Saturday 5 June 2021

कॉर्पोरेट लंच

 कॉर्पोरेट लंच

चांगल्या पण छोट्या नोकरीमधून मोठ्या आणि वलयांकित अश्या ठिकाणी नोकरीला आले होते. मोठा परिसर. आतमधे अनेक इमारती. अद्ययावत केबिन्स. वर्कस्टेशन्स. स्वछ. चकाचक. आता माझा नवीन पत्ता - टॉवर टू, R & D.
पहिला दिवस. लंच टाईम. घरून डबा नेला होताच. चार नवीन ओळखीही झाल्या होत्या. तर आता कोणाबरोबर खावा डबा असा विचार करत असतानाच एक नवीन सखी आली आणि मला डबा खायला घेऊन गेली.
ही माझी चौथी नोकरी. तर लंच टाईम, डबा संस्कृती, त्यातले गॉसिप्स आणि अनेक पैलू मला नवीन नव्हते. आणि एका कलीगने स्वत:हून मला डबा खायला नेलं, म्हणजे इथे वातावरण मैत्रीपूर्ण असणार अशी खूणगाठ मनाशी बांधली.
एका मोठ्या हॉलसारख्या खोलीत जाताजाता तिने सांगितले, ही आपली लंचरूम. आपण सगळे इथे एकत्र जेवतो. एका स्वच्छ टेबलवर ढीगभर चिनीमातीच्या प्लेट्स. चमचे. एकएक जण येऊन आपापल्या डब्यातलं थोडंसं अन्न प्लेट्मध्ये काढून बाकीचं शेअर करत होता. मी १ फ़ुलका खाणारी. छोटासाच डबा नेणारी. इतरांनी मात्र माझी ओळख करून घेता घेता आपलं अन्न माझ्याशी शेअर केलंच. माझी प्लेट पूर्ण भरून गेली. आणि डबा म्हणून डबी आणणा-या मॅडम अशी एक नवीन ओळख माझ्या मानाच्या शिरपेचात जाऊन बसली. 😁 नवीन ठिकाणचे लोक आपल्याला स्वीकारतील का दूर ठेवतील का झिडकारतील असा मनात लपलेला प्रश्न एकदम कोप-यात जाऊन पडला. आणि मी लंच रूमचा एक हिस्सा बनून गेले. अर्थातच, दुस-या दिवशीपासून माझ्याही डब्याचा आकार वाढला.
सगळ्या डब्यांमधून भारताच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडायचं. अवियल, मुळघुटल, गुजिया, मुआ, सुशीला, पुट्टू अशी कधी न ऐकलेली नावं कानावर पडायला लागली. इथे होते काही मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू सहकारी. त्यांच्या डब्यात काय असेल अशी उत्कंठाही असायची. कंपनीत जास्त लोक शाकाहारी असल्यामुळे हे सगळे सहकारी शाकाहारी डबे आणत. ही त्यांची ऋजुता मनाला भावली. त्यांचे सण असताना त्यांचे खास पदार्थ खायला मजा यायची. हळूहळू आडनावं गळून पडली. लंच रूमने माणसाला माणूस जोडलं. कोणी डबा आणला नसेल तर त्याला कॅंटीनला जावं लागायचं नाही. पण “आज काय वहिनी नाराज?” असे म्हणून त्याची खूप चेष्टा केली जायची.
सगळ्यांची आयुष्यं फ़िरत होती आपली कच्चीबच्ची, त्यांचं शिक्षण, होमलोनचे हप्ते, घरी किंवा गावी असणारे आई-वडील, सासू-सुनांच्या कुरबुरी, कधी तब्ब्येतीच्या तक्रारी, कधी भविष्याची स्वप्नं... कधी टारगेट बद्दल चिंता. अपमान झाल्याचं, डावलल्या गेल्यांचं शल्य पोटतिडीकीने सांगणे. अथवा अवघड प्रसंगात मार्ग दिसत नाहीये म्हणून कासावीस होणे. कधी कुणासाठी गुपचूप वर्गणी काढून त्याची गरज भागवणे. लंच रूमने सगळ्या माणसांना बिनशर्त सामावून घेतलं.
घरी जाताना उद्याचे मेनू ठरायचे. घरी गेल्यावर लंचरूममधले किस्से घरच्या टेबलवर सांगितले जायचे. जसं मुलगी सासरी सुखात आहे हे रोज ऐकायला आई-बाबांना आवडतं, तसं काहीसं या गमतींचं स्थान आमच्या घरच्या लोकांच्या आयुष्यात होतं. कधी या गमती सांगायला विसरले, तर घरचं कोणी लगेच विचारायचं, की तिकडे कामावर सगळं ठीक आहे ना? मग कधी न बघितलेल्या माणसांची ख्यालीखुशाली विचारली जायची. कधी अनुभवाचा सल्लाही दिला जायचा. कधी डोहाळकरणीच्या आवडीचा पदार्थ करून पाठवला जाई. कधी आजा-याला पथ्याचा. तर कधी पापडाच्या लाट्या आणि कुरडईच्या चिकासारखा निगुतीचा पदार्थही.
एखाद्याच्या डब्यातलं वरण मुगाचं की तुरीचं अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरून वादविवादही घडत. कोणी परदेशातून किंवा मूळ गावाकडून आणलेल्या पदार्थांची समसमान वाटणी हा मुद्दा प्रॉपर्टीच्या वाटणीपेक्षा मोठा ठरे. जेवण झाल्यावर कोण आपल्या प्लेट्स उचलायला विसरलं आणि त्यांच्या प्लेट आपण उचलून टीमवर्क कसं सांभाळलं. शेवटी टॉवर टू च्या इज्जतीचा सवाल आहे. कंपनीतील बाकीच्या टॉवर्समधील कर्मचारी कसे trivial issues वरून भांडतात, you know, आपल्या lunch room सारखं culture नाही तिकडे. माझी transfer त्या tower ला नको बाई व्हायला. इथे किती peaceful आहे ना. कधी तरी प्लेट्स उचलाव्या लागल्या म्हणून काय झालं? असं मान हलवून हलवून गोड बोलणा-या काही स्पा-संस्कृतीतल्या कलीग्स. त्यांच्यामुळे सीक्रेट सॅंटा, किट्टी पार्टी, कॉर्पोरेट जगातील लेटेस्ट शिष्टाचार, कोणत्या रंगाच्या शर्ट्ला कोणता टाय परफ़ेक्ट मॅच होतो, फ़ेमिनिझम, पुण्यातील नवीन फ़ूड जॉइंट्स, कोरेगाव पार्कमधील नृत्याचे अनुभव अश्या अनेक गोष्टींबाबत लंच रूम अपडेटेड राहायची.
लंचरूमने सगळ्यांची मिळून एक identity तयार केली. ’टॉवर टू वाले’. एक. जात-धर्म मागे पडला. पे-स्केल, शिक्षण, स्त्री-पुरुष भेद, मध्यम परिस्थितीवाले आणि श्रीमंत, मराठी-अमराठी सगळे मिळून एक. टॉवर टू वाल्यांना अवघड टास्क मिळालं तर सगळे मिळून पूर्ण करणारच. आपापसात वाद झाले नाहीत असं नाही. पण तरी आम्ही सगळे मिळून एक. आणि लंचरूम ही आमचं प्रत्येक टारगेट पूर्ण झालं की जल्लोष करायची हक्काची जागा.
नऊ वर्षांनी एक ग्रहण लागलं. की आधीपासून थोडंथोडं ग्रहण लागतच होतं, आणि लंचरूम वाल्यांना ते समजलंच नाही? एके दिवशी मोठ्या मोठ्या प्लायवूडच्या फ़ळ्या येऊन पडल्या. लंच रूमच्या जागी नवीन केबिन्स बनली. टॉवर टू वाल्यांची लंच रूम गेली. कंपनीच्या ५० एकरच्या प्लॉटवर हीच जागा नवीन केबीन्सला का? असं विचारायचा आम्हा नोकरांना काय अधिकार? नाही विचारलं.
आज आमच्यातले बरेच लोक टॉवर टू मधे नाहीत. बरेच लोक त्या कंपनीत नोकरीलाही नाहीत. नवीन वाटा फ़ुटल्या. New destinations. नवीन माणसं. Change is constant. तशीही, ही माझी चौथी नोकरी होती. पण इथली कॉर्पोरेट लंचरूम मनाच्या एका कप्प्यात स्वत:ची जागा सांभाळून आहे.

-स्मिता सोवनी

2 comments:

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.