Sunday, 3 August 2025

तुम्हाला हे चालेल का ?

आजच मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या ठिकाणी "पंचम पुरीवाला" येथे जावून आलो. आज चा अनुभव तितकासा बरा नव्हता, किंवा अनुभवाने माझे भिंग जरा अधिक तीव्र होत चालले असावे. 

पहिलं म्हणजे इथे queue होता.नेहमी सुद्धा इथे गर्दी असतेच, पण पोटभऱ्या मंडळींची. आजची गर्दी कुतूहल असणाऱ्यांची, एकदा जावून बघू म्हणणाऱ्यांची आणि फूडी मंडळींची देखील. हे reels वगैरे ने वाढणारे ट्रॅफिक. VT म्हणजे आताचे CSMT किंवा CST च्या  GPO बाजुला उतरलो, की समोर पेरीन नरिमन अर्थात बाझार गेट स्ट्रीट च्या अगदी तोंडाशी हा पंचम आहे.

अनेक वर्षे आहे. पुरी आणि सोबत अनेक प्रकारच्या भाज्या आणि अत्यंत रास्त दरात, हे वर्षानुवर्षे मिळत आहे इथे. चव सुद्धा व्यवस्थित. व्यवस्थित इतकंच म्हणतोय, कारण इथे येणारा काही foodie अपेक्षित नाही. स्वस्तात चांगले जेवण हाच ह्यांचा व्यवसाय आत्मा. 

ते अजूनही मिळत आहेच. सोबत काही अनिष्ट गोष्टी पहिल्यांदाच आढळल्या. उदा :- स्टील च्या वाट्या न देता, कागदी. तसेच लाकडी चमचे ज्यातून पातळ भाजी खाताच येत नाही. किंवा स्वच्छतेच्या नावाने संपूर्ण बोऱ्या वाजलेला आहे. साफ सफाई करणारे कर्मचारी तर टेबलावरील खरकटे सरळ खाली ढकलून देत होते. त्यामुळे खूप घाण, अस्वच्छ, असुरक्षित देखील वाटले.

स्वस्त देणे म्हणजे असे करावे असे काही नाही

नुकताच कोइंबतूर येथे गीता हॉटेल नामक अत्यंत स्वस्त, तरीही कमालीच्या स्वच्छ व संपूर्ण प्लास्टिक विरहित उपहारगृहात जायचा योग आला. पुण्याचे बादशाही देखील ह्या प्रकारात मोडते.

धंदा वाढतोय,तो कराच.परंतु काउंटर सोडून मालक मंडळी कधी प्रत्यक्ष जिथे धंदा चालतो तिथे जाऊन पाहतील आणि स्वतः लाच प्रश्न विचारतील, की मला हे चालेल का ? तरच बदल घडेल. नाहीतर लोकप्रियता रसातळाला लागण्यात कितीसा वेळ लागेल ?

कॅफे गुडलक चे आपण नुकतेच काय झालं आहे हे पाहिलेच ! मला वाटतं की सुरुवातीला गरज म्हणून निवडलेला व्यवसाय एकदा स्थैर्य देवू लागला, की जोर पकडतो,वाढतो, आणि खूप पैसेही मिळू लागतात. अशा वेळी लागेल ते भान. सुरुवातीला नाही जाणवले तरी एखादा फटका, झटका बसल्यावर तरी किंवा स्वतः ला जाणवले तरीही हा बदल घडून येऊ शकतो, आणि संभाव्य हानी टळू शकेल.

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.