Tuesday, 3 November 2026

EV/EBITDA : अत्यंत उपयुक्त गुणोत्तर

जसे जसे गुंतवणूक क्षेत्रात अधिकाधिक शिकतोय, 

तसे तसे अधिकाधिक Amazing अशा Terms ची ओळख होत आहे. ज्या ज्या Extra Ordinary महत्त्वाच्या भासतील, त्या त्या पोस्ट करेन.

EV/EBITDA हे असेच एक गुणोत्तर. 

तसं गुगल च्या मदतीने उत्तर काढायला अगदी सोप्पं आहे. आणि परीक्षेत पास व्हायला किंवा Coach अथवा Trainer म्हणून प्रभाव पाडायला. पण समजावून घ्यायला , आणि आपल्या डोक्यात घुसवून वापरायला मज्जा येते जास्त. मुळात हे गुणोत्तर का वापरावे ? पाहुया ...

EV म्हणजे Enterprise Value

  

म्हणजे एक उद्योग म्हणून तुमची जोखली गेलेली किंमत. कशी काढली जाते ही ? :-

सूत्र नंतर देतो. आधी विचार करून पाहू :-

एखादा उद्योग विकत घ्यायचा झाला , तर आपण त्याची किंमत रास्त आहे की नाही हे कसे बरे ठरवू ?
  • त्याला दिलेली किंमत ( गुंतवणूक ) किती आहे ?
  • ती दिली तर त्यातून मिळू शकणारा परतावा हा किती टक्के असेल ?
  • तो ( परतावा ) केव्हा सुरु होईल ? ( साधारण पणे वर्ष अखेरीनंतर तरी व्हावा ! )
  • तो जो काही परतावा अपेक्षित आहे; तो निदान ४ ते ५ वर्षांत तरी गुंतवलेली रक्कम परत काढून देईल काय ? ( म्हणजे साधारण २० टक्के वार्षिक ? )
  • का आणि नक्की कसे हे होईल सर्व ? ( म्हणजे कोणत्या पद्धतीने सदर उद्योग चालविला जातो ? )

ह्या प्रश्नांची उत्तरे सापडली तर मग पुढचे पाउल टाकता येईल. ह्यासाठी हे गुणोत्तर खूप उपयोगी ठरते.

तर EV ( ENTERPRISE VALUE ) अर्थात उद्योगाचे "मोल" कसे काढले जाते ? 

तर कंपनीच्या भांडवलापैकी जे भांडवल मार्केट मधून आलेले असेल, ते एकूण Market Capitalization म्हणून गणले जाते. 

हे काढणे अगदीच सोप्पे आहे ☺ :-

👉त्या कंपनीच्या शेअर ची आजची किंमत x एकूण मार्केट मध्ये असलेले शेअर्स. 

ही जी संख्या येते त्याला भावनिक मोल जास्त आहे. कारण शेअर ची किंमत हाच मुळात भावनिक आकडा आहे. तर फक्त ही किंमत पाहून तर ठरवता येणार नाही ना , कि कंपनी विकत घ्यायची कि नाही. तर ह्या संख्येतून आज असलेली देणी घेणी ह्यांचा हिशोब केला जातो ( कर्जे + रोख ). नंतर उरते ती Enterprise Value.

✵आता सूत्र पाहू :- 

EV = Market Cap + ( Total Debt - Cash ).

एक उदाहरण म्हणून :-👇
समजा एखाद्या कंपनीची परिस्थिती अशी आहे:

✸आज त्यांचा शेअर रु. १०० ह्या किंमतीला खरेदी करता येतोय. आणि ह्या कंपनीचे सध्या शेअर्स आहेत १० कोटी, भागधारक नव्हे. म्हणजे ह्या कंपनीचे बाजारमूल्य आहे रु १००० कोटी ( १० कोटी x र. १०० प्रमाणे ). हे असते Market Capitalization. हे बदलते असते , सतत.

✸ह्या संख्येतून सध्या असलेली लगेच द्यायची आणि लांब पल्ल्याचीही - कर्जे ही अधिक केली जातात. हा आकडा समजा आहे १५० कोटी. तर किंमत पुन्हा बदलली : र. ११५० 

✸ह्याच वेळी कंपनीची अशी विविध येणी आहेत जी लगेच रोख मिळू शकतात, शिवाय बँकेत असलेली रोकड शिल्लक ही समजा ५० कोटी असेल, तर ती वजा केली जातात कारण ही द्यायची गरज नाही ना. 

किंमत पुन्हा बदलली : र. ११५० - रु ५० कोटी = रु ११०० कोटी.

याचा साधा अर्थ काय?

समजा तुम्हाला ही संपूर्ण कंपनी विकत घ्यायची आहे.

  • कंपनीचे सर्व शेअर्स विकत घेण्यासाठी ₹1,000 कोटी लागतील.

  • पण कंपनीवर ₹150 कोटींचे कर्ज आहे.

  • कंपनीकडे ₹50 कोटी रोख आहेत.

म्हणून कंपनीचे आर्थिकदृष्ट्या समायोजित मूल्य ₹1,100 कोटी होते.

----------------------------

Market Cap आपल्याला सांगते की बाजार कंपनीच्या इक्विटीला किती मूल्य देतो.

Enterprise Value आपल्याला कंपनीच्या व्यवसायाचे कर्ज आणि उपलब्ध रोख लक्षात घेऊन किती मूल्यांकन होते हे सांगतो.

------------------

आता EBITDA समजून घेवू :-

शार्क Tank सारख्या दूरचित्रवाणी वरील कार्यक्रमांत वारंवार वापरला जाणाऱ्या ह्या शब्दाचा अर्थ काय, आणि हा घटक सारखा वापरला जातो, त्या अर्थी ह्याचे महत्त्व जरा काकणभर जास्तच असणार, नाही का !

नफा हा विविध स्तरावर गणला जातो. आपण अगदी सामान्यपणे वापरत असलेले नफ्या ला समांतर असे शब्द म्हणजे :-

Gross Profit तसेच Net Profit. 

परंतु कसलेले गुंतवणुकदार हे मात्र ह्या दोन्हींचा विचार तसा दुय्यम करतात. त्यांच्या लेखी सर्वात महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे : कार्य चालन अर्थात Operational किंवा Operating नफा अर्थात Profit.









वरील दोन्ही प्रतिमा वरून स्पष्ट होतं कि EBITDA म्हणजे काय ते. मुख्य विषयापासून फार भरकटायला नको, म्हणून मी जरा पुढचा भाग घेतो. 

तर EV/EBITDA हे गुणोत्तर म्हणजे ....


मी share ची आत्ताची किंमत , जिला CMP म्हणजे Current Market Price असं म्हणतात ती भावनिक असते असं म्हणायचं कारण म्हणजे : कंपनीचा मूळ शेअर कदाचित रु १० किंवा रु. १ असतो, ज्याला रु १०० दिले जात असतात , ह्याचाच अर्थ आपण १०० पट किंमत देत असतो, तेच मुळी ह्याचे निदर्शक आहे. आपण सदर कंपनीच्या भविष्यात गुंतवणूक भागीदार झालेले असतो. अगदी तसेच, कि उद्या सोने नक्की वाढणार. फक्त इथे प्रत्येक कंपनी सोने असतेच असे नाही. शिवाय प्रत्येक कंपनी आज सोन्यासारखी वाटली तरी ती वाटतच राहील, ह्याची शाश्वती अजिबात नाही. 

हे तपासण्याचे साधन म्हणजे EV/EBITDA. 

हे कसं, तर नुसतंच खूप अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्तम ग्राहकवर्ग, खूप काळापर्यंत हातात असलेल्या orders हे असून भागत नाही; तर सोबत अशा कंपन्यांची तशी कामगिरी देखील असावी लागते. त्याकरिता सोबत EBITDA तपासत राहणं तेही एकापाठोपाठ तिमाही तसेच प्रत्येक सहामाही तसेच वार्षिक कामगिरी पाहत राहणे आणि तौलनिक अभ्यास करत जाणं हे अत्यंत फायद्याचं ठरतं. 

टिकून राहायचं की विकून टाकायचं ....


आपल्याला ह्या अभ्यासातून हेही समजतं कि एखादी कंपनी फक्त तात्पुरतीच वाईट कामगिरी करत आहे, कि आता खालावत जाणार आहे. म्हणजे आपल्याला ह्या गुणोत्तरा द्वारे हे Early Warning Signals ( नजीकच्या काळाचे आगाऊ संकेत ) नक्की मिळू शकतात. मग ठरवता येतं कि काय करायचं :
  • गुंतवणूक टिकवून ठेवायची 
  • काढून घ्यायची 
  • टप्प्याटप्प्याने वाढवत न्यायची 
  • की कमी करत जायची 

कोणत्याही व्यवसायाकडे पाहण्याची व्यावसायिक दृष्टी 


तर ही ह्याची सर्वात मोठ्ठी उपलब्धी. की स्वत: सोबत सर्व व्यवसायांकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी विकसित होऊ लागते. अनेक वेळा ते व्यवसाय आत्ता नक्की कुठे चुकत आहेत किंवा असावेत हे कळू शकतं, त्यांना वेळीच सावध करता येवू शकतं ....

Tuesday, 20 October 2026

ISI आणि स्वधर्म

 Compliances आणि स्वधर्म 


उत्तर प्रदेश सरकारच्या अन्न विभागाने नुकतेच बाटलीबंद पाण्यास ISI हे पुनश्च अपरिहार्य (अजून भारतात सर्वदूर नाही ) केले आहे, जे २०२४ मध्ये "ऐच्छिक" केले गेले होते. म्हणजे २००१ पासून २०२४ पर्यंत अपरिहार्य होतेच ! 

परंतु त्यांचा निष्कर्ष हे सांगतो, की जसे हे ISI मानांकन ऐच्छिक झाले; तशी अशा कारखान्यांची संख्या प्रचंड वाढली. ह्याचे प्रमुख कारण असावे ते म्हणजे ISI प्रमाणे प्लांट सांभाळताना पाळावी लागणारी शुचिर्भूतता. ज्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या वेळोवेळी ( काही प्रत्येक ४ तासांनी, दैनिक, साप्ताहिक, मासिक, तसेच वार्षिक ) स्वत: च्या अंतर्गत प्रयोगशाळेत करून त्याचे परिणाम सतत B.I.S. च्या संकेतस्थळावर तत्क्षणी upload करावे लागतात. हे करण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा तर आवश्यक असतेच, सोबत ह्यासाठी कुशल मनुष्यबळ, आणि प्रशिक्षण देखील. मुळात ह्या अटी स्वत:हूनच पाळाव्या ह्यासाठी उलट सरकारने काम सोप्पे करून दिले आहे. म्हणजे हे केले कि झाले ! 

स्वधर्माच्या चष्म्यातून ह्या कडे पाहताना प्रश्न पडतो, कि हे तर हवेच ना ! मग ह्यांचे उल्लंघन झाले तरी कसे ? कारण हेच कि Compulsory नव्हते ! पण FSSAI ने सुद्धा मोकळे सोडलेले नाहीये. त्याच चाचण्यांत सदर उद्योग सापडले. उत्तर प्रदेश चे कमिशनर ह्यांनी कडक धोरण अवलंबिल्याने हे झाले. हा त्यांचा स्वधर्म.

अगदी ISI न घेताही हा स्वधर्म पाळता येतोच, स्वत: स्वत:वर परीक्षण अपरिहार्य करून ....!

कुणाला रस असल्यास ह्यावर detailed blog पोस्ट आहे :-

===>>> https://mineralwaterpune.blogspot.com/2026/10/will-govt-take-u-turn.html

Wednesday, 14 October 2026

व्यावसायिक समज वाढवायला हवी

गेल्या आठवड्यात एका चित्रपटाला जाण्याचा योग आला. बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहिला हा एक भाग. दुसरा म्हणजे ह्या चित्रपटाची निर्मिती आमच्या एका अतिशय घनिष्ट मित्राच्या जावयाने केली आहे, तर त्यात प्रमुख भूमिका आमच्या मित्राच्या मुलीने केलेली आहे.

हा चित्रपटाचा लेखाजोखा नाही, तरीही सदर चित्रपट अत्यंत खिळवून ठेवणारा आहे. 

ह्या पोस्ट चा मुद्दा निराळा आहे. चित्रपटानंतर ही सर्व मंडळी येवून भेटली, त्यात निर्माता दिग्दर्शकाने आवाहन करताना मराठी चित्रपट आर्थिक बाबतीत टिकून रहाणे वगैरे विषयी खूप खंत व्यक्त केली आणि ह्याबद्दल किंचित अधिक बोलला, असं मला वाटतं, जे नाही बोलायला हवं. अभिप्राय शेअर करा, सोशल मेडिया वगैरे सर्व ठीक. 

मुळात हा निर्माता दिग्दर्शक जो आहे, तो स्वत: मिडिया क्षेत्रात आहे, आणि अजून पाय स्थिरावू पाहत आहे. त्याला सुसंगत असे हे पाउल आहे. त्यामुळे त्या मोठ्या मार्गावारीलच एक टप्पा, महत्त्वाचा, असे ह्याकडे पाहायला हवे. चित्रपट चालायला हवा, आर्थिक गणित जमायलाच हवे, हे खरेच. परंतु त्या एका गोष्टीने हवालदिल होता कामा नये. 

" मराठी चित्रपट आर्थिक बाबतीत टिकून रहाणे " वगैरे विषयी बोलण्याने ही अगतिकता अधोरेखित होईल. मनात. चित्रपटाचे व्यावसायिक यश म्हणजेच सर्वस्व हा समज दुणावेल. ऐवजी जरी जरा कमी यश मिळाले, आणि स्वत: च्या निर्मिती वरील प्रेम आणि विश्वास वाढवला, टिकवून धरला, तर आज नाही तर उद्या सफलता येईलच. एक उत्तम चित्रपट निर्माता म्हणून, नाव होईल, चांगले काम निर्माण होईल.

कोणतेही क्षेत्र असो, हा "दम" हवाच. आणि मुळातच त्यावर असीम श्रद्धा आणि प्रेम असेल, तर दम राहतोच. 

Friday, 2 October 2026

काम "करून टाकायचा" सोस….

​सर्वच कामाची परिणामकारकाता सरसकट “संख्येत” मोजायला आपण लागलो , की गोंधळ होणारच. 

सध्या ai मुळे जो एक दर्जाहीन आशय नजरेस पडतो तो बघितला की ह्या उथळ पणाची कीव येते आणि विषाद निर्माण होतो. खास करून सर्व प्लेटफॉर्म आपले काम हलके करायला इतके तत्पर असतात, की ज्यामुळे आधीच कृतिशीलते कडे न जाता फक्त सुरक्षित यशाकडे नेणाऱ्या गुलामी मानसिकतेत अधिकच भर पडते. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे विचार नको करूस, मला सांग,असे. आमचे एक मित्र म्हणतात तसे… “डोकच लावायचं नाही”. बुद्धी वापरायची नाही. ते तुझे कामच नाही. आणि हे कौशल्य पदरात पाडून घ्यायचा सवंग चंग बांधायचा, थोडक्यात खपणूक आधारित अर्थव्यवस्थेला चारापाणी देणारे गुलाम व्हायचे.

सरसकट व्हिडीओज चे पेव 

ही खेळणी अनेक ठिकाणी उपलब्ध झालीयेत त्यामुळे गरज असो, नसो , अत्यंत दुय्यम दर्जाचे ( किंवा छानही ) व्हिडियोज नको तिथे तयार करून पोस्ट केले जातात. कालच एकाने मार्केट यार्ड बद्दल एक बातमी दिली. तर ह्या मार्केट यार्डाचा वीडियो टाकण्याची काय आवश्यकता होती ? असेच हल्ली पेपर मध्ये अगदी करमणूक कार्यक्रमांच्या जाहिराती सुद्धा ai च्या इमेजेस लावून छापतात.ग्राफिक डिज़ाइनिंग म्हणजे फक्त चित्र तयार करणे हे नसते. असो.तो विषय पुन्हा.

व्हॉट्सअप वर मेसेज करण्याची गंमत 

इथे तर कमालीच्या गमती जमती अनुभवायला मिळतात. बऱ्याच वेळा कुणाला काही सांगायचं असतं, आणि काही वेगळाच अर्थ निघू शकतो. परिणामस्वरुप गैरसमज तयार होतात, सौहार्दाचं वातावरण बिघडतं.संवादात शब्दाला असाधारण महत्त्व आहे, असते. मदत घ्या परंतु शेवट संदेश नीट तपासूनच टाकायला हवा. एखाद्या ठिकाणी आपण नेतेपदी किंवा प्रमुख पदी असलात तर जबाबदारी अधिक विस्तृत होते.

आज गांधीजयंती च्या निमित्ताने त्यांच्या एका अशाच सवयीबद्दल आले आहे ते आपण आवर्जून पाळण्यासारखे आहे :-




Saturday, 26 September 2026

परीवर्तन शून्य आकडे

​बिझनेस ग्रुप्स मध्येही आकडे खूपच प्रिय असतात आणि खरेच आहे की आकडे आपल्याला सत्य दर्शन करवितात. हे कोणते आकडे ह्यात सर्व इंगित लपलेले आहे. बऱ्याच ठिकाणी मेंबर्स कडून अमुक एक काम करून घेणे ह्यावर फारच भर दिला जातो. म्हणजे कसे, की एखादा खास कार्यक्रम असतो आणि त्याकरिता अमुक एक संख्या ठरविलेली असते. तरच ते गणित परवडणारे वगैरे असते. तर अशी कल्पना करूयात की संस्थेच्या अंतर्गत अनेक ग्रुप आहेत आणि त्यांचे त्यांचे सदस्य. एक ग्रुप प्रमुखांची टीम असते.त्यांना एक टास्क दिले जाते आणि ते हासिल केल्यावर त्या प्रमुख मंडळींचा दबदबा वाढणार असतो. 

(टीप: ह्याचा प्रत्यक्ष बिझनेस शी कितपत संबंध असतो हे सांगणे कठीणच.)

तर ही मंडळी ह्याच्या इतके मागे लागतात की मूळ उद्देश कुठच्या कुठे लांब फेकला जातो. नुकताच आमच्या अशाच एका ग्रुप प्रमुखाने हे नोंदणी सत्र राबविताना ग्रुप चक्क लॉक करून टाकला. आणि हे “पवित्र” काम करून घेतले. म्हणजे जी मंडळी करत नाहीयेत त्यांचे प्रश्न जाणून घ्यायच्या ऐवजी नसेल तर गेला उडत अशीच भूमिका झाली ना. शिवाय माझ्या सारख्या जुन्या लाकडाची काय असणार किंमत ! 

एक समांतर उदाहरण बघूया म्हणजे समजेल…..

एका रक्तदान शिबिराला आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून रक्तदान उत्सुकांना त्यांची माहिती भरून द्यायला मदत करत होते. त्यांनतर हे फॉर्म घेवून रक्तदाते पुढे जात होते जेथे रक्त संकलन करणाऱ्या संस्थेचे अधिकारी पुढील काम करत होते.

माझी पाळी आल्यावर समजले, की संस्थेच्या अधिकारी असलेल्या व्यक्ती हाच आधी भरलेला फॉर्म जवळपास पुन्हा एकदा भरून घेत होत्या. अर्थात हे डुप्लिकेशन का असा प्रश्न मी विचारता त्यांचे उत्तर खूप मार्गदर्शक होते :

“ विद्यार्थ्यांचा कल फॉर्म भरून देण्याकडे असतो. मात्र ह्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देताना व्यक्तीने थांबून, विचार करून उत्तर देण्याची आवश्यकता असते. चुकीच्या प्राकृतिक स्थितीतील रक्त स्वीकारणे हे धोकादायक असते. त्यामुळे त्यांनी स्वतःहून विचार करूनच फॉर्म भरणे गरजेचे आहे”

हेच तत्त्व आपण बिझनेस क्लब ला लागू केले तर प्रत्येक मेंबर स्वयंप्रेरित होवून सहभाग देईल. अधिक अर्थपूर्ण सहभाग राहील, नुसते आकडे नाही राहणार.


Saturday, 12 September 2026

Contribution Margin शी विक्री Incentive संलग्न करणे

Incentives देण्याबद्दल वेगळाच विचार काळ शिकायला मिळाला 

अनेक ठिकाणी माझ्या पाहण्यात आले आहे, विक्री विभागातील कर्मचाऱ्यांना सरसकट कमिशन देण्यात येते. म्हणजे अमुक सेल केलात तर इतके कमिशन वगैरे.

त्यात थोडे अधिक म्हणजे अमुक एका विक्रीपर्यंत अमुक, त्याच्या पुढे तमुक वगैरे.कधी कधी season प्रमाणे किंवा व्यवसायाच्या आर्थिक स्थिती नुसार सुद्धा काही नैमित्तिक schemes राबविल्या जातात. 

लहान लहान कंपनीज मध्ये तर खूपच सरधोपट पणा आढळतो. फक्त विक्री आण , कमिशन घेवून जा .... असा प्रकार चिक्कार ठिकाणी असतो. पण त्या कंपनीत Finance विभाग जर दक्ष असेल, किंवा स्वत: व्यावसायिक जर दक्ष असेल, तर त्याला मात्र प्रत्येक अशा सेल च्या मागे घडणाऱ्या घटना वेगळ्या प्रकारे जाणवतात.

कधी कधी मोठ्या कंपन्या अधिक क्रेडीट मागतात, कधी वेगळ्या प्रकारच्या सवलती. कधी सांगितलेल्या तारखेला वसुलीच होत नाही, तर कधी Delivery होई पर्यंत अनंत अडचणी येत राहतात.

बऱ्याच वेळा अडचणी ह्या ग्राहकांच्या बाजूने असतात. कारण ग्राहक कदाचित प्रथमच असा व्यवहार करत असतात , मात्र उद्योजकासाठी हे अनेक वर्षे अगदी कोळून प्यायलेले बिझनेस मॉडेल असते. थोडक्यात त्याचे अगदी रोजचे झालेले, ठरलेले बिझनेस मॉडेल असते.

तरीही अंतर्गत सेल्स कर्मचाऱ्यांशी मात्र ह्या बाबत व्यवस्थित गणित ठरवलेले नसल्याने बऱ्याच वेळा गैरसमज घडून येतात. ह्या ऐवजी जर त्यांचे कमिशन हे अशा व्यवहारांतून कंपनीला प्रत्यक्ष मिळणाऱ्या योगदान रुपी उत्पन्नाशी  जोडून घेतले, तर तर खूप ताण कमी होऊ शकेल. कारण प्रत्येक्लेअच प्रकारे व्यवहार ठरत नसतात, ते वेग्ग्ल्या प्रकारे ठरतात. त्याचवेळी दोन गोष्टी मात्र घडतातच घडतात :-

  1. काहीही झालेतरी त्या त्या व्यवहारा ( Deal ) करिता लागणाऱ्या स्थिर खर्चाचा वाटा हा स्थिर च राहतो. 
  2. हा व्यवहार ( Deal ) ह्या मुळे कंपनीवर सदोदित असणाऱ्या ह्या स्थिर खर्चाचा बोजा नक्की हलका करतोच करतो. 

तरीही नेहमीचे च उत्पादन विक्री कर्मचारी वेगवेगळ्या अटींवर विकत असतात. तर मग कंपनी एकच समान कमिशन ह्या वाट्यातून कसे बरे देवू शकेल ?हा मुलभूत विचार केंद्रस्थानी ठेवून कमिशन च्या Structure ची फेररचना केल्यास खूप गुंते सुटायला मदत होईल.

हे आपल्याला Contribution Margin ह्या सूत्रातून सहज काढता येते. माझ्या मिनरल water च्या युट्युब channel वर ह्याबद्दल एक व्हिडियो मी पोस्ट केलेला आहे. तो पाहिलात तर सहज समजून येईल.


पहा आणि जरूर प्रतिक्रिया द्या !





  

Thursday, 10 September 2026

ऑफिस सोडा…..

​भारतीय युवा शक्ति ट्रस्ट मध्ये MMC “Mentor Mobile Clinic” नामक एक कार्यपद्धती वापरली जाते.

ज्याद्वारे काही मेंटर्स एकत्रित पणे काही ठराविक उद्योजकांकडे भेट देतात. ज्यांना कर्ज सहाय्य करण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे स्वत: जाऊन आल्यामुळे एक विश्वास निर्माण होतो तसेच उद्योजक मंडळी जर कुठे चुका करत असतील तर त्यांना मार्गदर्शन करता येतं.

खरं तर स्वत: लाच जास्त शिकण्याची संधी. काल एकूण ४ जणांकडे जाऊन आलो. सोबत चार मेंटर्स, byst चे समन्वयक अधिकारी होते.



पहिला उद्योजक होता एक प्लास्टिक स्क्रॅप चा व्यवसाय मांडलेला उद्योजक 

अगदी प्राथमिक स्वरूपातील सॉर्टिंग करून देतो हा. महत्त्वाचे काम, कष्टाचे काम. नंतर मग पुढची प्रक्रिया त्या त्या कंपन्या करतात. “मराठी स्क्रॅपवाला” असा ब्रांड ह्याने तयार केलाय आणि आता इतरांनाही ह्या व्यवसायाचे प्रशिक्षण देतोय.

दुसरी होती पाउडर कोटिंग यूनिट चालवणारी अगदी तरुण उद्योजिका 


ही स्वत: आणि हिचा भाऊ हे यूनिट चालवतात. घरी आधीपासून फॅब्रिकेशन व्यवसाय आहेच. विशेष म्हणजे चांगल्या पैकी शिक्षण घेतलेले असूनही दोघांना नोकरी करायचीच नाहीये.

तिसरा लिफ्ट उत्पादन करणारा उद्योजक 

स्वतःची अत्यंत प्रेरक वृत्ती ह्याचा यूनिट वर ठायी ठायी जाणवते. वडील बस कंडक्टर पण मुलगा उच्चशिक्षित आणि तरीही नोकरी नाही, तर कसलेला उद्योजक.

तर चौथा होता एक इवेंट वाला.

अगदी छोट्या खेड्यातील हा सुद्धा दुसऱ्या पिढीतील उद्योजक. ह्याचे वडील आणि संपूर्ण कुटुंब हा व्यवसाय अत्यंत तन्मयतेने चालवतात.अत्यंत स्फूर्तीदायक. 

शिवाय माझ्या छोट्या विचारांचा चक्काचूर करणारे मेंटर. ह्यांच्या नुसत्या कथा ऐकल्या तरी आपण पुन्हा भरारी घ्यायला सज्ज होतो. सोबत आमचे byst चे उत्साही आणि तितकेच अहंकार रहित असे अधिकारी.

किती शिकू आणि काय काय शिकू……

Wednesday, 2 September 2026

दूरच्या वस्तूचे विनाकारण आकर्षण

अगदी ताजी ताजी घटना. जाता - येता मला कार्यालयाजवळ एक प्रिंटींग चे दुकान नजरेस पडले. त्यावेळी गडबडीत असल्याने मी लक्षात ठेवले आणि नंतर अनेक वेळा ते कुठे आहे ह्याचं शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मिळता मिळेना.

आपला सहज अग्रक्रम जवळ असेल त्याला असतो. आणि हे दुकान नक्की माझ्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरचे आहे आणि तेही कार्यालयाजवळ आहे इतके माझ्या पक्के लक्षात होते. त्यामुळे मला शेवटी एक दिवस हे सापडले. 

त्यांना कार्ड दिले, त्यांचे काम समजून घेतले. त्यांना पुढे काम देईन - न देईन हा भाग अलाहिदा, पण तिथून निघता निघता एक गमतीदार घटना घडली, जी माझ्या पक्की लक्षात राहिली आणि विनोबा भावे ह्यांनी "गीता प्रवचने" मध्ये उल्लेख केलेलं एक वाक्य आठवलं. त्यांनी धुक्याचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात...

धुक्यात आपल्याला जवळचं दिसतच नाही 

आणि दूरचं मात्र नीट दिसतं  

झालं असं , की तिथून निघत असताना मी त्या दुकान मालकाशी बोललो ; त्यांना म्हणालो, कि तुमच्या shop वर बोर्ड नाही, मिळणार कसं ?

ह्यावर त्यांनी मला आवर्जून सांगितलं ( त्यांच्या दारावर लावलेल्या स्टीकर कडे अंगुलीनिर्देश करून ) कि गुगल वर हे नांव टाकलेत ना , तर लगेच मिळेल !

आता बोला. 

आपले ग्राहक आपल्याला गुगल वर शोधत असतात हे खरेच, परंतु स्थानिक मंडळी ही आपली आपसूक ग्राहक असतात हो !  

 

 

Sunday, 30 August 2026

आपण कसे हळूहळू अदृश्यपणे अप्रिय होत जावू शकतो .....

घटना १ :-

एका हॉटेल मध्ये मी Agoda ह्या website वरून बुकिंग केले. काही कारणास्तव मला रद्द करावे लागले. नियमाप्रमाणे २४ तासांच्या आत मी ते रद्द केले, तर मला संपूर्ण refund मिळायला हवा होता. जो Agoda ने " सदर हॉटेल ने तो देण्यास नकार दिला आहे , त्यामुळे मिळणार नाही " हा stand घेतला. मी त्यांना केस कळविली. अजून तरी काही पुढे घडलेले नाहीये. 

सर्वात जास्त प्रभावी परिणाम : मी ( ग्राहक ) ह्यापुढे agoda चा विचार करताना "असेच एक" म्हणून करणे हा आहे. 
असंच पूर्वी एकदा Treeebo बाबत घडलं होतं. त्यांच्या तर माणसाने फोन वगैरे केला होता, पण परिणाम शून्य.

✵तात्पर्य : जास्त लोकांपर्यंत पोचायला डिजिटल मार्केटिंग चा वापर जरूर करा , परंतु प्रतिक्रिया मात्र जरूर पहा आणि आवश्यक तिथे स्वत: हस्तक्षेप करून ग्राहकाला खूष समाधानी तरी ठेवा. 
------

घटना २ :-

आमचे निवडक चे सदस्य श्री वाकडे हे स्वत: MASMA च्या कृती समितीवर कार्यरत आहेत. आणि आपला अधिकार वापरून त्यांनी एका संस्थेला त्यांच्या २ प्रदर्शनांत निशुल्क stall देवू केला होता. आता त्या संस्थेच्या प्रदर्शनात त्यांनी अशीच विनंती सदर संस्थेला केली असता, त्यांनी त्वरित ही विनंती गोड शब्दांत धुडकावून लावली.

✵तात्पर्य : काहीच नाही. असा प्रकार सदर संस्थेबद्दल आणि त्या व्यक्ती बाबत वाकडे पुन्हा करणार नाहीत हे नक्की.

मला वाटतं की कधी ग्राहकाला अपेक्षित असणारी फेड आपण करू शकू किंवा नाही. परंतु एक आस्थापूर्वक concern ठेवणे आणि तसाच संवाद ठेवून त्यांच्याशी नीट "सु"संवाद ठेवायला हरकत नाही.

आपण अप्रिय होण्यापासून तरी लांब राहूच शकू, काय ?


Friday, 28 August 2026

अफाट मानसिक शक्तीचे प्रदर्शन ....

 


वरचा screenshot आहे तो नुकत्याच पार पडलेल्या भारत वि श्रीलंका कसोटी तील श्रीलंकन दुसऱ्या डावाचा. 

"सहज खिशात घालू" असे समजणाऱ्या, नव्याने "आपणच क्रिकेट चे राजे" ह्या दिमाखात वावरणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या तोंडचे पाणी ह्या तळाच्या ३ फलंदाजांनी अक्षरश: पळवले. दिनुशा चे कौतुक आहेच ; पण स्वत:कडे so called फलंदाजी कौशल्य प्रामुख्याने नसताना फक्त "उभे राहीन" हा विश्वास स्वत:वर ठेवून उत्तम किल्ला लढविणाऱ्या दिनुशा ला साथ देणाऱ्या ह्या वीरांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

हरवत चाललेल्या " Playing for Hours Together & Offering No stroke At All " ह्या वृत्तीचे दर्शन गावस्कर, द्रविड, पुजारा ह्यांच्यानंतर आज घडले. शिवाय मला ती विश्वचषकातील ग्लेन Maxwell ची inning आठवली. त्यात स्वत: उत्तुंग फटके मारू शकत असणाऱ्या Pat Cummins नेही स्वत: च्या नैसर्गिक वृत्ती वर आवर घालून अत्यंत सावध खेळ केला , आणि Australia ला एक अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता.

असंच आपल्या कपिलदेव किरमाणी - १९८३ झिम्बाब्वे सामन्याबद्दल बोलता येईल.

संघ भावना वगैरे तर आहेच; परंतु अंतिम उद्दिष्ट काय आहे आणि त्यासाठी टिच्चून उभे राहायचे आहे. फक्त उभे राहायचे आहे, काहीही इतर न करता हे खूप महत्त्वाचे. ही वृत्ती T-20 च्या जमान्यात, हे फार महत्त्वाचे. 

एक उद्योजक म्हणून, माणूस म्हणून देखील हा अप्रतिक्रिया युक्त स्तब्ध पणा अंगी बाणवणे हे महत्त्वाचे !



Tuesday, 11 August 2026

सेल्स track करता का ?

कोणत्या कंपनीमध्ये लांब पल्ल्याची गुंतवणूक करावी असा विचार करताना अनेक numbers track करतात. तरीही सर्वात लोकप्रिय, महत्त्वाचा आणि कोणीही अजिबात न टाळणारा निर्देशक अंक आहे तो म्हणजे Sales अर्थात विक्री किती झाली हाच !

आणि हाच मूळ आधार आम्ही आता ठेवत आहोत !

निवडक उद्यमी ची विचारसरणी म्हणजे वेचक ते ते करावे. ह्यानुसार तुम्हाला हे आढळणारच नाही कि जे जे म्हणून टिपिकल संस्था करतात ते ते निवडक करत राहते ... निवडक ची कार्यपद्धती सतत बदलत राहते, कधी पुन्हा नीट करून घ्यावी लागते वगैरे वगैरे.

ह्यात नक्की काय करणार आहोत , ह्या बद्दल निवडक उद्यमी बद्दल ह्या पेज वर पाहता येईल 

Friday, 7 August 2026

कंटाळा : थोडे विचारमंथन

कालच एका व्यक्तीसोबत चर्चा सुरु असताना तिने मला सुचविले 

" तुझ्या तोंडात सारखा हा कंटाळा आला हा वाक्प्रचार असतो. तो काढून टाक यार "

इथून ह्या विचार मंथनाची सुरुवात झाली. मग made डॉ आनंद नाडकर्णी ह्यांचे कधीतरी वाचलेले आठवले कि कुठे असतो हा कंटाळा , दाखवा कि जरा ! पण असतो यार. मनासारखेच आहे, हवे सारखेच आहे. दिसत नाही,पण त्याची प्रारूपे मात्र दिसतात. 

तर काहीतरी आवश्यक असलेले करावेसे वाटत नाही हे त्याचे प्रमुख व्यक्त रूप.

आता हे का करावेसे वाटत नाही, हे पाहायला लागलो. उत्तर : उर्जा कमी पडली. का ? तर ती कमी झाली असेल. कदाचित वयोमानाने. पण तरुण मुलांनाही येतोच कि कंटाळा ( हास्य जत्रेत ओंकार चा कंटाळा नामक एपिसोड पहा कधी ). पण ह्याला बऱ्याच अर्थी वाईट च लेखले गेलेले आहे हे मात्र त्रिवार सत्य. 

मला तर माझे Offering नीटपणे अधिक सखोल करायला हा कंटाळा खुप मार्गदर्शक ठरतोय. आणि आता मी त्याला सरावलोय. हे जे काही Passion वगैरे म्हणतात ना, त्याची तपासणी करताना ज्याचा कंटाळा येतो ना, त्या गोष्टी आवर्जून बाजूला करा. उरेल, फक्त आवड. आणि आवडीचं काम करताना सुद्धा कंटाळा येवू शकतोच कि. आपण Burn Out होतो, पैसे अनेक काळ मना जोगते मिळत नाहीत वगैरे. इथेच कधी घोळ होऊ शकतो.

कारण जे लावून धरलेलं असतं त्यातून कधी उगवेल, ठावूक नाही आणि पोट तर भरत नाहीये. अशावेळी Guilt येवू शकतो आणि हेच ते Distraction. कालच एका उद्योजिकेशी  मला Part Time Job हवाय ह्या विषयावर बोलताना तिची अडचण, घालमेल मला समजली. हे असं सारखं पैसे मागत जगायचा कंटाळा आलाय तिला. म्हणजे थोडक्यात अनेक काळ मना जोगते मिळत नाहीत  ह्याचाच ! Job पाहणं हे नक्की distraction. पण तिच्याच क्षेत्रात पाहणं हा उपाय. अजून खोल जावून आपलं निश्चित काम निवडून, ठरवून आयुष्यभर आपल्या जगण्यासोबत कसं Relate करता येईल, हे पाहण्यासाठी हे Distractors येत असतात. Stoic Philosophy मध्ये एक सिद्धांत च आहे :

अडथळे हाच मार्ग 

झाला कंटाळा Channelize. 

Guilt नको.

Monday, 6 July 2026

आशेचा एक लहानसा किरण

मी आता खाली एक इमेज शेअर करतोय. कदाचित तुम्हाला काही समजणार नाही, पण मी समजावून सांगतो, आणि समजावून घ्या. कदाचित तुम्हाला बहुमोल माहिती मिळेल, उपयोग होईल.


ह्यात नमूद केलेल्या आकड्यांचा संदर्भ 


मी ह्यापूर्वी एक लेख दिला होता कि ज्यात मी गुगल सर्च कन्सोल नावाच्या विनामुल्य उपयुक्ततेबद्दल लिहिले होते, ज्याद्वारे मी माझ्या जखमी व्यवसायाबद्दल ( धन्यवाद AI ) बोललो होतो. 

त्यात माझ्या वेबसाईट वरच्या काही ( बहुतेक सर्व ) इमेजेस ह्या नवीन Algorythm नुसार मोबाईल वापरकर्त्या मंडळींना अजिबात योग्य वेळात लोड होत नसल्याने गुगल माझ्या website चा अनुभव Poor म्हणून गणत होते. त्या मी आता Improvement करिता परिश्रम घेतो आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील सदर निकाल आहेत :-

आकड्यांचा अर्थ

  

१. Core Web Vitals : ह्यात फरक पाडणाऱ्या प्रमुख बाबी ( उदा. इमेजेस ) बद्दल बोलले गेले आहे. 
२. ह्यात सध्याची स्थिती दिलेली आहे. २९ हा सध्याचा ( जून 26 ) आकडा आहे. म्हणजे अशा २९ ठिकाणी अजूनही Poor अनुभव येतोय, २१ ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे. एकूण ५० आहेत. 
३. प्रवास Poor कडून Good कडे :- अजूनही Good URL नाहीयेत. परंतु एप्रिल मध्ये काम करायला घेतले तेव्हा सर्व ५० जागा Poor होत्या. लाल रंग Poor , नारिंगी रंग ठीकठाक , तर हिरवा रंग उत्तम दर्शवतो. प्रवास पाहता येईल.

ह्या सगळ्याचा काय उपयोग ?


माझे घसरलेले Ranking सुधारणे. आणि मला पूर्ववत विचारणा सुरु व्हाव्यात. अर्थात हे एका रात्रीत होणारे काम नाहीच. शिवाय हे एकमेव नाही. ह्याच्या जोडीने अनेक गोष्टी कराव्या लागतात, करत राहाव्या लागत आहेत. आणि तरीही आव्हानात्मक आहेच. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शोध घेणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनातच आता फरक पडला आहे.

क्रमशः पुढचा अपडेट पोस्ट करेनच !

Saturday, 21 March 2026

गुगल सर्च कन्सोल : एक दुर्लक्षित उपयुक्तता

काही वर्षे माझी अशी समजूत झाली होती ( आणि ती काही अंशी खरी सुद्धा होती ) , की आता महत्त्व ( फक्त ) व्हिडीयोज ना द्यावे. कारण सुमारे २०१३ पासून माझ्या web वरची माझी खरी मालमत्ता ( म्हणजे माझी website ) तर तयार आहेच; शिवाय ती बऱ्या पैकी पहिल्या पानावरचे स्थान राखून सुद्धा आहेच. 

परिणाम स्वरूप २०१९ नंतर ( जवळ जवळ ७ वर्षे ) मी website साठी काही कंटेंट लिहिला नाही, शिवाय त्याकडे काही लक्ष देखील पुरवले नाही. 

विचार इतकाच : की व्यवसायात काही बदल झालेला नाहीये, की त्याच्या स्वरुपात, पद्धतीत. आणि जे काही विचार मांडायचे आहेत, ते तर Youtube द्वारे सुरूच आहेत की.

गेल्या काही महिन्यांतला बदल 

गेल्या ( खरे तर वर्षभर ) सहा महिन्यांत , आणि जास्त करून जानेवारी पासून एक विचित्र अनुभव येत आहे, की मला ट्रेनिंग करिता येणारी मंडळी अगदी गंभीर रित्या कमी झालेली आहेत. 

प्रत्येक तिमाही ला आढावा घेण्याच्या पद्धतीचा खूप मोठा फायदा 

गेले दोन वर्षे आम्ही प्रत्येक तिमाही ला बसून परिस्थिती चे मूल्यमापन करतो, शिवाय पुढच्या तीन महिन्या मध्ये अगदी काही झाले तरी कार्य पद्धतीत मोठ्ठे बदल करत नाही. उलट सखोल विचार करणे, मूळ तत्वांना धक्का न लावणे ह्या गोष्टी कसोशीने पाळतो. ह्यामुळे "नक्की काय होत असेल" ह्याचा नीट विचार करता आला. नाहीतर उथळ विचारांना बळी पडून मोठे नुकसान होऊ शकते. 


काय आढळले ?

आम्ही विचार करत होतो, तसा बाह्य परिस्थितीचा विशेष फटका बसलेला नाहीये

तर लोकांच्या माहिती शोधण्याच्या पद्धतीत घडून आलेला बदल ह्याचं आहे हा फटका. 
तरुण मुले , तसेच ज्यांना ठावूक आहे अशी सर्व मंडळी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्रास वापर करतात.
जी मंडळी पारंपारिक गुगल सर्च वापरतात, त्यानाही प्रथम कृत्रिम बुधीमत्तेचाच पर्याय दिसतो. 


फरक कसा पडला आहे ?

आता Chat GPT किंवा Gemini मुळे मंडळी व्यक्तिगत प्रश्न विचारतात. 

ही नवी सर्च इंजिने त्यांचे व्यक्तिगत मुद्देसूद, आस्थेने अमर्यादित, उलट सुलट शंका निरसन करतात. ही उत्तरे ही इंजिने इंटरनेट वरूनच शोधतात. ही सर्वात सुयोग्य उत्तरे सर्वात जलद देण्याची कटीबद्धता गुगल अर्थातच राखून आहे. माझ्या पाहण्यात आले, की गेल्या ६ आणि खास करून ३ महिन्यापासून गुगल आता फार जुना ( माझा बराचसा ) आशय दाखवत नाही. आणि दुसरा तितका तुल्यबळ आशय उपलब्ध नसेल, तर दाखवेलही काही काळ ( हेही माझ्या बाबतीत झालंय ). आणि जरी समोर माझ्या वेबसाईट वरील मजकूर दाखवला तरीही काही अशा अटकळी आहेत, की ज्या द्वारे आपल्याला कळू शकते की लोक आपली website उघडूनच पाहत नाहीयेत. 

तर गुगल कडे ही माहिती जात राहते आणि हा क्लिक थ्रू रेशो ( CTR ) सातत्याने कमी कमी होत चालला असेल, तर गुगल किंवा इतर AI इंजिने अनुमान बांधतात, की आता ह्या links लोकांना देत राहण्यात अर्थ नाही.

हे कसं दुरुस्त करायचं  ?

मी इथे जेमिनी च्या मदतीनेच हे केले. म्हणजे "काय करू" ची अगदी Step By Step मदत घेत आहे. तर आधी काय होतंय हे पहायचं : ते गुगल सर्च कन्सोल च्या मदतीने. हे एक अतिशय कमी ठावूक असलेलं अत्यंत उपयुक्त , विनामुंय असं हत्यार आहे. ज्याद्वारे आपल्या Website वर काय सुरु आहे हे समजते. खूप सखोल शोधा अंती मला अनेक गोष्टींसोबत एक प्रमुख गोष्ट सापडली, ती म्हणजे माझी पेजेस महिनोंमहिने mobile वर झटपट लोड होत नाहीयेत. त्यामुळे बघा काय फरक पडलाय :-👇

२०२५ वि. २०२६

इम्प्रेशन मध्ये किंचित वाढच आहे, परंतु क्लिक्स मध्ये मात्र लक्षणीय घट आहे, आणि ती वाढतच चालली आहे ( होती ). आता ह्यावर काम सुरु केलेले आहे. आणि थोडी थोडी परिस्थिती सुधारत चाललेली आहे.