Showing posts with label अर्थ साक्षरता. Show all posts
Showing posts with label अर्थ साक्षरता. Show all posts

Sunday, 31 August 2025

त्या tariff चं काय इतकं!

सध्या गाजत असलेल्या ट्रम्प ने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयातशुल्क ह्या विषयावर माझ्या निकटवर्ती व्यक्तीने टाकलेला हा खडा सवाल. प्रत्युत्तरार्थ माझं जागतिक घडामोडी इत्यादी  भाष्य. 

समांतरपणे आणि सहजच ह्याबद्दल सध्या बरंच लिहून किंवा आंतरजालावर देखील सातत्याने काही ना काही येतंय. भारताने हे संकट हलक्यात घेऊ नये, आणि त्याच वेळी घेऊ पेलून अशी देखील एक मानसिकता.

दरम्यान मनात चाललेल्या घडामोडी. समांतर पुस्तके वाचन आणि सोबत असलेली माहिती. तर मुळात "निर्यात" प्रकाराशी हे सारं संबंधित आहे. भीती ह्याचीच आहे. अमेरिकेची  आपल्याकडून होणारी आयात जिच्यावर एकदम ५० टक्के शुल्क लागू झाले आहे,त्यामुळे अमेरिकन मंडळी भारतीय वस्तू इतक्या वाढीव दराने घेणार नाहीत. परिणामस्वरूप ह्या वस्तू,सेवा ह्यांचे निर्माते आणि त्यात गुंतलेले सर्व हे अडचणीत आलेत.

आपल्याच प्रमाणे चीन, ब्राझील ह्याचीही ५० टक्के नाही, पण कोंडी झालीच आहे. चीन कडे अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे अमेरिकेला थेट कोंडी होतेय,त्यामुळे त्यांच्यावर संक्रांत नाही. आपल्याकडे मात्र असं काहीच नाही की ज्यावर अमेरिकन "फक्त भारत" स्वरूपात अवलंबून रहावेत.

बाळबोध वाटेल, पण खरंच आपल्याला इतक्या निर्यातीची गरज आहे का ? अर्थशास्त्रज्ञ माझ्यावर तुटून पडतील, balance of trade कळत नाही का वगैरे म्हणतील, तरी.....

इसवीसनाच्या सुरुवाती पासून इतिहास पाहिलत तर भारतात विविध संसाधनांची असलेली विपुलता हाच येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाचा केंद्रबिंदू होता. प्रत्येक काळात,जोपर्यंत मुघल शाही आणि पाठोपाठ इंग्रजशाही आपल्याकडे एकछत्री सत्ता स्थिरावलेली नव्हती,तोपर्यंत तसा स्थिर व्यापार चालत असे आणि त्यातही वरदहस्त हा भारतीय उपखंडातील व्यापाऱ्यांकडे होता. 

आजही आपल्याला लाभलेले कृषिवैभव आपल्या लक्षात येत नाही. आणि जोडीने हिमालयातून वितळणाऱ्या नद्या. कोहिनूर सिंहासन पळवून नेले असेल,पण हे सर्व कुठे जाणार.

तर इंग्रजांच्या निमित्ताने ह्या विखुरलेल्या अनेक स्वराज्य संस्थांना एक भारत रुपी एकसंध देश मिळाला. आता गरज आहे फक्त आपली शक्तिस्थाने जाणून घ्यायची..

Thursday, 28 August 2025

मुरलेला गुंतवणूकदार

आमच्या निवडक उद्यमी च्या त्रैमासिक भेटी होत असतात. त्यात व्यावसायिक वाटचालीचा आढावा घेणे व सोबत एखाद्या वेगळ्या वाटेने विचार करणाऱ्या व्यक्तीसोबत गप्पा असा अजेंडा असतो. गेल्या म्हणजे जुलै च्या भेटीत अमित हळबे ह्या उद्योजक - गुंतवणूकदार व्यक्तीशी गप्पा मारण्याचा योग आला, त्याबद्दल थोडे :-

अभियांत्रिकी शिक्षण घेत असल्यापासूनच अमित च्या डोक्यात गुंतवणूक विषयी कुतूहल होतेच. शिवाय व्यवसाय तर करायचा होताच. ह्या दोन्हीची समांतर वाटचाल करत अमित ने केलेली वाटचाल नक्की प्रेरक ठरेल. त्यातील काही ठळक मुद्दे इथे देतोय :-

# पहिला व्यवसाय कर्जाऊ पैशाने किंवा "फंडिंग" पद्धतीने करू नये. हळूहळू सुरुवात करावी. एकदा पाय जमले की पुढे whole वावर is our. अमित ने कायम क्रिकेट ची रूपके वापरून विचार मांडलेत.

# ज्यांचे आपण काम करतो त्यांचे ग्राहक शक्यतो विखुरलेले असावेत. हा सिद्धांत स्वतः च्या अडचणीत आलेल्या केटरिंग व्यवसायावरून आलाय. हाच गुंतवणुकीत देखील योग्य ठरेल.

# एकदा आपल्या व्यवसायाचे गणित पचनी पडले,की त्यातून मिळणारा नियमित पैसा, हा ठराविक अंतराळाने शेअर मार्केट मध्ये लावावा. म्युच्युअल फंड मध्ये गुंतविताना index प्रकारच्या फंड मध्ये लावावेत. जास्त काळ गुंतवणूक ही १२ ते १५ टक्के वाढ देतेच.

# स्वतः च्या सोबत इतर व्यवसायात पैसे गुंतवणे हिताचे ठरेलच.तेही करिअर च्या सुरुवातीपासून करायला हवे.निवडताना,ज्यांचा व्यवसाय सहज समजेल अशांची निवड करावी. घाईत निर्णय अजिबात नको.

# शेवटी यशाचं मानक आपली विक्री तसेच भरघोस वाढ हेच असते. हे साध्य करता येईल ते भौगोलिक किंवा निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहक समूहांना निशाण करून. ह्यात अमित ने टाटा समूहाची दोन उदाहरणे दिली. ताज हे उच्च उत्पन्न गटासाठी तर जिंजर हे मध्यम गटासाठी. असेच वस्त्रोद्योगत West Side सोबत Zudio हा ब्रँड टाटा समूहाने आणला.

सर्वच्या सर्व मुद्दे इथे देणे प्रस्तुत नाही, कारण निवडक च्या त्रैमासिक भेटींतून अशा वेगळ्या विचाराच्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटणे व त्यातून ग्रहण केलेलं ज्ञान अंमलात आणणे ह्यावर भर आहे.

अमित हळबे ह्यांचे मन:पूर्वक धन्यवाद.


Saturday, 9 August 2025

आर्थिक वाटचाल Track करतोय का आपण ?

माझे एक मित्र श्री तेजस पाध्ये ह्यांच्या सोबत एक संवाद कायम रंगत असे : MSME वि Corporate. ह्यात तेजस छान छान मुद्दे मांडत असत. मोठ्या कंपन्यांच्या संपर्काच्या पद्धती आणि लहान लहान उद्योजकांच्या. किंवा फक्त उलाढाल मोठी झाली तरी दृष्टीकोन न बदलणे वगैरे .....

मी हल्ली हल्लीच खूपशा शेअर मार्केट वर नोंदीत ( म्हणजेच ज्यांनी भाग भांडवल हे तुमच्या आमच्या कडून उभारलेले आहे अशा ) कंपन्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. आणि समांतरपणे लहान लहान उद्योजक ह्यांच्यासोबत तर पूर्वापार मी काम करतच आलेलो आहे. मला जाणवते कि, नोंदणीकृत कंपन्या दर तीन महिन्यांना आपले निकाल जाहीर करीत असतात : नव्हे - त्यांना ते कायद्याने बांधील आहे. ह्या जाहीर करण्यात येत असलेल्या निर्णयांचा आकृतिबंध पाहिल्यास लक्षात येतं कि प्रत्येक महिन्यास काही अति महत्त्वाचेच निर्देशांक त्या प्रदर्शित करत असतात. 

हे निर्देशांक आहेत हे विसरायला नको. म्हणजे ह्याच्या अंतरंगात खूप प्रकारचे संदर्भ, त्यांची त्या त्या वेळेची चोख नोंद वगैरे खूप काही अस्तित्त्वात असायलाच लागते. म्हणजे इतक्या प्रकारे एखाद्या कंपनीची विचारणा होऊ शकते आणि त्यांना त्या त्या वेळी त्या त्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देणे भाग असते, तरच त्यांची प्रतिपादने, विधाने, निकाल, परिणाम इत्यादी सिद्ध होऊ शकतात. प्रत्येक भागधारक हा त्या कंपनीचा "मालक" असतो, आणि तो प्रश्न करायला अधिकृत असतो.

तर काही आकडे उदा निव्वळ नफा एखाद्या वर्षी कमी दिसला आणि ताळेबंदा तून असे दिसून आले, कि कंपनीने इतर काही उद्योगांत गुंतवणूक केलेली आहे, तर आधी तर अंतर्गत व नंतर बाह्य auditor ला उत्तर द्यावे लागते कि ह्या मागे काय लांब किंवा नजीकच्या पल्ल्याची भूमिका आहे ते. आणि ह्यानंतही भाग धारकांना उत्तर द्यावे लागू शकते.

थोडक्यात काय, तर मनाला येईल तसे निर्णय ( कृतींचे ) ह्या कंपन्यांना बदलता येत नाहीत. 

इथे लहान उद्योजक संपूर्णपणे विरुद्ध वागतात. सारखे निर्णय बदलत असतात. Tracking करत नाहीत. त्यामुळे परिणाम हे अशाश्वत मिळतात. संपत्ती वाढत नाही. 

निऊ ने उचललेले एक प्रमुख पाउल 


ही प्रमुख बाब लक्षात घेवून निवडक उद्यमी चे सदस्य सध्या दर तीन महिन्यांनी भेटतात, त्यांच्या वाटचालीचा छोटेखानी अहवाल एकमेकांसमोर ठेवतात, पुढील कृतीबद्दल चर्चा करतात, मागील कृतींच्या परिणामांची सखोल चर्चा करतात, एकमेकांना एक संचालक मंडळाप्रमाणे बदल वगैरे सुचवतात. 

उद्योग साम्राज्ये अशीच उभी नाही राहत, त्यांच्या मागे ही मानसिकता विकसत करावी लागेल !


Saturday, 26 July 2025

मी माझ्या व्यवसायात नक्की कुठे आहे ?

काल परवाच एका व्यावसायिक मित्राची भेट झाली. छान आहे म्हणाला व्यवसाय. पण खूप धावपळ आहे, असणारच, असेही म्हणाला.

ठीकच..माझे मोघम उत्तर.

"मला काहीच दिवसांपूर्वी चेहऱ्यावर पक्षाघाताचा झटका येऊन गेला" असे नंतर म्हणाला. 

आता मात्र माझे विचारचक्र सुरू झाले. काही होणे हे तसे फारसे आपल्या हातात नाही. तरी त्यानंतर आपण त्यातून शिकून आपले काय चालले होते, आणि आहे हे त्याप्रमाणे बदलू शकतो नक्की. 

सदर व्यावसायिकाचे आर्थिक गणित तसे ठीकठाक आहे. कधी कधी नाही हो तितकं असं आपल्याला वाटू शकतं. पण ते नक्की ठीक असतं. "सुखी माणसाचा सदरा" हे करुणा गोखले अनुवादित पुस्तक वाचा. उलगडा होईल. 

चर्चा पुस्तकाची नाहीये, तर आपल्या व्यवसायाचा आणि जोडून असलेल्या आपल्या आयुष्याचा आपण लेखाजोखा अवश्य घेतला पाहिजे, असे कळकळीने वाटते.

तर वरील व्यावसायिकाच्या बाबतीत, त्याने प्रचंड धावपळ करणे हे तरी निश्चित कमी करता येईल. थोडा धंदा कमी झाला तरी चालतंय. आणि हा कमी झालेला धंदा जास्त प्रमाणात वेळ उपलब्ध करून देईल, जो स्वतः वर अवलंबून नसलेल्या वाटा सुचवेल, शिवाय शारीरिक तंदुरुस्ती कडे काम करण्यास प्रवृत्त करेल. अशा वेळी तर निश्चितच आपला व्यवसाय आपल्याला आवश्यक बाबी सोडून किती काम करायला लावतो हे नक्की पाहायला हवं. शिवाय आपला कृतिशील व्यवसाय म्हणजे आपण फक्त एकच व्यवसायात सगळी गुंतवणूक करत आहोत.

पुन्हा सांगतो :- शारीरिक तंदुरुस्ती अधिक आयुष्य लाभण्याकरिता नाही. तर प्रत्यक्ष त्यातून खूप छान वाटते, आणि "सतत आपण काहीतरी करायला पाहिजे" ह्या सापळ्यातून  आपण मुक्त होऊ शकतो. ही खरी सुरुवात आहे. वेगळी वाट चोखाळायची.

तर कधीही विचार केला नसेल तरी काही आर्थिक विवरण करणाऱ्या गोष्टीचा अभ्यास स्वतः च करा. गेले २ ते ३ वर्षे मी हे करत आहे आणि त्यातून मला समांतर मार्ग मिळाला आहे असे मी म्हणेन, जो मला शांत करतो, शारीरिक तंदुरुस्ती कडे प्रवृत्त करतो, आणि एक समांतर अर्थ व्यवस्था उभी करून देत आहे.

सोबत अगदी मूलभूत अशा ताळेबंदाचे चित्र जोडले आहे, जे आपल्याला जे जे सांगू शकते ते ते उद्धृत केले आहे. त्यातले owners/shareholders हे अगदी समजण्यासारखे आहे. कारण ते आपण स्वतः च आहोत.

Thursday, 10 July 2025

व्यावसायिक हा प्रथम एक गुंतवणूकदार असतो

ज्याप्रमाणे शेअर बाजारातील कंपन्या फार विश्वासार्ह नाहीत , असं आपण म्हणत असतो, आता हाच नियम आपल्या सरकार बाबत सुद्धा लागू होऊ शकतो. 

अगदी ताजं उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा. 
अनेक वर्षे याचा सगळीकडून प्रचार केला जातो आहे. सोबत अनेक कंपन्या तसेच उद्योजक यांना देखील हे क्षेत्र खुणावत आहे. अनेक लघु आणि अति लघु उद्योजक मंडळी याच्यावर शंभर टक्के अवलंबून आहेत. ही तुमच्या माझ्यासारखी मंडळी याचा प्रसार करून स्वतःचं अर्थार्जन स्वतःच करू पाहणारे खरे मुळातले उद्योजक. ही मंडळी विविध ठिकाणहून सौरऊर्जेचा प्रचार करत असतात आणि यात प्रमुख मुद्दा असतो तो म्हणजे वीज बचतीचा. याला नक्कीच मोठं मार्केट आहे. आणि त्यामुळेच तितकीच स्पर्धा सुद्धा आहे. 

बाजाराच्या नियमाप्रमाणे स्पर्धा वाढली की नफा आकसतो. तरीही उद्योजक मंडळी मावळ्यांप्रमाणे खिंड लढवत असतात. सतत आशेवर आणि दुर्दम्य इच्छाशक्ती वर ही मंडळी लढत असतात. 

पण मध्येच एखादा मोठा घाव येतो आणि भविष्य धूसर होऊन जातं. अशावेळी अनेक मंडळी मानसिक रित्या ढासळतात. आणि स्वाभाविक देखील आहे. अगदी पहेलगाम सारखी अनपेक्षित घटना घडली तर तसं काही फार करता येत नाही, सरकारवरचा विश्वास देखील उडत नाही. परंतु नुकतीच महाराष्ट्र वीज मंडळाने जाहीर केलेला सौर ऊर्जेबाबतचा नियम म्हणजे अजबच म्हणायला हवा. थोडक्यात सांगायचं तर ज्या उद्देशाने मोठे उद्योजक किंवा लहान सहान कारखानदार बऱ्यापैकी गुंतवणूक करून ज्या आशेवर तो परतावा मिळण्याची अपेक्षा करत असतात त्यावरच घाला घातला गेलेला आहे. 

एकच दणका 

म्हणे, आता 24 तास सौरऊर्जेचा मोबदला म्हणून वीज मंडळाची वीज मिळणार नाही. याचा अर्थ असा की फक्त आठच तास त्या बदल्यात असलेली वीज मिळणार. उरलेले सोळा तास वीज मंडळाच्या राक्षसी दराने वीज खरेदी करावी लागणार. शिवाय जेव्हा कारखाना बंद असेल तेव्हा जी काही युनिट्स गोळा होत होती, त्याचा परतावा देखील मिळणे थोडे मुश्किल होऊन बसले आहे. एखादा सौरऊर्जा तज्ञ याबद्दल त्यांचे मत देईलच. परंतु या निमित्ताने सरकार हे देखील अत्यंत बे भरवशाचे आहे हे सिद्ध होऊ लागले आहे. 

खाजगीत तर असे वरचेवर होत असते 

मला आणि इतर अनेक लहान उद्योजकांना हा वारंवार अनुभव येत असतोच की काम संपलं की ज्या संस्थेंसोबत आपण काम सुरू केलं आहे किंवा होतं त्या आपल्याला वाऱ्यावर सोडतात. यात फार तपशीलात जाण्यात अर्थ नाही. 

आज गुरुपौर्णिमा आणि त्या निमित्ताने अनुभव हा आपला कायमस्वरूपी गुरू तो आपल्याला काय शिकवतो हे अधिक महत्त्वाचं. 

यातून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे की कुणीच विश्वासार्ह नाही ही वस्तुस्थिती स्वीकारणे. आणि उद्योजक हा प्रथम गुंतवणूकदार आहे ही अधिक व्यापक दृष्टी विकसित करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

आपल्या व्यवसायाचा सुद्धा आपण अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय असाच विचार करायला हवा. आपण एकच व्यवसाय घेऊन बसतो आणि त्यात वर खाली झाले की दुःख करत बसतो. असे न करता आपण अनेक ठिकाणी आपली गुंतवणूक विखुरणे गरजेचे आहे. शेअर बाजार आपल्याला ही संधी देतोच. स्वतः अभ्यास करून हे करता येईलच, परंतु ह्या विचाराला केंद्रस्थानी धरून बाकीचे विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. 

म्हणजे करायचे काय ?

गुंतवणूक हा आपला स्थायीभाव ठेवला तर परतावा हा त्यातला परिणाम. कोणत्याही गोष्टींनी उमटणारे पडसाद हे काहींसाठी योग्य असतात तर काहींसाठी अयोग्य. शेअर बाजार आपल्याला अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये अगदी कमीत कमी गुंतवणूक करून आपली गुंतवणूक समतोल करण्याची बहुमूल्य संधी देतो. अनेक लोक हे एसआयपी किंवा थेट रोख्यांमध्ये गुंतवणे ह्या मार्गाने हे करतच असतात. गरज आहे ती या मार्गाकडे प्रमुख मार्ग म्हणून पाहण्याची. 

जब जाग आए वही सवेरा 

"माझं वय फार झालंय", किंवा 
"मी अगदीच तरुण आहे", 
"आत्ता कुठे करिअरला सुरुवात केली आहे",
तत्सम कारणे मनाला देत बसू नका. ज्या क्षणी हे उमगलय त्या क्षणी कामाला सुरुवात करा. 

एखाद दोन पुस्तके वाचा, काही कोर्सेस वगैरे अटेंड करा. खूप पैसे भसकन गुंतवू नका. त्याऐवजी अशा कोर्सेस किंवा शिकण्यामध्ये थोडे जास्त पैसे गेले तरी चालेल. काही ठिकाणी खूप चांगले काही मिळेल, काही ठिकाणी तितकेसे मिळाले नाही असे देखील वाटेल. परंतु एकदम अंधविश्वासाने किंवा कमी ज्ञानाने हे सुरू करू नका. 

यालाच आजपासून सुरुवात करूया.

Monday, 7 July 2025

Operations चे असाधारण महत्त्व ....

माझा मित्र निशांत ह्याने नुकताच राजीव तलरेजा ह्यांच्या मुलाखतीची एक लिंक मला पाठविली होती. त्यात मला आवडलेले आणि खूप भावलेले एक वाक्य म्हणजे :-

सध्याच्या युगात आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल, तर आपली Operational Efficiency वाढवूनच हे शक्य होईल. उत्पादने, सेवा वगैरे तर प्रत्येक संस्था उत्तमोत्तम देण्यात कुठे कुचराई नाही करत.

✔ पटण्यासारखे आहे. माझ्या कडे सध्या काही अशी उदाहरणे (लहान व्यवसायांची) आहेत की त्यांना वाटत राहते कि फक्त विक्री हेच सर्वस्व. 

मला एका संस्थेने त्यांच्याकडील निवडक अशा १२ उद्योजकांबद्दल टिप्पणी द्यायला सांगितले, आणि सोबत एक एक्सेल sheet दिला ज्यात बरेच मुद्दे होते मूल्यांकना करिता. एक होता : Net Profit अर्थात निव्वळ नफा. त्यात १२ पैकी फक्त एकाचाच निव्वळ नफा ८% पेक्षा जास्त होता. बहुतेकांचे १- ३ टक्के. मी विनंती करून त्यांच्या "कार्यचालन म्हणजेच Operating Profit" चे आकडे मागवून घेतले. मग सर्व जरा बरे झाले. बऱ्याचदा नफा कमी दाखवून कर कमी भरण्याच्या प्रवृत्तीने असे होत असावे. तरीही, मी माझा निष्कर्ष पाठवून दिला :- ज्या उद्योजकांचा कार्य चालन नफा हा १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, त्यांचाच विचार व्हावा. कारण निकष अगदी काहीही जरी असला, तरीही आपल्या स्वत: च्या मूळ कामातून जे उद्योजक कमीत कमी १५ टक्के नफा मिळवू शकत नसतील, तर बाकी सर्व गौण. खालील एका कंपनीच्या उदाहरणातून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय.

आजच्याच सकाळ मध्ये योगा योगाने डॉ अनिल लांबा ह्यांचे एक विधान आले आहे जे Cash Flow किती महत्त्वाचा आहे ह्याबद्दल आहे 👇


✵पाठोपाठ श्री भूषण ओक ह्यांचे एका कंपनीचे (Dynacons) आर्थिक विश्लेषण आलेले आहे. त्यातील बाकी सर्व भाग सोडा परंतु, खालील दोन्ही वक्तव्ये पहा :-



दोन्हींमध्ये " Cash In" जरा चिंताजनक बाब आहे असे म्हटलेले आहे. म्हणजे येणी आहेत, परंतु वसुली मात्र ३५ टक्केच आहे. आता आणखी खोलात गेल्यावर समजून आले, की , कदाचित कंपनीच्या प्रत्यक्ष धंद्यातून असलेल्या येण्याचे प्रमाण इतके कमी नसेल, परंतु कंपनीने सोबत इतर गुंतवणुकी केल्यात ज्यात कदाचित घाटा झाला असावा.कुठेतरी कंपनी व्यवस्थापनात गडबड असू शकते. तर ही इतर गुंतवणूक कार्य चालन नफ्यातून केली जाते ना ! म्हणूनच एखाद्या कंपनीची कामगिरी पाहताना ताळेबंद, नफा तोटा पत्रक व सोबत कॅश फ्लो देखील पाहतात. हे कॅश फ्लो सुद्धा ३ भागांत असतात : त्यातील Operations Cash Flow नीट बघितला कि कंपनीचे कामकाज समजून येते.

मी काही यातला कसलेला खेळाडू नाही, फक्त सोबत स्वत: चा व्यवसाय व इतर व्यावसायिकांशी सल्ला मसलत करत असताना, त्यांच्या समस्या अधिक खोलात जाणून घ्यायला, त्या नीट अधोरेखित करायला ह्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करीत आहे.

इथे आपण कंपनीचे शेअर घ्यावे कि नाही ही चर्चा नाही करत आहोत, परंतु ह्या अनुषंगे आपल्याला निश्चित समजून येतं की Operational Profit किती महत्त्वाचा आहे. हाच तो EBITDA. ह्यावर आपला एक विशेष podcast देखील आहे. 

✔ नुसता कागदावर नफा दिसून नाही भागायचे तर तो रोखीत , वेळेत रुपांतरीत व्हायला हवा. नाहीतर गणित पालटायला वेळ लागणार नाही. ह्याकरिता वेळेवर वसुली होणे, प्रत्येक ठिकाणच्या नोंदी अचूक तसेच वेळेवर चोख व्यायला हव्यात. नसल्यास कर्मचारी वर्गास समजूत द्यायला हवी. कंपनीत कार्यचालन नफ्याची संस्कृती रुजवायला हवी. कर्मचारी वर्गाला ह्यात प्रशिक्षित करायला हवे.