Sunday, 10 August 2025

जागतिक अर्थकारण आणि माझा व्यवसाय : बरेच शिकण्यासारखे

सध्या जगाच्या आर्थिक पटलावर जरा जास्तच हलचल दिसतीये. त्यानिमित्ताने एक व्यावसायिक ( खरे तर एक गुंतवणुकदार ) ह्या नात्याने जाणवणाऱ्या काही गोष्टी :-

गुंतवणुकदार ह्या नात्याने संधी !

कदाचित रोखे बाजार बरेच खाली जातील. प्रत्येक खाली जाणाऱ्या पायरीवर काही शेअर्स थोड्या ( अगदी अत्यल्प ) प्रमाणात घेत राहण्याची संधी. ही गुंतवणूक हमखास वाढते, १५ -२० वर्षांत अनेक पट वाढू शकते. शेअर बाजार कायम वर जाण्यासाठीच जन्माला आलेला आहे. आणि आपण जरी नाही राहिलो, तरी पुढच्या पिढी करिता उत्तम गुंतवणूक आहे ही. नुसतं "मी उद्योजक" बिरूद मिरविण्यात काहीच मतलब नाही. 

बातम्यांना बळी पडायचे नाही 

अमेरिकन लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या शेकडो वस्तूंच्या किमती त्यांच्या आयात शुल्क धोरणामुळे वाढून बसतील. चैन सोडा हे म्हणणे जितके सोपे तितकेच अंमलात आणणे मुश्कील. त्यामुळे हे बाजार अमेरिका भीतीग्रस्त होतील, शेअर खरेदीची पुन्हा संधी देतील, आणि २०२६ च्या आसपास पुन्हा ठिकाणावर येतील. त्यामुळे कोणत्याही भीतींना बळी नाही पडायचे. 

ग्राहक , ग्राहकवर्ग विखुरायचे 

भारताने चांगलाच धडा घेतला असणार : एकूण पैकी फक्त अमेरिकेला होणारी निर्यात ६२ % टक्के आहे. ही विखुरायला हवी. हेच धोरण आपण आपल्या Segments अर्थात ग्राहक वर्गांबद्दल लागू करायला हवे. एकाच ग्राहकावर अवलंबून आपले उत्पन्न नको, एकाच Segment ग्राहक वर्गावर वर सुद्धा नको. 

मैत्री फक्त फायद्याशी !

विचित्र वाटेल ऐकायला, पण निष्कारण भावुकता उपयोगी नाही. वागण्याची रीत भात म्हणून ठीक आहे, पण एखाद्या व्यावसायिक संबंधांतून पुरेसा नफा निर्मित होत नसेल, तर त्यातून बाहेर पडणे केव्हाही चांगले. लवकरात लवकर. दिखाऊ मैत्रीला न जगलेले अमेरिकन अध्यक्ष ते पचवू शकतात, आपण नाही हे पंतप्रधानांनी जसे ध्यानात घेतले आहे, तसे आपणही अनेक व्यावसायिक संबंधांत समजून घेवून वेळप्रसंगी माघार घ्यायला हवी, आणि धूर्तपणे नावे भागीदार निवडायला हवेत. म्हणूनच आपले पंतप्रधान चीन, ब्राझील, रशिया ह्या देशांशी नव्याने जवळीक साधत आहेत. 

मुत्सद्देगिरी : एक आवश्यक कौशल्य  

प्रक्रिया लांबलचक वाटल्या, तरीही वाटाघाटी करण्याची तयारी आपण दाखवून द्यायला हवीच. ह्यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात. 


No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.