बिझनेस ग्रुप्स मध्येही आकडे खूपच प्रिय असतात आणि खरेच आहे की आकडे आपल्याला सत्य दर्शन करवितात. हे कोणते आकडे ह्यात सर्व इंगित लपलेले आहे. बऱ्याच ठिकाणी मेंबर्स कडून अमुक एक काम करून घेणे ह्यावर फारच भर दिला जातो. म्हणजे कसे, की एखादा खास कार्यक्रम असतो आणि त्याकरिता अमुक एक संख्या ठरविलेली असते. तरच ते गणित परवडणारे वगैरे असते. तर अशी कल्पना करूयात की संस्थेच्या अंतर्गत अनेक ग्रुप आहेत आणि त्यांचे त्यांचे सदस्य. एक ग्रुप प्रमुखांची टीम असते.त्यांना एक टास्क दिले जाते आणि ते हासिल केल्यावर त्या प्रमुख मंडळींचा दबदबा वाढणार असतो.
(टीप: ह्याचा प्रत्यक्ष बिझनेस शी कितपत संबंध असतो हे सांगणे कठीणच.)
तर ही मंडळी ह्याच्या इतके मागे लागतात की मूळ उद्देश कुठच्या कुठे लांब फेकला जातो. नुकताच आमच्या अशाच एका ग्रुप प्रमुखाने हे नोंदणी सत्र राबविताना ग्रुप चक्क लॉक करून टाकला. आणि हे “पवित्र” काम करून घेतले. म्हणजे जी मंडळी करत नाहीयेत त्यांचे प्रश्न जाणून घ्यायच्या ऐवजी नसेल तर गेला उडत अशीच भूमिका झाली ना. शिवाय माझ्या सारख्या जुन्या लाकडाची काय असणार किंमत !
एक समांतर उदाहरण बघूया म्हणजे समजेल…..
एका रक्तदान शिबिराला आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून रक्तदान उत्सुकांना त्यांची माहिती भरून द्यायला मदत करत होते. त्यांनतर हे फॉर्म घेवून रक्तदाते पुढे जात होते जेथे रक्त संकलन करणाऱ्या संस्थेचे अधिकारी पुढील काम करत होते.
माझी पाळी आल्यावर समजले, की संस्थेच्या अधिकारी असलेल्या व्यक्ती हाच आधी भरलेला फॉर्म जवळपास पुन्हा एकदा भरून घेत होत्या. अर्थात हे डुप्लिकेशन का असा प्रश्न मी विचारता त्यांचे उत्तर खूप मार्गदर्शक होते :
“ विद्यार्थ्यांचा कल फॉर्म भरून देण्याकडे असतो. मात्र ह्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देताना व्यक्तीने थांबून, विचार करून उत्तर देण्याची आवश्यकता असते. चुकीच्या प्राकृतिक स्थितीतील रक्त स्वीकारणे हे धोकादायक असते. त्यामुळे त्यांनी स्वतःहून विचार करूनच फॉर्म भरणे गरजेचे आहे”
हेच तत्त्व आपण बिझनेस क्लब ला लागू केले तर प्रत्येक मेंबर स्वयंप्रेरित होवून सहभाग देईल. अधिक अर्थपूर्ण सहभाग राहील, नुसते आकडे नाही राहणार.
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.