Monday, 28 June 2021

Connect The Dots ...श्री. अजित मराठे सरांची मुलाखत

 Connect The Dots ...

पर्वा श्री.अजित मराठे सरांची मुलाखत सुरू असताना 'Connect The Dots' हा शब्द दोन मुख्य कारणांनी डोक्यात घर करून राहिला,

पहिलं - 'Connect The Dots' - हे रश्मी बंसल ह्यांचं गाजलेलं पुस्तक - उद्योजक मानसिकतेच्या 20 व्यक्तींची ही कहाणी. मुख्य म्हणजे आयआयटी, आयआयएम मध्ये न जाताही निव्वळ स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या इर्ष्येतून व्यवसाय मोठा करता येतो हे त्यांनी दाखवून दिलं.या उद्योजकांची, 'जुगाड, जूनून आणि जूबान' अशी तीन सामायिक स्वभाववैशिष्ट्ये लेखिकेने ह्या पुस्तकात तपशिलात मांडलीयेत.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच 'मी काही तत्वज्ञान सांगायला नव्हे तर माझे अनुभव तुमच्याशी शेअर करायला आलो आहे आणि मी तुमच्यासारखाच एक उद्योजक आहे', असे मराठे सर म्हणाले आणि औपचारिकतेचे सगळे बंध गळून पडले.

लेखिकेला 'जुगाड' - या शब्दाचा पुस्तकात अभिप्रेत असलेल्या अर्थाप्रमाणे मराठे सरांना व्यावसायिकतेचा वारसा होता असे नाही.'सरांचे आईवडील शिक्षकी पेशात त्यामूळे स्वतःच्या निरीक्षणातून, प्रयोगशीलतेतून आणि आलेल्या अनुभवांचा डोळसपणे वापर करत ते व्यवसायात एक एक पायरी वर चढत गेले. सुरुवातीच्या काळात 'भांडवलाची कमतरता' भरून काढण्यासाठी काँट्रॅक्टरपासून 'टाइम्स ऑफ इंडियात' जाहिरात देण्यापर्यंत' वस्तुविनिमय पद्धतीचा (अर्थात Barter System) कल्पक आणि प्रभावी वापर (अर्थात 'जुगाड') हे अतिशय चपखल उदाहरण ठरावे 

सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी आणि त्यानंतर 'Brand Equity Management in Real Estate Industry in MMRDA Region' ह्या विषयात संशोधन प्रकल्प सादर करून पीएचडी मिळवणे तसेच 1995 पासून इंटिरिअरच्या कामांपासून सुरुवात करून NRDL हा बांधकाम क्षेत्रातील ब्रँड नावारूपाला आणण्याच्या मागे निव्वळ 'जूनून'

व्यवसायात अडचणी येतच असतात पण आपण जाणूनबुजून कुणालाही न फसवता काम करावे व आपल्या शब्दाचा मान राखावा असं ते म्हणतात. मराठे सर आज 'बिझिनेस गुरु' म्हणून प्रसिद्ध आहेत.आपला 25 वर्षाचा अनुभव स्वतःच्या 'जुबानी' तून 500 हुन अधिक व्याख्यानातून त्यांनी लोकांपर्यत पोहोचवलाय. 

अडचणी - व्यवसायात दररोज अडचणी येत असतात आणि त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया ही निरंतर आहे. माणसांशी निगडित असल्याने व्यवसाय म्हणजे लोकांचा गंड किंवा आत्मसन्मान चुचकारत व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी शक्य तितक्या व्यक्तींबरोबर वैयक्तिक संबंध प्रस्थापित करणे ह्याला महत्व आहे. वैयक्तिक भेटीगाठी आणि संबंध असल्यास तुम्ही तुमच्या अडचणी इतरांबरोबर शेअर करू शकता आणि लोकंच त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला निरनिराळ्या कल्पना सुचवतात असं मराठे सर सांगतात

नेटवर्किंग - नेटवर्किंगचा अर्थ लावतांना आपल्याकडून होणारी गल्लत मराठे सर अतिशय सोप्या आणि नेमक्या भाषेत अधोरेखित करतात,

> तिथे विक्री साठी जाऊ नका तर आपली ब्रँड इमेज तयार करण्यासाठी प्रयत्न करा

> घेण्याऐवजी देण्यावर/मदत करण्यावर भर द्या

> मानवाची नैसर्गिक भावना अशी की देणारे आवडतात, घेणाऱ्यांना  मात्र शक्य तो दूर ठेवण्याकडे कल असतो

> प्रत्येक व्यक्तीत प्रचंड क्षमता असते. ज्ञान, कौशल्य किंवा मर्यादित का असेना त्याचं संपर्कजाळं ह्यातून काही ना काही आपल्या उपयोगी पडण्यासारखं असतं

> नेटवर्किंग मीटिंगमध्ये काय बोलावं आणि काय नाही ह्यांचं ताळतम्य बाळगा, त्यासाठी 'ऐकण्यावर' भर द्या

> बोलतांना इतरांच्या आवडलेल्या गोष्टींचा जरूर उल्लेख करा, तुमच्यातल्या सामायिक गोष्टीं (Background of relativeness) ओळखून संभाषणाला सुरुवात करा

> नेटवर्किंग मध्ये एकवेळच्या 'विक्री' ऐवजी उत्तम संबंध प्रस्थापित करून दीर्घकाळ आणि वारंवार व्यवसाय मिळवण्याच्या दृष्टीने काम करा (नेटवर्किंगचा अर्थ शिकार करणे नव्हे तर शेती करणे असा अभिप्रेत आहे)

मार्स गुरुकुल  - नवउद्यमींना व्यवसायात उंच भरारी घेण्यासाठी म्हणून MARS Gurukul ह्या आपल्या संस्थेतर्फे ते काही 'निवडक' व्यावसायिकांना मार्गदर्शन करतात.आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत टक्के टोणपे खाल्ल्यानंतर मिळालेली शिकवण आणि अनुभव ते या नउद्यमींना पुढे आणण्यासाठी वापरतायत. 'निवडक' अशा अर्थाने की मराठे सरांच्या मते प्रत्येक व्यवसायात अगदी 100 कोटीच्या पुढे उलाढाल करण्याची क्षमता असते पण मुदलात त्या व्यावसायिकाची तेवढी तयारी आहे का?

मराठे सरांना व्यावसायिकांच्या काही जाणवलेल्या अडचणी म्हणजे,

1.भांडवल कसं उभारायचं?

2.अनुभवाची कमतरता

3.पंचवीस एक वर्ष काम करून पण वार्षिक उलाढाल जेमतेम 4 - 5 कोटीच्या पुढे न जाणे किंवा त्यातच समाधान मानणे 

4.पुढची पिढी हा व्यवसाय करेल की नाही किंवा त्रयस्थ व्यक्ती नेमून तो दैनंदिन कामकाज पाहिल ह्याबद्दल काही पूर्वतयारी नसणे

5.व्यवसायाची रणनीती फक्त कागदावर असणे पण त्याची अंमलबजावणी कशी करावी ह्याबद्दल साशंक असणे इत्यादी. त्यामुळे क्षमता आणि इच्छाशक्ती असणाऱ्यांबरोबर मात्र ते अगदी सावलीसारखे 3 ते 5 वर्ष स्वतःचा बहुमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन करण्याचं काम करतायत (ह्याची संकल्पना म्हणून सर्वश्रुत जरी असला तरी मराठे सरांनी दिलेला 'श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या नात्याचा दाखला' प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका

Effective Delegation - (अर्थात योग्य प्रतिनिधींकडून काम करून घेणे) - 

बऱ्याच वेळेला आपल्या व्यवसाय किंवा कामाच्या अतिप्रेमात पडल्यामुळे आपल्याला इतरांनी केलेलं काम आवडत नाही आणि हा सतत चा मानसिक झगडा आहे. बऱ्याच वेळेला कर्मचारीही कामचुकारपणा करतात. Effective Delegation साठी मराठे सर एक सोपी पण अतिशय प्रभावी त्रिसूत्री सुचवतात,

1.I do, you see - मी करतो/करते , तू बघ

2. We do - आपण दोघांनी एकत्र करूया

3.You do, I see - तू कर, मी बघतो/बघते 

पण ह्यासाठी आपल्या कामाच्या पद्धतीचं प्रमाणिकरण आणि त्याचं दस्तावेजीकरण केलेलं असणं आवश्यक आहे. मालक म्हणून आपल्या अखत्यारीत आपण वेळोवेळी कामाच्या पद्धती बदलू लागलो तर मात्र कर्मचाऱ्यांचा नाईलाज होऊ शकतो असं ते सुचवतात 

अस्वस्थपणा हा उद्योजकाचा स्थायीभाव कारण तो रोज नवीन गोष्टी शिकत असतो.आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या कालावधीत सामाजिक, आर्थिक आणि अगदी भौगोलिक बदल होत असतात ज्याचा आपल्या व्यवसायावर परिणाम होत असतो. दैनंदिन कामकाजात अडकल्यामुळे बऱ्याच वेळा काही महत्वाच्या गोष्टींची नोंद घेणं उद्योजकांकडून राहून जातं.

दुसरं - साधारण दोनेक वर्षांपूर्वी लोकसत्ताचे संपादक श्री.गिरीष कुबेर ह्यांचं श्री.नरहर कुरुंदकर ह्यांच्यावर आयोजित एक व्याख्यान माझ्या ऐकण्या/पाहण्यात आलं. समाजात, देशा परदेशात वेगवेगळ्या टप्प्यात आणि कालखंडात घडणाऱ्या गोष्टींचा तार्किक संबंध लावून (टिंब टिंब जोडून मोठं चित्र - Connect The Dots) आपल्याला उलगडून दाखवणारे आणि तटस्थ बुद्धिमत्तेने मांडणारे 'कुरुंदकर' असावे लागतात आणि तसे ते नसल्याने होणारी अपरिमित हानी असा त्यांच्या व्याख्यानाचा रोख होता

पर्वाचं मराठे सरांचं 'अनुभव कथन' हे कुठल्याही उद्योजकाला हे असं Reading between the lines किंवा ती अनेक टिंब एका रेषेत जोडून दाखवणारं होतं

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या, 'बीएनआय'चे ईवान माईझ्नर आणि 'सॅटर्डे क्लब'च्या माधवराव भिडे सरांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या श्री.अजित मराठे सरांना 'निवडक उद्यमी' तर्फे त्रिवार वंदन (Take a bow🙏) आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा💐. पुराणकाळातील गुरू शिष्य परंपरेप्रमाणे त्यांचं सतत मार्गदर्शन आम्हाला लाभो अशी कामना 

वि. सू. सरांच्या मुलाखतीची व्हिडिओ लिंक , आणि ऑडीयो लिंक येथे मिळेल 

धन्यवाद 

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.