Monday, 18 August 2025

कठीण काळ समोर : अमेरिकी निर्बंध .....

Whatsapp वरून खूप उथळ मजकूर समोर येतो. नुकताच एक मेसेज आला की कसे आपले पंतप्रधान प्रचंड मुत्सद्दी आहेत, कशा सावध आणि संयमी खेळ्या खेळत आहेत आणि ट्रम्प ह्यांची नाकेबंदी वगैरे करून ठेवली आहे. सोबत अगदि अभ्यासपूर्वक ( तो बेतलेली तत्वेच गन्डलेली आहेत ) प्रतिपादन केलेले आहे, घटनांचे. 

"Whatsapp मेसेज : कुठे गांभीर्याने घेताय" असं बोलायला ठीक आहे हो, पण ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे गांभीर्याने घ्यायला हवं. जबाबदारीने. प्रतिपक्ष म्हणून नव्हे.

तर पहिलं म्हणजे " हे काय किरकोळ आहे, आपला देश भारी आहे " किंवा "लोकसंख्या आपली ताकद आहे " वगैरे देशप्रेमाच्या स्वस्त संकल्पनांतून बाहेर पडून, प्रथम हे एक गंभीर आर्थिक आव्हान आहे हे स्वीकारायला हवे. कारणे सुद्धा तशीच आहेत.

अमेरिका हा सर्वात जास्त कर्जे घेणारा देश आहे, त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे Saving हे त्यांच्या खरेदी पेक्षा कमी असते, मग हा देश श्रीमंत कसा , असा बाळबोध प्रश्न नक्कीच पडू शकतो. बाळबोध ह्याकरिता म्हणतोय, कि एकंदरीत आपल्याकडे असलेली आर्थिक समज दारिद्र्य रेषेच्याही खाली आहे. आणि म्हणूनच वर दिलेल्या Whatsapp पोस्ट्स सहज, ज्ञान म्हणून खपतात, लोक त्यावरून हिरीरीने भाष्य करतात. 

तर कर्जे ही कशाकरता घेतली जातात हे महत्त्वाचे. आपल्यासारखा देश ही जगण्यासाठी, तरण्यासाठी घेत असतो, तर अमेरिकन नागरिक चैनीच्या गोष्टी, किंवा उपजीविके बाहेरील खरेद्या करण्याकरिता. मुळातच अमेरिकेतील गुंतवणूक ही खूप सुरक्षित आहे, त्यामुळे परदेशीय इथे गुंतवणूक करण्यात उत्सुक असतात. त्यामुळे ही कर्जे अमेरिका रणनीती म्हणून वापरते. स्वत:चे सर्व सुरक्षित ठेवून. त्यामुळे अमेरिकेला नाक वगैरे घासायची वेळ आपण नाहीच आणू शकत.

अमेरिका ज्या देशांकडून आयात करते, त्या देशांत भारत १० व्या स्थानी आहे. आणि आपण असे काहीही निर्यात करत नाही, कि ज्यांना पर्याय उभा राहू शकत नाही. उलट आपल्या काही क्षेत्रांना प्रचंड तडाखा बसू शकतो. पर्यायाने नोकऱ्या वगैरे जातील. 

आपण एकदम तडजोड करणेही शक्य नाही. भारताने इतर राष्ट्रांशी बोलणी सुरु केली आहेत, परंतु इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गोची मात्र झालेली आहे आपली. 

मुळात निकृष्ट दर्जा म्हणून हिणवल्या गेलेल्या चीन वरच आता अमेरिका अवलंबून आहे इतका कायापालट चीन ने साधला. आपल्याला नुसता अभिमान बाळगून नाही चालणार, तर कंबर कसून आपल्या शक्ती स्थळांवर नीती केंद्रित करावी लागेल.

सर्व ठिकाणी काळजी स्वरूप स्थिती असली, तरी भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात जलद आहे सध्याला. निर्बंध २७ तारखेपासून अंमलात आले, की ही इतकी उत्तम ह्यापुढ राहिलच असे नाही. 

अशा वेळी, एक व्यक्ती समूह म्हणून भारतीय उपखंड जो एक मनुष्य ह्या नात्याने ह्या सर्व पश्चिमी देशांपेक्षाही प्रगल्भ आहे ( हा दुराभिमान नाही ). खूप पूर्वापार आपल्याकडे संस्कृती नांदत आहेत. जो काही आततायीपणा केलाय, तो परकीय राजांनी. तर आपण आपला Stock घ्यायची गरज आहे. इतरांकडे न पाहता. दुर्लक्ष नाही म्हणणार मी, पण स्वयं विश्वास वाढवून. 

भारतीयांकडे व्यापारी वृत्ती उत्तम आहेच. सोबतीला इतका प्राचीन वारसा, ज्याचा आधार आपण ह्यापुढे पथदर्शक म्हणून ठेवावा, आणि इतके स्वत:च बलवान व्हायचा संकल्प सोडवा, कि तैवान किंवा कोरिया प्रमाणे जगच आपल्या कडे धावत येईल.

Thursday, 14 August 2025

घर बसल्या पुस्तके खरेदी करताना...

ऑनलाइन पुस्तके मिळत असतील, आणि ती सुद्धा वाट्टेल त्या विषयावर, बाजार न फिरता, अमेझॉन सारख्या वेबसाईट वरून, आणि अनंत ! तर का जावं प्रत्यक्ष दुकानात तरी ? शिवाय हल्ली त्या दुकान वाल्यांनी सुद्धा स्वीकारला आहे हा ट्रेंड आणि बऱ्याच मंडळींनी स्वतः च्या वेबसाइट्स केल्या आहेत आता.

वेळ घालवायचा असेल, छान बीन वाटत असेल, गवाक्ष खरेदी ( window shopping ) करायचे असेल, किंवा चक्क एसी ची हवा खायची असेल तर जावे खुशाल पण उगीच जुने विश्वास कवटाळून मी तरी नाही बसत.

ऐवजी, हल्ली नीट पुस्तके निवडून घ्यायला शिकलोय. सोबत ती वाचताना, अभ्यासपूर्ण असतील, तर काही विशेष गोष्टी सुद्धा अंगीकारल्या आहेत आता. तर पहिलं:- पुस्तके निवडताना :-

त्याच्या reviews वर जाणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण आधी पहा की किती reviews आहेत. निदान ( विषयानुसार ) १०० किंवा २०० तरी हवेत. जसे पुस्तक जास्त खपू लागते, तसे reviews वाढू लागतात. चांगल्या सोबत वाईट सुद्धा. 

तर दुसरे म्हणजे अमेझॉन बऱ्याच वेळा आधी वाईट अभिप्राय दर्शवते. आपण लेटेस्ट प्रमाणे क्रमवारी लावून पाहू शकतो. तर वाईट कशाला म्हटले आहे, ते बऱ्याच वेळा पुस्तकाच्या वापराशी संबंधित नसूही शकेल. उदा मी काही पुस्तके वाचत असतो खास करून finance ह्या क्षेत्रात. मी त्या मानाने नवखा आहे,त्यामुळे जी पुस्तके मी खूप भारी म्हणालो आहे ती एखाद्या पारंगत व्यक्तीला खूप बेसिक वाटू शकतात. हे नीट पाहा.बऱ्याचदा कमी पाने आहेत, वगैरे लिहिलेले असते. ह्यालाही विशेष अर्थ नाही. मुळात अगदी ४.० च्या खाली स्कोअर असलेली पुस्तके आधी नकाच निवडू.

पुस्तक वाचताना, मी स्वतः सोबत जेमिनी चा खूप आधार घेतो. अगदी शाळकरी मुलाप्रमाणे परत परत उत्तर नीट मिळेपर्यंत विचारणा करत राहतो. हे अत्यंत उपयुक्त ठरते.सोबत स्टुडिओ वर असेन तर चक्क प्रिंट्स काढतो, file करून ठेवतो.

एक नव्हे तर असंख्य बुकमार्क वापरतो. पुस्तक वाचताना उपयोगी पडतात. काही विशेष पानांवर असलेला संदर्भ फक्त त्याच्या index वरून समजत नाही. तर तो माझ्या अभ्यास वहीत चक्क त्याचा पान क्रमांक टाकून मला त्यातून कोणता प्रश्न उत्तरीत झाला किंवा नवीन काय समजलं  हे माझ्या भाषेत, बऱ्याच दा मराठीत ( पुस्तक इंग्रजी असेल तरीही ) लिहितो. हे कुठेही पोस्ट करण्यासाठी नाही तर मलाच कुठे चटकन संदर्भ लागला तर खूप उपयुक्त पडते.


Sunday, 10 August 2025

जागतिक अर्थकारण आणि माझा व्यवसाय : बरेच शिकण्यासारखे

सध्या जगाच्या आर्थिक पटलावर जरा जास्तच हलचल दिसतीये. त्यानिमित्ताने एक व्यावसायिक ( खरे तर एक गुंतवणुकदार ) ह्या नात्याने जाणवणाऱ्या काही गोष्टी :-

गुंतवणुकदार ह्या नात्याने संधी !

कदाचित रोखे बाजार बरेच खाली जातील. प्रत्येक खाली जाणाऱ्या पायरीवर काही शेअर्स थोड्या ( अगदी अत्यल्प ) प्रमाणात घेत राहण्याची संधी. ही गुंतवणूक हमखास वाढते, १५ -२० वर्षांत अनेक पट वाढू शकते. शेअर बाजार कायम वर जाण्यासाठीच जन्माला आलेला आहे. आणि आपण जरी नाही राहिलो, तरी पुढच्या पिढी करिता उत्तम गुंतवणूक आहे ही. नुसतं "मी उद्योजक" बिरूद मिरविण्यात काहीच मतलब नाही. 

बातम्यांना बळी पडायचे नाही 

अमेरिकन लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या शेकडो वस्तूंच्या किमती त्यांच्या आयात शुल्क धोरणामुळे वाढून बसतील. चैन सोडा हे म्हणणे जितके सोपे तितकेच अंमलात आणणे मुश्कील. त्यामुळे हे बाजार अमेरिका भीतीग्रस्त होतील, शेअर खरेदीची पुन्हा संधी देतील, आणि २०२६ च्या आसपास पुन्हा ठिकाणावर येतील. त्यामुळे कोणत्याही भीतींना बळी नाही पडायचे. 

ग्राहक , ग्राहकवर्ग विखुरायचे 

भारताने चांगलाच धडा घेतला असणार : एकूण पैकी फक्त अमेरिकेला होणारी निर्यात ६२ % टक्के आहे. ही विखुरायला हवी. हेच धोरण आपण आपल्या Segments अर्थात ग्राहक वर्गांबद्दल लागू करायला हवे. एकाच ग्राहकावर अवलंबून आपले उत्पन्न नको, एकाच Segment ग्राहक वर्गावर वर सुद्धा नको. 

मैत्री फक्त फायद्याशी !

विचित्र वाटेल ऐकायला, पण निष्कारण भावुकता उपयोगी नाही. वागण्याची रीत भात म्हणून ठीक आहे, पण एखाद्या व्यावसायिक संबंधांतून पुरेसा नफा निर्मित होत नसेल, तर त्यातून बाहेर पडणे केव्हाही चांगले. लवकरात लवकर. दिखाऊ मैत्रीला न जगलेले अमेरिकन अध्यक्ष ते पचवू शकतात, आपण नाही हे पंतप्रधानांनी जसे ध्यानात घेतले आहे, तसे आपणही अनेक व्यावसायिक संबंधांत समजून घेवून वेळप्रसंगी माघार घ्यायला हवी, आणि धूर्तपणे नावे भागीदार निवडायला हवेत. म्हणूनच आपले पंतप्रधान चीन, ब्राझील, रशिया ह्या देशांशी नव्याने जवळीक साधत आहेत. 

मुत्सद्देगिरी : एक आवश्यक कौशल्य  

प्रक्रिया लांबलचक वाटल्या, तरीही वाटाघाटी करण्याची तयारी आपण दाखवून द्यायला हवीच. ह्यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात. 


Saturday, 9 August 2025

आर्थिक वाटचाल Track करतोय का आपण ?

माझे एक मित्र श्री तेजस पाध्ये ह्यांच्या सोबत एक संवाद कायम रंगत असे : MSME वि Corporate. ह्यात तेजस छान छान मुद्दे मांडत असत. मोठ्या कंपन्यांच्या संपर्काच्या पद्धती आणि लहान लहान उद्योजकांच्या. किंवा फक्त उलाढाल मोठी झाली तरी दृष्टीकोन न बदलणे वगैरे .....

मी हल्ली हल्लीच खूपशा शेअर मार्केट वर नोंदीत ( म्हणजेच ज्यांनी भाग भांडवल हे तुमच्या आमच्या कडून उभारलेले आहे अशा ) कंपन्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. आणि समांतरपणे लहान लहान उद्योजक ह्यांच्यासोबत तर पूर्वापार मी काम करतच आलेलो आहे. मला जाणवते कि, नोंदणीकृत कंपन्या दर तीन महिन्यांना आपले निकाल जाहीर करीत असतात : नव्हे - त्यांना ते कायद्याने बांधील आहे. ह्या जाहीर करण्यात येत असलेल्या निर्णयांचा आकृतिबंध पाहिल्यास लक्षात येतं कि प्रत्येक महिन्यास काही अति महत्त्वाचेच निर्देशांक त्या प्रदर्शित करत असतात. 

हे निर्देशांक आहेत हे विसरायला नको. म्हणजे ह्याच्या अंतरंगात खूप प्रकारचे संदर्भ, त्यांची त्या त्या वेळेची चोख नोंद वगैरे खूप काही अस्तित्त्वात असायलाच लागते. म्हणजे इतक्या प्रकारे एखाद्या कंपनीची विचारणा होऊ शकते आणि त्यांना त्या त्या वेळी त्या त्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देणे भाग असते, तरच त्यांची प्रतिपादने, विधाने, निकाल, परिणाम इत्यादी सिद्ध होऊ शकतात. प्रत्येक भागधारक हा त्या कंपनीचा "मालक" असतो, आणि तो प्रश्न करायला अधिकृत असतो.

तर काही आकडे उदा निव्वळ नफा एखाद्या वर्षी कमी दिसला आणि ताळेबंदा तून असे दिसून आले, कि कंपनीने इतर काही उद्योगांत गुंतवणूक केलेली आहे, तर आधी तर अंतर्गत व नंतर बाह्य auditor ला उत्तर द्यावे लागते कि ह्या मागे काय लांब किंवा नजीकच्या पल्ल्याची भूमिका आहे ते. आणि ह्यानंतही भाग धारकांना उत्तर द्यावे लागू शकते.

थोडक्यात काय, तर मनाला येईल तसे निर्णय ( कृतींचे ) ह्या कंपन्यांना बदलता येत नाहीत. 

इथे लहान उद्योजक संपूर्णपणे विरुद्ध वागतात. सारखे निर्णय बदलत असतात. Tracking करत नाहीत. त्यामुळे परिणाम हे अशाश्वत मिळतात. संपत्ती वाढत नाही. 

निऊ ने उचललेले एक प्रमुख पाउल 


ही प्रमुख बाब लक्षात घेवून निवडक उद्यमी चे सदस्य सध्या दर तीन महिन्यांनी भेटतात, त्यांच्या वाटचालीचा छोटेखानी अहवाल एकमेकांसमोर ठेवतात, पुढील कृतीबद्दल चर्चा करतात, मागील कृतींच्या परिणामांची सखोल चर्चा करतात, एकमेकांना एक संचालक मंडळाप्रमाणे बदल वगैरे सुचवतात. 

उद्योग साम्राज्ये अशीच उभी नाही राहत, त्यांच्या मागे ही मानसिकता विकसत करावी लागेल !


Thursday, 7 August 2025

उद्योग = अनिश्चितता

अनिश्चित असतो तोच तर उद्योग. आता नुकत्याच घडलेल्या काही घटना पाहिल्या तर हे लगेच लक्षात येईल.

१. सरकारने अचानक बदललेले सौर ऊर्जा धोरण. ह्याबद्दल ऑलरेडी दोन लेख झालेत

२. अमेरिकेने अचानक लादलेले अतिरिक्त आयात शुल्क.

ह्या घटना बघितल्या तर त्या त्या उद्योगांवर होणारे निकटचे तसेच दूरगामी परिणाम लक्षात येतील. अनेक उद्योग कदाचित बंद देखील पडू शकतील.

करार मदार : सावधपणे घेऊयात !


"डोळस" पणे हा शब्द अधिक संयुक्तिक आहे. ट्रम्प महाराज तिकडे आयात शुल्क वाढवत असतानाच ब्रिटन व भारत करार झालाय. आपल्या देशाच्या नेतृत्वाला भारतीयांना नव्या संधी उपलब्ध करून देणे भागच आहे. त्यामुळे अमेरिकेची बाजारपेठ जर का लांब पल्ल्यासाठी अशीच अनिश्चित राहिली तर निदान इतर देश तरी बांधून ठेवायलाच हवेत. ब्रिटन ने देखील ही अगतिकता ओळखून आपल्या scotch बाटल्यांवरील भारतातील आयात शुल्क ५० टक्क्यांनी कमी करून घेतले आहे. ब्रिटन च्या scotch निर्यातीपैकी ९० टक्के निर्यात भारताला होते. त्यामुळे त्यांना ह्या कराराचा जास्त फायदा होणार आहे.

तरीही समांतर पणे विचार करता अनेक वस्तू जसे की चामडी वस्तू, रसायने, पादत्राणे, रत्ने , दागिने, कापड आणि कोळंबी तसेच सेवा ह्यांवर ब्रिटन शून्य टक्के आयात कर लावेल. ही सुद्धा एक उत्तम संधी आहे. कारण नेमक्या ह्याच वस्तूंना अमेरिकेच्या धोरणाने फटका बसला आहे.

ह्यामुळेच डोळस हा शब्द वापरला. असो. तरीही, लवकरात लवकर आवश्यकता आहे, ती एक "गुंतवणूकदार" होण्याची.  

म्हणजे करायचं इतकंच, की स्वत:च्या व्यवसायासोबत  थोडी थोडी गुंतवणूक इतर व्यवसायातही करायची, जे कदाचित भरभराटीला येतील.एक पूर्वीचा लेखांक पहा 

कारण स्वतःचा उद्योग अनिश्चित असला तरीही स्वतःचे आर्थिक स्रोत तर शाबूत ठेवावेच लागतील !

Wednesday, 6 August 2025

ह्या अचानकतेला तयार रहायलाच हवे !

जुगाड हे पुस्तक सध्या वाचनात आहे. त्यात विकसनशील देशातल्या ( प्रामुख्याने भारत ) उद्योजकांच्या संशोधना बद्दल भरपूर लिहिले आहे, ज्याचा प्रमुख सूर असा आहे, की विपुलते ऐवजी कमतरतेतून  हे संशोधन घडत असते. ह्यात "अचानक बदलणारी शासकीय धोरणे " हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे उद्योजक अशा बदलत्या परिस्थितीसाठी अत्यंत सरावलेले असायलाच हवेत. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपल्याकडे तुलनेने किंचित कमी अनिश्चितता आहे, किंवा लोकप्रतिनिधी आणि पर्यायाने सरकार तितके बेदरकार नाहीये.

वरकरणी मनमानी वाटत असली तरी सरकारी अथवा निमसरकारी संस्था तितक्या मनमानी किंवा जुलूम करीत नसतात. हे म्हणायला कारण घडलं ते म्हणजे वीज मंडळाच्या सौर ऊर्जेची सवलत मर्यादित करण्याचा निर्णय. ह्याबद्दल एक लेख पुर्वी लिहिला आहे,तो जमल्यास जरूर पहा

थोडक्यात ताज्या अधिनियमानुसार, ज्या कारखान्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केल्याचा १०० टक्के परतावा मिळत होता, तो आता फक्त सकाळी नऊ ते पाच ह्या वेळेतच मिळेल. 

हा नियम थोडा जाचक वाटतो,त्याबद्दल थोडे स्पष्टीकरण :- 

१. निर्माण झालेली वीज साठवण्याची क्षमता ( बॅटरी ) मंडळाकडे पुरेशी नाही.सुरुवातीला सौर द्वारे निर्मिती कमी व्हायची ती आता खूप वाढली आहे. 

२. पुर्वी सौर ऊर्जा निर्मात्यांकडून रु १५ ह्या दराने खरेदी केली जाणारी वीज आता रु ३ ह्या दराने घेतली जाते कारण प्रगत झालेली उपकरणे. निर्मात्यांना अत्यंत कमी दराने हे निर्माण आता शक्य आहे. तरी मंडळाच्या म्हणण्यानुसार ९ ते ५ मध्येच हा दर मिळतो, इतर वेळी १० ते १२ रुपये दराने वीज "बाजारातून" विकत घ्यावी लागते म्हणे. ( हा "बाजार" नक्की कुठला, कुठे भरतो तो ?  पुन्हा रु ३ ने खरेदी आणि रु ७ - ८ ने विक्री, उद्योगांना १५- १६ ने हे गणित फायद्यात न उतरायला मंडळाचा आदर्श कारभार हा देखील एक मुद्दा आहेच. ह्याला आव्हान नाही.कारण मुरलेली नोकरशाही.)

३. असे जरी असले, तरीही १० MW खालील म्हणजे शक्यतो घरगुती ग्राहकांना मात्र सवलत पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहे. ह्या आर्थिक ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे, ह्यावर नेहमीचा सरकारी भीमटोला. धरा उद्योगांना वेठीला. 

४. इतर राज्ये असेच करतात, मग आम्ही का नको ? ह्या न्यायाने पंजाब,राजस्थान गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र देखील री ओढत आहे.

सदर लेख सकाळ मध्ये ६ ऑगस्ट च्या मुख्य आवृत्तीत सापडेल. मी आमचे स्नेही श्री शशिकांत वाकडे जे सोलर उद्योगात अनेक वर्षे आहेत त्यांचेही मत ह्याबद्दल जाणून घेतले, त्यानंतर ही पोस्ट लिहिली आहे.

लेखक देखील माझ्या तात्पर्याशी सहमत असावेत. 

ह्यातून बॅटरी निर्माण व तत्सम उद्योग उभा करण्यासाठी भविष्यात चांगली संधी आहे हे दिसत आहे. परंतु पुन्हा तेच :- 

की ह्यातही आव्हाने येऊ लागल्यास सरकार स्वतः ची अंतर्गत कार्यक्षमता वाढवणे हे कधीही करणार नाही हे उद्योजकाने गृहीत धरून चालावे. तोच खरा गुंतवणूकदार - उद्योजक.



Sunday, 3 August 2025

तुम्हाला हे चालेल का ?

आजच मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या ठिकाणी "पंचम पुरीवाला" येथे जावून आलो. आज चा अनुभव तितकासा बरा नव्हता, किंवा अनुभवाने माझे भिंग जरा अधिक तीव्र होत चालले असावे. 

पहिलं म्हणजे इथे queue होता.नेहमी सुद्धा इथे गर्दी असतेच, पण पोटभऱ्या मंडळींची. आजची गर्दी कुतूहल असणाऱ्यांची, एकदा जावून बघू म्हणणाऱ्यांची आणि फूडी मंडळींची देखील. हे reels वगैरे ने वाढणारे ट्रॅफिक. VT म्हणजे आताचे CSMT किंवा CST च्या  GPO बाजुला उतरलो, की समोर पेरीन नरिमन अर्थात बाझार गेट स्ट्रीट च्या अगदी तोंडाशी हा पंचम आहे.

अनेक वर्षे आहे. पुरी आणि सोबत अनेक प्रकारच्या भाज्या आणि अत्यंत रास्त दरात, हे वर्षानुवर्षे मिळत आहे इथे. चव सुद्धा व्यवस्थित. व्यवस्थित इतकंच म्हणतोय, कारण इथे येणारा काही foodie अपेक्षित नाही. स्वस्तात चांगले जेवण हाच ह्यांचा व्यवसाय आत्मा. 

ते अजूनही मिळत आहेच. सोबत काही अनिष्ट गोष्टी पहिल्यांदाच आढळल्या. उदा :- स्टील च्या वाट्या न देता, कागदी. तसेच लाकडी चमचे ज्यातून पातळ भाजी खाताच येत नाही. किंवा स्वच्छतेच्या नावाने संपूर्ण बोऱ्या वाजलेला आहे. साफ सफाई करणारे कर्मचारी तर टेबलावरील खरकटे सरळ खाली ढकलून देत होते. त्यामुळे खूप घाण, अस्वच्छ, असुरक्षित देखील वाटले.

स्वस्त देणे म्हणजे असे करावे असे काही नाही

नुकताच कोइंबतूर येथे गीता हॉटेल नामक अत्यंत स्वस्त, तरीही कमालीच्या स्वच्छ व संपूर्ण प्लास्टिक विरहित उपहारगृहात जायचा योग आला. पुण्याचे बादशाही देखील ह्या प्रकारात मोडते.

धंदा वाढतोय,तो कराच.परंतु काउंटर सोडून मालक मंडळी कधी प्रत्यक्ष जिथे धंदा चालतो तिथे जाऊन पाहतील आणि स्वतः लाच प्रश्न विचारतील, की मला हे चालेल का ? तरच बदल घडेल. नाहीतर लोकप्रियता रसातळाला लागण्यात कितीसा वेळ लागेल ?

कॅफे गुडलक चे आपण नुकतेच काय झालं आहे हे पाहिलेच ! मला वाटतं की सुरुवातीला गरज म्हणून निवडलेला व्यवसाय एकदा स्थैर्य देवू लागला, की जोर पकडतो,वाढतो, आणि खूप पैसेही मिळू लागतात. अशा वेळी लागेल ते भान. सुरुवातीला नाही जाणवले तरी एखादा फटका, झटका बसल्यावर तरी किंवा स्वतः ला जाणवले तरीही हा बदल घडून येऊ शकतो, आणि संभाव्य हानी टळू शकेल.

Friday, 1 August 2025

लोहमार्ग : मुंबई चा खरा प्राणवायू

( मी स्वतः जन्माने मुंबईकर असल्याने मला मुंबई लोकल्स प्रकाराची व्यवस्थित माहिती आहे, ही आधीच कबूली देतो )

तर सांगायचं असं, की आता एक अ मुंबैकर म्हणून ( गेले २७ वर्षे मी मुंबईकर नाही ) मुंबईत येतोय, अगदी तसाच मी प्रमुख मेट्रो शहरांत म्हणजे कलकत्ता, दिल्ली, चेन्नई मध्ये तर अर्ध मेट्रो शहरांत उदा बंगळूर, हैदराबाद आणि ह्याच्या किंचित खाली म्हणजे पुणे, अहमदाबाद, सुरत, नागपूर इत्यादी शहरांमध्येही फिरत असतो. अर्थात कामाच्याच निमित्ताने.

मुंबईत तर परिचयाचे असल्याने, आणि आता दिल्ली, चेन्नई आणि कलकत्त्यात देखील मी लोकल किंवा मेट्रो ह्या मार्गेच फिरून कामे करतो. अतिशय चोख असा हा साथीदार आहे. गर्दी फिर्दी जरा धरून चालायचे. तर ह्यासारखा वेळेत आपल्या गंतव्य ( हा शब्द सुद्धा रेल्वे नेच शिकवला  ) स्थानी पोचविणारा दुसरा साथीदार नाही. अगदी आधीपासूनच पुणे मुंबई प्रवास सुद्धा माझा मार्ग म्हणजे लोहमार्ग. शक्य नसेल तरच रस्त्याने.

हल्ली पुण्यात मेट्रो झालिये पण पुणेकर आणि चटकन कामे मार्गाला लावण्याची नॅक असलेला मुंबईकर ह्यांच्या वर्तणुकीत असलेला प्राथमिक फरक हा देखील रेल्वे मुळेच आहे. त्यामुळे अगदी मुंबईत येऊन राहिला नाहीत, तरी लोकल वापरायचे कुतूहल जागृत करा. शिवाय चालणे आपोआप होतेच. १० हजार पावले ही मुंबईकर व्यक्ती करिता अत्यंत किरकोळ बाब आहे.


Wednesday, 30 July 2025

अनुत्पादक वार्षिक सोहळे

काल २९ जुलै. टाटा ह्यांचा जन्मदिवस साधून काही संस्थांनी समारंभ ठेवले होते, ज्यात सर्वोत्कृष्ट उद्योजक नामक पुरस्कार, आणि जोडून एखाद्या प्रथितयश व्यक्तीचे भाषण असे साधारण स्वरूप होते.

आता पुन्हा मी अशा कार्यक्रमांना न जायचे ठरवले आहे. कारण त्यात येणारा विदारक अनुभव. 

दोन्ही कार्यक्रमांत, ज्यांचा सत्कार केला गेला, त्या त्या उद्योजकांना ना बोलू दिले, ना त्यांच्या उद्योग प्रवासा बद्दल काही माहिती. उद्योजक सुद्धा अशा उथळ पुरस्कारांना पूर्ण भुललेले असतात असेच दिसत आहे. त्यामुळे ज्या करिता गेलो होतो ते एक कारण तर संपले.

दुसरे म्हणजे प्रमुख वक्ते जे काही सांगतील ते. दुर्दैवाने एकात एक मंत्री होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तिमित करणाऱ्या शैलीने तसेच अत्यंत प्रभावी अशा नम्रपणे वारंवार आयोजकांना खुष करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

दुसऱ्या कार्यक्रमात एक प्रथितयश उद्योगपती होते, ज्यांनी स्वतः चा PR अत्यंत कसब दाखवून करून घेतला, जोडीने खुपशी आश्वासने दिली. अशी मंडळी नंतर अजिबात भेटत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे ही देखील एक अत्यंत अंधुक अपेक्षा. 

दोघांच्याही कडून तसे काहीच विशेष विचारधन नाही मिळू शकले. भोजने वगैरे होतीच. अर्थात मी त्याकरता जात नाहीच. राहिला भाग नेटवर्किंग चा. त्याबद्दल देखील माझे आता वेगळेच मत तयार झालेले आहे. ते पुन्हा कधी.

तात्पर्य असे, की जे ऐकायला गेलो होतो, ते सोडून दोन्ही संस्थांनी मला पहा आणि फुले वाहा असाच सर्व प्रकार केला. त्यामुळे असल्या कार्यक्रमांना आता फुली.

Monday, 28 July 2025

माझे वेळापत्रक नव्हे.. "ऊर्जा पत्रक"


सोबतचे छायाचित्र आहे २७ जुलै च्या  सकाळ सत्परंग मधील. पान २ वरचे. वीणा वर्ल्ड च्या  वीणा पाटील ह्यांच्या "किचन आणि टॉयलेट" ह्या लेखातील. 

ह्या लेखात अजूनही छान संदर्भ सापडतील, तरीही आपल्या विषयाला धरून हे समर्पक वाटलं.

वीणा ह्यांनी सकाळची वेळ ही सूचित केली आहे, ज्यात त्यांना नवीन उपक्रमासाठी आवश्यक अविचलित एकाग्रता सापडलेली आहे. ह्यावेळी त्यांची ऊर्जा देखील सर्वोत्तम असते.

मी माझ्या वेळापत्रकाला आता ऊर्जापत्रक असे संबोधायला सुरुवात केली आहे. आणि "वेळेचं व्यवस्थापन" ह्या कालबाह्य संकल्पनेतून खरेच बाहेर पडण्याची गरज आहे आता. 

एक गोष्टीची कबुली : की शेवटी आपण वेळच तर manage करतो ना;  मग कशाला ही नवीन फंडूगिरी ?

META ची संकल्पना 

हे डिजीटल विश्वातील meta नाही. तर मी माझ्यासाठी केलेले एक सूत्र. कोणताही वेगळा विचार अंमलात आणताना काही गोष्टी द्याव्याच लागतात. त्या म्हणजे META.

M = Money
E  = Energy 
T  = Time 
A  = Attention 

ह्यातील Money, Time ह्या गोष्टी आवर्जून द्याव्या लागतात. पण Energy म्हणजे ऊर्जा मात्र खर्ची पडते. आवर्जून न देताही. ही स्वतः ची कल्पक ऊर्जा म्हणतो आहे मी. ही माझीच असते. ही सर्व ऊर्जा म्हणजे सर्जनशील, धैर्यशील, तुलनात्मक वगैरे मूल्यमापन करणारी मेंदूची शक्ती. आत्मशक्ती. 

माझाच नवीन प्रकल्प असल्याने ही ऊर्जा माझीच जात असते, आणि मलाच लावावी लागेल,लागते. ह्यात काहीच करता येत नाही. ही पुन्हा भरूनच काढावी लागते. आपण बऱ्याचदा म्हणतो की .... फुकट वेळ गेला यार! 

हे दुःख वेळ गेल्याचं कमी, आणि आता पुन्हा सगळं नव्याने करावं लागणार ह्याचं अधिक असतं. त्यामुळे अशी वेळ कमीतकमी यावी ह्याकरता आधी आपलं Attention म्हणजेच व्यवधान कुठे ठेवायचं हे ठरल्यास बहुमोल फायदा होतो. 

म्हणून ऊर्जापत्रक.

ऊर्जापत्रक म्हणजे :- 

# कमी गोष्टींचा संकल्प करणे 
# कोरडी शिस्त टाळून आनंदावर भर देणे
# ऊर्जा खाणाऱ्या गोष्टी हळूहळू नामशेष करणे
# आणि ह्यानुसार क्रमवारी करत वेळेची आखणी करणे.

रोजचे नियोजन नव्हे 

आपल्याला कॅलेंडर शी खेळायला जाम आवडतं. आणि मज्जा येते. करुयात. पण रोज प्रत्येक दिवशी हे व्हायलाच हवं असं नाही. उदा: एखादा लेख किंवा blog किंवा व्हिडीओ करायचा ठरवला, तर नेम नका लावू सुरुवातीला. किंवा चालायला जायचं ठरवलं, तर रोजच चालायला हवं असं काही नाही. कोरडी शिस्त जर तुम्हाला प्रेरित करत असेल तर त्यात पुन्हा मानसिक शक्ती म्हणजे ऊर्जा खर्च. 

जेव्हा वाटेल, तेव्हा विचार करून पहा.. "आत्ता लिहून पाहावं का ? व्हिडिओ ला  मस्त मूड आहे, करू का ?" आतून "हो" आलं, की झालं. करायला सुरू करा, जमेल तितकेच करा. अट्टाहास नको. 

स्वतः चाच ट्रेंड पहा ...

अशा पद्धतीने करा. फक्त व्यवधान राहू दे. आपलं ध्यान इकडे तिकडे भटकू द्यायचं नसेल तर व्यवधान म्हणजे Attention कुठे ठेवायचं हे आठवा. ते तुम्हाला दर्शक ठरेल. काही काळ स्वतः ला द्या. निष्कारण मोजमाप नको. आपला आपल्याला अंदाज येतो, आणि तो दाखवतो की अमुक गोष्ट मला अमुक कालावधीत किती वेळा जमते.साधारण ठरवा. की आठवड्यातून, पंधरवड्यातून मी दोन लेख लिहू शकते, किंवा आठवड्यात साधारण दोन दिवस मी संध्याकाळी ३० मिनिटे चालायला जाऊ शकतो किंवा आठवड्यातून एक व्हिडिओ मला तयार करता येईल वगैरे.

अतिरिक्त, जास्तीचे ध्येय नको 

सगळ्या जगाचाच हा रेटा असतो, की पहिल्या ३ महिन्यांत घेतलेल्या ध्येयापेक्षा आता जास्त वगैरे. हे पूर्ण टाळा. आपले उद्दिष्ट हे आहे, की जास्त काळ आनंदाचे काम आनंदाने करत वेळ जायला हवा आहे. त्यामुळे काहीच काळ एखादे काम करण्यापेक्षा एक आनंदाचा शाश्वत मार्ग शोधणे. त्यामुळे 

मोजके करू, 
जे आपोआप कायम, सहज, 
आत्मशक्ती न लावता होत राहील.

कंटाळा आला तर चक्क थांबा.

लिहिता लिहिता खूपच कंटाळा आला तर थांबा. ब्रेक घ्या. मध्येच WhatsApp तपासा. पण त्यात गढून जावू नका. घरातले एखादे काम करा. उदा. पत्नीला, स्वतः ला चहा करणे, वगैरे. परत बसा. तरीही नाही वाटले, तर सोडून द्या. फिर कभी.

प्रेरक वाटला विचार तर करून पहा, तुमचा काही वेगळा विचार असेल तर कमेंट मध्ये जरुर कळवा.

Saturday, 26 July 2025

मी माझ्या व्यवसायात नक्की कुठे आहे ?

काल परवाच एका व्यावसायिक मित्राची भेट झाली. छान आहे म्हणाला व्यवसाय. पण खूप धावपळ आहे, असणारच, असेही म्हणाला.

ठीकच..माझे मोघम उत्तर.

"मला काहीच दिवसांपूर्वी चेहऱ्यावर पक्षाघाताचा झटका येऊन गेला" असे नंतर म्हणाला. 

आता मात्र माझे विचारचक्र सुरू झाले. काही होणे हे तसे फारसे आपल्या हातात नाही. तरी त्यानंतर आपण त्यातून शिकून आपले काय चालले होते, आणि आहे हे त्याप्रमाणे बदलू शकतो नक्की. 

सदर व्यावसायिकाचे आर्थिक गणित तसे ठीकठाक आहे. कधी कधी नाही हो तितकं असं आपल्याला वाटू शकतं. पण ते नक्की ठीक असतं. "सुखी माणसाचा सदरा" हे करुणा गोखले अनुवादित पुस्तक वाचा. उलगडा होईल. 

चर्चा पुस्तकाची नाहीये, तर आपल्या व्यवसायाचा आणि जोडून असलेल्या आपल्या आयुष्याचा आपण लेखाजोखा अवश्य घेतला पाहिजे, असे कळकळीने वाटते.

तर वरील व्यावसायिकाच्या बाबतीत, त्याने प्रचंड धावपळ करणे हे तरी निश्चित कमी करता येईल. थोडा धंदा कमी झाला तरी चालतंय. आणि हा कमी झालेला धंदा जास्त प्रमाणात वेळ उपलब्ध करून देईल, जो स्वतः वर अवलंबून नसलेल्या वाटा सुचवेल, शिवाय शारीरिक तंदुरुस्ती कडे काम करण्यास प्रवृत्त करेल. अशा वेळी तर निश्चितच आपला व्यवसाय आपल्याला आवश्यक बाबी सोडून किती काम करायला लावतो हे नक्की पाहायला हवं. शिवाय आपला कृतिशील व्यवसाय म्हणजे आपण फक्त एकच व्यवसायात सगळी गुंतवणूक करत आहोत.

पुन्हा सांगतो :- शारीरिक तंदुरुस्ती अधिक आयुष्य लाभण्याकरिता नाही. तर प्रत्यक्ष त्यातून खूप छान वाटते, आणि "सतत आपण काहीतरी करायला पाहिजे" ह्या सापळ्यातून  आपण मुक्त होऊ शकतो. ही खरी सुरुवात आहे. वेगळी वाट चोखाळायची.

तर कधीही विचार केला नसेल तरी काही आर्थिक विवरण करणाऱ्या गोष्टीचा अभ्यास स्वतः च करा. गेले २ ते ३ वर्षे मी हे करत आहे आणि त्यातून मला समांतर मार्ग मिळाला आहे असे मी म्हणेन, जो मला शांत करतो, शारीरिक तंदुरुस्ती कडे प्रवृत्त करतो, आणि एक समांतर अर्थ व्यवस्था उभी करून देत आहे.

सोबत अगदी मूलभूत अशा ताळेबंदाचे चित्र जोडले आहे, जे आपल्याला जे जे सांगू शकते ते ते उद्धृत केले आहे. त्यातले owners/shareholders हे अगदी समजण्यासारखे आहे. कारण ते आपण स्वतः च आहोत.

Friday, 25 July 2025

सातत्यपूर्ण सेवा

" भाजी कोणती देवू आज ? " 






गेली पंचवीस वर्षे ही हाक मी दरवाज्यात ऐकली नाही असे कधीच झाले नाही. ह्याचे कारण श्री व सौ ढेकणे हे स्वत: प्रत्येक घराच्या दाराशी येवून, बेल वाजवून विचारतात, समोर भाजीची टोकरी असते. भाज्या उत्तम, रास्त दरात वगैरे असतातच. तो प्रश्न नाही. 

पण हल्ली whatsapp च्या जमान्यात हे , इतक्या कमालीच्या सातत्याने किती मंडळी करतात ? जरी लिफ्ट असली, तरीही उतरताना हे उपलब्ध साधन नाहीये. 

महत्त्वाचे असे, कि कोणत्याही मार्केटिंग शाखेचे कोणतेही खास प्रशिक्षण न घेताही त्यांनी ही गरज बरोब्बर हेरली आहे. हाच त्यांचा USP.

तुमच्या सातत्याला सलाम !

Thursday, 24 July 2025

स्पष्ट नकार म्हणजे शिष्टपणा नाही

आजचीच ताजी ताजी घटना....

एका व्यक्तीने काल मला ते काय करतात ते (कळत नव्हतं नीट) एक व्हॉट्सॲप संदेशमार्फत पाठवलं. पाठोपाठ घडून आलेल्या छोटेखानी संदेश आदान प्रदानातून आम्ही कोणत्या ग्रुप मार्फत एकमेकांना ओळखतो ह्याची खात्री पटली.

दरम्यान आज सदर व्यक्तीचा दुसरा संदेश. त्यात affiliate marketing बद्द्ल लिहिले होते, ज्याचा त्यांनी सांगितलेल्या बिझनेस शी तसा भासमान संबंध नाही आढळला. मी त्यांना स्पष्ट फिरून विचारलं की "आपण नक्की काय करता ?"

( प्रत्येकाकडे स्वतः विषयी नेमकं सांगायचं कौशल्य नसू शकतं.किंवा सुरुवात करताना नव व्यावसायिक अनेक वाटा हाताळून पाहत असतो, तेव्हा देखील असे होत असते.)

सदर व्यक्तीने जे सांगितलं, त्यात एक विशिष्ट उल्लेख केला, जे मला वाटलं की माझ्या कामाचे असेल. म्हणजे त्याची सेवा मी त्या विशिष्ट उपयोगासाठी जसेच्या तसे सुचवू शकेन. परंतु त्यांची सेवा ERP ही ज्या विशेष वापरासाठी आहे त्यात माझ्या मनातला वापर नव्हता. तरी हे संभाषण सुरु असतानाच त्यांनी " सर फोन करतो, बोलू सविस्तर " असे उत्तर पाठवले.

ही धोक्याची घंटा 

ह्यात खूप वेळ जातो, त्यामुळे मी त्याला स्पष्ट, परंतु नीट कळवून टाकले की बाबा, माझ्याकडे सरळ सरळ अशी requirement नाही त्यामुळे फोन करू नकोस. ह्यात खूप वेळ जाऊ शकतो. अर्थात हे सापेक्ष आहे म्हणा. तरीही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर अनेक ठिकाणी आपला जाणारा वेळ, आणि पाठोपाठ जाणारी ऊर्जा, पैसे ह्याचा विचार करणे नक्कीच उपयुक्त !

हा शिष्टपणा नाही 

उगाचच आढ्यताखोर आविर्भाव ह्यात नाही. तर पुढे जावू शकणारा दोघांचा वेळ वाचविणे हा उद्देश आहे. तरीही मी त्याला फोन करू नको , पण चहा करिता कधीही भेट ठरवू शकतो असे निश्चित सांगितले आहे.

पाहुयात आता 



Sunday, 20 July 2025

Indiamart हे लौकिक अर्थाने सर्च इंजिन नव्हे !

सर्च इंजिन म्हणजे काय ? तर लोकांच्या मनात असलेल्या शोध मोहिमेत त्यांना मदत करणारे. वरकरणी दिसताना असंच भासतं कि हे एक उत्तम सर्च इंजिन आहे. निदान ज्या प्रकारे त्यावर माहिती टाकलेली दिसते, त्यावरून तरी. पण प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केलीत, की अत्यंत चीड येवू लागते.

तुम्हाला हवं ते निवांत पाहण्याची, त्यातून शिस्तीत, आरामात काहीच निवडण्याची सोय नाही. सारखे सारखे pop ups टाकून हैराण मात्र करत असतात. 

थोड्या फार फरकाने just dial ह्याची सुद्धा वेगळी कथा नाही. 

कसे असायला हवे ?


आपण गुगल वर एखादा व्यवसाय शोधात असतो, त्यात त्या त्या व्यवसायानुरूप साधारणपणे सर्व मानक दिलेले असतात. त्यावरून आपल्याला सहजपणे निवडता येतं. 

👉हे ह्या websites वर नाही. हे सोपे का होऊ नये ? 

ग्राहकाला चटकन काही सप्लायर बाजूला वेगळे काढून ठेवता यायला हवे, त्यांना संपर्क साधणे सहज हवे. हे काहीही नाही. तर India Mart त्यांच्या लिस्टिंग करणाऱ्यांत चढा ओढ लावते , आणि लाभार्थींचा व्यवसाय वर ढकलते. 

⛔हे नसायला हवे. तुमचा मूळ उद्देश ( स्व धर्म ) हा लोकांना लोकांचे शोध पटकन मिळवून देणे हा असायला हवा आणि पर्यायाने तो platform देखील ✔

स्वधर्म म्हणजे व्यावहारिक नाही असे अजिबात नाही 


जेव्हा BNI सारखी एखादी संस्था Selling, किंवा lead generation wing स्थापन करण्यासाठी नाही म्हणते, तेव्हा स्वधर्म च पाळत असते. टेल्को म्हणजे आताची टाटा मोटर्स इंडिका V2 चे दोषकारक बम्पर स्वखर्चाने बदलून देते, ती स्वधर्म च पाळत असते

ह्या रूपकाने एखाद्या माशिनेरी शोधणाऱ्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या मापदंडा अनुसार मशिनरी चे जास्तीत जास्त पुरवठादार कमीत कमी वेळात समोर आणून देणे हा indiamart सारख्या website चा स्वधर्म का असू शकत नाही ?

Wednesday, 16 July 2025

तक्रार :- प्रगतीची उत्तम संधी

आपापल्या व्यवसायात तर असतेच, आणि शिवाय विविध ग्रुप्स ना देखील सभासदांच्या तक्रारी ही एक मोठी संधी असते, आपली वाटचाल तपासून पाहण्याची.

ग्रुप ची " मालकी " नाही.

नेतृत्वाने हे "ही काय कटकट" असे न पाहणे ही पहिली आवश्यकता असते. मुळात ग्रुप म्हणजेच लोकांचा समूह. अगदी मी स्वतः सुरू केलेला असला तरीही मी त्या ग्रुप चा "मालक" किंवा स्वामी नाही. कारण मुळात जे त्यात सामील झाले, त्यांच्याही मनात त्याच भावना होत्या, त्या फक्त मी छेडल्या असतील. एखाद्या संस्थेचा देखील हा एक ग्रुप असेल,त्याचे तात्पुरते नेतृत्व तुमच्याकडे आलेले असेल. तरीही तुम्ही त्याचे सर्वे सर्वा नाही. हे लक्षात ठेवायला हवे. स्मरण हवे. 

सदस्य मंडळी जे काही व्यक्त करतील ते कदाचित आपण ठरवलेल्या मार्गात अडचणीचे असू शकेल. पण त्याचा कटकट असा विचार करता कामा नये. तर मेंबर काहीतरी वेगळे म्हणत असू शकेल हा आस्था दायक विचार आधी हवा.

कदाचित व्यक्तिगत जरी बोलले गेले तरी ते आपल्या पदाच्या दिशेने असेल, त्याच्या अधिकार क्षमतेच्या क्षेत्रात बसणारे. तुम्हाला उद्देशून नाही. असा विचार लाभदायक ठरेल.

एकदा का हा वैचारिक पाया पक्का झाला, की मग चक्क एक विशेष बैठक ह्याच कारणास्तव घ्यावी. आरोप प्रत्यारोप असे स्वरूप न येऊ देण्याकरिता प्रत्येकाच्या मताचा यथोचित मान ठेवून कोणतेही मत प्रदर्शित करावे, करायला संबोधन करावे.

प्रत्येक गोष्टीतून शिकताच येते

नुकतंच एका वेब सिरीज मध्ये एक काल्पनिक प्रसंगात आई आणि मुलगी एकच चित्रपटात सोबत काम करायला तयार नसतात. तर त्यांचे वाद प्रतिवाद घडायला लागतात. लेखक दिग्दर्शक एकच असते : फरहा खान. ती त्यांना चित्रपटात घेत नाही, परंतु त्यांच्या वाद प्रतिवादातून तिला तिच्या पुढच्या कथेची थीम मिळते.

असाच थोडासा दृष्टिकोन नेत्याला ठेवायला लागतो. प्रत्येक इशू काहीतरी शिकवत असतो.

Tuesday, 15 July 2025

उद्दिष्टाचे स्मरण : प्रगल्भतेचे मानक

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात काल भारताची हार. बरंच शिकण्यासारखं. दोन्ही संघांकडून.

मला वाटलं, मी धुतलं 
यशस्वी जयस्वाल, हॅरी ब्रूक, ऋषभ पंत ह्यांनी संघाचा काहीही विचार न करता मनाला येईल तसा फटका मारला आणि आऊट झाले. ते ते चेंडू सर्वोत्कृष्ट नव्हते. काहीच नाही. आली सनक, हाणा.... मागचा पुढचा विचार शून्य. 

बाचाबाची अर्थात स्लेजिंग 
इंग्लंड सारखे संघ अगदी आधीपासून हे करतातच. मला आठवतं एकदा गावस्कर आणि एकदा अरविंद डिसिल्वा ह्याबद्दल बोलले होते, की ह्याकडे दुर्लक्ष करणे हे किती महत्त्वाचे आहे. कशासाठी ? स्वतः ची एकाग्रता ढळू न देण्यासाठी. पर्यायाने संघासाठीच. ह्याउलट शुभमन गिल ह्याने स्वतः भांडभांड केली. इथेच त्याची स्वतः ची एकाग्रता ढळली. 

फक्त उभं राहायचं होतं 

रेड्डी, बुमरा,सिराज, राहुल आणि दस्तुरखुद्द जाडेजा ह्यांना जे जमलं ते बाकीच्यांनी का बरं करू शकू नये ? जेफ्री बॉयकॉट च्या म्हणण्यानुसार "तासनतास उभे राहून अजिबात फटका मारण्याचं टाळणे" हे एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे ( क्रिकेट मध्ये ) आणि कौशल्य आहे ( व्यवसायात ).

तिकडे विंडीज आऊट झाले फक्त २७ धावांत ! कारणे : हीच, अशीच. अजून काय !

अंतिम उद्दिष्ट काय ?

ह्याचे थोडे जरी स्मरण असते, तरी अशा चुका घडल्या नसत्या. संयम का ? तर अंतिम उद्दिष्टकरिता. सामन्यात विजय. मनात आलेले फटके मारण्यासाठी अख्खा दिवस होता ना पडलेला.

अशाच चुका आपल्या व्यवसायात होत असतात. अशा वेळी अपेक्षित संधीचे नीट मूल्यमापन करून मगच त्यात शिरावे. कधी कधी "नाही" म्हणायला देखील हरकत नसते.

Thursday, 10 July 2025

व्यावसायिक हा प्रथम एक गुंतवणूकदार असतो

ज्याप्रमाणे शेअर बाजारातील कंपन्या फार विश्वासार्ह नाहीत , असं आपण म्हणत असतो, आता हाच नियम आपल्या सरकार बाबत सुद्धा लागू होऊ शकतो. 

अगदी ताजं उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा. 
अनेक वर्षे याचा सगळीकडून प्रचार केला जातो आहे. सोबत अनेक कंपन्या तसेच उद्योजक यांना देखील हे क्षेत्र खुणावत आहे. अनेक लघु आणि अति लघु उद्योजक मंडळी याच्यावर शंभर टक्के अवलंबून आहेत. ही तुमच्या माझ्यासारखी मंडळी याचा प्रसार करून स्वतःचं अर्थार्जन स्वतःच करू पाहणारे खरे मुळातले उद्योजक. ही मंडळी विविध ठिकाणहून सौरऊर्जेचा प्रचार करत असतात आणि यात प्रमुख मुद्दा असतो तो म्हणजे वीज बचतीचा. याला नक्कीच मोठं मार्केट आहे. आणि त्यामुळेच तितकीच स्पर्धा सुद्धा आहे. 

बाजाराच्या नियमाप्रमाणे स्पर्धा वाढली की नफा आकसतो. तरीही उद्योजक मंडळी मावळ्यांप्रमाणे खिंड लढवत असतात. सतत आशेवर आणि दुर्दम्य इच्छाशक्ती वर ही मंडळी लढत असतात. 

पण मध्येच एखादा मोठा घाव येतो आणि भविष्य धूसर होऊन जातं. अशावेळी अनेक मंडळी मानसिक रित्या ढासळतात. आणि स्वाभाविक देखील आहे. अगदी पहेलगाम सारखी अनपेक्षित घटना घडली तर तसं काही फार करता येत नाही, सरकारवरचा विश्वास देखील उडत नाही. परंतु नुकतीच महाराष्ट्र वीज मंडळाने जाहीर केलेला सौर ऊर्जेबाबतचा नियम म्हणजे अजबच म्हणायला हवा. थोडक्यात सांगायचं तर ज्या उद्देशाने मोठे उद्योजक किंवा लहान सहान कारखानदार बऱ्यापैकी गुंतवणूक करून ज्या आशेवर तो परतावा मिळण्याची अपेक्षा करत असतात त्यावरच घाला घातला गेलेला आहे. 

एकच दणका 

म्हणे, आता 24 तास सौरऊर्जेचा मोबदला म्हणून वीज मंडळाची वीज मिळणार नाही. याचा अर्थ असा की फक्त आठच तास त्या बदल्यात असलेली वीज मिळणार. उरलेले सोळा तास वीज मंडळाच्या राक्षसी दराने वीज खरेदी करावी लागणार. शिवाय जेव्हा कारखाना बंद असेल तेव्हा जी काही युनिट्स गोळा होत होती, त्याचा परतावा देखील मिळणे थोडे मुश्किल होऊन बसले आहे. एखादा सौरऊर्जा तज्ञ याबद्दल त्यांचे मत देईलच. परंतु या निमित्ताने सरकार हे देखील अत्यंत बे भरवशाचे आहे हे सिद्ध होऊ लागले आहे. 

खाजगीत तर असे वरचेवर होत असते 

मला आणि इतर अनेक लहान उद्योजकांना हा वारंवार अनुभव येत असतोच की काम संपलं की ज्या संस्थेंसोबत आपण काम सुरू केलं आहे किंवा होतं त्या आपल्याला वाऱ्यावर सोडतात. यात फार तपशीलात जाण्यात अर्थ नाही. 

आज गुरुपौर्णिमा आणि त्या निमित्ताने अनुभव हा आपला कायमस्वरूपी गुरू तो आपल्याला काय शिकवतो हे अधिक महत्त्वाचं. 

यातून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे की कुणीच विश्वासार्ह नाही ही वस्तुस्थिती स्वीकारणे. आणि उद्योजक हा प्रथम गुंतवणूकदार आहे ही अधिक व्यापक दृष्टी विकसित करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

आपल्या व्यवसायाचा सुद्धा आपण अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय असाच विचार करायला हवा. आपण एकच व्यवसाय घेऊन बसतो आणि त्यात वर खाली झाले की दुःख करत बसतो. असे न करता आपण अनेक ठिकाणी आपली गुंतवणूक विखुरणे गरजेचे आहे. शेअर बाजार आपल्याला ही संधी देतोच. स्वतः अभ्यास करून हे करता येईलच, परंतु ह्या विचाराला केंद्रस्थानी धरून बाकीचे विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. 

म्हणजे करायचे काय ?

गुंतवणूक हा आपला स्थायीभाव ठेवला तर परतावा हा त्यातला परिणाम. कोणत्याही गोष्टींनी उमटणारे पडसाद हे काहींसाठी योग्य असतात तर काहींसाठी अयोग्य. शेअर बाजार आपल्याला अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये अगदी कमीत कमी गुंतवणूक करून आपली गुंतवणूक समतोल करण्याची बहुमूल्य संधी देतो. अनेक लोक हे एसआयपी किंवा थेट रोख्यांमध्ये गुंतवणे ह्या मार्गाने हे करतच असतात. गरज आहे ती या मार्गाकडे प्रमुख मार्ग म्हणून पाहण्याची. 

जब जाग आए वही सवेरा 

"माझं वय फार झालंय", किंवा 
"मी अगदीच तरुण आहे", 
"आत्ता कुठे करिअरला सुरुवात केली आहे",
तत्सम कारणे मनाला देत बसू नका. ज्या क्षणी हे उमगलय त्या क्षणी कामाला सुरुवात करा. 

एखाद दोन पुस्तके वाचा, काही कोर्सेस वगैरे अटेंड करा. खूप पैसे भसकन गुंतवू नका. त्याऐवजी अशा कोर्सेस किंवा शिकण्यामध्ये थोडे जास्त पैसे गेले तरी चालेल. काही ठिकाणी खूप चांगले काही मिळेल, काही ठिकाणी तितकेसे मिळाले नाही असे देखील वाटेल. परंतु एकदम अंधविश्वासाने किंवा कमी ज्ञानाने हे सुरू करू नका. 

यालाच आजपासून सुरुवात करूया.

Monday, 7 July 2025

Operations चे असाधारण महत्त्व ....

माझा मित्र निशांत ह्याने नुकताच राजीव तलरेजा ह्यांच्या मुलाखतीची एक लिंक मला पाठविली होती. त्यात मला आवडलेले आणि खूप भावलेले एक वाक्य म्हणजे :-

सध्याच्या युगात आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल, तर आपली Operational Efficiency वाढवूनच हे शक्य होईल. उत्पादने, सेवा वगैरे तर प्रत्येक संस्था उत्तमोत्तम देण्यात कुठे कुचराई नाही करत.

✔ पटण्यासारखे आहे. माझ्या कडे सध्या काही अशी उदाहरणे (लहान व्यवसायांची) आहेत की त्यांना वाटत राहते कि फक्त विक्री हेच सर्वस्व. 

मला एका संस्थेने त्यांच्याकडील निवडक अशा १२ उद्योजकांबद्दल टिप्पणी द्यायला सांगितले, आणि सोबत एक एक्सेल sheet दिला ज्यात बरेच मुद्दे होते मूल्यांकना करिता. एक होता : Net Profit अर्थात निव्वळ नफा. त्यात १२ पैकी फक्त एकाचाच निव्वळ नफा ८% पेक्षा जास्त होता. बहुतेकांचे १- ३ टक्के. मी विनंती करून त्यांच्या "कार्यचालन म्हणजेच Operating Profit" चे आकडे मागवून घेतले. मग सर्व जरा बरे झाले. बऱ्याचदा नफा कमी दाखवून कर कमी भरण्याच्या प्रवृत्तीने असे होत असावे. तरीही, मी माझा निष्कर्ष पाठवून दिला :- ज्या उद्योजकांचा कार्य चालन नफा हा १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, त्यांचाच विचार व्हावा. कारण निकष अगदी काहीही जरी असला, तरीही आपल्या स्वत: च्या मूळ कामातून जे उद्योजक कमीत कमी १५ टक्के नफा मिळवू शकत नसतील, तर बाकी सर्व गौण. खालील एका कंपनीच्या उदाहरणातून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय.

आजच्याच सकाळ मध्ये योगा योगाने डॉ अनिल लांबा ह्यांचे एक विधान आले आहे जे Cash Flow किती महत्त्वाचा आहे ह्याबद्दल आहे 👇


✵पाठोपाठ श्री भूषण ओक ह्यांचे एका कंपनीचे (Dynacons) आर्थिक विश्लेषण आलेले आहे. त्यातील बाकी सर्व भाग सोडा परंतु, खालील दोन्ही वक्तव्ये पहा :-



दोन्हींमध्ये " Cash In" जरा चिंताजनक बाब आहे असे म्हटलेले आहे. म्हणजे येणी आहेत, परंतु वसुली मात्र ३५ टक्केच आहे. आता आणखी खोलात गेल्यावर समजून आले, की , कदाचित कंपनीच्या प्रत्यक्ष धंद्यातून असलेल्या येण्याचे प्रमाण इतके कमी नसेल, परंतु कंपनीने सोबत इतर गुंतवणुकी केल्यात ज्यात कदाचित घाटा झाला असावा.कुठेतरी कंपनी व्यवस्थापनात गडबड असू शकते. तर ही इतर गुंतवणूक कार्य चालन नफ्यातून केली जाते ना ! म्हणूनच एखाद्या कंपनीची कामगिरी पाहताना ताळेबंद, नफा तोटा पत्रक व सोबत कॅश फ्लो देखील पाहतात. हे कॅश फ्लो सुद्धा ३ भागांत असतात : त्यातील Operations Cash Flow नीट बघितला कि कंपनीचे कामकाज समजून येते.

मी काही यातला कसलेला खेळाडू नाही, फक्त सोबत स्वत: चा व्यवसाय व इतर व्यावसायिकांशी सल्ला मसलत करत असताना, त्यांच्या समस्या अधिक खोलात जाणून घ्यायला, त्या नीट अधोरेखित करायला ह्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करीत आहे.

इथे आपण कंपनीचे शेअर घ्यावे कि नाही ही चर्चा नाही करत आहोत, परंतु ह्या अनुषंगे आपल्याला निश्चित समजून येतं की Operational Profit किती महत्त्वाचा आहे. हाच तो EBITDA. ह्यावर आपला एक विशेष podcast देखील आहे. 

✔ नुसता कागदावर नफा दिसून नाही भागायचे तर तो रोखीत , वेळेत रुपांतरीत व्हायला हवा. नाहीतर गणित पालटायला वेळ लागणार नाही. ह्याकरिता वेळेवर वसुली होणे, प्रत्येक ठिकाणच्या नोंदी अचूक तसेच वेळेवर चोख व्यायला हव्यात. नसल्यास कर्मचारी वर्गास समजूत द्यायला हवी. कंपनीत कार्यचालन नफ्याची संस्कृती रुजवायला हवी. कर्मचारी वर्गाला ह्यात प्रशिक्षित करायला हवे.


 

Saturday, 28 June 2025

सेवा - बीवा

काही प्रसिद्ध online व्यवसायांच्या "ग्राहक - सेवा" 

नुकतंच अमेझॉन वरून एक पार्सल ऑर्डर केलं. TDS मीटर+ PH Meter असे होते. अमेझॉन प्राईम असल्याने २ दिवसांत मिळणार होते. ज्या दिवशी यायचे त्याच दिवशी संध्याकाळी संदेश : आज नाही, दोन दिवस लागतील. दोन दिवस वाट पाहिली. पुन्हा सायंकाळी संदेश : आम्हीं म्हणे तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला, तुमच्या पर्यंत पोचता नाही आले, त्यामुळे दोन दिवस अजून लागणार.

ह्यांच्याकडे chat पटकन उपलब्ध नाही, फोन विषयच नाही. महत्प्रयासाने chat सापडले माणूस एकदम प्रॉम्प्ट पण प्रचंड मठ्ठ आणि अत्यंत फालतू स्मार्ट. त्याने अजिबात किती वाजता पार्सल मिळेल हे सांगितले नाही. आजही ( ८ पर्यंत देणार होता ) आलेले नाहीच. मी ऑर्डर रद्द केली. पुन्हा ह्या लोकांचा अभिप्रायाचा ठराविक स्क्रीन. माझ्या गरजेचं काय ? तपासच नाही.

असाच अनुभव axis च्या  क्रेडिट कार्ड कडून. काही केल्या ही मठ्ठ मंडळी स्टेटमेंट इमेल ने पाठवायला तयारच नाहीत. हद्द झाली यार.

ह्यांना तुमची काहीच पडलेली नाही.

इंडिया मार्ट :- इथे तर साधा सर्च करायची प्रचंड भीती वाटते. भयानक फॉलो अप सुरू होतो. आणि फीडबॅक वर फीडबॅक. साधं संभाषण कसं झालं ह्याचा सुद्धा प्रचंड फीडबॅक फॉलोअप. मूर्खपणाचा कळस.

सर्वात विनोद म्हणजे अमेझॉन च्या फीडबॅक फॉर्म वरचा empathy नामक एक पर्याय. 

काय बोलायचं आता ?

पूर्वी मशिनरी चे काम करताना ACC ह्या tata समूहातील बलाढ्य कंपनीने माझ्यासारख्या अती लघु उद्योगाला काम दिले होते. जैन नामक व्यक्तीने हे काम मोठ्या कंपनीला डावलून मला दिले ह्याबद्दल आश्चर्य वाटून मी त्यांना विचारले होते, तेव्हा त्याचं उत्तर ऐकण्याजोगे होते :-

" बडे कंपनी के सपोर्ट को पकड़ना मुश्किल होता है , छोटा पकड़ में आ जाता हैं "

Friday, 27 June 2025

आत्मसन्मान हीच खरी ऊर्जा

उद्योग व्यवसायात आपले उत्पादन, सेवा ह्या सुचणे, त्यांना एक व्यावसायिक विक्रीयोग्य रुप देणे, पाठोपाठ त्यांविषयी सतत सांगत राहणे हेही काम असते. म्हणजे काय तर त्यांचे कायमस्वरूपी दालन प्रत्यक्ष दुकान किंवा आंतरजालावर प्रस्थापित संकेतस्थळ तयार करणे ( किंबहुना दोन्हीही ). 

आणि नंतर ते अनेक ठिकाणी : अशी ठिकाणे, जी गप्पा मारण्यासाठी तयार करण्यात आलेली असतात जसे की इंस्टाग्राम वगैरे; किंवा अशी ठिकाणे की जिथून प्रत्यक्ष खरेदी करण्याच्या उद्देशाने व्यक्ती येतात, म्हणजेच बाजार  (जसे की अमेझॉन, जस्ट डायल, इंडिया मार्ट इत्यादी ); तर काही अशीही ठिकाणे की जिथे व्यक्ती त्यांच्या संगणक अथवा भ्रमण ध्वनी मार्फत शोध करतात ( जसे की गुगल ) अशा ठिकाणी पोस्ट करणे.

अजूनही इतर मार्ग आहेतच. इथे विषय भटकायला नको म्हणून थांबवतो,कारण चर्चा ह्या मार्गांची नाही, तर एक उद्यमी ला कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल बोलायचं आहे. 

उद्यमी:- मग ती व्यक्ती स्वतः चे काहीतरी असे करू पाहतेय की ज्याद्वारे तिचे अर्थार्जन त्याद्वारे होईल, दुसऱ्या कुणाची चाकरी न करता.
हा प्रवास सुरू असताना काही व्यक्ती, संस्थांच्या संपर्कात येतात, तिथे काही "महत्त्वाच्या" वगैरे व्यक्ती असतात, म्हणजे काय तर व्यवस्थेने त्यांना दिलेले पद. तर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा उद्यमी सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी मनाविरुद्ध जाणे, विनंत्या करत राहणे हा प्रवास बऱ्याच ना इलाजस्ताव ती व्यक्ती करत असते, राहते. कृत्रिमरीत्या आवडून घेऊन करत राहते. काही व्यक्ती ह्या कृत्रिमरीत्या मुरवून घेतलेल्या कौशल्याला सरावतात. काहींमध्ये अजिबात हे शिरत नाही. काही लोक कधी कधी हे जमवून घेतात, तर कधी कधी अजिबात झेपत नाही त्यांना.

हीच शिदोरी पुढे कामी येणार 

कधी कधी मला स्वतः ला देखील स्वतः बाबत हा अनुभव येतो,येत असतो. 

"तुझं हेच चुकतं"
"थोडी आणखी कळ काढली असतीस तर.."

असे आप्तस्वकीय मंडळींचे ताशेरे, किंवा 

"त्याने बघ कसं पुढे - पुढे करून बरोब्बर पदरात दान पाडून घेतलं"
"आपलं प्रोफाईल नाय ना यार तसं

ह्या स्वरूपाची किंचित असूया, खेद मिश्रित वल्गना ( स्वतः ची )

अशा अनेक मनो प्रवासातून मी गेलोय,जात असतो. मला खरं तर ह्यातून मुक्त व्हायचं असतं ( हेही आत्ता आत्ता म्हणजे साठी ला  आल्यावर उमगलेले नव सत्य ). तर मला ह्यातून एक गोष्ट सुचली ती म्हणजे :- 

एका प्रमाणाबाहेर आपण हे नाही सहन करू शकत. आणि नाही करायचं. कधी कधी ते so called पदस्थ आपल्याला बऱ्यापैकी दुर्लक्षित करतात अशी जाणीव झाली आणि माझी अशी काही कृती झाली की त्यातून प्राप्त होऊ शकणाऱ्या संभाव्य लाभाला घातक होती ( हे नंतरच जाणवतं) , तर सर्वप्रथम स्वतः बद्दल योग्य वाटून घ्यायचं, अजिबात खंत किंवा अपराधी वगैरे वाटून घ्यायचे नाही , कारण आपण आपल्या आत्मसन्मानाची कदर केली, त्याकडे आलो की विश्रामाची भावना जागृत होते.

हीच शिदोरी पुढे कामी येणार !



Thursday, 19 June 2025

खरंच मराठी उद्योजक घडवायचे आहेत?

मी काही नेटवर्क चा सदस्य आहे अनेक वर्षे. इथे व्यावसायिक मंडळी कोट घालून भेटतात. ह्या गोष्टीला अनेक जण नाके मुरडतात.

असेच मग सर्व साधारणपणे मराठी भाषा वापरताना , खास करून सरकार दरबारी , अत्यंत जड शब्द वापरले जातात. शब्दाला शब्द असा अतिरेकी आग्रह सोडल्यास नक्कीच बरं होईल, शिवाय प्रत्येक ठिकाणी मूळ इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द असायलाच हवा असं नाही ना ! 

तरीही प्रत्येक ठिकाणी, अगदी साधे साधे लिहायचे, बोलायचे झाले तरी इंग्रजी चा वापर का बरं ?

अजून एक म्हणजे :- हे कोणी सांगितले की मुलाना इंग्रजी शाळेतच घाला ? इथे मराठीचा दुस्वास करायचा, तिला निष्कारण कमी लेखायचं आणि मराठी उद्योजक घडवायचे !

आशेचा किरण 

नवीन शैक्षणिक धोरण मात्र आशादायक आहे. 
प्राथमिक वर्षांत तरी सरकारने मातृभाषा प्रमाण ठेवली आहे ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन

Monday, 9 June 2025

कर्मचाऱ्यांत खरी passion निर्माण करणारा उद्योजक

उद्योग जगतातील अवलिया हे लिहिणारे रिकार्डो सेमलर ही तसे पाहता जन्मजात धनवान व्यक्ती, ज्यांच्या वडिलांनी मशिनरी उद्योग निर्माण करून मोठा केला. रिकार्डो नी अगदीच लहान वयात ही जबाबदारी पुढे पेलली.

विशेष हे , की त्यांनी सर्व ढाचा, ज्या पारंपरिक पद्धतीने कंपन्या चालवल्या जातात, त्या त्रिशंकू व्यवस्थापनाला तोडून मोडून, कंपनी ही "मनुष्य" केंद्री केली. आणि प्रचंड यशस्वी करून दाखविली. 

भारताप्रमाणे ब्राझील मध्येही ट्रॅफिक, गर्दी इत्यादी समस्या आहेतच. त्यात लवचिक वेळा, स्वतः च स्वतः चे उत्पन्न ठरवणे, आपले ऑडिट आपल्या कनिष्ठ मंडळींकडून  करून घेणे, कर्मचारी मंडळीना नफ्यात भागीदार करून घेणे, ह्यामुळे त्यांना अपेक्षित तो परिणाम त्यांना लाभला :- सकाळी अत्यंत प्रेरित होऊन कामाला आतुर असलेला कर्मचारी वर्ग.

तरीही सर्व काही लोकशाही पद्धतीने व्हायलाच हवे असा त्यांचा दुराग्रह नाही. काही युनिट्स अगदी लष्करी खाक्याने देखील चालत आहेत त्यांची. कारण मुळात "माणूस" समजून घेतलेला आहे.

निरुपयोगी मेट्रिक्स काढून टाकणं, मशीन असेम्ब्ली करिता पट्टे नसणे, अनावश्यक कागदपत्रे टाळून एक पानी टाचणे, तसेच कर्मचाऱ्यांची ठोकळबाज उतरंड काढून टाकून नवी लहानशी कंट्रोल युनिट्स तसेच मला सर्वात भारी वाटलेली म्हणजे अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना त्यांनी राबविलेली उपग्रह उद्योग उपक्रम व्यवस्था. अर्थात कर्मचाऱ्यांना कंपनीचे भाग सप्लाय करण्याकरिता मदत, शिक्षण , तसेच संपूर्ण सहकार्य. अचंबित करणारे आहे सर्व.

काही वाक्यं मला खूप वेगळी वाटली ती खाली देत आहे :-
  • मिनिटा मिनिटाचा हिशोब ठेवणाऱ्या ला जीवनाची संकीर्णता समजूच शकणार नाही 
  • जेव्हा मी काहीच करत नसतो तेव्हा मी अतिशय कार्यकुशल असतो
  • जे निर्णयाचे परिणाम भोगणार आहेत त्यांच्यावर निर्णय सोडणे
  • तपशिलाचा चिखल
  • माहिती गोळा करायचा हव्यास
  • जेव्हा मी अर्धा दिवस, घरून काम करायचं ठरवलं तेव्हा सर्वांना वाटलं की मालकाचा मुलगा, आराम मिळावा म्हणून बहाणा करत असेल. त्यांची ही शंका दूर करण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न मी केले नाहीत.
  • माझी गरज आहे अशी परिस्थिती निर्माण होणं ही लाज आणणारी गोष्ट आहे
आणि अशी अनंत वाक्ये.

केळकरांनी देखील अगदी छान मराठीत वाक्ये वापरून अनुवाद करण्याचा यत्न केलाय. 

इतर अनेक अनेक अनुवादित साहित्या प्रमाणे ह्यातही मूळ इंग्रजी आहे ते प्रसंगी फोड करून, विलग करून आणि सोपे करून न सांगितल्याने अर्थ समजायला खूप अवघड जातं.

पण ते अगदीच माफ. कारण असे पुस्तक मराठीत आणणे ही कल्पना सुचणे, ते प्रत्यक्षात करणे ह्या सर्वकारिता केळकर : आपले आभार.

Monday, 26 May 2025

ही निष्ठुरता नव्हे, तर "विवेक" आहे

अनेक वर्षे मी स्वत: Pocket नामक एक सुंदर, अत्यंत उपयुक्त असे संकेतस्थळ तसेच App वापरत आहे. 

👉मला वाटणारे, आवडणारे, उपयुक्त लेखांक ह्यावर नुसते लिंक ह्या स्वरुपात सेव्ह करून ठेवायचे. ते मी नंतर वाचतो, ते सुद्धा जाहिराती बाजूला करून, शिवाय हव्या त्या अक्षराच्या मापात ( मोठ्या - छोट्या ). अजून म्हणजे दोन्हीकडे : मोबाईल व web वर, लिखित मजकूर "श्राव्य" करून ऐकण्याची सोय वगैरे अत्यंत उपयुक्त. त्यात पुन्हा अधोरेखित करून ठेवायची सोय, वगैरे. 

😢 दुर्दैवाने ही website बंद होत आहे. वाईट वाटले. 

☝ ही झाली "वापरकर्ता" ह्या नात्याने एक बाजू. पण काय कारण असेल ? हे जरा खणले असता एक साधारण कारण जाणवले ते असे : की ... Firefox ( संकेतस्थळाचे प्रवर्तक ) ह्यांना त्यावर उर्जा आणि वेळ देणे परवडत नाहीये

बास. इतकेच पुरेसे आहे, असते. 

"तुमचा तो Zero Budget Digital Marketing Course किती भारी होता हो, का घेत नाही तुम्ही ?" अशी मला अनेक ट्रेनिंग कोर्सेस बाबत कायम विचारणा होतंच असते. पण दिलेली उर्जा आणि मिळणारा परतावा हा माझ्या आयुष्याला संलग्न नसेल तर मी त्या गोष्टी चक्क थांबवतो. 

माझा मशिनरी उद्योग किंवा ट्रेनिंग ह्या गोष्टी मी अशाच बंद केलेल्या आहेत. दुसऱ्याने करावे का ह्याबद्दलचे हे अनुमान नव्हे. पण "करता येतं" किंवा असं करणारे काही असतात असं पाहिल्यावर हुशः वाटतं.

हेच तर कारण आहे, आपण आपले अर्थपत्रक प्रत्येक तिमाही ( आणि मासिक-साप्ताहिक सुद्धा 👌 ) पाहून आपल्या कृतींत यथोचित बदल करण्याला. काही निर्णय परखडपणे घेता येतात. फायदा ? उर्जा वाचते.

हा "विवेक" च आहे. 

Saturday, 24 May 2025

परखड परीक्षणाची फलश्रुती

नुकतेच आम्ही एक Podcast केले ज्यात आधारभूत विषय घेतला होता तो हा की ...
  1. छापून येणाऱ्या बातम्यांतील आणि प्रत्यक्ष असणाऱ्या आर्थिक आकड्यातील तफावत 
  2. शेवटच्या तिमाहीत कंपन्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी करत असलेली धावाधाव. 
पब्लिक लिमिटेड कंपन्यांना हे अहवाल प्रत्येक तिमाहीला सादर करावे लागतातच. त्याबद्दल फार नको बोलायला, परंतु ह्या निमित्ताने आपण लघु, तसेच अति लघु किंवा वैयक्तिक व्यावसायिक मंडळी आपल्या व्यवसायाचे परखड परीक्षण करतो का , आणि ते केल्यास काय फायदे होतात ह्याचे एक उदाहरण :-

मी स्वत: भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ह्या संस्थेसोबत एक Mentor ह्या नात्याने अनेक वर्षे कार्यरत आहे. काम हेच : नवीन उद्योजक मंडळींना, ज्याना कर्ज वितरीत झाले आहे त्यांना साधारण दोन वर्षे मदत करत राहणे. त्यांचा व्यवसाय सुस्थितीत आणणे, अडचणी असल्यास मदत करणे. 

एका वस्त्र उद्योजकाची कहाणी :-


ह्याचे एक दुकान आहे ते सिंहगड कॉलेज च्या परिसरात. सुरुवातीला जम बसेस्तोवर काही अडचणी होत्या, ज्या वाहत्या गल्ल्यामुळे तसेच दिलेल्या गेलेल्या रोकड कर्जामुळे ( CC ). त्यात त्याने सतत विचारणा होत असल्याने पादत्राणे तसेच चष्मा goggles ह्याचेही एक छोटे दालन बाजूला सुरु केले.

नियमित, परखड परीक्षणाचा फायदा 


सुरुवातीस दर महिन्यातून एकदा , व नंतर दर तीन महिन्यांतून एकदा आम्ही नफा-तोटा पत्रक तसेच ताळेबंद पाहत राहिलो. तो सुरवातीला तयार नव्हता तरीही आकड्यांच्या संकेतानुसार त्याने त्याच्या आवडीचा परंतु व्यवसाय संमती देत नसलेला निर्णय घेतला, आणखीही सोबत काही निर्णय घेतले ते असे :-
  1. पादत्राणे दालन बंद केले 
  2. "प्रत्येक मागणी आपल्याला पुरवता यायलाच हवी" हा दुराग्रह काढून टाकला. ह्या मुळे XXL प्रकारचे फक्त २०-२५ शर्टस विकले जात, परंतु साठा मात्र त्याच्या १० पट करावा लागे. हा पडून राहणारा Asset ताळेबंदात सतत दिसायचा, त्यामुळे मालमत्ता कमी होत होती. 
  3. हाच अर्थ प्रवाह मागणी सतत असणाऱ्या वस्त्रांकडे वळवला. 
  4. आणि हीच कृती पुढे दोन तिमाही कायम ठेवली.

परिणाम स्वरूप :-

  1. नफ्यात भरभक्कम वाढ, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच बोनस देता आला.
  2. वेळ बराच शिक्कल राहिला, ह्यातून नवीन अजून एक दुकान काढले, असेच, पण वेगळ्या भागात ( ह्याबद्दल आम्ही पूर्वी चर्चा केलेली होती ).
  3. नवीन सामान विक्रीस नाही ठेवलेले, आहे त्यातील उप प्रवर्गातील वस्त्रे ठेवली, गरजेप्रमाणे साठा कमी जास्त केला.
  4. मुद्दा १ आणि २ मुळे आधीचाच एक कर्मचारी आता मूळ दुकान पूर्णपणे चालवितो, तर हा स्वत: आता नव्या दुकानी बसतो, ते चालवितो. ( नया धंदा , पुराना आदमी  ) 
  5. हेही दुकान आता जेमतेम ६ महिन्यांतच Cash Flow + ve झालेले आहे.
ह्यामुळेच निवडक उद्यमी च्या त्रैमासिक बैठकींत आम्ही आता एकमेकांच्या उद्योगाचे परखड परीक्षण करत असतो.


Sunday, 11 May 2025

कंपनीबद्दल बोला .....

काल एक सत्र घेत असताना लक्षात आलं की खास करून लहान उद्योजक, अगदी घरून व्यवसाय सुरू करणारे देखील ज्यात येऊ शकतात, अशा व्यावसायिक मंडळींना कमी वेळात ( जास्तीत जास्त १० मिनिटे ) त्यांच्या व्यवसायाची माहिती द्यायला सांगितली तर सर्वात जास्त ते त्यांच्या उत्पादने अथवा पैलू, त्यातील विविध वैशिष्ट्ये इत्यादींबद्दल भरभरून बोलतात. वेड, passion वगैरे वगैरे...

पण ही मंडळी *भरभरून बोलतच सुटतात*. इतकी, की कदाचित पलीकडील टेबलवरून घंटानाद ऐकू येऊ शकतो. आणि अगदी वेळेचं बंधन नसेल तरी ऐकणारा तुम्हाला मनातून बंद पाडू शकतोच की !

जैसा देस वैसा भेस

ज्याप्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे त्याप्रमाणे हे असायला हवे. अनेक, विविध परंतु अनोळखी व्यक्ती समुदायासमोर आपले सादरीकरण असेल,तेव्हा आपल्या संस्थेबाबत अधिक बोलायला हवे. तिची महती.

कारण मुळात आपण देत असलेली सेवा तसेच उत्पादन अनेकांपैकी एक असेल, तर मग ह्या अनेकांतून एक म्हणून मला,आम्हाला का निवडा  हे संभाव्य ग्राहकाच्या मनापर्यंत पोचायला हवे ना !



Friday, 9 May 2025

खरे उपयुक्त संपर्क मिळविण्याची एक क्लुप्ती

सर्व प्रकारच्या व्यावसायिक मंडळींना मी "leads" तसेच नेट्वर्किंग मध्ये "Referrals" करता काम करताना पाहत असतो. जणू काही एखादा बिझनेस आणि त्याची परिणामकारकता म्हणजे सतत नवीन, आणखी नवीन स्त्रोतांकडून सतत अविरत leads येत राहणे. हे जरी महत्त्वाचे असले, तरी इतर बाबीही तितक्याच किंबहुना अधिक महत्त्वाच्या ठरतात. उदा :-

  • नवनव्या तंत्रांचा मागोवा घेत राहणे 
  • आपल्या व्यवसायात ती अंमलात आणणे 
  • अधिक प्रभावी व्यक्तींना भेटणे ( फक्त "विक्री" वाढवणे ह्यासाठी नव्हे )
हे करताना काही नवनवे कोर्सेस करीत रहाणे, विविध कार्यशाळा अटेंड करणे तसेच अनेक प्रदर्शने व त्या अनुषंगे घडणारे परिसंवाद तसेच नेट्वर्किंग च्या संधी आवर्जून घ्यायला हव्यात. बऱ्याच वेळा ही सत्रे विनामुल्य असतात. काही ठिकाणी सशुल्क देखील असतात. 

माझ्या मते आपल्या थेट क्षेत्रातील निदान एक - दोन तरी अशी प्रदर्शने आपण वार्षिक पातळीवर अटेंड करावीतच !


ह्यात सर्व काही घडू शकते, आणि आपण पूर्वी कधीही न विचार केलेल्या संधी देखील आपले दार ठोठावू शकतात. 


ह्या करता आपल्या मनात येणाऱ्या , मागे खेचणाऱ्या विचारांचे संपूर्णपणे निर्दालन करून रस्ता करावा लागतो. अनेक वेळा माझे असेही झालेले आहे, कि ३- ४ दिवस राखीव ठेवले आणि तितके काहीच हाताला नाही लागले, वगैरे. होते असे कधी. पण म्हणून हा संपूर्ण विचार चुकीचा ठरवणे हे मात्र चूक ठरेल


तर आपल्या पुढच्या "प्रदर्शन" किंवा "परिषद" कार्यक्रमास शुभेच्छा !


Tuesday, 6 May 2025

संस्था अंतर्गत प्रशिक्षणाचे महत्त्व

कालच एका संस्थेत "समन्वयक" अर्थात Co-Ordinator म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीशी संवाद सुरु होता. ती तिथल्या कर्मचारी वर्गाच्या विचित्र वागण्याबाबत खेद कम आश्चर्य व्यक्त करीत होती. कारण देखील तसेच होते. 

सदर संस्था ही एक सामाजिक संस्था आहे, ५० वर्षे जुनी , उदात्त विचारांनी निर्मित झालेली आहे. मूल्ये स्पष्ट आहेत, अधोरेखित देखील असावीत. आणि वर्षानुवर्षे अनेक अनुभवी व्यक्तींच्या चाळणीतून चाळून झालेली असणार. 

तर त्यांचे एक व्यावसायिक मूल्य असे कि इथे येणाऱ्या कर्मचारी मंडळींना "लेटमार्क" केला जात नाही. कारण असे, कि ही काम करणारी मंडळी देखील तशी संघर्षमय परिस्थितीतूनच आलेली असतात. तर त्यांना मानवता वादी दृष्टीकोनातून इतकी सवलत देणे हे देखील एक प्रकारचे सामाजिक भान व काम आहे. अशी सवलत देवू करणारी मी तरी पहिलीच संस्था पाहिली. आणि हेच दुखणे आमच्या समन्वयक व्यक्तीचे होते. 

की असे असून देखील, इथे काम करणारे कर्मचारी संस्थेचा खूप ( उगाचच ) दुस्वास करतात. नावे ठेवतात, वगैरे. संस्थेच्याही  काही  डाव्या  बाजू  असणारच  रे  अशी माझी खास खोचक शंका देखील काढून झाली. पण एकंदरीत संस्थेकडून फार अन्यायकारक काही घडत नाहीये हे लक्षात आले. मग असे का बरे होत असावे ?

सामाजिक संस्थेबाबत अशी स्थिती असेल, तर खाजगी नफा उद्दिष्टीत संस्थांबद्दल काय बोलावे ? 

पण अगदी हे काळे , हे पांढरे असे नको करायला, कारण अशाही अनेक संस्था ( खाजगी ) , ज्यांना "उद्योग" म्हणता येईल, पाहण्यात आहेत, ज्यांच्या बद्दल कर्मचाऱ्यांना नितांत आदर आहेच, शिवाय ते स्वत: आनंदी देखील आहेत.

मला भासलेल्या काही गोष्टी :-

१. खाजगी संस्थांबाबत बोलायचं झाल्यास, नुसता "नफा" ह्यापलीकडे काय विशेष आपण करतोय, कोणत्या प्रकारे लोकांच्या आयुष्यात ( म्हणजे ग्राहक वर्गाच्या ) क्रांतिकारक बदल घडवून आणीत आहोत, हे शोधणे, तपासणे, आणि ते व्यवस्थित लिहून काढणे

२. ह्या मूल्याकरिता स्वत: प्रवर्तक, किंवा मालक मंडळी किती कटिबद्ध आहेत ह्याचं स्वत: वस्तू निरपेक्ष मूल्यमापन करणे. 

३. ह्या नंतर आपल्या विविध संबंधित व्यक्तींमार्फत ही अंतर्गत मूल्ये कशी पोहोचतील, ह्याचा कृती कार्यक्रम तयार करणे.

प्रत्येक संबंधित व्यक्ती करिता ह्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नवीन रुजू होणारे, बढती प्राप्त होणारे, पदभार बदललेले, वगैरे वगैरे.

हे फक्त मोठ्या नव्हे, तर अगदी एक - दोन व्यक्ती असणाऱ्या संस्थांकरिता देखील आवश्यक आहे. आपण ज्या संस्थेकरिता काम करत आहोत, ती संस्था काय आहे, तिची मूल्ये काय आहेत हे समजल्यास कर्मचारी वर्ग टिकवून ठेवण्यास त्याचा निश्चितपणे उपयोग होईल.

Wednesday, 23 April 2025

स्वत: च्या धंद्यात सर्व गुंतवणूक करू नका

यशस्वी व्यावसायिक आणि गुंतवणूक 

" जर पैसे गुंतावायचेच असतील, तर मी स्वत:च्याच व्यवसायात गुंतवीन ना ! उगाच मार्केट ( शेअर ) मध्ये कोण गुंतवेल ? शेवटी तो दुसऱ्याचा धंदा. माझ्या धंद्यात मला ४० - ५० टक्के मिळतात ! अगदी SIP केली , Long Term, तरही १५ ते २० टक्केच परतावा."

असा युक्तिवाद अनेक व्यावसायिक करतात. खरेही वाटायला संपूर्ण जागा आहे.

असे खूप व्यावसायिक असतात जे सचोटीने, हुशारीने, चतुराईने वर्षानुवर्षे भरपूर फायदा देणारा धंदा करतात. पैसे कमावीत असतात. आणि काही स्वरूपात त्यांची गुंतवणूक सुद्धा असते :- सोने, जमीन इत्यादी मध्ये. अडी अडचणीला ह्यातून त्यांची उभारणी नक्कीच होऊ शकते. 

तरीही "मार्केट" म्हटले कि जरा चार पावले मागेच हटतात. खूप "रिस्क" वाटते त्यांना. ह्याचाच थोडा बारकाईने विचार करूयात :- 

मार्केट , शेअर मार्केट म्हणजे काय ? तर अनेक मोठ्ठ्या उद्योगांनी त्यांचे भांडवल हे आम जनतेकडून प्रत्येकी अगदी कमी - कमी किंमत घेवून उभारलेले असते. अशा उद्योगांच्या मालकीचे रोखे ( म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या गुंतवणुकीचा हिस्सा ) अनेकांकडे असतात. एकदा का गुंतवणूकदारांनी हे घेतले कि ते चढेल किमतीला विकू शकतात. कारण ज्या कंपन्या चांगली कामगिरी ( चांगला नफा ) करतात; त्यांच्यात सर्व जण गुंतवणूक करायला आतुर असतात. 

विविध कारणास्तव ती मंडळी कधी खरेदी तर कधी विक्री करत असतात आणि त्यात त्याना नफा - तोटा होत असतो. विचार अर्थात फायद्या चाच असतो, तोटा कुणाला हवाय ? एका स्थिर मार्गाने, फार उठ पटांग न करता हे करत राहिले, तर वर्षाकाठी कमीत कमी १५ आणि जास्तीत जास्त ३० टक्के परतावा देखील प्राप्त होऊ शकतो. 

इथेच उद्योजक म्हणतात : माझ्या धंद्यात ५०-६० टक्के नफा असताना मी का बरे १५-३० टक्क्यांवर सेटल होऊ ?


ह्याला उत्तर असे, कि अगदी चतुराईने, चाणाक्षपणे जरी आपण बिझनेस करत असाल, तरी ज्या क्षेत्रात तुम्ही व्यवसाय करता ते क्षेत्रच संपूर्णपणे अडचणीत आले तर ? आपण खूप मोठ्या जोखीमिशी सामना करत असू शकता. अशा वेळी काही पैसे जर दुसऱ्याच्या आणि वेगळ्या प्रकारच्या उद्योगाशी निगडीत धंद्यात गुंतवले तर ! 

हे असे अनेक व्यवसाय एकाच ठिकाणी सापडणे म्हणजेच शेअर मार्केट.

पण आता हे उद्योग हुडकायचे कोणी ?


खरंच अवघड असत हे, आणि आपला उद्योग सांभाळत असताना तर अजूनच. ह्याच साठी असतो म्युचुअल फंड. अनेक जणांनी एकत्रित पणे एखाद्या तज्ज्ञाच्या हाती सोपवलेले समायिक पैसे. बर ही व्यक्ती साधी सुधी नसते. अनेक मोठ्या मोठ्या उद्योगांनी त्यांचा क्षेत्रातील अधिकार आणि लौकिक पाहूनच त्यांना नेमलेले असते. तर ही मंडळी अशा विविध क्षेत्रातील अनेक कंपनीज एकत्रित करून एक सामायिक रक्कम ठरवतात व त्यांचे भाग करून त्या त्या किमतीला उदा. १० रुपयांचं एक युनिट अशा प्रकारे हे सामान्य ( आपण ) गुंतवणूकदार मंडळीना देतात. ह्या त्यांच्या वार्षिक वगैरे गुंतवणुकीचा मिळणारा परतावा ते वाटतात जो वेगवेगळ्या योजनांत कमी जास्त असू शकतोच. पण अगदी सर्वात जास्त सुरक्षित समजला जाणारा आणि कमीत कमी परतावा देणारा fund देखील ( Liquid ) महागाई दराच्या २ टक्के अधिक परतावा देतोच. निवडक उद्यमी ने आपले शून्य परतावा देणारे चालू खाते विरुद्ध Liquid Fund असा एक podcast देखील केलाय

चक्रवाढ आणि त्याचे गणित 


प्रत्येक वर्षी मिळणारा परतावा पुन्हा गुंतवीत राहिल्याने काही वर्षांनी प्रचंड संपत्ती तयार होऊ लागते. असे म्हणतात , कि Warren Buffet च्या यशाचे सूत्र म्हणजे त्याने अगदी लहान वयात सुरु केलेली गुंतवणूक. आपल्याच blog वर श्री निशांत आवळे ह्यांनी ह्याच विषयाला वाहून काही लेख लिहिले आहेत, ते एका वेगळ्याच सदराखाली एकत्रित स्वरूपात पाहायला मिळतील .


तात्पर्य :- 


आपल्या सोबत इतरही धंद्यात गुंतवणूक सुरु करा, फुटकळ १००० - २००० ची SIP सुरु करा, आणि अजिबात मोडू नका. 

Wednesday, 26 February 2025

ही जर चिंधी गिरी असेल, तर हरकत नाही ....

एका उत्पादकाकडे नुकतेच जावून आलो, अर्थात त्याच्या बँकेचे हप्ते थकले आहेत म्हणून😁. सुरुवातीला, जेव्हा कर्ज बिर्ज मिळालेलं असतं तेव्हा विमान जोरात असतं ह्यांचं.असो. अडला म्हणून तर आपलं काम. हेही स्वागतार्ह.

नेहमी प्रमाणे मी त्याचे ताळेबंद तसेच नफा-तोटा पत्रक व चालू वर्षाचे बँक चे व्यवहार पत्रक मागवून घेतले. सोबत नक्की काय अडचण आहे ते जाणून घेतले. म्हणजे परिणाम. मीमांसा नव्हे. समस्या होती : विक्री कमी , नाहीच जवळपास. मागणी आहे, पण पैसे नाहीत, सप्लायर आता माल देत नाही वगैरे. 

सुरुवातीपासून आत्तापर्यंत पाहिले आणि त्याच्या ग्राहकांचे वर्गीकरण केले असता असे लक्षात आले, कि ज्यांच्याकडून ह्याला अपेक्षित टक्केवारी ( मार्जिन ) मिळत नाहीये; अशांना त्याने भरपूर माल दिलाय, कारण भरपूर मागणी होती. आणि ज्यांच्याकडून त्या मानाने कमी मागणी आहे, परंतु जिथे मार्जिन चांगले मिळत आहे, जे दर्जा वगैरे ह्याला महत्त्व देतात, त्यांचे काम नगण्य आहे. 

दुर्दैवाने ( अपेक्षित होतेच ) ह्या गोष्टीचा सखोल अभ्यास तर सोडाच, परंतु विचार देखील केलेला नव्हता. हे ह्यांचे मासिक कृतीशील खर्च ( Operating Expenses ) जाणून घेतानाच लक्षात आले. खरी गोम तर इथेच तर आहे ना !

मागे एकाशी बोलत असताना , त्याने ह्या कौशल्याला "चिंधी - गिरी" असे हिणवले होते, ते आठवले. सदर व्यावसायिकाने त्याचा गाशा लवकरच गुंडाळला हे सांगायला नकोच. 

पण आपल्या उत्पादन अथवा सेवेचा शेवटच्या पै अन पै पर्यंत बारीक सारीक तपशिलासकट , हे कौशल्य सर्व प्रथम आत्मसात करायलाच हवे !

हे "चिंधी" thinking तुम्हाला मोठ्ठे बनवेल. आम्ही नुकताच निवडक वर podcast केलाय, जरूर पहा :- 

https://youtu.be/b7smsF1H9pk

Sunday, 2 February 2025

अर्थपूर्ण संपर्काचे एक उदाहरण

उथळ साहित्याच्या सध्याच्या युगात एक योग्य उदाहरण नजरेस आले. 

अनेक इमेल्स प्रमाणे मला VJM Global ह्या कंपनीकडून देखील नियमित इमेल्स येत होते, आहेत. तसा मी नियमित पणे unsubscribe वगैरे करत असतो, पण काही काही मात्र त्यातील मजकूर वाचत नसलो, तरीही "राहू द्या" स्वरुपात असतात, त्याच प्रवर्गातील ही. 

आज मात्र त्यांची इमेल उघडून बघितली. त्यात त्यांनी Compliance Calendar दिलेले आहे. खूप चोख आहे. शिवाय वाखाणण्याजोगे असे कि खाली एक लहानशी प्रश्नावली देखील दिलेली आहे, ज्यात आपण आपला प्रश्न त्यांच्याकडे पाठवू शकतो, ज्यावर ते उत्तर देवू शकतील. 

शिवाय बाकी सर्व आहेच : जसे कि यु ट्यूब , सोशल इत्यादी. 

ह्या सर्व प्रकारामुळे मी त्यांची website तपासली , जी अत्यंत व्यावसायिक रित्या , अत्यंत चोख ( आकर्षक नव्हे ) तयार केलेली आहे. 

ह्यानंतर मी त्यांचे इतरही इमेल्स तपासले. एक ठराविक ( आठवड्यातून १ इमेल ) frequency त्यात सांभाळली गेलेली आहे, आणि गेले वर्षभर सातत्य देखील. 

ह्यामुळे सदर कंपनी बद्दल एक आदर आणि विश्वास निर्माण होतो. असे अर्थपूर्ण संपर्क निर्माण करणे अधिक आवश्यक आहे.

शिवाय आपल्या स्वत:च्या व्यवसायातील असे Essential माहिती देणारे आपण काय तयार करू शकू असा विचार जरूर करायला हवा, जो आशय मनोरंजक नसेल, परंतु आवश्यक असेल, जो टाळता येणार नाही !