Wednesday, 14 October 2026

व्यावसायिक समज वाढवायला हवी

गेल्या आठवड्यात एका चित्रपटाला जाण्याचा योग आला. बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहिला हा एक भाग. दुसरा म्हणजे ह्या चित्रपटाची निर्मिती आमच्या एका अतिशय घनिष्ट मित्राच्या जावयाने केली आहे, तर त्यात प्रमुख भूमिका आमच्या मित्राच्या मुलीने केलेली आहे.

हा चित्रपटाचा लेखाजोखा नाही, तरीही सदर चित्रपट अत्यंत खिळवून ठेवणारा आहे. 

ह्या पोस्ट चा मुद्दा निराळा आहे. चित्रपटानंतर ही सर्व मंडळी येवून भेटली, त्यात निर्माता दिग्दर्शकाने आवाहन करताना मराठी चित्रपट आर्थिक बाबतीत टिकून रहाणे वगैरे विषयी खूप खंत व्यक्त केली आणि ह्याबद्दल किंचित अधिक बोलला, असं मला वाटतं, जे नाही बोलायला हवं. अभिप्राय शेअर करा, सोशल मेडिया वगैरे सर्व ठीक. 

मुळात हा निर्माता दिग्दर्शक जो आहे, तो स्वत: मिडिया क्षेत्रात आहे, आणि अजून पाय स्थिरावू पाहत आहे. त्याला सुसंगत असे हे पाउल आहे. त्यामुळे त्या मोठ्या मार्गावारीलच एक टप्पा, महत्त्वाचा, असे ह्याकडे पाहायला हवे. चित्रपट चालायला हवा, आर्थिक गणित जमायलाच हवे, हे खरेच. परंतु त्या एका गोष्टीने हवालदिल होता कामा नये. 

" मराठी चित्रपट आर्थिक बाबतीत टिकून रहाणे " वगैरे विषयी बोलण्याने ही अगतिकता अधोरेखित होईल. मनात. चित्रपटाचे व्यावसायिक यश म्हणजेच सर्वस्व हा समज दुणावेल. ऐवजी जरी जरा कमी यश मिळाले, आणि स्वत: च्या निर्मिती वरील प्रेम आणि विश्वास वाढवला, टिकवून धरला, तर आज नाही तर उद्या सफलता येईलच. एक उत्तम चित्रपट निर्माता म्हणून, नाव होईल, चांगले काम निर्माण होईल.

कोणतेही क्षेत्र असो, हा "दम" हवाच. आणि मुळातच त्यावर असीम श्रद्धा आणि प्रेम असेल, तर दम राहतोच. 

Friday, 2 October 2026

काम "करून टाकायचा" सोस….

​सर्वच कामाची परिणामकारकाता सरसकट “संख्येत” मोजायला आपण लागलो , की गोंधळ होणारच. 

सध्या ai मुळे जो एक दर्जाहीन आशय नजरेस पडतो तो बघितला की ह्या उथळ पणाची कीव येते आणि विषाद निर्माण होतो. खास करून सर्व प्लेटफॉर्म आपले काम हलके करायला इतके तत्पर असतात, की ज्यामुळे आधीच कृतिशीलते कडे न जाता फक्त सुरक्षित यशाकडे नेणाऱ्या गुलामी मानसिकतेत अधिकच भर पडते. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे विचार नको करूस, मला सांग,असे. आमचे एक मित्र म्हणतात तसे… “डोकच लावायचं नाही”. बुद्धी वापरायची नाही. ते तुझे कामच नाही. आणि हे कौशल्य पदरात पाडून घ्यायचा सवंग चंग बांधायचा, थोडक्यात खपणूक आधारित अर्थव्यवस्थेला चारापाणी देणारे गुलाम व्हायचे.

सरसकट व्हिडीओज चे पेव 

ही खेळणी अनेक ठिकाणी उपलब्ध झालीयेत त्यामुळे गरज असो, नसो , अत्यंत दुय्यम दर्जाचे ( किंवा छानही ) व्हिडियोज नको तिथे तयार करून पोस्ट केले जातात. कालच एकाने मार्केट यार्ड बद्दल एक बातमी दिली. तर ह्या मार्केट यार्डाचा वीडियो टाकण्याची काय आवश्यकता होती ? असेच हल्ली पेपर मध्ये अगदी करमणूक कार्यक्रमांच्या जाहिराती सुद्धा ai च्या इमेजेस लावून छापतात.ग्राफिक डिज़ाइनिंग म्हणजे फक्त चित्र तयार करणे हे नसते. असो.तो विषय पुन्हा.

व्हॉट्सअप वर मेसेज करण्याची गंमत 

इथे तर कमालीच्या गमती जमती अनुभवायला मिळतात. बऱ्याच वेळा कुणाला काही सांगायचं असतं, आणि काही वेगळाच अर्थ निघू शकतो. परिणामस्वरुप गैरसमज तयार होतात, सौहार्दाचं वातावरण बिघडतं.संवादात शब्दाला असाधारण महत्त्व आहे, असते. मदत घ्या परंतु शेवट संदेश नीट तपासूनच टाकायला हवा. एखाद्या ठिकाणी आपण नेतेपदी किंवा प्रमुख पदी असलात तर जबाबदारी अधिक विस्तृत होते.

आज गांधीजयंती च्या निमित्ताने त्यांच्या एका अशाच सवयीबद्दल आले आहे ते आपण आवर्जून पाळण्यासारखे आहे :-




Saturday, 26 September 2026

परीवर्तन शून्य आकडे

​बिझनेस ग्रुप्स मध्येही आकडे खूपच प्रिय असतात आणि खरेच आहे की आकडे आपल्याला सत्य दर्शन करवितात. हे कोणते आकडे ह्यात सर्व इंगित लपलेले आहे. बऱ्याच ठिकाणी मेंबर्स कडून अमुक एक काम करून घेणे ह्यावर फारच भर दिला जातो. म्हणजे कसे, की एखादा खास कार्यक्रम असतो आणि त्याकरिता अमुक एक संख्या ठरविलेली असते. तरच ते गणित परवडणारे वगैरे असते. तर अशी कल्पना करूयात की संस्थेच्या अंतर्गत अनेक ग्रुप आहेत आणि त्यांचे त्यांचे सदस्य. एक ग्रुप प्रमुखांची टीम असते.त्यांना एक टास्क दिले जाते आणि ते हासिल केल्यावर त्या प्रमुख मंडळींचा दबदबा वाढणार असतो. 

(टीप: ह्याचा प्रत्यक्ष बिझनेस शी कितपत संबंध असतो हे सांगणे कठीणच.)

तर ही मंडळी ह्याच्या इतके मागे लागतात की मूळ उद्देश कुठच्या कुठे लांब फेकला जातो. नुकताच आमच्या अशाच एका ग्रुप प्रमुखाने हे नोंदणी सत्र राबविताना ग्रुप चक्क लॉक करून टाकला. आणि हे “पवित्र” काम करून घेतले. म्हणजे जी मंडळी करत नाहीयेत त्यांचे प्रश्न जाणून घ्यायच्या ऐवजी नसेल तर गेला उडत अशीच भूमिका झाली ना. शिवाय माझ्या सारख्या जुन्या लाकडाची काय असणार किंमत ! 

एक समांतर उदाहरण बघूया म्हणजे समजेल…..

एका रक्तदान शिबिराला आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून रक्तदान उत्सुकांना त्यांची माहिती भरून द्यायला मदत करत होते. त्यांनतर हे फॉर्म घेवून रक्तदाते पुढे जात होते जेथे रक्त संकलन करणाऱ्या संस्थेचे अधिकारी पुढील काम करत होते.

माझी पाळी आल्यावर समजले, की संस्थेच्या अधिकारी असलेल्या व्यक्ती हाच आधी भरलेला फॉर्म जवळपास पुन्हा एकदा भरून घेत होत्या. अर्थात हे डुप्लिकेशन का असा प्रश्न मी विचारता त्यांचे उत्तर खूप मार्गदर्शक होते :

“ विद्यार्थ्यांचा कल फॉर्म भरून देण्याकडे असतो. मात्र ह्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देताना व्यक्तीने थांबून, विचार करून उत्तर देण्याची आवश्यकता असते. चुकीच्या प्राकृतिक स्थितीतील रक्त स्वीकारणे हे धोकादायक असते. त्यामुळे त्यांनी स्वतःहून विचार करूनच फॉर्म भरणे गरजेचे आहे”

हेच तत्त्व आपण बिझनेस क्लब ला लागू केले तर प्रत्येक मेंबर स्वयंप्रेरित होवून सहभाग देईल. अधिक अर्थपूर्ण सहभाग राहील, नुसते आकडे नाही राहणार.


Saturday, 12 September 2026

Contribution Margin शी विक्री Incentive संलग्न करणे

Incentives देण्याबद्दल वेगळाच विचार काळ शिकायला मिळाला 

अनेक ठिकाणी माझ्या पाहण्यात आले आहे, विक्री विभागातील कर्मचाऱ्यांना सरसकट कमिशन देण्यात येते. म्हणजे अमुक सेल केलात तर इतके कमिशन वगैरे.

त्यात थोडे अधिक म्हणजे अमुक एका विक्रीपर्यंत अमुक, त्याच्या पुढे तमुक वगैरे.कधी कधी season प्रमाणे किंवा व्यवसायाच्या आर्थिक स्थिती नुसार सुद्धा काही नैमित्तिक schemes राबविल्या जातात. 

लहान लहान कंपनीज मध्ये तर खूपच सरधोपट पणा आढळतो. फक्त विक्री आण , कमिशन घेवून जा .... असा प्रकार चिक्कार ठिकाणी असतो. पण त्या कंपनीत Finance विभाग जर दक्ष असेल, किंवा स्वत: व्यावसायिक जर दक्ष असेल, तर त्याला मात्र प्रत्येक अशा सेल च्या मागे घडणाऱ्या घटना वेगळ्या प्रकारे जाणवतात.

कधी कधी मोठ्या कंपन्या अधिक क्रेडीट मागतात, कधी वेगळ्या प्रकारच्या सवलती. कधी सांगितलेल्या तारखेला वसुलीच होत नाही, तर कधी Delivery होई पर्यंत अनंत अडचणी येत राहतात.

बऱ्याच वेळा अडचणी ह्या ग्राहकांच्या बाजूने असतात. कारण ग्राहक कदाचित प्रथमच असा व्यवहार करत असतात , मात्र उद्योजकासाठी हे अनेक वर्षे अगदी कोळून प्यायलेले बिझनेस मॉडेल असते. थोडक्यात त्याचे अगदी रोजचे झालेले, ठरलेले बिझनेस मॉडेल असते.

तरीही अंतर्गत सेल्स कर्मचाऱ्यांशी मात्र ह्या बाबत व्यवस्थित गणित ठरवलेले नसल्याने बऱ्याच वेळा गैरसमज घडून येतात. ह्या ऐवजी जर त्यांचे कमिशन हे अशा व्यवहारांतून कंपनीला प्रत्यक्ष मिळणाऱ्या योगदान रुपी उत्पन्नाशी  जोडून घेतले, तर तर खूप ताण कमी होऊ शकेल. कारण प्रत्येक्लेअच प्रकारे व्यवहार ठरत नसतात, ते वेग्ग्ल्या प्रकारे ठरतात. त्याचवेळी दोन गोष्टी मात्र घडतातच घडतात :-

  1. काहीही झालेतरी त्या त्या व्यवहारा ( Deal ) करिता लागणाऱ्या स्थिर खर्चाचा वाटा हा स्थिर च राहतो. 
  2. हा व्यवहार ( Deal ) ह्या मुळे कंपनीवर सदोदित असणाऱ्या ह्या स्थिर खर्चाचा बोजा नक्की हलका करतोच करतो. 

तरीही नेहमीचे च उत्पादन विक्री कर्मचारी वेगवेगळ्या अटींवर विकत असतात. तर मग कंपनी एकच समान कमिशन ह्या वाट्यातून कसे बरे देवू शकेल ?हा मुलभूत विचार केंद्रस्थानी ठेवून कमिशन च्या Structure ची फेररचना केल्यास खूप गुंते सुटायला मदत होईल.

हे आपल्याला Contribution Margin ह्या सूत्रातून सहज काढता येते. माझ्या मिनरल water च्या युट्युब channel वर ह्याबद्दल एक व्हिडियो मी पोस्ट केलेला आहे. तो पाहिलात तर सहज समजून येईल.


पहा आणि जरूर प्रतिक्रिया द्या !





  

Thursday, 10 September 2026

ऑफिस सोडा…..

​भारतीय युवा शक्ति ट्रस्ट मध्ये MMC “Mentor Mobile Clinic” नामक एक कार्यपद्धती वापरली जाते.

ज्याद्वारे काही मेंटर्स एकत्रित पणे काही ठराविक उद्योजकांकडे भेट देतात. ज्यांना कर्ज सहाय्य करण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडे स्वत: जाऊन आल्यामुळे एक विश्वास निर्माण होतो तसेच उद्योजक मंडळी जर कुठे चुका करत असतील तर त्यांना मार्गदर्शन करता येतं.

खरं तर स्वत: लाच जास्त शिकण्याची संधी. काल एकूण ४ जणांकडे जाऊन आलो. सोबत चार मेंटर्स, byst चे समन्वयक अधिकारी होते.



पहिला उद्योजक होता एक प्लास्टिक स्क्रॅप चा व्यवसाय मांडलेला उद्योजक 

अगदी प्राथमिक स्वरूपातील सॉर्टिंग करून देतो हा. महत्त्वाचे काम, कष्टाचे काम. नंतर मग पुढची प्रक्रिया त्या त्या कंपन्या करतात. “मराठी स्क्रॅपवाला” असा ब्रांड ह्याने तयार केलाय आणि आता इतरांनाही ह्या व्यवसायाचे प्रशिक्षण देतोय.

दुसरी होती पाउडर कोटिंग यूनिट चालवणारी अगदी तरुण उद्योजिका 


ही स्वत: आणि हिचा भाऊ हे यूनिट चालवतात. घरी आधीपासून फॅब्रिकेशन व्यवसाय आहेच. विशेष म्हणजे चांगल्या पैकी शिक्षण घेतलेले असूनही दोघांना नोकरी करायचीच नाहीये.

तिसरा लिफ्ट उत्पादन करणारा उद्योजक 

स्वतःची अत्यंत प्रेरक वृत्ती ह्याचा यूनिट वर ठायी ठायी जाणवते. वडील बस कंडक्टर पण मुलगा उच्चशिक्षित आणि तरीही नोकरी नाही, तर कसलेला उद्योजक.

तर चौथा होता एक इवेंट वाला.

अगदी छोट्या खेड्यातील हा सुद्धा दुसऱ्या पिढीतील उद्योजक. ह्याचे वडील आणि संपूर्ण कुटुंब हा व्यवसाय अत्यंत तन्मयतेने चालवतात.अत्यंत स्फूर्तीदायक. 

शिवाय माझ्या छोट्या विचारांचा चक्काचूर करणारे मेंटर. ह्यांच्या नुसत्या कथा ऐकल्या तरी आपण पुन्हा भरारी घ्यायला सज्ज होतो. सोबत आमचे byst चे उत्साही आणि तितकेच अहंकार रहित असे अधिकारी.

किती शिकू आणि काय काय शिकू……

Wednesday, 2 September 2026

दूरच्या वस्तूचे विनाकारण आकर्षण

अगदी ताजी ताजी घटना. जाता - येता मला कार्यालयाजवळ एक प्रिंटींग चे दुकान नजरेस पडले. त्यावेळी गडबडीत असल्याने मी लक्षात ठेवले आणि नंतर अनेक वेळा ते कुठे आहे ह्याचं शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मिळता मिळेना.

आपला सहज अग्रक्रम जवळ असेल त्याला असतो. आणि हे दुकान नक्की माझ्या जाण्या येण्याच्या रस्त्यावरचे आहे आणि तेही कार्यालयाजवळ आहे इतके माझ्या पक्के लक्षात होते. त्यामुळे मला शेवटी एक दिवस हे सापडले. 

त्यांना कार्ड दिले, त्यांचे काम समजून घेतले. त्यांना पुढे काम देईन - न देईन हा भाग अलाहिदा, पण तिथून निघता निघता एक गमतीदार घटना घडली, जी माझ्या पक्की लक्षात राहिली आणि विनोबा भावे ह्यांनी "गीता प्रवचने" मध्ये उल्लेख केलेलं एक वाक्य आठवलं. त्यांनी धुक्याचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात...

धुक्यात आपल्याला जवळचं दिसतच नाही 

आणि दूरचं मात्र नीट दिसतं  

झालं असं , की तिथून निघत असताना मी त्या दुकान मालकाशी बोललो ; त्यांना म्हणालो, कि तुमच्या shop वर बोर्ड नाही, मिळणार कसं ?

ह्यावर त्यांनी मला आवर्जून सांगितलं ( त्यांच्या दारावर लावलेल्या स्टीकर कडे अंगुलीनिर्देश करून ) कि गुगल वर हे नांव टाकलेत ना , तर लगेच मिळेल !

आता बोला. 

आपले ग्राहक आपल्याला गुगल वर शोधत असतात हे खरेच, परंतु स्थानिक मंडळी ही आपली आपसूक ग्राहक असतात हो !  

 

 

Sunday, 30 August 2026

आपण कसे हळूहळू अदृश्यपणे अप्रिय होत जावू शकतो .....

घटना १ :-

एका हॉटेल मध्ये मी Agoda ह्या website वरून बुकिंग केले. काही कारणास्तव मला रद्द करावे लागले. नियमाप्रमाणे २४ तासांच्या आत मी ते रद्द केले, तर मला संपूर्ण refund मिळायला हवा होता. जो Agoda ने " सदर हॉटेल ने तो देण्यास नकार दिला आहे , त्यामुळे मिळणार नाही " हा stand घेतला. मी त्यांना केस कळविली. अजून तरी काही पुढे घडलेले नाहीये. 

सर्वात जास्त प्रभावी परिणाम : मी ( ग्राहक ) ह्यापुढे agoda चा विचार करताना "असेच एक" म्हणून करणे हा आहे. 
असंच पूर्वी एकदा Treeebo बाबत घडलं होतं. त्यांच्या तर माणसाने फोन वगैरे केला होता, पण परिणाम शून्य.

✵तात्पर्य : जास्त लोकांपर्यंत पोचायला डिजिटल मार्केटिंग चा वापर जरूर करा , परंतु प्रतिक्रिया मात्र जरूर पहा आणि आवश्यक तिथे स्वत: हस्तक्षेप करून ग्राहकाला खूष समाधानी तरी ठेवा. 
------

घटना २ :-

आमचे निवडक चे सदस्य श्री वाकडे हे स्वत: MASMA च्या कृती समितीवर कार्यरत आहेत. आणि आपला अधिकार वापरून त्यांनी एका संस्थेला त्यांच्या २ प्रदर्शनांत निशुल्क stall देवू केला होता. आता त्या संस्थेच्या प्रदर्शनात त्यांनी अशीच विनंती सदर संस्थेला केली असता, त्यांनी त्वरित ही विनंती गोड शब्दांत धुडकावून लावली.

✵तात्पर्य : काहीच नाही. असा प्रकार सदर संस्थेबद्दल आणि त्या व्यक्ती बाबत वाकडे पुन्हा करणार नाहीत हे नक्की.

मला वाटतं की कधी ग्राहकाला अपेक्षित असणारी फेड आपण करू शकू किंवा नाही. परंतु एक आस्थापूर्वक concern ठेवणे आणि तसाच संवाद ठेवून त्यांच्याशी नीट "सु"संवाद ठेवायला हरकत नाही.

आपण अप्रिय होण्यापासून तरी लांब राहूच शकू, काय ?