Tuesday, 22 June 2021

संस्कृती + संपत्तीनिर्मिती + समाजभान = किर्लोस्कर

मुदलात किर्लोस्कर समूहाची सुरुवातच आपले अभियांत्रिकी कौशल्य वापरून शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी काही तरी करता यावं ह्या उद्देशातून झाली. त्याकाळी (साधारण इ.स.1910 च्या आसपास) शेतकऱ्यांचे नांगरांचे फाळ हे लाकडाचे असत.लाकडाला स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात, पाण्यात अति भिजले की ते कमकुवत होतं आणि म्हणूनच लक्ष्मणरावांनी 'लोखंडाचा नांगर' तयार केला.

सरकारी रेट्यामूळे सायकलचे दुकान असलेली जमीन गमवावी लागल्यामुळे 'औंध' च्या पंतप्रतिनिधींकडून त्याकाळी 10 हजार रुपयांची कर्जाऊ रक्कम व जागा मिळवण्यासाठी लक्ष्मणरावांनी पुन्हा जुळवाजुळव केली (ह्याला आजच्या भाषेत Collaboration आणि Funding म्हणता येईल 🙂)

युरोपातील औद्योगिक वसाहतींबद्दल वाचून माहीत असल्यामुळे 'कुंडल' ची जागा उद्योगासाठी निवडण्यामागचं कारण म्हणजे रेल्वेने कच्च्या पक्क्या मालाची ने आण करता येईल तसंच पाणी जवळ असल्यामुळे (कृष्णा नदी) कारखान्याच्या आसपास औद्योगिक वसाहत निर्माण करता  येईल.(आज कुंडल चं किर्लोस्करवाडीत झालेलं रूपांतर पाहून लक्ष्मणरावांची दूरदृष्टी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी) दोन्ही दिसते.....

लक्ष्मणरावांचे थोरले सुपूत्र शंतनुराव हे त्याकाळी (सन 1926) मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजि येथून 'यांत्रिक अभियंता' ही पदवी मिळवलेल्या काही मोजक्या भारतीयांपैकी एक.भविष्याचा वेध घेणाऱ्या शंतनुरावांनी भारताला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्याचा प्रयत्न केला.जेव्हा कुणी विचारही करू शकत नव्हते (1954 साली) तेव्हा त्यांनी डिझेल इंजिनाचा कंटेनर जर्मनीला निर्यात केला होता.1957 साली शंतनुराव इंजिनियरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल चे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.विकसित देशांत सुद्धा जेव्हा 'जागतिकीकरण' हा शब्द दबक्या आवाजात उच्चारला जात असे तेव्हा निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी रॉटरडॅम, हॉलंड, बँकॉक येथे ऑफिसे थाटली होती.मलेशिया आणि फिलिपाईन्स येथे स्थानिक बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्याबरोबरच जगभर वितरकांचं जाळं निर्माण करण्यासाठी यंत्रांचे सुटे भाग बनविण्याचे कारखाने उभारले होते.परदेशी लोकांच्या तालावर नाचणं त्यांना मान्य नव्हतं. भारताच्या राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याचा रस्ता हा औद्योगिकीकरण आणि वाढीव उत्पादनातून जातो असं त्यांचं ठाम मत होतं.'आर्थिक तयारी ही सैन्यदलाच्या तयारी इतकीच महत्वाची आहे' असं ते म्हणत असत. रोजगार निर्मितीसाठी तसेच लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी यंत्रांची आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास होता.1960 च्या दशकात शंतनुरावांनी भारत सरकारच्या आर्थिक नियोजन, सार्वजनिक क्षेत्राबद्दलची धोरणे आणि एकंदरीतच 'लायसन्स राज' ह्याबद्दल टीका केली तेव्हा बऱ्याच समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी त्यांची थट्टा केली होती पण पुढे 1991 साली औद्योगिकीकरण आणि उदारमतवाद स्वीकारून भारत सरकारने एक प्रकारे शंतनूरावांचे विचार मान्य केल्यासारखंच झालं.

ते कायमच यंत्रांचे सुटे भाग बनवणाऱ्या उद्योगांना उत्तेजन देत.छोट्या उद्योजकांना उभं राहण्यासाठी कर्ज देण्यापासून ते त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्यापर्यंत शक्य ती सगळी मदत ते करत असंत.स्वच्छतेचा त्यांचा आग्रह त्यांच्या उद्योगांपुरताच मर्यादित नव्हता तर 'स्वच्छ आणि सुंदर' शाळा हा उपक्रम त्यांनी पुण्यात राबवला व वेळोवेळी शाळेत जाऊन ते आढावाही घेत असत.1965 साली त्यांना 'पद्मभूषण' ह्या सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2003 साली त्यावेळचे भारताचे पंतप्रधान श्री.अटलबिहारी वाजपेयी यांनी शंतनूरावांच्या शंभराव्या जयंती निमित्त पोस्टाचे तिकीट प्रसारित करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.

ते नेहेमी म्हणत 'मला उद्योगपती म्हणवून घेण्यात रस नाही, भारत हे सक्षम असे औद्योगिक राष्ट्र म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीने चळवळ उभारण्याचा किर्लोस्कर समूहाचा मानस आहे'....शंतनुरावांच्या कारकिर्दीत किर्लोस्कर समूह शब्दशः हजारो पटींनी वाढला

शंतनुरावांचे सुपूत्र श्री चंद्रकांत किर्लोस्कर ह्यांना ही दूरदृष्टी होती व आजोबा आणि वडीलांपासून लाभलेला वारसा त्यांनी पुढे नेला. आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण झाल्यानेच दीर्घकालीन औद्योगिक वाढ शक्य आहे असा त्यांचा विश्वास होता. अभियांत्रिकी क्रियाकृती व उत्पादनांचा दर्जा राखायचा असल्यास 'संशोधन व विकास' ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे हे त्यांनी ओळखलं होतं व त्यादृष्टीने किर्लोस्कर समूह अद्ययावत राहील ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परदेशी कंपन्यांनाही ज्याचा मोह आवरत नसे अशा अद्ययावत कार्यप्रणाली आणि प्रक्रिया श्री.चंद्रकांत किर्लोस्कर यांनी आपल्या उद्योगांमध्ये मध्ये राबविल्या होत्या 

👉ग्राहकांचं हित किर्लोस्कर समूहाच्या कायमच केंद्रस्थानी राहिलं आहे.लोखंडाचा नांगर बनविल्यानंतर काही बिघाड झाल्यास लक्ष्मणराव बदलून देत असत.

👉ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून त्यानुसार अपेक्षित बदल घडवणे

👉शाळांमध्ये पाणी, स्वछता इत्यादी उपक्रम राबविणे 

👉व्यवस्थापन मंडळ आणि कर्मचारी ह्यात व्यावसायिक संस्कृती रुजविणे - कर्मचाऱ्यांच्या कल्याणाची काळजी असल्या कारणाने क्वचितच कधी त्यांच्यात विसंवाद होणे

👉आपल्या उद्योगांमध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन पद्धत राबविणे - 

 फॉरवर्ड इंटिग्रेशन- उदा: आपली उत्पादने विकताना उत्पादनानंतरच्या पुरवठा साखळीवर नियंत्रण ठेवणे - वितरकांचं जाळं निर्माण करण्याबरोबरच आपला माल थेट बाजारपेठेत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणे

बॅकवर्ड इंटिग्रेशन - उदा: यंत्र बनविण्यासाठी लागणारे सुट्टे भाग पण शक्य असल्यास स्वतःच उत्पादीत करणे 

👉सतत सुधारणा करत राहणे

👉व्यवसायात प्रत्येक पातळ्यांवर प्रेरणादायी नेतृत्व तयार करणे

👉स्वतःच्या कौशल्यात भर घालून पुढे जाऊ इच्छिणाऱ्या सुरुवातीच्या पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासदेखील कंपनीतच सेवाबढतीच्या संधी उपलब्ध करून देणे

शंभर वर्षाची गौरवशाली परंपरा आणि आज किर्लोस्करांची पाचवी पिढी कार्यरत आहे पण त्याच्या जोडीला 4 पिढ्या किर्लोस्कर समूहात सेवा देणारे कर्मचारीही आहेत. हे अशक्य कोटीतील उदाहरण कदाचित इथेच सापडलं असतं आणि 2010 साली किर्लोस्कर समूहाच्या शतकमहोत्सवी  कार्यक्रमात समूहाने अश्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मानही केला

'या सम हाच' 

संस्कृती, संपत्तीनिर्मिती आणि समाजभान जपणाऱ्यांना आदर्श मानणाऱ्या 'निवडक उद्यमी' तर्फे किर्लोस्कर समूहास आणि त्याची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य पुरुष श्री.लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर ह्यांना आदरांजली 🙏

कार्यक्रमाची Video रेकॉर्डिंग लिंक 

फक्त Audio रेकॉर्डिंग लिंक 



1 comment:

  1. मोजक्या शब्दात चपखल वर्णन.

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.