Wednesday 30 June 2021

Website Content : अत्यंत विचारपूर्वक तयार करा


काही अनुभव ....

Funded Startups


ह्या केसेस मध्ये अनेक वेळा , उद्योजक भरपूर खर्च वगैरे करतात, छान अशी website बनवतात. "Navigation" (म्हणजे website वर ग्राहक किंवा कुणीही भेट द्यायला आलं कि त्यांनी कसा प्रवास करावा विविध दालनांत ह्याची केलेली रचना.) उत्तम असतं, content सुद्धा उत्तम भाषेत लिहिलेला किंवा लिहून घेतलेला असू शकतो, तरीही त्यात काही flaws असू शकतात.
 

मोठ्या कंपन्या

 
ह्यांच्या websites कधी कधी Graphically खूपच आकर्षक बनविलेल्या असतात. सर्व ठीक ठाक असतं, कारण त्याना बऱ्याच वेळा website ची तुमच्या आमच्या इतकी गरजही "भासत" नाही. त्यांची विचारसरणी sorted (त्यांच्यापुरती) असते. तरीही "तो" factor missing असू शकतो. अर्थात कंटेंट चा.

तुमच्या-आमच्यासारखे लहान-सहान उद्योजक

 
ह्यांना मी MSME म्हणेन. ह्यातल्या काहींना website ची उपयुक्तता पटलेली असते, आणि ते web developer वर अवलंबून असतात. आता हे developers ह्या क्षेत्रात अनुभव असलेली मंडळी असतात, म्हणजे design वगैरे. ही लोकं परत त्यांच्या त्यांच्या परीने त्या त्या budget मध्ये बऱ्यापैकी चांगली website बनवून देतातही. ह्यांनी तर व्यवस्थित content प्रकाराला पूर्ण "फाटा" दिलेला आढळून येतो.

चांगला कंटेंट म्हणजे काय नक्की ?


चांगला कंटेंट म्हणजे त्या त्या व्यावसायिकाला व्यवसाय मिळवून द्यायला सहाय्यक ठरणारा मजकूर. तो अतिशय उत्कृष्ट भाषेतच तयार व्हायला हवा असे नाही.

कोणती भाषा वापरावी ?


स्थानिक व्यवसाय असेल तर ...

आता एखाद्याची केक बनवून द्यायची सेवा असेल, तर त्या त्या ग्राहकांना पटणारी भाषा हवी. शिवाय त्या त्या भागातली असावी. म्हणजे पुण्यात असेल, तर मराठी असेल तर अगदी उत्तम. तुमचे ग्राहक जर सर्वभाषक असतील , तर एखाद बटन ठेवून इंग्लिश आणि हिंदी भाषेतही तो तो मजकूर लिहून घ्यावा. Product ची पेजेस असतील, तर ती इंग्लिश मध्ये ठेवा की (फक्त) ! उगाच क्लिष्ट वाटणारी मराठी भाषा नको. पण Founder विषयी वगैरे असेल तिथे आवर्जून बहुभाषिक कंटेंट ठेवल्यास परिणाम साधला जाईल.

सार्वत्रिक व्यवसाय असेल तर ....

अशा केस मध्ये ठरवा, की साधारण कोणत्या प्रकारचे लोक तुमची सेवा वापरणार आहेत, जरी कुठलेही असले तरीही. उदाहरणार्थ लाडू बनविण्याचा व्यवसाय आहे, आणि परदेशात पाठवत आहात, तरीही ultimately वाचणारा माणूस मराठी असणार आहे. इथे फक्त इंग्रजी मजकूर मर्यादित परिणाम देईल.

उलट एखादे ट्रेनर आहेत, आणि त्यांचा Audience फक्त मराठीच नाहीये, त्यानी आपला मजकूर "फक्त इंग्लिश" मध्ये ठेवला तरी चालू शकेल.

कंटेंट सुंदर (classy) की समर्पक (Relevant)

खरं म्हणजे दोन्ही असावं. तरीही मी समर्पकतेला जरा जास्त महत्त्व देईन. म्हणजे एक वेळ सुंदर नसला तर ठीक, परंतु तो समर्पक असायला हवाच ! तरीही, अगदी काही अपवाद वगळता , जड भाषा टाळाच !

कंटेंट वाचायला सोप्पा असू द्या !

एखादा परिच्छेद लांबलचक वाचायला बोअरिंग वाटू शकतो. त्या ऐवजी तोच जर उप मुद्दे काढून सुट्टा सुट्टा केला, तर सोप्पा होऊ शकतो, शिवाय त्या त्या भागाला वेगवेगळी शीर्षके दिली, तर थेट मुद्द्यावर वाचक येवू शकतो. अगदी एक जलद Tip म्हणजे : कोणताही परिच्छेद ५ ते ६ ओळींच्या पलीकडे नको !

हीच तत्त्वे Video Content ला देखील लागू पडतात ! आपल्या Video मध्ये देखील, असे महत्त्वाचे मुद्दे शीर्षके देवून Highlight करता येतात. Youtube ने Chapters ची सोय केलेली आहे, त्यातून फायदा असा होतो, की पुन्हा Visitor थेट त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या भागावर थेट येवू शकतो.

कंटेंट उगाचच पूर्णपणे वाचायला लावायचा नाही

कधीकधी हे पूर्ण वाचा, किंवा हा Video शेवटपर्यंत पहा, मगच तुम्हाला काहीतरी भारी मिळेल असाही Approach नको. तसेही Youtube वर Video टाकला कि इतर ठिकाणी आपल्याला भटकावं अशी योजना असतेच. आपलं धोरण बरोब्बर ह्याच्या उलट हवं ! आपल्या आणि फक्त आपल्याच कंटेंट वर राहावं असं. ह्यासाठी आम्ही तर हल्ली निऊ वर Video सोबत Audio ची सुद्धा लिंक देतो. म्हणजे होतं असं कि Audio हा Distraction FREE असा ऐकता येतो. 

Website वरची पाने (Pages)

आपल्या वेबसाईट ला visit करणारे Visitors साधारणपणे दोन प्रकारचे असतात :- [ Stage 2 ]
(Stage 2 म्हणजे तुमच्याविषयी थोडीफार माहिती असलेले लोक)

कुणाच्या सांगण्यावरून आलेले लोक,जे आपल्यामागे आपलं profile तपासतात : ही संख्या खूप मोठी असते, आणि इथेच तुमचे बरेच ग्राहक गळत असण्याची शक्यता आहे. ह्यांच्याकडे आधी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण ही मंडळी बऱ्याचदा आपल्या नेट्वर्किंग मधून एखाद्या मेंबर च्या सांगण्यावरून आलेली असू शकतात. किंवा एखादा मेंबर स्वत:च आपलं profile आपल्या अपरोक्ष तपासत असू शकेल. हा मेंबर जर तुमचा संभाव्य SRP अर्थात Specialized Referral Partner असेल, मग तर जरा जास्तच लक्ष देण्याची गरज आहे. कारण इथून तुम्हाला कायमस्वरूपी, खूप कमी कष्टांत जास्त व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे.

आपल्याला कुठेतरी भेटलेले लोक किंवा Ads वरून आलेले लोक :- [ Stage 1 ] 
(Stage 1 म्हणजे तुमच्याविषयी विशेष माहिती नसलेले लोक)

ह्यांच्याकडेही लक्ष द्या. कारण ह्यातूनच तर Stage 2 ला जातील ना ! कधीकधी तर दोन्ही एकत्र घडू शकतं. अशा वेळी तुमची केस अधिक पक्की होईल हे निश्चित! शिवाय ह्या मार्गे येणारे लोक हे बऱ्याच वेळा त्यांना गरज असतानाच येतात. 

प्रत्यक्ष घेऊ इच्छिणारे लोक [ stage 3 ]

हे सर्वात जास्त probable. हे लोक तुमचे Reviews पाहतात, आणि "About Us" सुद्धा. खरं म्हणजे सर्वात शेवटी About Us हे पेज चेक करतात हा अनुभव आहे. त्यामुळे ह्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कसं असावं हे पेज ? ह्यावर अगदी व्यवस्थित प्रकारे पोस्ट केलेली Founder ची स्टोरी असावी. जमल्यास तो Video सोबत Audio form मध्ये देखील असावी. आणि शिवाय Text मध्ये सुद्धा !

ह्या सगळ्याला व्यवस्थित महत्त्व द्या 

ह्याला वेळ लागेल कदाचित. कारण घाई-घाईत उरकायचं हे कामच नव्हे. पूर्ण strategy ने करायचे हे काम आहे, शिवाय संपूर्ण वेळ देवून. तुम्हाला काही मदत हवी असेल, विनामुल्य Assesment करायची असेल तर जरूर संपर्क करा : ९८५०९९७११० ( Joy Web Services )




Tuesday 29 June 2021

Testimonials चा अतिशय योग्य वापर : Cache Technologies

 

Testimonials का घ्यायची , आणि कुणाकडून .....

Testimonials म्हणजेच आपल्या सेवाकिंवा उत्पादने ह्यांच्या बद्दल बोलले गेलेले उत्तम बोल, असं म्हणता येईल. आपला धंदा वाढवायचा असेल, तर हि अशी घ्यावीत, कि एखादी मोठी कंपनी आपल्याकडे विचारणा करायला आली, तर त्याचं आपल्याबद्दल अगदी उत्तम मत व्हावं. जी पाहून आपली Value System त्यांच्या लक्षात यावी आणि त्याना आपल्याबरोबर काम करावसं वाटावं.


Cache Technologies ही तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी एक कंपनी. ह्यांचं काम चालतं B2B; म्हणजेच इतर व्यावसायिक मंडळींना हे त्यांचा माल देतात, जे नंतर प्रत्यक्ष ग्राहका पर्यंत तो पोचवितात. हे ह्यांचं पार्टनर नेटवर्क. हे partners जितके उत्तम, तितकं Cache चं काम उत्तम चालणार हे ह्यांनी छान समजून घेतलं आहे, आणि म्हणूनच त्यांनी सर्व प्रकार ची Testimonials गोळा करून वेबसाईट वर ठेवली आहेत. ह्याने कंपनीची "पत" वाढते.

व्यवसाय चालविताना हे ४ खांब महत्त्वाचे :-

1. व्यवसाय - मालक ( Founders-owners )
2. पुरवठादार ( Vendors-Suppliers )
3. कर्मचारी ( Employees )
4. खरेदीदार ( Buyers )

Cache ने ह्या सर्व वर्गातील मांडणी अगदी चोख-व्यवस्थित केलेली आहे. 

Partners हेच त्यांचे प्रमुख खरेदीदार आहेत, तर मालकांविषयी "About Us" पानावर वाचायला मिळते.

विश्वासार्हता वाढीस लागते 

"हे कोण पाहतं का ?" हा प्रश्न येत असेल मनात, तर "नाही" म्हणजे कोणीही  पाहत नाही, तर तेच पाहतात जे खरोखर ह्याची जाण आणि किंमत आहे.

Link to the Website :- Cache Technologies

Monday 28 June 2021

Connect The Dots ...श्री. अजित मराठे सरांची मुलाखत

 Connect The Dots ...

पर्वा श्री.अजित मराठे सरांची मुलाखत सुरू असताना 'Connect The Dots' हा शब्द दोन मुख्य कारणांनी डोक्यात घर करून राहिला,

पहिलं - 'Connect The Dots' - हे रश्मी बंसल ह्यांचं गाजलेलं पुस्तक - उद्योजक मानसिकतेच्या 20 व्यक्तींची ही कहाणी. मुख्य म्हणजे आयआयटी, आयआयएम मध्ये न जाताही निव्वळ स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या इर्ष्येतून व्यवसाय मोठा करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं.या उद्योजकांची, 'जुगाड, जूनून आणि जूबान' अशी तीन सामायिक स्वभाववैशिष्ट्ये लेखिकेने ह्या पुस्तकात तपशिलात मांडलीयेत.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच 'मी काही तत्वज्ञान सांगायला नव्हे तर माझे अनुभव तुमच्याशी शेअर करायला आलो आहे आणि मी तुमच्यासारखाच एक उद्योजक आहे', असे मराठे सर म्हणाले आणि औपचारिकतेचे सगळे बंध गळून पडले.

लेखिकेला 'जुगाड' - या शब्दाचा पुस्तकात अभिप्रेत असलेल्या अर्थाप्रमाणे मराठे सरांना व्यावसायिकतेचा वारसा होता असे नाही.'सरांचे आईवडील शिक्षकी पेशात त्यामूळे स्वतःच्या निरीक्षणातून, प्रयोगशीलतेतून आणि आलेल्या अनुभवांचा डोळसपणे वापर करत ते व्यवसायात एक एक पायरी वर चढत गेले. सुरुवातीच्या काळात 'भांडवलाची कमतरता' भरून काढण्यासाठी काँट्रॅक्टरपासून 'टाइम्स ऑफ इंडियात' जाहिरात देण्यापर्यंत' वस्तुविनिमय पद्धतीचा (अर्थात Barter System) कल्पक आणि प्रभावी वापर (अर्थात 'जुगाड') हे अतिशय चपखल उदाहरण ठरावे 

सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी आणि त्यानंतर 'Brand Equity Management in Real Estate Industry in MMRDA Region' ह्या विषयात संशोधन प्रकल्प सादर करून पीएचडी मिळवणे तसेच 1995 पासून इंटिरिअरच्या कामांपासून सुरुवात करून NRDL हा बांधकाम क्षेत्रातील ब्रँड नावारूपाला आणण्याच्या मागे निव्वळ 'जूनून'

व्यवसायात अडचणी येतच असतात पण आपण जाणूनबुजून कुणालाही न फसवता काम करावे व आपल्या शब्दाचा मान राखावा असं ते म्हणतात. मराठे सर आज 'बिझिनेस गुरु' म्हणून प्रसिद्ध आहेत.आपला 25 वर्षाचा अनुभव स्वतःच्या 'जुबानी' तून 500 हुन अधिक व्याख्यानातून त्यांनी लोकांपर्यत पोहोचवलाय. 

अडचणी - व्यवसायात दररोज अडचणी येत असतात आणि त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया ही निरंतर आहे. माणसांशी निगडित असल्याने व्यवसाय म्हणजे लोकांचा गंड किंवा आत्मसन्मान चुचकारत व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी शक्य तितक्या व्यक्तींबरोबर वैयक्तिक संबंध प्रस्थापित करणे ह्याला महत्व आहे. वैयक्तिक भेटीगाठी आणि संबंध असल्यास तुम्ही तुमच्या अडचणी इतरांबरोबर शेअर करू शकता आणि लोकंच त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला निरनिराळ्या कल्पना सुचवतात असं मराठे सर सांगतात

नेटवर्किंग - नेटवर्किंगचा अर्थ लावतांना आपल्याकडून होणारी गल्लत मराठे सर अतिशय सोप्या आणि नेमक्या भाषेत अधोरेखित करतात,

> तिथे विक्री साठी जाऊ नका तर आपली ब्रँड इमेज तयार करण्यासाठी प्रयत्न करा

> घेण्याऐवजी देण्यावर/मदत करण्यावर भर द्या

> मानवाची नैसर्गिक भावना अशी की देणारे आवडतात, घेणाऱ्यांना  मात्र शक्य तो दूर ठेवण्याकडे कल असतो

> प्रत्येक व्यक्तीत प्रचंड क्षमता असते. ज्ञान, कौशल्य किंवा मर्यादित का असेना त्याचं संपर्कजाळं ह्यातून काही ना काही आपल्या उपयोगी पडण्यासारखं असतं

> नेटवर्किंग मीटिंगमध्ये काय बोलावं आणि काय नाही ह्यांचं ताळतम्य बाळगा, त्यासाठी 'ऐकण्यावर' भर द्या

> बोलतांना इतरांच्या आवडलेल्या गोष्टींचा जरूर उल्लेख करा, तुमच्यातल्या सामायिक गोष्टीं (Background of relativeness) ओळखून संभाषणाला सुरुवात करा

> नेटवर्किंग मध्ये एकवेळच्या 'विक्री' ऐवजी उत्तम संबंध प्रस्थापित करून दीर्घकाळ आणि वारंवार व्यवसाय मिळवण्याच्या दृष्टीने काम करा (नेटवर्किंगचा अर्थ शिकार करणे नव्हे तर शेती करणे असा अभिप्रेत आहे)

मार्स गुरुकुल  - नवउद्यमींना व्यवसायात उंच भरारी घेण्यासाठी म्हणून MARS Gurukul ह्या आपल्या संस्थेतर्फे ते काही 'निवडक' व्यावसायिकांना मार्गदर्शन करतात.आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत टक्के टोणपे खाल्ल्यानंतर मिळालेली शिकवण आणि अनुभव ते या नउद्यमींना पुढे आणण्यासाठी वापरतायत. 'निवडक' अशा अर्थाने की मराठे सरांच्या मते प्रत्येक व्यवसायात अगदी 100 कोटीच्या पुढे उलाढाल करण्याची क्षमता असते पण मुदलात त्या व्यावसायिकाची तेवढी तयारी आहे का?

मराठे सरांना व्यावसायिकांच्या काही जाणवलेल्या अडचणी म्हणजे,

1.भांडवल कसं उभारायचं?

2.अनुभवाची कमतरता

3.पंचवीस एक वर्ष काम करून पण वार्षिक उलाढाल जेमतेम 4 - 5 कोटीच्या पुढे न जाणे किंवा त्यातच समाधान मानणे 

4.पुढची पिढी हा व्यवसाय करेल की नाही किंवा त्रयस्थ व्यक्ती नेमून तो दैनंदिन कामकाज पाहिल ह्याबद्दल काही पूर्वतयारी नसणे

5.व्यवसायाची रणनीती फक्त कागदावर असणे पण त्याची अंमलबजावणी कशी करावी ह्याबद्दल साशंक असणे इत्यादी. त्यामुळे क्षमता आणि इच्छाशक्ती असणाऱ्यांबरोबर मात्र ते अगदी सावलीसारखे 3 ते 5 वर्ष स्वतःचा बहुमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन करण्याचं काम करतायत (ह्याची संकल्पना म्हणून सर्वश्रुत जरी असला तरी मराठे सरांनी दिलेला 'श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या नात्याचा दाखला' प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका

Effective Delegation - (अर्थात योग्य प्रतिनिधींकडून काम करून घेणे) - 

बऱ्याच वेळेला आपल्या व्यवसाय किंवा कामाच्या अतिप्रेमात पडल्यामुळे आपल्याला इतरांनी केलेलं काम आवडत नाही आणि हा सतत चा मानसिक झगडा आहे. बऱ्याच वेळेला कर्मचारीही कामचुकारपणा करतात. Effective Delegation साठी मराठे सर एक सोपी पण अतिशय प्रभावी त्रिसूत्री सुचवतात,

1.I do, you see - मी करतो/करते , तू बघ

2. We do - आपण दोघांनी एकत्र करूया

3.You do, I see - तू कर, मी बघतो/बघते 

पण ह्यासाठी आपल्या कामाच्या पद्धतीचं प्रमाणिकरण आणि त्याचं दस्तावेजीकरण केलेलं असणं आवश्यक आहे. मालक म्हणून आपल्या अखत्यारीत आपण वेळोवेळी कामाच्या पद्धती बदलू लागलो तर मात्र कर्मचाऱ्यांचा नाईलाज होऊ शकतो असं ते सुचवतात 

अस्वस्थपणा हा उद्योजकाचा स्थायीभाव कारण तो रोज नवीन गोष्टी शिकत असतो.आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या कालावधीत सामाजिक, आर्थिक आणि अगदी भौगोलिक बदल होत असतात ज्याचा आपल्या व्यवसायावर परिणाम होत असतो. दैनंदिन कामकाजात अडकल्यामुळे बऱ्याच वेळा काही महत्वाच्या गोष्टींची नोंद घेणं उद्योजकांकडून राहून जातं.

दुसरं - साधारण दोनेक वर्षांपूर्वी लोकसत्ताचे संपादक श्री.गिरीष कुबेर ह्यांचं श्री.नरहर कुरुंदकर ह्यांच्यावर आयोजित एक व्याख्यान माझ्या ऐकण्या/पाहण्यात आलं. समाजात, देशा परदेशात वेगवेगळ्या टप्प्यात आणि कालखंडात घडणाऱ्या गोष्टींचा तार्किक संबंध लावून (टिंब टिंब जोडून मोठं चित्र - Connect The Dots) आपल्याला उलगडून दाखवणारे आणि तटस्थ बुद्धिमत्तेने मांडणारे 'कुरुंदकर' असावे लागतात आणि तसे ते नसल्याने होणारी अपरिमित हानी असा त्यांच्या व्याख्यानाचा रोख होता

पर्वाचं मराठे सरांचं 'अनुभव कथन' हे कुठल्याही उद्योजकाला हे असं Reading between the lines किंवा ती अनेक टिंब एका रेषेत जोडून दाखवणारं होतं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या, 'बीएनआय'चे ईवान माईझ्नर आणि 'सॅटर्डे क्लब'च्या माधवराव भिडे सरांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या श्री.अजित मराठे सरांना 'निवडक उद्यमी' तर्फे त्रिवार वंदन (Take a bow🙏) आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा💐. पुराणकाळातील गुरू शिष्य परंपरेप्रमाणे त्यांचं सतत मार्गदर्शन आम्हाला लाभो अशी कामना 

वि. सू. सरांच्या मुलाखतीची व्हिडिओ लिंक , आणि ऑडीयो लिंक येथे मिळेल 

धन्यवाद 

Tuesday 22 June 2021

संस्कृती + संपत्तीनिर्मिती + समाजभान = किर्लोस्कर

मुदलात किर्लोस्कर समूहाची सुरुवातच आपले अभियांत्रिकी कौशल्य वापरून शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी काही तरी करता यावं ह्या उद्देशातून झाली. त्याकाळी (साधारण इ.स.1910 च्या आसपास) शेतकऱ्यांचे नांगरांचे फाळ हे लाकडाचे असत.लाकडाला स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात, पाण्यात अति भिजले की ते कमकुवत होतं आणि म्हणूनच लक्ष्मणरावांनी 'लोखंडाचा नांगर' तयार केला.

सरकारी रेट्यामूळे सायकलचे दुकान असलेली जमीन गमवावी लागल्यामुळे 'औंध' च्या पंतप्रतिनिधींकडून त्याकाळी 10 हजार रुपयांची कर्जाऊ रक्कम व जागा मिळवण्यासाठी लक्ष्मणरावांनी पुन्हा जुळवाजुळव केली (ह्याला आजच्या भाषेत Collaboration आणि Funding म्हणता येईल 🙂)

युरोपातील औद्योगिक वसाहतींबद्दल वाचून माहीत असल्यामुळे 'कुंडल' ची जागा उद्योगासाठी निवडण्यामागचं कारण म्हणजे रेल्वेने कच्च्या पक्क्या मालाची ने आण करता येईल तसंच पाणी जवळ असल्यामुळे (कृष्णा नदी) कारखान्याच्या आसपास औद्योगिक वसाहत निर्माण करता  येईल.(आज कुंडल चं किर्लोस्करवाडीत झालेलं रूपांतर पाहून लक्ष्मणरावांची दूरदृष्टी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी) दोन्ही दिसते.....

लक्ष्मणरावांचे थोरले सुपूत्र शंतनुराव हे त्याकाळी (सन 1926) मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजि येथून 'यांत्रिक अभियंता' ही पदवी मिळवलेल्या काही मोजक्या भारतीयांपैकी एक.भविष्याचा वेध घेणाऱ्या शंतनुरावांनी भारताला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्याचा प्रयत्न केला.जेव्हा कुणी विचारही करू शकत नव्हते (1954 साली) तेव्हा त्यांनी डिझेल इंजिनाचा कंटेनर जर्मनीला निर्यात केला होता.1957 साली शंतनुराव इंजिनियरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल चे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.विकसित देशांत सुद्धा जेव्हा 'जागतिकीकरण' हा शब्द दबक्या आवाजात उच्चारला जात असे तेव्हा निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी रॉटरडॅम, हॉलंड, बँकॉक येथे ऑफिसे थाटली होती.मलेशिया आणि फिलिपाईन्स येथे स्थानिक बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्याबरोबरच जगभर वितरकांचं जाळं निर्माण करण्यासाठी यंत्रांचे सुटे भाग बनविण्याचे कारखाने उभारले होते.परदेशी लोकांच्या तालावर नाचणं त्यांना मान्य नव्हतं. भारताच्या राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याचा रस्ता हा औद्योगिकीकरण आणि वाढीव उत्पादनातून जातो असं त्यांचं ठाम मत होतं.'आर्थिक तयारी ही सैन्यदलाच्या तयारी इतकीच महत्वाची आहे' असं ते म्हणत असत. रोजगार निर्मितीसाठी तसेच लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी यंत्रांची आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास होता.1960 च्या दशकात शंतनुरावांनी भारत सरकारच्या आर्थिक नियोजन, सार्वजनिक क्षेत्राबद्दलची धोरणे आणि एकंदरीतच 'लायसन्स राज' ह्याबद्दल टीका केली तेव्हा बऱ्याच समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी त्यांची थट्टा केली होती पण पुढे 1991 साली औद्योगिकीकरण आणि उदारमतवाद स्वीकारून भारत सरकारने एक प्रकारे शंतनूरावांचे विचार मान्य केल्यासारखंच झालं.

ते कायमच यंत्रांचे सुटे भाग बनवणाऱ्या उद्योगांना उत्तेजन देत.छोट्या उद्योजकांना उभं राहण्यासाठी कर्ज देण्यापासून ते त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यापर्यंत शक्य ती सगळी मदत ते करत असंत.स्वच्छतेचा त्यांचा आग्रह त्यांच्या उद्योगांपुरताच मर्यादित नव्हता तर 'स्वच्छ आणि सुंदर' शाळा हा उपक्रम त्यांनी पुण्यात राबवला व वेळोवेळी शाळेत जाऊन ते आढावाही घेत असत.1965 साली त्यांना 'पद्मभूषण' ह्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2003 साली त्यावेळचे भारताचे पंतप्रधान श्री.अटलबिहारी वाजपेयी यांनी शंतनूरावांच्या शंभराव्या जयंती निमित्त पोस्टाचे तिकीट प्रसारित करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.

ते नेहेमी म्हणत 'मला उद्योगपती म्हणवून घेण्यात रस नाही, भारत हे सक्षम असे औद्योगिक राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीने चळवळ उभारण्याचा किर्लोस्कर समूहाचा मानस आहे'....शंतनुरावांच्या कारकिर्दीत किर्लोस्कर समूह शब्दशः हजारो पटींनी वाढला

शंतनुरावांचे सुपूत्र श्री चंद्रकांत किर्लोस्कर ह्यांना ही दूरदृष्टी होती व आजोबा आणि वडीलांपासून लाभलेला वारसा त्यांनी पुढे नेला. आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण झाल्यानेच दीर्घकालीन औद्योगिक वाढ शक्य आहे असा त्यांचा विश्वास होता. अभियांत्रिकी क्रियाकृती व उत्पादनांचा दर्जा राखायचा असल्यास 'संशोधन व विकास' ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे हे त्यांनी ओळखलं होतं व त्यादृष्टीने किर्लोस्कर समूह अद्ययावत राहील ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परदेशी कंपन्यांनाही ज्याचा मोह आवरत नसे अशा अद्ययावत कार्यप्रणाली आणि प्रक्रिया श्री.चंद्रकांत किर्लोस्कर यांनी आपल्या उद्योगांमध्ये मध्ये राबविल्या होत्या 

👉ग्राहकांचं हित किर्लोस्कर समूहाच्या कायमच केंद्रस्थानी राहिलं आहे.लोखंडाचा नांगर बनविल्यानंतर काही बिघाड झाल्यास लक्ष्मणराव बदलून देत असत.

👉ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून त्यानुसार अपेक्षित बदल घडवणे

👉शाळांमध्ये पाणी, स्वछता इत्यादी उपक्रम राबविणे 

👉व्यवस्थापन मंडळ आणि कर्मचारी ह्यात व्यावसायिक संस्कृती रुजविणे - कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची काळजी असल्या कारणाने क्वचितच कधी त्यांच्यात विसंवाद होणे

👉आपल्या उद्योगांमध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन पद्धत राबविणे - 

 फॉरवर्ड इंटिग्रेशन- उदा: आपली उत्पादने विकताना उत्पादनानंतरच्या पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवणे - वितरकांचं जाळं निर्माण करण्याबरोबरच आपला माल थेट बाजारपेठेत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे

बॅकवर्ड इंटिग्रेशन - उदा: यंत्र बनविण्यासाठी लागणारे सुट्टे भाग पण शक्य असल्यास स्वतःच उत्पादीत करणे 

👉सतत सुधारणा करत राहणे

👉व्यवसायात प्रत्येक पातळ्यांवर प्रेरणादायी नेतृत्व तयार करणे

👉स्वतःच्या कौशल्यात भर घालून पुढे जाऊ इच्छिणाऱ्या सुरुवातीच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासदेखील कंपनीतच सेवाबढतीच्या संधी उपलब्ध करून देणे

शंभर वर्षाची गौरवशाली परंपरा आणि आज किर्लोस्करांची पाचवी पिढी कार्यरत आहे पण त्याच्या जोडीला 4 पिढ्या किर्लोस्कर समूहात सेवा देणारे कर्मचारीही आहेत. हे अशक्य कोटीतील उदाहरण कदाचित इथेच सापडलं असतं आणि 2010 साली किर्लोस्कर समूहाच्या शतकमहोत्सवी  कार्यक्रमात समूहाने अश्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केला

'या सम हाच' 

संस्कृती, संपत्तीनिर्मिती आणि समाजभान जपणाऱ्यांना आदर्श मानणाऱ्या 'निवडक उद्यमी' तर्फे किर्लोस्कर समूहास आणि त्याची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य पुरुष श्री.लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर ह्यांना आदरांजली 🙏

कार्यक्रमाची Video रेकॉर्डिंग लिंक 

फक्त Audio रेकॉर्डिंग लिंक 



Monday 21 June 2021

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 

नवीन  प्रथेप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!😊

खरं तर योग हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. पण काळाच्या ओघात आपण त्याचे महत्व विसरलो. आज पाश्चात्य आपल्याला आपल्याच संस्कृतीशी  ओळख नव्याने देत आहेत, त्याचे महत्व सांगत आहेत आणि आपण 'योगा डे ' म्हणून वेगवेगळे कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतो.

योग म्हणजे जुळवणे किंवा एकत्र आणणे. एका वाक्यात आणि सोपे सांगायचे तर योग म्हणजे तीन गोष्टींचे एकत्रीकरण आहे - वेगवेगळे शारीरिक पवित्रे,श्वासांचे प्रकार आणि ध्यान. खरं तर माइंडफुलनेस हा योगाचा अविर्भाज्य भाग आहे. यात शरीर मन यांची सांगड घालणे, वर्तमानात राहणे अपेक्षित आहे. पण हल्ली भर शारीरिक व्यायाम श्वास यावर जास्त जातो. योग आणि माइंडफुलनेस या दोन्हींचा आपल्याला स्वतःविषयी सजगता वाढवणे स्व- नियमन यासाठी उत्तम उपयोग होतो.

आजच्या स्पर्धात्मक युगात आपण सतत धावपळ करत जगत असतो. बाह्य गोष्टींचे बारीक निरीक्षण, विश्लेषण  करत असतो. पण यात स्वतःच्या मनात डोकावायला वेळ नसतो किंवा त्याची गरज वाटत नाही. परिणामी मानसिक आणि शारीरिक आजारांचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे.

यावर उत्तम  खात्रीशीर  उपाय म्हणून पाश्चात्य लोक आज योग आणि माइंडफुलनेस ह्या मूळच्या भारतीय तंत्रांचा वाढता उपयोग करत आहेत.   त्यांचे अनन्यसाधारण महत्व जाणून आता ' माइंडफूल योगा ' हा नवीन प्रकार उदयास येत आहे. यात गौतम बुद्धाच्या माइंडफुलनेस (क्षण- प्रतिक्षण वर्तमान जाणणे) आणि ऋषीमुनींनी विकसित केलेल्या योगाची सांगड घातली आहे. याच्या नियमित सरावाचे अनेक फायदे आहेत. स्वतःच्या कृती, विचार भावना यांची सखोल जाणीव, हानिकारक प्रतिक्रिया कमी होणे, दैनंदिन समस्यांना परिणामकारक तोंड देता येणे, घटना आणि लोकांचा विना-प्रतिक्रिया स्वीकार, स्वतः आणि लोकांप्रती करुणाभाव आणि या सर्वांचा परिणाम म्हणून मिळणारी आंतरिक शांती

आनंद आणि शांतीसाठी आपण झगडत असतो आणि ते सोडून बहुतेक सर्व मिळते अशी आपली आजची स्थिती आहे. आपण डॉक्टर, औषधे यावर वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करतो. पण थोडा वेळ स्वतःसाठी देत नाही.

आजच्या या दिनाचे औचित्य साधून आपण पुन्हा एकदा आपल्या या अनमोल संस्कृतीचे स्मरण करू या आणि विनाखर्च  शारीरिकमानसिक आरोग्य  मिळवू या. हे एकाच दिवसाचे साजरेपण सोडून रोज थोडासा वेळ   'माइंडफूल योगा' साठी ठेऊ या आणि आनंदयात्री बनू या.


Thursday 17 June 2021

वेळेचं नव्हे; तर "उर्जे" चं व्यवस्थापन करू !

परवाच प्रिय मित्र कात्रे अगदी काकुळतीला येवून म्हणाला

ह्या मिटींगा करून जाम दमायला होतं रे !  

मी अगदी पक्का सहमत आहे ह्याला.तरीही हे सगळं मीच आमंत्रित केलंय ना ! म्हणजे असं कि दुकान उघडायचं आणि म्हणायचं "गिऱ्हाईक लय दमवत".दमवत काय असतं, तर ह्याकडे द्यावं लागणारं लक्ष : व्यवधान. आणि हे तुफ्फान उर्जा खाणारं काम आहे. 

एकदा एखाद्याने १२१ साठी विनंती केली,कि आपण लगेच हो म्हणतो,आणि नंतर दमल्याच फिलिंग येतं कारण ह्याला शक्ती लावावी लागते,म्हणजे खास शक्ती : इच्छा एकवटून. हि इच्छाशक्ती. ही खर्ची पडते. म्हणजेच लक्षात असू द्या की ही इच्छाशक्ती काही आपल्याकडे अमर्याद नाही. ती संपते, कमी-कमी होत असते वयानुसार. त्यामुळे ती manage करणे, हेच श्रेयस्कर. 

उपाय ? दुकानाची वेळ ठरवून घेणे.पुणेरी वाटेल खरं; पण माझा व्यवसाय हा सर्वात आधी मी माझ्यासाठी उभारला आहे.कस्टमर जर देव असेल, तर मीसुद्धा देव आहेच की.कधीही कोणत्याही वेळी कस्टमर साठी धावत जाणे ह्याला मी उत्तम व्यवसाय नाही समजत.१ ते ४ दुकान बंद ठेवणारे चितळे गेल्या काही वर्षांत कुठे गेलेत पहा.अर्थात सिस्टीम हवी. 

ह्याच निकषाने मी आधी मी कोणत्या प्रकारची कामं करतो ह्याची चक्क यादी तयार केली.ढोबळ मानाने हि कामं ३ प्रकारांत विभागली :-

  1. sales म्हणजे व्यवसाय आणणारी कामं 
  2. Execution म्हणजे हातातली कामे/Orders ची पूर्तता करणे 
  3. Admin अर्थात व्यवसायाचे व्यवस्थापन 
म्हणजे हि कामे करावीच लागतात.पोटापाण्याची असं म्हणू हवं तर ! ही दिवसभरातच करायची. 

ही सोडून मी इतर महत्त्वाची व्यावसायिक कामं लिस्टिंग केली : ती म्हणजे :-
  • १-२-१ s 
  • उद्योजकांना online विषयी द्यायचा विनामुल्य सल्ला ( Assesment )
  • Assesment नंतर चा follow up call 
ह्या कामांना मी संध्याकाळचा वेळ राखून ठेवला. ही कामे फोनवर बोलता बोलता होतात, कदाचित थोडे long Calls चालू शकतात, तसेच ही कामं "पेरणी" स्वरुपाची असतात. महत्त्वाचीच. तरीही संगणकावर बसून करावी लागत नाहीत. म्हणून ही कामं मी बहुतेक वेळा Walk When You Talk ह्या प्रकारे करतो. जेणेकरून माझी physical Activity सुद्धा होते, आणि फोन ला रेंज सुद्धा बाहेर उत्तम मिळते. 

ह्या शिवाय माझी आवडीची कामं म्हणजे जी मला फार प्लान करावी लागतं नाहीत, ती मी सकाळी जागं झाल्यावर आपोआपच करतो. उदा : Blogging, बागकाम वगैरे.

गुगल कॅलेंडर चा वापर :-


आवडीची कामं सोडून सगळी माझ्या सगळ्या Appointments मी गुगल कॅलेंडर वर नोंद करून ठेवतो. त्यात पुन्हा Appointment Booking साठी एक वेबसाईट वापरतो. त्यावर माझ्या ह्या "इतर" कामांची यादी तयार केली, आणि तेसुद्धा माझ्या गुगल कॅलेंडर ला sync करून घेतलं. आणि विशेष फायदा म्हणजे ज्यांना माझ्यासोबत १-2-१ करायची असते, त्याना मी विनंती करतो आणि लिंक पाठवून स्लॉट ठरवून घेतो. ह्यात उर्मट पणा नाहीये, तर स्वत:च्या आणि समोरच्याच्या वेळेला रास्त आदर देणे आहे. काहींना हे आवडत नाही असं सुद्धा होऊ शकतं. असं झालं तर तो contact आपल्यासाठी नाही असं मी समजतो. पण बहुतेक मंडळी हे स्वीकारतात.



ह्या खेरीज CRM सुद्धा मी वापरतो. ह्यातून मिळालेला प्रत्येक संपर्क पुढे कसा वृद्धिंगत करायचा हे ठरतं. 

Offline टू Online नाही; तर Offline "+" Online आहे हे !

Sunday 13 June 2021

भाग १० - Asset & Liability अर्थात मालमत्ता आणि उत्तरदायित्व

मागील भागातील ठळक वैशिष्ट्ये : Baises चे काही प्रकार आणि त्याची उदाहरणे आपण पहिली                         ========================================================================

'रिच डॅड पूअर डॅड' ह्या प्रसिद्ध पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी ह्यांनी 'मालमत्ता आणि उत्तरदायित्व' ह्याची फार सोपी व्याख्या करून ठेवली आहे.

कुठल्याही कारणास्तव पैसे आपल्या खिशात आले किंवा येत असतील तर त्याला मालमत्ता (Asset) म्हणायचं आणि पैसे खिशातून गेले किंवा जात असतील तर ते झाले आपले उत्तरदायित्व (Liability)

शेअर्स, बॉण्ड्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक,एखादी कर्जमुक्त अशी स्थावर-जंगम मालमत्ता, तुमच्या मेंदूअपत्याचे पुस्तक, ब्लॉग इत्यादी स्वरूपातील कॉपीराईट, पेटंट्स इत्यादींमुळे तुमच्या खिशात पैसे येतात त्यामुळे ह्या सगळ्यांना मालमत्ता (Asset) म्हणता येईल.

उत्तरदायित्व म्हणजे जेव्हा आपण कुणाचंही देणं लागतो - उदाहरणार्थ कर्ज काढून घेतलेलं घर, गाडी किंवा इतर तत्सम वस्तू

वरील मुद्यावर बऱ्याच जणांना आक्षेप असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच मी ह्या विषयावर आजची पोस्ट लिहितोय

उदा: कर्ज काढून घेतलेलं घर - 

जोपर्यंत ठरलेल्या कालावधीत आपण कर्ज फेडत नाही तोपर्यंत ते घर बँकेच्या मालकीचं असतं. आपल्यासारखा 'रिटेल' ग्राहक सलग तीन ते पाच मासिक हप्ते भरू न शकल्यास तुमच्या घराला टाळं ठोकण्याचा बँकेला अधिकार असतो

ह्याचाच अर्थ कर्ज काढून घेतलेलं घर हे बँकेसाठी मालमत्ता - Asset (कारण त्याद्वारे बँकेला व्याजरूपी उत्पन्न मिळणार असतं) आणि तुमच्यासाठी मात्र उत्तरदायित्व Liability (मासिक हप्ता भरण्याचं) असतं. संपूर्ण कर्ज फेडल्यावरंच घराची 'मालकी' तुमच्याकडे हस्तांतरीत केली जाते

काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर एक जाहीरात दाखवली जायची - गृहकर्ज देऊ करणाऱ्या कंपनीच्या या जाहिरातीतील जोडपं आपल्या मित्र मंडळींना सांगतं - ह्या कंपनीने माफक दरात कर्ज दिल्यामूळे 'हम किरायेदार से मकानमालिक बन गये' - ह्या भावनिक सादाला बळी पडलेल्यांची संख्या कमी नाही.

निष्कर्ष - कर्ज काढून घर घेणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न फक्त त्याला मालमत्ता (Asset) म्हणण्याची गल्लत करू नका 😊

======================================================================

पुढील भागात - गृहकर्ज, व्याजरूपी रक्कम आणि ती वाचवण्याचे काही उपाय

धन्यवाद 🙏 Happy Investing 💐

Sunday 6 June 2021

भाग ९ - Mental Heuristics and Biases - part III

मागील पोस्टमध्ये आपण 'Biases' चे काही प्रकार आणि त्याची उदाहरणे पहिली , आज अजून काही उदाहरणे पाहू 

=========================================================================

 6. The Endowment Effect - ह्या पूर्वग्रहदोष प्रकारात एखादी विशिष्ठ वस्तू इतरांपेक्षा आपल्या मालकीची असतांना त्याचे वस्तुनिष्ठ मूल्य अधिक मानले जाते. सारख्याच मूल्याची वस्तू आपल्याला मिळण्याच्या आनंदापेक्षा ती गमावण्याचं दुख दुपटीने अधिक वाटत. त्या वस्तूच्या मोहापोटी आपण ती राखण्यासाठी अधिकची किंमत मोजायलाही तयार असतो 

उदा: एकदा एका व्यक्तीसमुहाला 'विक्रेते' आणि 'खरेदीदार' असं समसमान विभागून विक्रेत्यांना आकर्षक 'कॉफी मग' भेट दिले गेले. पुढे विक्रेत्यांना ते मग किती किंमतीत विकणार? आणि खरेदीदारांना ते मग किती किंमतीत खरेदी करणार असं विचारलं गेलं ?

निष्कर्ष - विक्रेत्यांनी 'कॉफी मग'ची किंमत खरेदीदारांपेक्षा लक्षणीयरित्या अधिकची लावली होती 

7. Herd Mentality - कळपातलं एक मेंढरू एका दिशेन गेलं कि बाकी सगळे त्याच दिशेने त्याच्या मागे जातात. हि एक अशी प्रवृत्ती आहे जेथे एखाद्याच्या कृतीची (तर्कसंगत किवा तर्कविसंगत ) हुबेहूब नक्कल केली जाते  

उदा: 1) भांडवली बाजारात एखाद्या कंपनीच्या समभागांना अचानक उसळी येणे किंवा सपाटून मार खाणे 

2. सामाजमाध्यमावर एखादा हॅशटॅग अल्पावधीतच प्रसिद्ध होणे 

8. Mental Accounting Error -  अशी प्रवृत्ती ज्यात पैशाचा स्त्रोत किंवा वापरण्याचा उद्देश ह्या अनुषंगाने त्याची  वेगवेगळ्या मानसिक खात्यात विभागणी केली जाते

 उदा: 1) क्रेडीट कार्डवरील कर्ज वाढवून सुट्टीत पर्यटनस्थळी जाण्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले जातात. कर्जाची परतफेड करतांना व्याज भरावं लागत असल्यामुळे एकूण संपत्ती कमी होते ह्याकडे दुर्लक्ष होत

2. मुलांसाठी पाच हजार रुपयांची सायकल विकत घेताना पाचशे रुपायची सवलत मिळते का ते पाहण्यासाठी आपण ४ दुकान हिंडतो पण पंचवीस हजार रुपयाच्या मोबाईल खरेदीवर पाचशे रुपायची सवलत मिळत असल्यास आपण चार ठिकाणी चौकशी करायला कंटाळा करतो 

9. Sunk Cost Fallacy - हि एक अशी प्रवृत्ती आहे जिथे वेळ आणि पैसा खर्ची पडल्यामुळे, अपेक्षापूर्ती होत नसताना देखील तर्कविसंगतपणे आपल्या कृतीचा पाठपुरावा करत राहणे 

साधारण तर्क असा कि ,

'' ह्या व्यक्तीने  '' नावाच्या प्रोजेक्टमध्ये गुतंवणूक केलीयेय

आता '' हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी '' ह्या अधिकच्या गुतंवणूकीची गरज आहे अन्यथा '' चं नुकसान होईल त्यामुळे '' ला अधिकची गुंतवणूक न्याय्य वाटते 

उदा: 1. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहताना तो आवडत नसतानाही शेवटपर्यंत पाहणे 

2. उपहारगृहात खाताना पोट भरल्यानंतरही सगळ अन्न संपवण्याचा प्रयत्न करणे 

10. Russian Roulette - 

हा एक प्रकारचा खेळ आहे. ह्यात बंदुकीच्या सहा चेंबर पैकी फक्त एकात गोळी असते आणि ते चेंबर न बघता फिरवून नंतर स्वतःच्या डोक्यावरच निशाणा साधायचा असतो.

ह्यातील परिणामांच्या शक्यतांचा गणिती भाग असा की,

गोळी तुम्हांला 'न' लागण्याची शक्यता ही 5 भागीले 6 अर्थात 5/6 = 83% टक्के असते आणि,

गोळी तुम्हांला लागण्याची शक्यता ही 1 भागीले 6 अर्थात 1/6 = 17% टक्के

म्हणजे वाचण्याची शक्यता नक्कीच फार जास्त पण दुसरी शक्यता खरी ठरली तर? म्हणजे गोळी तुम्हांला लागली तर? तूम्ही निष्क्रिय व्हाल किंवा वेगळ्या भाषेत सांगायचे तर ह्या जगातलं तुमचं अस्तित्व संपलेलं असेल.

मेंदूला सारासार विचार करण्याची सवय नसते असे तज्ञ म्हणतात आणि रशियन रूलेट् हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण.

=======================================================================

पुढील भागात - Asset and Liabilities (थोडक्यात मालमत्ता आणि कर्ज)

धन्यवाद 🙏, Happy Investing 💐

Saturday 5 June 2021

कॉर्पोरेट लंच

 कॉर्पोरेट लंच

चांगल्या पण छोट्या नोकरीमधून मोठ्या आणि वलयांकित अश्या ठिकाणी नोकरीला आले होते. मोठा परिसर. आतमधे अनेक इमारती. अद्ययावत केबिन्स. वर्कस्टेशन्स. स्वछ. चकाचक. आता माझा नवीन पत्ता - टॉवर टू, R & D.
पहिला दिवस. लंच टाईम. घरून डबा नेला होताच. चार नवीन ओळखीही झाल्या होत्या. तर आता कोणाबरोबर खावा डबा असा विचार करत असतानाच एक नवीन सखी आली आणि मला डबा खायला घेऊन गेली.
ही माझी चौथी नोकरी. तर लंच टाईम, डबा संस्कृती, त्यातले गॉसिप्स आणि अनेक पैलू मला नवीन नव्हते. आणि एका कलीगने स्वत:हून मला डबा खायला नेलं, म्हणजे इथे वातावरण मैत्रीपूर्ण असणार अशी खूणगाठ मनाशी बांधली.
एका मोठ्या हॉलसारख्या खोलीत जाताजाता तिने सांगितले, ही आपली लंचरूम. आपण सगळे इथे एकत्र जेवतो. एका स्वच्छ टेबलवर ढीगभर चिनीमातीच्या प्लेट्स. चमचे. एकएक जण येऊन आपापल्या डब्यातलं थोडंसं अन्न प्लेट्मध्ये काढून बाकीचं शेअर करत होता. मी १ फ़ुलका खाणारी. छोटासाच डबा नेणारी. इतरांनी मात्र माझी ओळख करून घेता घेता आपलं अन्न माझ्याशी शेअर केलंच. माझी प्लेट पूर्ण भरून गेली. आणि डबा म्हणून डबी आणणा-या मॅडम अशी एक नवीन ओळख माझ्या मानाच्या शिरपेचात जाऊन बसली. 😁 नवीन ठिकाणचे लोक आपल्याला स्वीकारतील का दूर ठेवतील का झिडकारतील असा मनात लपलेला प्रश्न एकदम कोप-यात जाऊन पडला. आणि मी लंच रूमचा एक हिस्सा बनून गेले. अर्थातच, दुस-या दिवशीपासून माझ्याही डब्याचा आकार वाढला.
सगळ्या डब्यांमधून भारताच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडायचं. अवियल, मुळघुटल, गुजिया, मुआ, सुशीला, पुट्टू अशी कधी न ऐकलेली नावं कानावर पडायला लागली. इथे होते काही मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू सहकारी. त्यांच्या डब्यात काय असेल अशी उत्कंठाही असायची. कंपनीत जास्त लोक शाकाहारी असल्यामुळे हे सगळे सहकारी शाकाहारी डबे आणत. ही त्यांची ऋजुता मनाला भावली. त्यांचे सण असताना त्यांचे खास पदार्थ खायला मजा यायची. हळूहळू आडनावं गळून पडली. लंच रूमने माणसाला माणूस जोडलं. कोणी डबा आणला नसेल तर त्याला कॅंटीनला जावं लागायचं नाही. पण “आज काय वहिनी नाराज?” असे म्हणून त्याची खूप चेष्टा केली जायची.
सगळ्यांची आयुष्यं फ़िरत होती आपली कच्चीबच्ची, त्यांचं शिक्षण, होमलोनचे हप्ते, घरी किंवा गावी असणारे आई-वडील, सासू-सुनांच्या कुरबुरी, कधी तब्ब्येतीच्या तक्रारी, कधी भविष्याची स्वप्नं... कधी टारगेट बद्दल चिंता. अपमान झाल्याचं, डावलल्या गेल्यांचं शल्य पोटतिडीकीने सांगणे. अथवा अवघड प्रसंगात मार्ग दिसत नाहीये म्हणून कासावीस होणे. कधी कुणासाठी गुपचूप वर्गणी काढून त्याची गरज भागवणे. लंच रूमने सगळ्या माणसांना बिनशर्त सामावून घेतलं.
घरी जाताना उद्याचे मेनू ठरायचे. घरी गेल्यावर लंचरूममधले किस्से घरच्या टेबलवर सांगितले जायचे. जसं मुलगी सासरी सुखात आहे हे रोज ऐकायला आई-बाबांना आवडतं, तसं काहीसं या गमतींचं स्थान आमच्या घरच्या लोकांच्या आयुष्यात होतं. कधी या गमती सांगायला विसरले, तर घरचं कोणी लगेच विचारायचं, की तिकडे कामावर सगळं ठीक आहे ना? मग कधी न बघितलेल्या माणसांची ख्यालीखुशाली विचारली जायची. कधी अनुभवाचा सल्लाही दिला जायचा. कधी डोहाळकरणीच्या आवडीचा पदार्थ करून पाठवला जाई. कधी आजा-याला पथ्याचा. तर कधी पापडाच्या लाट्या आणि कुरडईच्या चिकासारखा निगुतीचा पदार्थही.
एखाद्याच्या डब्यातलं वरण मुगाचं की तुरीचं अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरून वादविवादही घडत. कोणी परदेशातून किंवा मूळ गावाकडून आणलेल्या पदार्थांची समसमान वाटणी हा मुद्दा प्रॉपर्टीच्या वाटणीपेक्षा मोठा ठरे. जेवण झाल्यावर कोण आपल्या प्लेट्स उचलायला विसरलं आणि त्यांच्या प्लेट आपण उचलून टीमवर्क कसं सांभाळलं. शेवटी टॉवर टू च्या इज्जतीचा सवाल आहे. कंपनीतील बाकीच्या टॉवर्समधील कर्मचारी कसे trivial issues वरून भांडतात, you know, आपल्या lunch room सारखं culture नाही तिकडे. माझी transfer त्या tower ला नको बाई व्हायला. इथे किती peaceful आहे ना. कधी तरी प्लेट्स उचलाव्या लागल्या म्हणून काय झालं? असं मान हलवून हलवून गोड बोलणा-या काही स्पा-संस्कृतीतल्या कलीग्स. त्यांच्यामुळे सीक्रेट सॅंटा, किट्टी पार्टी, कॉर्पोरेट जगातील लेटेस्ट शिष्टाचार, कोणत्या रंगाच्या शर्ट्ला कोणता टाय परफ़ेक्ट मॅच होतो, फ़ेमिनिझम, पुण्यातील नवीन फ़ूड जॉइंट्स, कोरेगाव पार्कमधील नृत्याचे अनुभव अश्या अनेक गोष्टींबाबत लंच रूम अपडेटेड राहायची.
लंचरूमने सगळ्यांची मिळून एक identity तयार केली. ’टॉवर टू वाले’. एक. जात-धर्म मागे पडला. पे-स्केल, शिक्षण, स्त्री-पुरुष भेद, मध्यम परिस्थितीवाले आणि श्रीमंत, मराठी-अमराठी सगळे मिळून एक. टॉवर टू वाल्यांना अवघड टास्क मिळालं तर सगळे मिळून पूर्ण करणारच. आपापसात वाद झाले नाहीत असं नाही. पण तरी आम्ही सगळे मिळून एक. आणि लंचरूम ही आमचं प्रत्येक टारगेट पूर्ण झालं की जल्लोष करायची हक्काची जागा.
नऊ वर्षांनी एक ग्रहण लागलं. की आधीपासून थोडंथोडं ग्रहण लागतच होतं, आणि लंचरूम वाल्यांना ते समजलंच नाही? एके दिवशी मोठ्या मोठ्या प्लायवूडच्या फ़ळ्या येऊन पडल्या. लंच रूमच्या जागी नवीन केबिन्स बनली. टॉवर टू वाल्यांची लंच रूम गेली. कंपनीच्या ५० एकरच्या प्लॉटवर हीच जागा नवीन केबीन्सला का? असं विचारायचा आम्हा नोकरांना काय अधिकार? नाही विचारलं.
आज आमच्यातले बरेच लोक टॉवर टू मधे नाहीत. बरेच लोक त्या कंपनीत नोकरीलाही नाहीत. नवीन वाटा फ़ुटल्या. New destinations. नवीन माणसं. Change is constant. तशीही, ही माझी चौथी नोकरी होती. पण इथली कॉर्पोरेट लंचरूम मनाच्या एका कप्प्यात स्वत:ची जागा सांभाळून आहे.

-स्मिता सोवनी

Thursday 3 June 2021

Quality is free - श्री सुमंत पारखी ह्यांची मुलाखत

Quality is free - फिलिप क्रॉसबी ह्या लेखकाचं गाजलेलं पुस्तक

श्री.सुमंत पारखी सरांची मुलाखत ऐकली. केस स्टडी, प्रेझेन्टेशन आणि मुलाखत ह्यांतील ठिपके जोडण्याचा प्रयत्न केल्यास असे दिसते की,

1. ‘गुणवत्ता व्यवस्थापन’ म्हणजे एखादे उत्पादन, सेवा किंवा कार्यपद्धती, किती योग्य पद्धतीने ‘ठरलेला मानक’(Standard) साध्य करते - थोडक्यात मानकतेचे अनुसरण 

2.गुणवत्ता व्यवस्थापनाद्वारे दर्जा राखणे म्हणजे चुका शोधणे नव्हे तर चुका टाळणे

 3.शून्य दोष पद्धत हा कामगिरीचा आदर्श मानक बिंदू (Benchmark Standard) असला तरी त्याच्यापेक्षा कमी दर्जा चालेल असा त्याचा अर्थ काढता येत नाही

4.ठरलेल्या मानकतेचे अनुसरण न केल्यास होणारा वायफळ खर्च हि ‘दर्जा’ न राखण्याची मोजावी लागणारी खरी किंमत, 

उदा: > बुडालेला महसूल, 

> उत्पादनासाठी लागलेल्या वेळेचं नुकसान 

> संसाधनांचा अपव्यय 

> पुनरुत्पादन अर्थात (Rework)

> उत्पादनाच्या हमीचं देखील नुकसान (Loss of warranty)

> गमावलेला नावलौकिक, विश्वास आणि शिफारसीद्वारे मिळणारा अधिकचा व्यवसाय देखील 

आता ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केल्यास खालील तार्किक क्रम दिसतो,

१. व्यवसायाची कार्यपद्धती, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, प्रत्येक छोट्या-मोठ्या कृतींना लागणारा वेळ ह्यांचं दस्तावेजीकरण केल्याने व्यवसायाच्या कार्यपद्धतीला एक चौकट आखली जाऊन शिस्त येते. 

२. प्रत्येक कृतीचं आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करता येतं

३.एखादी कृती किंवा कृतीसंच ठराविक कालावधीनंतर काहीही बदल न करता वारंवार करावा लागत असल्यास त्याला स्वयंचलित करून कर्मचाऱ्याचा वेळ वाचवता येऊ शकतो 

म्हणजेच 'गुणवत्ता व्यवस्थापन'(QMS) हि व्यवस्था व्यवसायाला पूरक नाही तर ती व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ह्या सगळ्याचं एक सर्वव्यापी सूत्र म्हणजे, 'कुठलंही काम किंवा कृती पहिल्या प्रयत्नांतच त्याच्या अपेक्षित दर्जानुरूप करावी' - 'Do it right at the first time'

तसे झाल्यास तुमची गुंतवणूक ही परत मिळते व चुका सुधारण्याच्या खर्च ही वाचतो.

Hence Quality is Free 

थोडक्यात व्यवसाय करतांना 'गुणवत्ता व्यवस्थापन' पद्धतीला पर्याय नाही म्हणूनच मुलाखतीच समालोचन करणं टाळतोय. मुलाखत स्वतः ऐका -  ह्या विषयातलं श्री.सुमंत पारखी ह्यांचं प्रभुत्व आणि ते देऊ करत असलेल्या सेवेलाही पर्याय नाही

श्री कन्सल्टंट आणि पारखी दाम्पत्याला पुढील वाटचालीस निवडक उद्यमी तर्फे अनेक शुभेच्छा 💐