Monday 21 June 2021

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 

नवीन  प्रथेप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!😊

खरं तर योग हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. पण काळाच्या ओघात आपण त्याचे महत्व विसरलो. आज पाश्चात्य आपल्याला आपल्याच संस्कृतीशी  ओळख नव्याने देत आहेत, त्याचे महत्व सांगत आहेत आणि आपण 'योगा डे ' म्हणून वेगवेगळे कार्यक्रम करून हा दिवस साजरा करतो.

योग म्हणजे जुळवणे किंवा एकत्र आणणे. एका वाक्यात आणि सोपे सांगायचे तर योग म्हणजे तीन गोष्टींचे एकत्रीकरण आहे - वेगवेगळे शारीरिक पवित्रे,श्वासांचे प्रकार आणि ध्यान. खरं तर माइंडफुलनेस हा योगाचा अविर्भाज्य भाग आहे. यात शरीर मन यांची सांगड घालणे, वर्तमानात राहणे अपेक्षित आहे. पण हल्ली भर शारीरिक व्यायाम श्वास यावर जास्त जातो. योग आणि माइंडफुलनेस या दोन्हींचा आपल्याला स्वतःविषयी सजगता वाढवणे स्व- नियमन यासाठी उत्तम उपयोग होतो.

आजच्या स्पर्धात्मक युगात आपण सतत धावपळ करत जगत असतो. बाह्य गोष्टींचे बारीक निरीक्षण, विश्लेषण  करत असतो. पण यात स्वतःच्या मनात डोकावायला वेळ नसतो किंवा त्याची गरज वाटत नाही. परिणामी मानसिक आणि शारीरिक आजारांचे प्रमाण जगभर झपाट्याने वाढत आहे.

यावर उत्तम  खात्रीशीर  उपाय म्हणून पाश्चात्य लोक आज योग आणि माइंडफुलनेस ह्या मूळच्या भारतीय तंत्रांचा वाढता उपयोग करत आहेत.   त्यांचे अनन्यसाधारण महत्व जाणून आता ' माइंडफूल योगा ' हा नवीन प्रकार उदयास येत आहे. यात गौतम बुद्धाच्या माइंडफुलनेस (क्षण- प्रतिक्षण वर्तमान जाणणे) आणि ऋषीमुनींनी विकसित केलेल्या योगाची सांगड घातली आहे. याच्या नियमित सरावाचे अनेक फायदे आहेत. स्वतःच्या कृती, विचार भावना यांची सखोल जाणीव, हानिकारक प्रतिक्रिया कमी होणे, दैनंदिन समस्यांना परिणामकारक तोंड देता येणे, घटना आणि लोकांचा विना-प्रतिक्रिया स्वीकार, स्वतः आणि लोकांप्रती करुणाभाव आणि या सर्वांचा परिणाम म्हणून मिळणारी आंतरिक शांती

आनंद आणि शांतीसाठी आपण झगडत असतो आणि ते सोडून बहुतेक सर्व मिळते अशी आपली आजची स्थिती आहे. आपण डॉक्टर, औषधे यावर वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करतो. पण थोडा वेळ स्वतःसाठी देत नाही.

आजच्या या दिनाचे औचित्य साधून आपण पुन्हा एकदा आपल्या या अनमोल संस्कृतीचे स्मरण करू या आणि विनाखर्च  शारीरिकमानसिक आरोग्य  मिळवू या. हे एकाच दिवसाचे साजरेपण सोडून रोज थोडासा वेळ   'माइंडफूल योगा' साठी ठेऊ या आणि आनंदयात्री बनू या.


5 comments:

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.