Showing posts with label अर्थ साक्षरता आणि गुंतवणूक : कळतंय पण वळत नाही. Show all posts
Showing posts with label अर्थ साक्षरता आणि गुंतवणूक : कळतंय पण वळत नाही. Show all posts

Sunday, 13 June 2021

भाग १० - Asset & Liability अर्थात मालमत्ता आणि उत्तरदायित्व

मागील भागातील ठळक वैशिष्ट्ये : Baises चे काही प्रकार आणि त्याची उदाहरणे आपण पहिली                         ========================================================================

'रिच डॅड पूअर डॅड' ह्या प्रसिद्ध पुस्तकात लेखक रॉबर्ट कियोसाकी ह्यांनी 'मालमत्ता आणि उत्तरदायित्व' ह्याची फार सोपी व्याख्या करून ठेवली आहे.

कुठल्याही कारणास्तव पैसे आपल्या खिशात आले किंवा येत असतील तर त्याला मालमत्ता (Asset) म्हणायचं आणि पैसे खिशातून गेले किंवा जात असतील तर ते झाले आपले उत्तरदायित्व (Liability)

शेअर्स, बॉण्ड्स, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक,एखादी कर्जमुक्त अशी स्थावर-जंगम मालमत्ता, तुमच्या मेंदूअपत्याचे पुस्तक, ब्लॉग इत्यादी स्वरूपातील कॉपीराईट, पेटंट्स इत्यादींमुळे तुमच्या खिशात पैसे येतात त्यामुळे ह्या सगळ्यांना मालमत्ता (Asset) म्हणता येईल.

उत्तरदायित्व म्हणजे जेव्हा आपण कुणाचंही देणं लागतो - उदाहरणार्थ कर्ज काढून घेतलेलं घर, गाडी किंवा इतर तत्सम वस्तू

वरील मुद्यावर बऱ्याच जणांना आक्षेप असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच मी ह्या विषयावर आजची पोस्ट लिहितोय

उदा: कर्ज काढून घेतलेलं घर - 

जोपर्यंत ठरलेल्या कालावधीत आपण कर्ज फेडत नाही तोपर्यंत ते घर बँकेच्या मालकीचं असतं. आपल्यासारखा 'रिटेल' ग्राहक सलग तीन ते पाच मासिक हप्ते भरू न शकल्यास तुमच्या घराला टाळं ठोकण्याचा बँकेला अधिकार असतो

ह्याचाच अर्थ कर्ज काढून घेतलेलं घर हे बँकेसाठी मालमत्ता - Asset (कारण त्याद्वारे बँकेला व्याजरूपी उत्पन्न मिळणार असतं) आणि तुमच्यासाठी मात्र उत्तरदायित्व Liability (मासिक हप्ता भरण्याचं) असतं. संपूर्ण कर्ज फेडल्यावरंच घराची 'मालकी' तुमच्याकडे हस्तांतरीत केली जाते

काही वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर एक जाहीरात दाखवली जायची - गृहकर्ज देऊ करणाऱ्या कंपनीच्या या जाहिरातीतील जोडपं आपल्या मित्र मंडळींना सांगतं - ह्या कंपनीने माफक दरात कर्ज दिल्यामूळे 'हम किरायेदार से मकानमालिक बन गये' - ह्या भावनिक सादाला बळी पडलेल्यांची संख्या कमी नाही.

निष्कर्ष - कर्ज काढून घर घेणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न फक्त त्याला मालमत्ता (Asset) म्हणण्याची गल्लत करू नका 😊

======================================================================

पुढील भागात - गृहकर्ज, व्याजरूपी रक्कम आणि ती वाचवण्याचे काही उपाय

धन्यवाद 🙏 Happy Investing 💐

Sunday, 6 June 2021

भाग ९ - Mental Heuristics and Biases - part III

मागील पोस्टमध्ये आपण 'Biases' चे काही प्रकार आणि त्याची उदाहरणे पहिली , आज अजून काही उदाहरणे पाहू 

=========================================================================

 6. The Endowment Effect - ह्या पूर्वग्रहदोष प्रकारात एखादी विशिष्ठ वस्तू इतरांपेक्षा आपल्या मालकीची असतांना त्याचे वस्तुनिष्ठ मूल्य अधिक मानले जाते. सारख्याच मूल्याची वस्तू आपल्याला मिळण्याच्या आनंदापेक्षा ती गमावण्याचं दुख दुपटीने अधिक वाटत. त्या वस्तूच्या मोहापोटी आपण ती राखण्यासाठी अधिकची किंमत मोजायलाही तयार असतो 

उदा: एकदा एका व्यक्तीसमुहाला 'विक्रेते' आणि 'खरेदीदार' असं समसमान विभागून विक्रेत्यांना आकर्षक 'कॉफी मग' भेट दिले गेले. पुढे विक्रेत्यांना ते मग किती किंमतीत विकणार? आणि खरेदीदारांना ते मग किती किंमतीत खरेदी करणार असं विचारलं गेलं ?

निष्कर्ष - विक्रेत्यांनी 'कॉफी मग'ची किंमत खरेदीदारांपेक्षा लक्षणीयरित्या अधिकची लावली होती 

7. Herd Mentality - कळपातलं एक मेंढरू एका दिशेन गेलं कि बाकी सगळे त्याच दिशेने त्याच्या मागे जातात. हि एक अशी प्रवृत्ती आहे जेथे एखाद्याच्या कृतीची (तर्कसंगत किवा तर्कविसंगत ) हुबेहूब नक्कल केली जाते  

उदा: 1) भांडवली बाजारात एखाद्या कंपनीच्या समभागांना अचानक उसळी येणे किंवा सपाटून मार खाणे 

2. सामाजमाध्यमावर एखादा हॅशटॅग अल्पावधीतच प्रसिद्ध होणे 

8. Mental Accounting Error -  अशी प्रवृत्ती ज्यात पैशाचा स्त्रोत किंवा वापरण्याचा उद्देश ह्या अनुषंगाने त्याची  वेगवेगळ्या मानसिक खात्यात विभागणी केली जाते

 उदा: 1) क्रेडीट कार्डवरील कर्ज वाढवून सुट्टीत पर्यटनस्थळी जाण्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवले जातात. कर्जाची परतफेड करतांना व्याज भरावं लागत असल्यामुळे एकूण संपत्ती कमी होते ह्याकडे दुर्लक्ष होत

2. मुलांसाठी पाच हजार रुपयांची सायकल विकत घेताना पाचशे रुपायची सवलत मिळते का ते पाहण्यासाठी आपण ४ दुकान हिंडतो पण पंचवीस हजार रुपयाच्या मोबाईल खरेदीवर पाचशे रुपायची सवलत मिळत असल्यास आपण चार ठिकाणी चौकशी करायला कंटाळा करतो 

9. Sunk Cost Fallacy - हि एक अशी प्रवृत्ती आहे जिथे वेळ आणि पैसा खर्ची पडल्यामुळे, अपेक्षापूर्ती होत नसताना देखील तर्कविसंगतपणे आपल्या कृतीचा पाठपुरावा करत राहणे 

साधारण तर्क असा कि ,

'' ह्या व्यक्तीने  '' नावाच्या प्रोजेक्टमध्ये गुतंवणूक केलीयेय

आता '' हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी '' ह्या अधिकच्या गुतंवणूकीची गरज आहे अन्यथा '' चं नुकसान होईल त्यामुळे '' ला अधिकची गुंतवणूक न्याय्य वाटते 

उदा: 1. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहताना तो आवडत नसतानाही शेवटपर्यंत पाहणे 

2. उपहारगृहात खाताना पोट भरल्यानंतरही सगळ अन्न संपवण्याचा प्रयत्न करणे 

10. Russian Roulette - 

हा एक प्रकारचा खेळ आहे. ह्यात बंदुकीच्या सहा चेंबर पैकी फक्त एकात गोळी असते आणि ते चेंबर न बघता फिरवून नंतर स्वतःच्या डोक्यावरच निशाणा साधायचा असतो.

ह्यातील परिणामांच्या शक्यतांचा गणिती भाग असा की,

गोळी तुम्हांला 'न' लागण्याची शक्यता ही 5 भागीले 6 अर्थात 5/6 = 83% टक्के असते आणि,

गोळी तुम्हांला लागण्याची शक्यता ही 1 भागीले 6 अर्थात 1/6 = 17% टक्के

म्हणजे वाचण्याची शक्यता नक्कीच फार जास्त पण दुसरी शक्यता खरी ठरली तर? म्हणजे गोळी तुम्हांला लागली तर? तूम्ही निष्क्रिय व्हाल किंवा वेगळ्या भाषेत सांगायचे तर ह्या जगातलं तुमचं अस्तित्व संपलेलं असेल.

मेंदूला सारासार विचार करण्याची सवय नसते असे तज्ञ म्हणतात आणि रशियन रूलेट् हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण.

=======================================================================

पुढील भागात - Asset and Liabilities (थोडक्यात मालमत्ता आणि कर्ज)

धन्यवाद 🙏, Happy Investing 💐

Saturday, 29 May 2021

भाग ८ - Mental Heuristics and Biases - part II

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये - 

1. Mental Heuristics म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे आपण पहिली 

2. Biases - (पूर्वग्रह) ची व्याख्यादेखील अभ्यासली, आजच्या भागात आपण विविध 'पूर्वग्रह' उदाहरणासकट पाहणार आहोत, 'पूर्वग्रह' बरेच असतात, आपण विशिष्ठ असे 10 पूर्वग्रह 2 भागात विभागून अभ्यासूया.

वि.सू. - Mental Heuristics and Biases हे आपल्या निर्णयक्षमतेशी निगडीत विषय आहेत. गुतंवणूक ही सोपी प्रक्रिया आहे पण चुकीच्या निर्णयांमुळे संपत्तीनिर्मितीत अडथळे निर्माण होतात आणि गुंतवणुकीच्या परीप्रेष्यातूंनच आपण त्याकडे पाहणार आहोत ======================================================================

👉 The Confirmation Bias - हा एक असा पूर्वग्रहदोष आहे जेथे आपल्या विध्यमान विचारधारेला बळकट करणारी माहिती ऐकण्याकडेच आपली प्रवृत्ती असते. ह्या पूर्वाग्रहाद्वारे आपले विचार आणि श्रद्धा प्रबलित होणाऱ्या माहीतीला अनुकूलता दर्शवण्याकडेच आपला कल असतो

उदा: 1.समाजमाध्यमांवर आपली विचारधारा शेअर करणाऱ्यांनाच आपण फॉलो करतो

2. वेगळा किंवा विरुद्ध विचार मांडणाऱ्यांचे किमान ऐकून  घेण्यास देखील आपण अनूत्सूक असतो

👉 The Hindsight Bias - हा पूर्वग्रहदोष प्रकार म्हणजे अनियमित आणि कुठल्याही हेतुपुरस्सर न घडलेल्या गोष्टींचादेखील अचूक अंदाज बांधता येतो असा दावा करणे. ह्याला 'मला हे कायमच माहीत होतं' असं मानण्याचा अतर्क्यवाद म्हणूनही संबोधलं जातं

उदा: 1. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर अमुक एक उमेदवार जिंकणार हे मला आधीपासूनच माहीत होतं असं वक्तव्य करणं

2.कुठल्या कंपनीच्या समभागातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल हे आपण आधीच सांगू शकलो असतो असा दावा करण

👉 The Anchoring Bias - ह्या पूर्वग्रहदोष प्रवृत्तीत आपल्या कानावर पडणाऱ्या पहिल्या माहितीने किंवा महितीसंचाने आपण वाजवीपेक्षा अधिक प्रभावित होतो आणि आपल्या पुढील निर्णयप्रक्रियेत त्याला संदर्भ बिंदू मानून चालतो

उदा: 1.वाटाघाटीच्या सुरुवातीला ज्या आकड्याने सुरुवात होईल तो संदर्भ मानूनच पुढील वाटाघाटी पार पडतात 

2.एखादा शर्ट विकत घेताना पहिला नजरेस पडणाऱ्या शर्टाची किंमत रु.2000/- , दुसऱ्याची रु.1000/- आणि तिसऱ्याची रु.800/- असल्यास आपल्याला तिसरा शर्ट दर्जाहीन वाटतो

👉 The Halo Effect- हा पूर्वग्रहदोष प्रकार म्हणजे एखाद्या व्यक्ती, कंपनी, ब्रँडच्या एखादयाच गुणवैशिष्ट्यानुसार त्याच्या एकूणच व्यक्तित्वाबद्दल मत बनविणे

उदा: 1.देखणी व्यक्ती ही उच्च नैतिकता जपणारी, दयाळू आणि हुशार देखील असते असा सहसा समज करून घेतला जातो

2.आकर्षक व्यक्तीने विपणन केलेली उत्पादने दर्जेदार असतात असा समज करून घेणे 

👉 The Recency Bias- हा पूर्वग्रहदोष प्रकार म्हणजे नजीकच्या कालावधीत घडलेल्या घटनांना, काही वर्षांपूर्वी किंवा इतिहासात घडलेल्या घटनांपेक्षा अधिक महत्व किंवा त्यावर अधिक भर दिला जातो

उदा: 1.तुम्ही पाहिलेल्या 20 चित्रपटांची नावे सांगा असं विचारल्यास, 5 - 7 वर्षापूर्वी पाहिलेल्या चित्रपटांपेक्षा गेल्या 1 - 2 वर्षात पाहिलेल्या चित्रपटांची नावं चटकन आठवतील

2. गेल्या 5 वर्षातील गुंतवणुकीच्या परताव्याचा सरासरी दर उत्तम असूनदेखील फक्त मागील वर्षभरात काही दखलपात्र अनुकूल बदल न झाल्यामुळे संपूर्ण गुंतवणूक काढून घ्यावंसं वाटणे

=====================================================================

पुढील भागात - अजून काही Biases बद्दल पाहू , Part III

धन्यवाद 🙏, Happy Investing 💐

Saturday, 22 May 2021

भाग ७ - Mental Heuristics and Biases - Part I

मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये : 

Power of Compounding चं तत्व समजणं आणि मान्य करणं हे व्यवहारज्ञान सोपं आहे पण निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणं सहजसाध्य नाही. म्हणूनच फार कमी गुंतवणूकदार संपत्तीनिर्मितीत यशस्वी झाल्याचं दिसतं

ह्या निर्णयक्षमतेतील गोंधळ आणि त्यामागील कारणे हेच आजच्या भागात आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी पुन्हा एकदा वाचकांना नमूद करू इच्छितो, मागील आठवड्यातील, Delayed Gratification आणि आजचा Mental Heuristics and Biases ह्या विषयांची संपूर्ण व्याख्या मानसशास्त्राच्या अभ्यासातूनच होऊ शकते. Power of compounding च्या संकल्पनेद्वारे संपत्तिनिर्मिती साधतांना आपल्या सदोष निर्णयक्षमतेमुळे त्यात अडथळे निर्माण होतात आणि म्हणूनच मी ह्या विषयांची किमान तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे

========================================================================

'Mental Heuristics and Biases' -

आपला मेंदू दिवसभरात प्रचंड माहितीसाठ्याची नोंद घेत असतो, परंतु आपल्या मेंदूचा जागरूक भाग एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत असल्यामुळे बऱ्याच वेळेला पटकन निर्णय घेताना शॉर्ट कट मारले जातात. एखाद्या समस्येवर उपाय शोधताना आपला मेंदू असा वागतो खरा आणि ह्या नकळतपणे मारल्या जाणाऱ्या शॉर्टकट्सना 'Heuristics' असं म्हणतात.

ह्या Heuristics मूळे दैनंदिन जीवनात कार्यक्षमतेने निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते पण ती 'पुरावासिद्ध' (Full Proof) प्रक्रिया नाही, त्यात बऱ्याच वेळेला तर्कविसंगत त्रुटी राहतात आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपल्या मेंदूत एखाद्या विषयाच्या आकलना विषयी पूर्वग्रह/दु:षाग्रह तयार होतात ज्याला Cognitive Biases असं म्हणतात

वेळेचं बंधन, एखादया समस्येचा जटिलपणा किंवा संदिग्धता ह्याचा आपल्या निर्णयक्षमतेवर प्रभाव असतो. मानवी मेंदू ह्या शॉर्ट कटस् (Heuristics) वर अवलंबून असण्याचे, मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले काही सिद्धांत आपण खाली पाहूया

1.पर्यायी संबंध लावणे - जटिल आणि अवघड प्रश्नाला सोप्या आणि मिळत्या जुळत्या प्रष्णांशी सांगड घालून चट्कन निर्णयाप्रत येणे

2.प्रयत्न कपात - उपलब्ध पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडतांना प्रत्येकाचे फायदे-तोटे तोलूनमापून घेण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या बौद्धिक कष्टाचा संज्ञानात्मक आळस (Cognitive Laziness) असल्यामुळे आपण हे शॉर्टकटस् मारत असतो

3.जलद आणि काटकसर - बऱ्याच संदर्भांमध्ये काटकसरीने आणि जलद निर्णय घेतानाही मानवी मेंदू ह्या शॉर्ट कटस्चा वापर करतो

Mental Heuristics (शॉर्ट कट्स) चे काही मर्यादित प्रकार खाली पाहूया,

1.Availability Heuristics - (उपलब्धता शॉर्ट कट) - एखादी गोष्ट चुटकी सरशी आठवल्या जाण्याच्या क्षमतेचा ह्या निर्णयप्रकारात अंतर्भाव होतो.निर्णय घेताना एखाद्या गोष्टीशी साधर्म्य सांगणारी काही उदाहरणे आपल्याला चटकन आठवतात.अशी उदाहरणं आपल्या स्मरणशक्तीत सहज उपलब्ध असल्यामुळे त्याच्या परिणामस्वरूप म्हणून घडलेल्या गोष्टीं सार्वजनिक आयुष्यात वारंवार घडतात अशीच आपली समजूत होऊन जाते

उदा: तुम्ही विमानाने कुठे जाणार असाल आणि अचानक तुम्हांला नजीकच्या काळात घडलेले विमानअपघात आठवले की तुम्ही विमानप्रवासा टाळून आगगाडीने जाण्याचा निर्णय घेता, विमानअपघाता बद्दलचे विचार सहज तुमच्या स्मरणशक्तीत उपलब्ध असल्यामुळे वास्तवापेक्षा विमान अपघात वारंवार घडतात असं तुमचा मेंदू मानू लागतो

2. Representativeness - (प्रातिनिधिक/निदर्शक) - ह्या निर्णयप्रकारात वर्तमानात घडणारा एखादा प्रसंग किंवा घटना ह्याची मेंदूतील एखाद्या प्रातिनिधिक मानसिक नमुन्या बरोबर तुलना केली जाते.एखाद्या व्यक्तीची विश्वासार्हता ठरविताना तुम्ही त्याच्या पैलूंविषयी नकळतपणे तुमच्या मनातल्या ठराविक मानसिक नमुन्या बरोबर तुलना करून पाहता

उदा: एखाद्या कनवाळू वृद्ध महिलेला पाहिल्यावर तुम्हांला तुमच्या आजीची आठवण येते आणि चट्कन ती महिला तुम्हांला दयाळू, सौम्य आणि विश्वासार्ह वाटू लागते

3.Affect - परिणाम - ह्या शॉर्टकट प्रकारात सध्याच्या घडीला (चालू वर्तमानात) तुमच्या भावनांवर कुठल्या गोष्टींचा प्रभाव आहे त्याअनुषंगाने निर्णय घेतले जातात 

उदा: संशोधनाने हे दाखवून देण्यात आलं आहे की तुम्ही सकारात्मक मूडमध्ये असताना जेव्हा निर्णय घेता तेव्हा जोखीम कमी आणि फायदे अधिक असंच चित्र दिसतं पण विरुद्धार्थाने जेव्हा तुम्ही नकारात्मक भावनेच्या प्रभावाखाली असता तेव्हा फायद्यांऐवजी एखाद्या निर्णयाच्या संभाव्य जोखमींकडे आणि वाईट परिणामांकडेच लक्ष केंद्रित केलं जातं

======================================================================

पुढील भागात : ह्याच विषयातील 'Biases' - (पूर्वग्रहदूषित) बद्दल तपशिलात जाणून घेऊ 

धन्यवाद 🙏, 

Happy Investing💐

Saturday, 15 May 2021

भाग 6 - 'The Marshmallow Test' - Delayed Gratification'


मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये :- 

1.चक्रवाढ व्याजाची ताकत (Power of Compounding) आणि त्याच्या समीकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे वेळ - आणि त्याची काही उदाहरणे आपण पहिली. 

2.Power of compounding चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असल्यास दीर्घकाळ गुंतवणूक करणे आणि त्यासाठी शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे इतकं ते सोपं आहे
=========================================================================
सोपं आहे 🤔? 
पण मग हा फॉर्म्युला यशस्वी करून दाखवणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या इतकी कमी कशी काय?

आकडेमोड तर पटण्यासारखी आहे आणि फार काही रॉकेट सायन्सही नाही त्यात मग नक्की कठीण किंवा असाध्य असं काय आहे? 

वॉरन बफेट म्हणालेयत - 'Investing is simple however not easy'

म्हणजे गुंतवणूक ही तशी सोपी प्रक्रिया आहे पण सहजसाध्य नाही - का ? त्याचं उत्तर आहे ,

'Delayed Gratification'
अर्थात, 'उस्फुर्त कृतीमूळे ताबडतोब मिळणारी बक्षिसी टाळण्याचं मानसिक कसब' (ह्यापेक्षा कमी शब्दात योग्य अर्थ पोहोचवण्याचं कसब मी ही अजून शिकतोय - त्याबद्दल क्षमस्व 😔) - 

एक व्हिडिओ पोस्टमध्ये जोडला आहे तो पहा

म्हणजे काही गोष्टींना निसर्गतःच वेळ लागतो. आज पेरलं आणि उद्या उगवलं असं सहसा होत नाही. काही जटील प्रश्नांची चटकन उत्तरे शोधण्याच्या आपल्या सवयीमुळे बऱ्याच वेळेला 'शॉर्ट कट' मारले जातात. म्हणजे थोड्या वेळ थांबल्यास अजून एक मार्शमेलो मिळणार हे आगाऊ माहीत असून सुद्धा मुलांना तो मोह आवरत नाही. बऱ्याच अंशी प्रौढांच्या बाबतीतही हे सत्य आहे. इथे आपल्या भावना आपल्या मेंदूवर मात करतात आणि बहुतांशी ही एक सवय आपलं आयुष्य किंवा एकंदरीतच आपलं जगणं नियंत्रित करत असते.

Delayed Gratification  हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे 'अर्थसाक्षरता आणि गुंतवणूक' ह्या आपल्या ब्लॉग च्या मूळ विषयाच्या चौकटीतच राहूनच मी भाष्य करतो. 

इथे वॉरन बफेट ह्यांचं अजून एक वाक्य मी उद्धृत करतो

'In short term stock markets are voting machines however in long term they are weighing machine' - अर्थात अल्प कालावधीचा विचार करता भांडवली बाजारातील चढउतार हे भावनांच्या कल्लोळामुळे होत असतात. त्याआधारे एखाद्या कंपनीत किंवा व्यवसायात केलेली गुंतवणूक योग्य किंवा अयोग्य ठरविता येत नाही. भांडवली बाजार हा पुढे किंवा वर जाण्यासाठीच जन्माला आलाय हे तत्व मान्य केल्यास योग्य व्यवसायात केलेली गुंतवणूक दीर्घकालावधीत संपत्तीनिर्मिती साध्य करते.

मागील एका पोस्टमध्ये मी महिनाभर दरदिवशी दुप्पट रक्कम देण्याचं एक काल्पनिक उदाहरण दिलं होतं. दररोज दुप्पट परतावा देणारं कुठलंही उत्पादन ह्या जगात अस्तित्वात नाही. त्या उदाहरणातील 30 दिवस म्हणजे प्रत्यक्षात 30 वर्षे समजावी

गुंतवणूक हा बराचसा 'पॅसिव्ह' असा विषय आहे. इथे सामान्य व्यवहाराज्ञानाबरोबरच भावनांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. रोज बाजाराकडे लक्ष देत राहिल्यास काही तरी कृती करण्याचा मोह होतो, दोन - पाच टक्के आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढल्यास नफ्यासकट मूळ मुद्दल काढून घेण्याचा मोह होतो आणि हीच ती ताबडतोब मिळणारी 'बक्षिसी' आपल्याला प्रचंड अशा संपत्तीनिर्मिती पासून दूर ठेवते 

Power of Compounding चं तत्व समजणं आणि मान्य करणं हे व्यवहारज्ञान सोपं आहे पण निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणं सहजसाध्य नाही. म्हणूनच फार कमी गुंतवणूकदार संपत्तीनिर्मितीत यशस्वी झाल्याचं दिसतं

पण तज्ज्ञांच्या मते सरावाने बऱ्याच अंशी भावनांवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.

Delayed Gratification is an important personality trait

पुढील भागात - "Mental Heuristics and Biases"

धन्यवाद 🙏 Happy Investing 💐

Saturday, 8 May 2021

भाग ५ - "Magic of Compounding"- Part II

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये 

1.नगण्य भासणारी व्याजरूपी रक्कम दिर्घकालावधीसाठी मूळ रक्कमेत भर घालून मुद्दल वाढवत नेल्यास प्रचंड संपत्तीनिर्मिती साधता येते

2. त्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे शिस्त आणि आयुष्यात शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे जेणेकरून Compounding साठी आपल्याला जास्तीत जास्त कालावधी मिळेल

=============================================================

खालील समीकरण तुमचं आयुष्य बदलू शकतं,

 F = P (1 + R)^t  

ज्यात,

F - म्हणजे भविष्यातील रक्कम,

P - म्हणजे आजची रक्कम

R - म्हणजे सरासरी व्याज दर

T - गुंतवणूक कालावधी

वरील समीकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक कोणता? विचार करा 🤔

खालील काही उदाहरणे पाहू,

1.एकरक्कमी 100 रुपयांचे , 20 टक्के सरासरी व्याजदाराने 50 वर्षांनी 8 लाख रुपये होतात

2.दरमहा 5000 रुपये, 20 टक्के सरासरी व्याज दराने 30 वर्षासाठी गुंतवल्यास, तूम्ही गुंतवलेली एकूण रक्कम असते 18 लाख रुपये पण तिसाव्या वर्षअखेर तुम्हांला मिळणारी रक्कम असते जवळपास 11 कोटी 60 लाख

3.एकाच वयाचे 2 मित्र अमर आणि प्रेम - 

अमर वयाच्या अठराव्या वर्षी प्रतिवर्षी 2000/- रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात करून पंचवीसाव्या वर्षी थांबतो. 

प्रेम मात्र खुशाल चेंडू वयाच्या पंचविसाव्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करून प्रतिवर्षी रु.2000 प्रमाणे वयाच्या पासष्ठ वर्षे वयापर्यंत गुंतवणूक करतो. 

18 ते 25 ह्या सात वर्षात अमरने एकूण 14 हजार रु.गुंतवलेले असतात तर 25 ते 65 ह्या चाळीस वर्षात प्रेम एकूण 80 हजार रुपये गुंतवतो.

वयाच्या 65 व्या वर्षी प्रेम कढील एकूण रक्कम होते 1 कोटी 40 लाख आणि अमर कढील एकूण रक्कम होते 

3 कोटी 70 लाख.

ह्याचाच अर्थ मी किती रुपयांनी सुरुवात करू? दरमहा मी किती रुपये गुंतवले पाहिजेत? किती वर्षे गुंतवले पाहिजेत? अमुक एका गुंतवणुक प्रकारात मला किती व्याजदर मिळेल ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आणि तुमच्या - माझ्या नियंत्रणा बाहेरच्या आहेत.......

सगळ्याच्या मुळाशी एकच - गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त तितकी जास्त संपत्ती निर्मिती साधता येते आणि त्यासाठी आयुष्यात लवकरात लवकर सुरुवात करणे महत्वाचे.

ही पोस्ट वाचून तुम्हांला ह्याचं महत्व पटलं असेल आणि कदाचित असं वाटत असेल कि आता तेवढा वेळ उरला नाही हातात तर निदान तुमच्या मुलांच्या नावे तरी आतापासून गुंतवणूक सुरू करा. 

"There is never a wrong time to to do the right thing" 😀

अजून एक गंमत सांगतो,

समजा माझ्याकडे रु.50 लाख आहेत गुंतवणूक करायला, माझं आजचं वय वर्ष 40 आणि माझा मागच्या दहा वर्षातील परताव्याचा दर आहे साधारण 18 ते 19 टक्के. म्हणजे 'Rule of 72' च्या हिशोबाने मी साधारण दर चार वर्षांनी माझी संपत्ती दुप्पट करतोय तर पुढील काही वर्षातील आकडेवारी साधारण खालीलप्रमाणे असेल👇,

40 व्या वर्षी - 50 लाख

44 व्या वर्षी - 1 कोटी

48 व्या वर्षी - 2 कोटी

52 व्या वर्षी - 4 कोटी

56 व्या वर्षी - 8 कोटी

60 व्या वर्षी - 16 कोटी

64 व्या वर्षी - 32 कोटी

68 व्या वर्षी - 64 कोटी आणि चुकून माकून अजून 4 वर्ष जगलो तर,

72 व्या वर्षी - 128 कोटी 

ह्याचाच 50 लाखाचे 64 कोटी करायला 28 वर्षे लागली (वय वर्ष 40 ते 68), पण त्यानंतरचे 64 कोटी त्यापुढील चारंच वर्षात वाढणार आहेत आणि हे सगळ आडवी काठी उभी न करता 😁

That's nothing but Power/Magic of compounding  

आता कळला का Compounding च्या समिकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक?

F = P (1 + R)^T 

पुढील भागात ,"The Marshmallow Test"

धन्यवाद 🙏 - Happy Investing 💐

Saturday, 1 May 2021

भाग 4 - 'Magic of Compounding' - Part I

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये

1.'Rule of 72' - परताव्याच्या व्याजाचा दर माहीत असल्यास मूळ रक्कम दुप्पट होण्यास किती कालावधी लागेल ह्याचा बऱ्यापैकी अचूक अंदाज बांधता येतो

2.काही म्युच्युअल फंडांनी गेल्या जवळपास 30 वर्षात 12 ते 15 टक्के परतावा दिलेला आहे

3.त्यामुळे भारतीयांच्या सरासरी आयुर्मानाच्या हिशोबाने (76 वर्षे), आपण साधारण किती संपत्ती निर्माण करू शकतो ह्याचाही अंदाज बांधता येऊ शकतो
===================================================================

खालील काल्पनिक 2 पर्यायांपैकी  तुम्ही कुठला निवडाल,

 पर्याय पहिला- आजपासून पुढील 30 दिवस मी तुम्हांला दररोज एक लाख रुपये देणार 😱 😋

 पर्याय दुसरा - पहिल्या दिवशी 10 पैशांपासून सुरुवात करून प्रत्येक पुढल्या दिवशी आदल्या दिवसापेक्षा दुप्पट रक्कम देत जाईन आणि हे ही सत्र 30 दिवस चालेल, तर तुम्ही कुठला पर्याय निवडाल 🤔

केलात विचात ? 🙂 असो,

पहिल्या पर्यायाचं उत्तर सोपं आहे - 30 लाख

दुसऱ्या पर्यायाचं?- 53687091 म्हणजे किती 👇 

पाच कोटी छत्तीस लाख सत्याऐंशी हजार एक्क्यांणव रुपये

हो तुम्ही बरोबर ऐकलंत - कसं? करून बघा कॅलक्युलेटर वर

आता वर जी सांगितली ती झाली आकडेमोड पण हे होतं कसं आणि त्यासाठी आवश्यक काय?
 

चक्रवाढ व्याज - अर्थात मूळ रक्कमेवर मिळालेलं व्याज काढून न घेता पुन्हा मूळ रक्कमेत भर घालून भांडवल वाढवत नेण्याची प्रक्रिया खंड पडू न देता अव्याहतपणे चालू ठेवणे

वरील उदाहरणातील एक गंमत दाखवू 👇

पहिल्या दिवशी - 10 पैसे
दहाव्या दिवशी - 51.20 रु.
विसाव्या दिवशी - 52428.80 रु.
तिसाव्या दिवशी - 53687091.20रु
 

However whats the actual magic of compounding in above equation ? 👇

They say, 'Small unnoticeable changes done over a long period of time, makes humongous difference' 😊

अर्थात,नगण्य भासणारी व्याजरूपी रक्कम दिर्घकालावधीसाठी मूळ रक्कमेत भर घालून वाढवत नेल्यास प्रचंड संपत्तीनिर्मिती साधता येते

त्यासाठी आवश्यक काय ?

1.अभिनव व्यवसाय कल्पना - नाही
2.बुध्यांक - 150 च्या आसपास - नाही
3.तंत्रशिक्षण, व्यवस्थापनातील पदवी - नाही
4.White hat junior वर कोडिंग शिकून ऍप तयार करणे - अजिबातच नाही

आवश्यक आहे ती फक्त - 'शिस्त' आणि आयुष्यात शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात करणे जेणेकरून Compounding साठी आपल्याला जास्तीत जास्त कालावधी मिळेल.

 पुढील भागात - काही उदाहरणांनी वरील संकल्पना तपशिलात समजून घेऊ

धन्यवाद 🙏 - Happy Investing 💐

Saturday, 24 April 2021

भाग ३ - ''Rule of 72"

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये :-

1.किमान जोखीम ही जगतांना प्रत्येक क्षणी असते - 'गुंतवणूक' त्याला अपवाद नाही

2.(Inflation) - म्हणजे काय हेच मुदलात न समजल्यामुळे (आणि समजावून घेण्याचा किमान प्रयत्नही न केल्यामुळे) भारतीय मंडळी FD करण्यात किंवा सोनं विकत घेण्यात धन्यता मानतात - परीणामी आपली संपत्ती स्वतःच्या हाताने (म्हणजे निर्णयाने) उत्तरोत्तर कमी कमी करून घेतात

3.भांडवली बाजार - (स्टॉक मार्केट) आणि 'म्युच्युअल फंड' ह्या दोन साधनांनी सातत्याने Inflation पेक्षा किती तरी अधिक पट परतावा दिला आहे

परताव्याचा दर कसा मोजायचा? आणि त्याने आपल्याला काय समजतं?

        💐Rule of 72💐

"72 ह्या संख्येला जर तुम्ही परताव्याच्या व्याज दराने भागलंत तर येणारं उत्तर हे तुमची मूळ रक्कम दुप्पट होण्यास साधारण किती वर्ष लागतील हे दर्शवतं"

ऑ 🤔 म्हणजे काय?

समजा FD ला तुम्हांला 8 टक्के परताव्याचा व्याज दर मिळत असेल तर,

72/8 = 9

म्हणजे आज जर तुम्ही 1 लाख रुपयांची FD केलीत आणि दरवर्षी मिळणारं व्याज काढून न घेता परत मूळ रक्कमेत गुंतवलेत तर 9 वर्षांनी तुमची रक्कम 2 लाख झालेली असेल (Calculator वर करून बघू शकता)

ह्याच तत्वाने आपल्याला समजा अमूक इतक्या वर्षात रक्कम दुप्पट व्हायला हवी असेल तर किती परताव्याचा दर मिळायला हवा हे ही समजते आणि त्या अनुषंगाने कुठल्या साधनांमध्ये 'गुंतवणूक' करावी हे ठरविता येतं.

उदा: मला 6 वर्षात रक्कम दुप्पट व्हावी असं वाटत असेल तर,

72/6 = 12 , म्हणजे 12 टक्के परतावा मिळणाऱ्या साधनांत गुंतवणूक करावी लागेल

भारतीयांची सरासरी आयुर्मर्यादा 75 वय वर्षे धरून चालल्यास आपल्या हातात किती वेळ आहे आणि आपण किती संपत्ती निर्मिती करू शकतो ह्याचा साधारण अंदाज बांधता येतो.

1987 साली पब्लिक सेक्टर बँका आणि 1993 साली प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांना म्युच्युअल फंड व्यवसायाची मान्यता देण्यात आली आणि तेव्हापासून आता 2021 पर्यंत काही चांगल्या फंडांनी सातत्याने सरासरी 12 ते 15 टक्के परतावा दिलेला आहे.

भांडवली बाजारात तर समंजसपणे गुंतवणूक करून दिर्घकालावधीसाठी 18 ते 24 टक्के परताव्याचा दर मिळवण्याची संधी असते आणि त्याची अनेक उदाहरणेदेखील आहेत


तळ टीप-भांडवली बाजाराला 'सट्टा बाजार' म्हणूनही हिणवले जाते.काही उत्पादने सोडल्यास (जिथे समभागांच्या किंमतीतील चढउतारात मानवी भावना आणि नशिबाचा भाग अधिक असतो), हा अतिशय पद्धतशीरपणे आणि कसलीही अतार्किक क्रिया किंवा जादू न होता चालणारा बाजार आहे जो सगळ्यांना समान संधी देतो.

पुढील भागात - संपत्तीनिर्मिती कशी साधायची - 'Magic of Compounding' -

धन्यवाद 🙏

Saturday, 17 April 2021

भाग - २ "काय नाही करायचं"......


 

मागील पोस्ट मधील ठळक वैशिष्ट्ये 
1.चलनवाढ (महागाई) हा एक प्रकारचा खर्चच आहे जो दरवर्षी साधारण 6 टक्क्याने वाढतोय

2.उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी गुंतवणूक ही 'निवड' न राहता 'निकड' झाली आहे (Its no more a choice, rather a compulsion)

आता एकदा का आपल्याला कळलं की गुंतवणुकीच्या परताव्याचा दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक हवा की काही गोष्टी स्पष्ट होतात...

कुठल्या?

1.बँकांची कुठलीही उत्पादने (Inflation) ला मागे काढत नाहीत...करंट किंवा सेविंग अकाउंट मध्ये परताव्याचा दर Inflation पेक्षा कायमच कमी असतो. FD ला वयस्कर व्यक्तींना काही बँका 6 टक्के परतावा देतील सुद्धा पण ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक काढून घ्याल, तेव्हा ती रक्कम हे तुमच त्यावर्षीचे उत्पन्न गणले जाईल आणि त्याअनुषंगाने तुम्ही ज्या करपात्र प्रकारात (Tax Bracket) मध्ये याल त्यानुसार कर भरावा लागेल. थोडक्यात तुमच्या अपेक्षित खर्चापेक्षा परताव्याचा दर कमी होईल. (ह्याचाच अर्थ जेव्हा तुम्ही 15 वर्षांसाठी लाखांनी/कोट्यांनी रुपयांची FD करता, तेव्हा उत्तरोत्तर तुम्ही तुमची संपत्ती कमी कमी करून घेता 🙆🏽‍♂️😱)

2.किसान विकास पत्र, पोस्टातली गुंतवणूक, सरकारी रोखे , सोनं इत्यादी कुठलीच उत्पादने Inflation पेक्षा अधिक परतावा देत नाहीत

3.वरील उत्पादनांना काही लोकं 'जोखीम विरहीत' उत्पादने मानतात (घरबसल्या सिलिंग फॅन माझ्या डोक्यावर पडू शकतो - हे ऐकायला जितकं अतर्क्य वाटतं त्याच न्यायाने एवढी किमान जोखीम जगतांना प्रत्येक क्षणी असते) त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय डोळसपणे घ्यावेत.

मग कुठल्या साधनांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा देण्याची क्षमता आहे? 

भारतातील गेल्या 40 वर्षाचा इतिहास पाहता खालील दोन साधनांमधील गुंतवणुकीने सातत्याने inflation ला मागे काढलंय - 

1.भांडवली बाजार (स्टॉक मार्केट) 
2.म्युच्युअल फंड

कसं? परताव्याचा दर कसा मोजायचा इत्यादी पुढील भागात 💐

 'तळ टीप' - 'Rule of Inversion' - Instead of asking, 'How do i save and invest? Ask yourself, How would i get broke - You will find the right track 
 
धन्यवाद💐

Tuesday, 13 April 2021

भाग १ - "गुंतवणूक म्हणजे काय"?


 "If you don't find a way to make money while you sleep, you will work until you die' - इति श्री. वॉरन बफेट - अर्थात नोकरी धंद्यातून पैसे कमावताना त्याला गुंतवणुकीची जोड न दिल्यास निवृत्तीच्या वयात ही काम करावं लागेल.

असं का?

त्याच्या अनेक उत्तरांपैकी एक म्हणजे 'Inflation' - (चलनवाढ) - थोडक्यात 'महागाई' जी सतत वाढत असते, किंबहुना चलनवाढ होत राहणंच अपेक्षित असतं कारण हा कुठल्याही अर्थव्यवस्थेचा स्थायीभाव असतो.(आपला पगार किंवा उत्पन्न जसं उत्तरोत्तर वाढावं अशी आपली इच्छा असते ना तसंच)

पण विरुद्ध अर्थाने म्हणजे महागाई वाढणे ह्याचा अर्थ खर्च देखील वाढला आणि खर्चाच्या प्रमाणात उत्पन्नाचा ताळमेळ साधतांना किंवा आपली एक किमान जीवनशैली अबाधित राखतांना जी तारेवरची कसरत करावी लागते ते पाहून वॉरन बफेट ह्यांनी वरील उद्गार काढलेत.

त्या अर्थाने सध्याच्या युगात 'गुंतवणूक' हा निवडीचा विषय न राहता गरजेचा विषय झालाय.

गेल्या दशकभरात भारतात सरासरी चलनवाढ ही साधारण 5 ते 6 टक्क्यांच्या मध्ये राहिली आहे.

म्हणजे ह्या वर्षीच्या दर 100 रुपये खर्चाच्या मागे पुढील वर्षी अधिकचे 6 रुपये , म्हणजे एकूण सरासरी 106 रुपये खर्च करावे लागतील

ह्याचाच अर्थ आपल्याला गुंतवणुकीतून किमान 6 टक्क्यांपेक्षा अधिकचाच परतावा मिळवावा लागेल

तो मिळतो का? कुठल्या साधनांद्वारे मिळतो?नसल्यास कसा मिळवावा? पुढील भागात 💐