Saturday, 11 October 2025
उद्योगाचे पुढील पिढीत यशस्वी संक्रमण !
Thursday, 3 June 2021
Quality is free - श्री सुमंत पारखी ह्यांची मुलाखत
Quality is free - फिलिप क्रॉसबी ह्या लेखकाचं गाजलेलं पुस्तक
श्री.सुमंत पारखी सरांची मुलाखत ऐकली. केस स्टडी, प्रेझेन्टेशन आणि मुलाखत ह्यांतील ठिपके जोडण्याचा प्रयत्न केल्यास असे दिसते की,
1. ‘गुणवत्ता व्यवस्थापन’ म्हणजे एखादे उत्पादन, सेवा किंवा कार्यपद्धती, किती योग्य पद्धतीने ‘ठरलेला मानक’(Standard) साध्य करते - थोडक्यात मानकतेचे अनुसरण
2.गुणवत्ता व्यवस्थापनाद्वारे दर्जा राखणे म्हणजे चुका शोधणे नव्हे तर चुका टाळणे
3.शून्य दोष पद्धत हा कामगिरीचा आदर्श मानक बिंदू (Benchmark Standard) असला तरी त्याच्यापेक्षा कमी दर्जा चालेल असा त्याचा अर्थ काढता येत नाही
4.ठरलेल्या मानकतेचे अनुसरण न केल्यास होणारा वायफळ खर्च हि ‘दर्जा’ न राखण्याची मोजावी लागणारी खरी किंमत,
उदा: > बुडालेला महसूल,
> उत्पादनासाठी लागलेल्या वेळेचं नुकसान
> संसाधनांचा अपव्यय
> पुनरुत्पादन अर्थात (Rework)
> उत्पादनाच्या हमीचं देखील नुकसान (Loss of warranty)
> गमावलेला नावलौकिक, विश्वास आणि शिफारसीद्वारे मिळणारा अधिकचा व्यवसाय देखील
आता ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केल्यास खालील तार्किक क्रम दिसतो,
१. व्यवसायाची कार्यपद्धती, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, प्रत्येक छोट्या-मोठ्या कृतींना लागणारा वेळ ह्यांचं दस्तावेजीकरण केल्याने व्यवसायाच्या कार्यपद्धतीला एक चौकट आखली जाऊन शिस्त येते.
२. प्रत्येक कृतीचं आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करता येतं
३.एखादी कृती किंवा कृतीसंच ठराविक कालावधीनंतर काहीही बदल न करता वारंवार करावा लागत असल्यास त्याला स्वयंचलित करून कर्मचाऱ्याचा वेळ वाचवता येऊ शकतो
म्हणजेच 'गुणवत्ता व्यवस्थापन'(QMS) हि व्यवस्था व्यवसायाला पूरक नाही तर ती व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ह्या सगळ्याचं एक सर्वव्यापी सूत्र म्हणजे, 'कुठलंही काम किंवा कृती पहिल्या प्रयत्नांतच त्याच्या अपेक्षित दर्जानुरूप करावी' - 'Do it right at the first time'
तसे झाल्यास तुमची गुंतवणूक ही परत मिळते व चुका सुधारण्याच्या खर्च ही वाचतो.
Hence Quality is Free
थोडक्यात व्यवसाय करतांना 'गुणवत्ता व्यवस्थापन' पद्धतीला पर्याय नाही म्हणूनच मुलाखतीच समालोचन करणं टाळतोय. मुलाखत स्वतः ऐका - ह्या विषयातलं श्री.सुमंत पारखी ह्यांचं प्रभुत्व आणि ते देऊ करत असलेल्या सेवेलाही पर्याय नाही
श्री कन्सल्टंट आणि पारखी दाम्पत्याला पुढील वाटचालीस निवडक उद्यमी तर्फे अनेक शुभेच्छा 💐
Tuesday, 25 May 2021
एका बीजापोटी, तरु कोटी, जन्म घेती सुमने फळे I आधी बीज एकले - स्मिता सोवनी यांची मुलाखत
Monday, 17 May 2021
अडथळ्यांची शर्यत - रेवथी पाटील ह्यांची मुलाखत
"अडथळ्यांची शर्यत" -
1.तीन वर्षे पाळणाघरात राहिल्यानंतर मुलाने हट्ट धरला की आता तू घरूनच काम करायचं, मी पाळणाघरात जाणार नाही,
2.घरची आघाडी सांभाळून अजून काय करता येईल असा विचार करता रेवथीला जाणवलं की आपलं पाककौशल्य उत्तम आहे, त्यामुळे त्यालाच समांतर असे 'बेकरी प्रॉडक्टस्' जर आपण बनवायला शिकलो तर ? 'केक' हा सगळ्याच आनंदी सोहळ्यांचा अविभाज्य भाग आहे आणि 'कुकीज' लहानांपासून - मोठ्यांपर्यंय सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे नक्कीच त्यातून एक व्यवसाय उभा करता येऊ शकेल
3.म्हणून मग वर्षभर कोर्स वगैरे करून ते कौशल्य रेवथीने शिकून घेतलं खरं पण तिला व्यवसाय जमेल का ह्याबद्दल सुरुवातीला घरची मंडळी थोडी साशंकच होती, त्यात व्यवसाय करणार कुठून? साधनसामग्री, गुंतवणूक वाया गेली तर असा विचार करून रेवथीला व्यवसाच्या विचारापासून परावृत्त करण्याचादेखील प्रयत्न झाला
4.रेवथी तिच्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे हळूहळू 'तो' विरोध मावळला आणि 'स्पार्कल बेकर्स' ची सुरुवात झाली पण घरून काम करताना लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत होते,
5.सुरुवातीला जवळच्या ओळखीतून, मित्रमंडळींच्या शिफारसीतून ऑर्डर मिळत गेल्या आणि घराच्या खालीच असलेल्या छोटयाशा जागेतून व्यवसाय पुढे चालू राहिला खरा पण एका स्त्री मालकीणीबरोबर जुळवून घेण्यात हाताखालच्या माणसांना सुरुवातीला अवघड गेलं
6.पाच किलोचा केक एकदा 'डिलिव्हरी बॉय' कडून गहाळ झाला. अर्थात रेवथी ने पुन्हा नवीन केक बनवून दिला खरा पण कच्चा माल आणि कष्ट वाया गेले, त्यात केक वेळेत न पोहोचल्यास एखाद्याचा हिरमोड होऊ शकतो त्यामूळे 'डिलिव्हरी' विषयाकडे रेवथी कटाक्षाने लक्ष देऊ लागली
7.मागच्या वर्षी लॉकडाउनमध्ये तर रेवथीच्या व्यवसायाला घरघर लागेल असाच सगळ्यांचा कयास होता पण वेळेत केक बनवून देत असल्यामूळे काही हॉटेलमालकांनी आपल्या हॉटेलातच काही केक ठेवण्याचा आग्रह धरला
8.चोखंदळ ग्राहक बऱ्याच वेळेला स्पर्धकाचा दर्जा आणि किंमतीची तूलना करतात तेव्हा रेवथी चतुरपणे 'हरकत हाताळणी' करते. आपण वापरत असलेल्या कच्च्या मालाचा ब्रँड आणि दर्जा ती ग्राहकांना दाखवते, आपण फक्त 'एगलेस' केकच बनवतो हे सिद्ध करून दाखवते, आपल्या कामाला ग्राहकांकडून मिळालेले रिव्ह्यूज आणि शिफारसी ती ग्राहकांना दाखवून त्यांचं मत वळवण्याचा प्रयत्न करते. तसेच स्पर्धकाच्या दुकानात जाऊन ते काय किमतीत काय देऊ करतायत ह्याचाही आढावा घेते, तसंच महिन्यातून एकदा तरी नवीन फ्लेवर्स बनवून त्याची ग्राहकांना माहिती देत असते
व्यवसाय सुरू केल्यापासून आलेल्या अडथळ्यांचे असे अनेक किस्से सांगता येथील
व्यवसायाचं पाहिलं वर्ष कसं गेलं, फूड डिलिव्हरी ऍप आणि वेबसाईट मुळे कसा व्यवसाय वाढत गेला, व्यवसायाचं बाळकडू कधी आणि कुणाकडून मिळालं, ग्राहकांची टीका आणि स्तुती दोन्ही लक्षात का आणि कशी राहते, प्रोक्युरमेन्ट आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं चोख तंत्र, केकमधील रेवथीची स्पेशालिटी, व्यवसाय वाढवण्याचे तिचे प्लॅन काय, नेट्वर्किंचे महत्व, पहिला गुगल रिव्ह्यू आणि सॅटर्डे क्लबच्या 'वूमन्स् डे' च्या दिवशी घडलेला किस्सा ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष ऐकण्यातली मजा दवडू नका
'आयुष्यात अडचणी आल्या का'? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना रेवथी म्हणते - मुलगा सकाळी 7.30 वाजता शाळेत जातो त्यामुळे त्याआधी स्वयंपाक, शाळेची तयारी, घरच्या वडीलधाऱ्या मंडळींना काही हवं - नको हे सगळं पाहून आणि कामं उरकून 8.30 - 9 च्या आसपास मी दुकानात हजर असते. किंबहुना व्यवसाय आणि घर जवळ असल्यामुळे मुलाकडे व्यवस्थित लक्ष देता आलं, त्याला शाळेत सोडणं, परत आणणं, त्याच्या आवडी निवडी जोपासणं, अभ्यास आणि इतर गोष्टीसाठी वेळ देणं आणि व्यवसाय ही सांभाळणं जमलं त्यामुळे फारशी काही अडचण जाणवली नाही - म्हणजे 😳?
त्यासाठी दररोज सकाळी पाच वाजता उठून ते दिवस संपेपर्यंत घरच्या मंडळींपासून ग्राहकांपर्यंत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालणं हे काही दखलपात्र आव्हान नाहीच मूळी एवढया सहजतेने रेवथी बोलून गेली.
मातृत्वाच्या जबाबदरीमुळे घरची आघाडी आणि एकंदरच प्राधान्यक्रमात झालेले बदल स्वीकारताना करावी लागणारी तारेवरची कसरत, त्यासाठी प्रसंगी आपल्या करिअरमध्ये घ्यावी लागणारी माघार आणि पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याच्या इर्ष्येने व्यावसायिक कामात स्वतःला झोकून देणाऱ्या 'निवडक महिला उद्योजिका' गायत्री, शलाका, दीप, अनिता कासोदेकर,ज्योत्स्ना गोडबोले, आदिती कुलकर्णी आणि आज 'रेवथी पाटील' सगळ्यांनाच मानाचा मुजरा🙏आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 💐
Tuesday, 11 May 2021
विद्या विनयेन शोभते - डॉक्टर गिरीश तेलंग ह्यांची मुलाखत
वयाच्या विशी - पंचविशीत पोटापाण्यापूरतं शिक्षण घेऊन एकदा का आपण कामाधंद्याला लागलो की पुन्हा शिक्षणाकडे वळणं कठीण.पैशाचं आकर्षण, नोकरीधंदा व संसारामुळे बदललेले प्राधान्यक्रम आणि शिक्षणासाठी लागणारी मानसिक शिस्त, ऊर्जा गमावल्यामुळे असं होत असावं पण डॉ गिरीश तेलंग ह्यांनी हा समज खोटा ठरवण्याचा जणू पण केला असावा असंच त्यांची मुलाखत घेताना जाणवलं.1983 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून ते मागच्या वर्षी (नोव्हेंबर 2020) मध्ये वकिलीची (L.L.B.)परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत डॉक्टरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या पदव्या ऐकल्या आणि श्रीकांत जीचकारांची आठवण झाली.
डॉ.तेलंग मूळचे 'जालन्या'चे.1985 साली डिप्लोमा इन फार्मसी ची पदवी त्यांनी मिळविली.पुढे 1990 साली डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवीदेखील मिळवली पण अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचं मन रमलं नाही आणि ते मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून एका कंपनीत रुजू झाले.1990 ते 2000 ह्या दहा वर्षाच्या कालावधीत, वयाच्या 27 व्या वर्षीच सर्वात 'तरुण रिजनल हेड' म्हणून ते नावाजले गेले. ह्याच दरम्यान म्हणजे 1995 च्या आसपास अनौपचारिकरित्या लोकांना फार्मा क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यासाठी ते मदत करत होते आणि त्याच सुमारास पुढेमागे आपलंही स्वतःचं केबिन/ऑफिस, कन्सल्टन्सी असावी असे विचार त्यांच्या मनात रुजू लागले असं ते सांगतात.'रिक्रूटमेंट कन्सल्टंट' ह्या व्यवसायातली संधी आणि पुढे जाऊन पी.एच.डी. करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल ह्या हेतूने 3 जानेवारी 2000 साली डॉक्टर पुण्यात आले.सकाळी 10 ते 6 तुमच्या ऑफिसात काम आणि संध्याकाळनंतर मला माझ्या कन्सल्टन्सीच्या कामासाठी वेळ मिळावा ह्या अटीवर डॉक्टरांनी एका कंपनीत काही काळ नोकरी केली आणि 2001 साली फार्माफोकस ह्या नावाने पुण्यातील कर्वे रोड येथे स्वतःची रिक्रूटमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. पुढे 2004 साली त्यांनी सदाशिव पेठेत ऑफिस थाटलं आणि आजपर्यंत तेथूनच ते आपला व्यवसाय चालवतायत
फार्मा क्षेत्रातच काम करायचं ह्याचा आडाखा मनात पक्का असल्यामुळे 2001 सालीच डॉक्टरांनी 'फार्माफोकस' ह्या नावाचं ट्रेडमार्क करून घेतलं.
रिक्रूटमेंट क्षेत्राशी संबंध असला तरी वृत्तपत्रात जाहिराती देण्यापासून ते कंपन्यांबरोबर कंत्राट करतांना कुठले मुद्दे विचारात घ्यावे इत्यादी गोष्टी शिकण्यात 2 ते 3 वर्षे लागल्याचं डॉक्टर नमूद करतात. मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्हज् ना तेव्हा मागणी असल्यामुळे आणि फार्माफोकसची जाहिरातदेखील होईल ह्या उद्देशाने डॉक्टर 'How to become MR ?' ह्या विषयावर ट्रेंनिग वर्कशॉप देखील घेत. कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग हे दोन्ही विषय हातात हात घालून जात असल्यामुळे 2004 ते 2011 ह्या 7 वर्षात दर रविवारी डॉक्टर वेगवेगळ्या विषयांवर ट्रेनिंग घेत असंत.कंपन्यांची नोकरभरतीची जाहिरात पाहिल्यावर वृत्तपत्रातील त्याची कात्रणं डॉक्टर कापून ठेवत पण पत्रव्यवहार मात्र 8 ते 10 दिवसांनंतर करत (त्यामागील कारण मुलाखतीतच ऐका)
सलग 4 वर्षे एकाच कॉलेजमध्ये 'फार्मा क्षेत्रातील करिअरच्या संधी' ह्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉक्टरांना आमंत्रित केलं जात होतं
डॉक्टरांना स्वतः त्या क्षेत्रात अनुभव असल्या कारणाने फार्मा क्षेत्रातदेखील 'सेल्स आणि मार्केटिंग' ह्याच विभागात ते प्राधान्याने नोकरभरती करत आणि त्याअनुषंगाने त्यांनी स्वतःची टीम देखील तयार केली आहे. फार्माफोकस साठी कर्मचारी नेमताना उमेदवाराला दहावीला किमान 75 टक्के गुण मिळालेले असावेत, ती व्यक्ती 7 किलोमीटरच्या परिघातच वास्तव्यास हवी जेणेकरून येण्याजाण्यात अधिकचा वेळ जाणार नाही आणि क्रयशक्ती टिकून राहील तसेच फार्मा क्षेत्रातील तज्ञ हवी असे निकष ते लावतात.कंपनीच्या यशात सहकाऱ्यांचा वाटा मोठा आहे असं डॉक्टर मानतात आणि आपल्या सहकाऱ्यांच्या व्यावसायिक वाढीसाठी जातीने प्रयत्न केल्यामुळे बरेचसे जुने सहकारी आजही फार्माफोकस सोबत असल्याचं ते आवर्जून नमूद करतात.
कंपन्यांकडून कशा प्रकारचा उमेदवार हवाय हे तपशिलात समजून घेतल्यामुळे व प्राथमिक फेरीच्या मुलाखतीत एखाद्या पदासाठी आवश्यक ते शिक्षण व उमेदवाराच्या जमेच्या बाजू पारखून शक्य तितका योग्य उमेदवार पुरविल्यामुळे सगळ्या व्यावसायिक कंपन्यांशी फार्माफॉकसचे उत्तम संबंध आहेत.ही कामाची संस्कृती रुजवण्यासाठी डॉक्टरांनी प्रचंड बौद्धिक मेहनत घेतलीये.'गुणवत्ता व्यवस्थापन' ह्या विषयाचं शिक्षण घेतलं असल्याने कामाचा दर्जा राखायचा तर त्यात सातत्य हवं आणि हे सातत्य राखायचं तर कामाच्या पद्धतींचं प्रमाणिकरण आवश्यक आहे हे उमजल्यामुळे त्यांनी त्याच्या लिखित स्वरूपात नोंदी करून ठेवल्या आहेत. कामाची एक चौकट आखून ठेवलीयेय. नवीन कर्मचारी फार्माफोकसमध्ये रुजू झाल्यास त्याला ह्या लिखित स्वरुपातल्या नोंदी वाचण्यासाठी दिल्या जातात ज्याने त्या व्यक्तीस आपल्या कामाचा आवाका समजतो.पुढील 3 ते 4 महिने त्याला प्रत्येक कामात सहकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केलं जातं. उमेदवारांचे अर्ज पोर्टलवरून कसे शोधायचे, त्यांना कुठले प्रश्न विचारायचे, कंपन्यांबरोबरचं संभाषण कसं असावं, मुलाखतीचे पत्र कसे लिहावे इत्यादीबद्दल सराव करून घेतला जातो. ह्यानंतरही एखादा कर्मचाऱ्याला यशस्वीरीत्या उमेदवार कंपन्यांमध्ये दाखल करून द्यायला 3 - 4 महिने लागू शकतात हे डॉक्टरांनी गृहीत धरलेलं आहे आणि त्यासाठीच कुठलाही व्यक्ती कर्मचारी म्हणून रुजू करून घेण्याआधी त्याच्या किमान 6 महिन्याच्या एकूण खर्चाची (Cost to company) डॉक्टर तजवीज करून ठेवतात. ही सगळी प्रक्रिया कमालीची व्यावसायिक आणि दर्जेदार असल्यामुळे ह्यातून प्रत्येक व्यावसायिकाला घेण्यासारखं बरंच आहे.
2009 - 2010 मध्ये एक काळ अडचणींचा असा आला होता की 4 कर्मचारी मिळून 4 महिन्यात एकही उमेदवार रिक्रुट करू शकले नाही, अर्थात संयम राखल्यामुळे पुढे ती व्यवसाय पोकळी भरून काढता आली. मुदलात रिक्रूटमेंट ह्या व्यवसायाचं प्रारूपंच असं आहे की आज केलेल्या कामाचा मोबदला हा 3 ते 4 महिन्यांनी मिळतो. उमेदवार 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ कंपनीत 'टिकला' तरच 'रिक्रूटमेंट कन्सल्टंट' ना त्यांची व्यावसायिक फी दिली जाते आणि ह्या 3 महिन्यात बऱ्याच गोष्टींवर आपलं पूर्णतः नियंत्रण नसल्यामुळे संयम राखणं आवश्यक आहे असं डॉक्टर सांगतात.
मागच्या वर्षी (2020) मध्ये वकिलीची (L.L.B.) पदवी मिळवल्यानंतर इच्छापत्र किंवा मृत्युपत्र ह्या विषयावर आपल्या समाजात बरेच गैरसमज आहेत असं डॉक्टरांना जाणवलं आणि त्यांनी ह्या विषयावर जनजागृती करण्याचं मनावर घेतलंय. त्यासाठी आजवर त्यांनी जवळपास 8 वेबिनार्सही घेतली आहेत.
आयुष्यभर आपण कष्टाने मिळवलेला पैसा किंवा स्थावर/जंगम मालमत्तेचा आपल्या पश्चात योग्य विनियोग व्हावा आणि आपल्या वारसदारांना कसलाच मनस्ताप होऊ नये ह्यासाठी चालढकल न करता आपण धडधाकट असतांनाच प्रत्येकाने मृत्युपत्र करून घेण्याचा ते सल्ला देतात.
नेटवर्किंगचं महत्व अधोरेखित करतांना उत्तम संबंध प्रस्थापित करण्याला ते प्राधान्य देतात. व्यावसायिक परताव्याचा उद्देश आपोआप साधला जातो असं ते म्हणतात
निवडक उद्यमी हे उद्यमींचे डिजीपीठ आहे, इथे होणाऱ्या चर्चांमुळे विचारांचे आणि माहितीचे आदानप्रदान होते ज्याचा व्यवसायात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे प्रचंड उपयोग होतो असं ते नमूद करतात.
बिझिनेस मॅनेजमेंट, रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह, हॉस्पिटल रिसेप्शनिस्ट, आणि मृत्युपत्र ह्या आणि इतर बऱ्याच विषयावर डॉक्टर वर्कशॉप देखील घेतात.
डॉक्टर गिरीश तेलंग ह्यांनी आजवर मिळवलेल्या पदव्या खालीलप्रमाणे,
1. सन 1985 - डिप्लोमा इन फार्मसी
2.1990 - डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग
3.1993 - बॅचलर ऑफ आर्टस्
4.1994 - डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट
5.1995 - मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट सायन्स
6.2005 - मास्टर ऑफ फिलॉसॉफी - M Phil (ह्युमन रिसोर्स)
7.2015 - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी - Ph.D - (ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट)
8. 2020 - L.L.B
इतर शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाचा गाढा अभ्यास असल्यामुळे तो डॉक्टरांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत वागण्या - बोलण्यात स्पष्ट जाणवतो. वेळेत प्रतिसाद देणं, योग्य तयारीनिशी विषय मांडणं, इतरांच्या वेळेचा आदर राखणं आणि मुख्य म्हणजे नम्रपणा हे इतक्या दिवसांत डॉक्टरांबरोबर झालेल्या संभाषणातून भावलेले गुण.
डॉक्टर गिरीश तेलंग यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातून दिलेल्या प्रेरणेस निवडक उद्यमी तर्फे मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील व्यावसायिक आणि शैक्षणिक कारकिर्दीस अनेक शुभेच्छा 💐
विद्या विनयेन शोभते 💐
Monday, 3 May 2021
आवाज कि दुनिया के दोस्तो - मै आदिती कुलकर्णी
आवाज' हेच आदितीचं मुख्य प्रॉडक्ट असल्यामुळे तिच्या कामाचा परीघ मोठा असणार ह्याची प्रचीती केस स्टडी दरम्यान आलीच होती पण तिचा व्यावसायिक प्रवास मुलाखतीतून ऐकतांना जाणवलं की तो परीघ मोठाच नाही तर लांब आणि प्रशस्तदेखील आहे आणि तसा तो असण्यामागे कालानुरूप होणारे बदल डोळसपणे स्वीकारत स्वतःला अध्ययावत ठेवण्यासाठी आदिती ने घेतलेली मेहनत आहे
'आवाज' हे मुख्य अस्त्र असलं तरी कार्यक्रमाचा बाज आणि मागणी ह्याप्रमाणे सादरीकरण करतांना विषय, कथा, पटकथा, आवाजातील चढ-उतार, अविर्भाव, ह्या आणि अजून बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागतं जे आदितीच्या मुलाखतीतून स्पष्ट जाणवलं आणि जसं सौमित्र सर म्हणाले तसं केस स्टडीसाठी 'बदल आणि ते स्वीकारण्याची मानसिकता' हाच विषय आदितीने का निवडला ह्यामागील मर्म उलगडलं
व्हॉइस आर्टिस्ट, सूत्रसंचालन, स्पीच आणि व्हॉइस वर्कशॉप ट्रेनर, हास्यनीती हा एकपात्री कार्यक्रम आणि "आदि एंटरटेनमेंट" हे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल असे तिचे कामाचे मुख्य प्रकार असले तरी त्याच्या अलीकडे आणि पलीकडेही आदीतीने केलेल्या कामाची यादी लिहायला गेल्यास रकाने भरतील त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका
2002 ते 2006 ह्या कालावधीत पुणे आकाशवाणी केंद्रावर व्हॉइस आर्टीस्ट म्हणून काम पण ह्या कामातून फारसं उत्पन्न नसल्यामुळे मनाविरुद्ध 2006 ते 11 ह्या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यात मॅनेजमेंट इनफॉर्मेशन सिस्टम (MIS) ह्या क्षेत्रात अगदी रिजनल हेड (प्रादेशिक प्रमुख) पदापर्यंत मजल (तिथे काम करताना ट्रेनिंग, प्रेझेन्टेशन,संभाषण कौशल्य ह्या अनुभवाचा पुढे सुत्रसंचालनात उपयोग झाल्याचं आदिती नमूद करते)
2011 साली 'सुत्रसंचालनात' परतताना एकूणच लोकांच्या ऐकण्याच्या सवयीत आणि चवीत झालेले बदल आदितीने अचूक हेरले आणि त्यानुसार स्वतःत बदल घडवायला सुरुवात केली
2011 च्या आसपास खाजगीतली व्हॉइस आर्टिस्ट ना मिळणारी बरीच कामं रेडिओवरील (FM) च्या चॅनेलवर सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या काही रेडिओ जॉकीजकडे जाऊ लागल्याचं निरीक्षण ती नोंदवते
त्यावेळची कामं म्हणजे, गाण्यांच्या कार्यक्रमात 25 ते 30 गाण्यांची प्रस्तावना लिहून सुत्रसंचालन करणे पण आपल्याकडे Resources नसल्यामुळे आपली तयारी नाही आणि त्यामुळे सुरवातीचे काही दिवस तसली कामं टाळण्याकडेच आपला कल होता असं आदिती प्रामाणिकपणे कबूल करते
पुढे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करत ओळखीतल्या लोकांकडून किंवा मित्रमैत्रिणींनी शिफारस केल्यामुळे कामं मिळत गेली आणि आदिती एकेक पायरी पुढे चढत गेली.काही कार्यक्रमाच्या जाहिराती सकाळ ह्या वृत्तपत्रात छापून येत आणि बऱ्याच वेळा आयोजक मंडळी नवीन चेहऱ्यांच्या शोधार्थ अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यामुळे कामं मिळण्यास त्याचा हातभार लागल्याचं आदिती सांगते
ह्या सगळ्या प्रकारात स्वतःच्या आदि एंटरटेनमेंट ह्या "यु ट्यूब" चॅनेलवर 'एक पाऊल एक्स्ट्राँ' ह्या कार्यक्रमात नुसतंच व्यवसाय एके व्यवसाय न करता समाजाप्रति भान असणाऱ्या लोकांच्या मुलाखती ती घेतेय.(तिच्या चॅनेल ला सबस्क्राईब करून मुलाखती पाहता/ऐकता येतील)
कोविडकाळात तिने आपलं ट्रेनिंग वर्कशॉप आणि हास्यनीती हा एकपात्री कार्यक्रम ऑनलाइन आणलाय
काही प्रथितयश कलाकार मंडळी कोविडकाळात फेसबुक लाईव्ह वर सहज उपलब्ध झाल्यामुळे ज्युनिअर आर्टिस्टच्या हातचं काम गेलं असा आक्षेप आदिती नोंदवते पण त्याच बरोबर ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे स्वतःही एका वेळी देशा परदेशात पोहोचू शकले ह्याचा आनंदही ती व्यक्त करते
नेटवर्किंग म्हणजे गुडविल तयार करणे असं ती मानते आणि आपल्याला रेफरन्स मिळाल्यास अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते
एवढं काम करूनही आदीतीचे पाय अजूनही जमिनीवर आहे.ती ज्या क्षेत्रात काम करते तिथे लोकप्रियतेचा सोस भल्याभल्यांना आवरत नाही पण एकदा का लोकप्रियतेला झुकतं माप दिलं की आपली साधना, आपला व्यासंग, ह्याकडे दुर्लक्ष होत असं ती मानते. सुदैवाने ह्या सगळ्याचा नैतिक पातळीवर विचार करत असल्याने आदिती ह्या प्रलोभनांपासून दूर आहे 😀(ह्याबद्दल सौमित्र सरांनी सांगितलेली गोष्टही जरूर ऐका), आदीतीच्या मते स्वतःचं ह्या क्षेत्रात येण्यामागचं प्रयोजन काय हा विचार म्हणजे एक प्रकारचा रियाजच आहे, कोविडकाळात मिळालेल्या वेळेचा स्वतःची कौशल्ये वाढवण्यासाठी उपयोग करण्याचा ती सल्ला देते.
अशा या 'आवाज की दुनिये'तल्या बहुआयामी आदितीला तिच्या कारकिर्दीच्या पुढील वाटचालीस निवडक उद्यमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Sunday, 11 April 2021
निलेश बाक्षे ची मुलाखत
डिप्लोमा च्या तिसऱ्या वर्षाला चांगले गुण मिळाल्यामुळे हातात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज ऑटो सारख्या नामांकित कंपन्यांचे ऑफर लेटर,
वडील शेतकरी, त्यात घरची बिकट परिस्थती पण 'ह्याला' मात्र अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करायची इच्छा
वडिलांनी पैशाची जुळवाजुळव करतो म्हणून धीर दिला आणि आपल्याला 'निलेश पांडुरंग बक्षे' हा हाडाचा अभियंता मिळाला.
हाडाचा अशासाठी की,
1.अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये 180 विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने निवडलेल्या दोघांपैकी एक विद्यार्थी म्हणजे निलेश (त्या अर्थाने त्याने वडिलांचा निर्णय आणि विश्वास ही सार्थ ठरविला
2.10 - 12 वर्ष अभियंता म्हणून नोकरी केल्यानंतर चाकोरीबद्ध तोच तोचपणाचा निलेशला कंटाळा आला, आपल्याला वेगळं काय करता येईल हा किडा त्याच्या डोक्यात वळवळू लागला आणि त्याचंच रूपांतर म्हणजे 'ऑटोमॅटिक बाईक आणि कार वॉशिंग सिस्टम' हे पेटंटेड मशीन बनवून त्यानं स्वतःतील 'अभियंते'पण सिद्ध केलं आणि त्यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या एका व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली
ऑगस्ट 2017 ते आजतागायत देशात आणि परदेशात मिळून साधारण दर महिन्याला 1 पेक्षा जास्त ह्या हिशोबाने निलेश ने 45 बाईक आणि 10 पेक्षा जास्त कार वॉशिंग मशीन विकल्या आहेत
ग्रामीण भारतात रोजगार वाढावा ह्या उद्देशाने आपलं हे मशीन कमीत कमी खर्चात कसं बनविता येईल, ह्यावर निलेश सध्या काम करतोय, तसेच बस वॉश करण्याचं एक पोर्टेबल मशीनही तो तयार करतोय.
क्लीनिंग ह्या क्षेत्राला ऑटोमेशन ची जोड देऊन ज्या काही नवनवीन कल्पना राबवता येतील त्या सगळ्यां निलेश ला करुन पहायच्यात
बाकी अभियांत्रिकी पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर 10 - 12 वर्ष नोकरीचा अनुभव, स्वतःचं काही तरी करण्याची उर्मी, सगळा विचार करून केलेलं डिझाइन फेल जातंय की काय असं वाटायला लावणारा ओढवलेला प्रसंग, काहीच मनाजोग घडत नसल्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयाप्रत आलेला निलेश आणि तिथून पुढे कशाचीच तयारी नसतांना निव्वळ कागदावरील डिझाइन आणि पूर्वी यु ट्यूब वर आपल्या मशीनचा अपलोड केलेला एक व्हिडिओ ह्याच्या जोरावर मिळवलेली पहिली ऑर्डर, ही सगळी कहाणी अतिशय रंजक त्यामुळे स्वतःच ऐका.
अभियंता आणि व्यावसायिक असून सुद्धा स्व-आनंदासाठी कोथरूड येथील 'प्रबोधन वाद्य पथकातर्फे गणपती मिरवणुकीत आजही ढोल वाजवणार्या निलेश ला त्याच्या पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे अनेक शुभेच्छा 💐
Monday, 22 March 2021
श्री बीमन गांधी ह्यांचा उद्योजकीय प्रवास
गेल्या आठवड्यात आपण business planning ह्या विषयाला धरून केस स्टडी मांडण्यासाठी बीमन गांधी सर ह्यांना पाचारण केलं होतं. अर्थात सुरेखच मांडले सरांनी. सर हे स्वत: business coach आहेत. प्रथेप्रमाणे पाठोपाठ सरांची मुलाखत झाली, ज्यात त्यांचा उद्योजकीय प्रवास त्यांनी मांडला.
त्यांची संपूर्ण मुलाखत आपण इथे क्लिक करून ऐकू शकता, किंवा निशांत आवळे ह्यांनी त्यातले महत्त्वाचे मुद्दे खाली मांडले आहेत तेही पाहू शकता :-
1.गुजरातमधील राजकोट येथे जन्म पण पुढे 'पुण्या' लाच आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडणारे
2.शिक्षणाने (Instrumentation and Control) ह्या क्षेत्रातील अभियंते पण पेशाने बिझिनेस कोच, मेंटर, सल्लागार ह्या सगळ्या भूमिकांत लीलया वावरणारे तरीही आपली 'सेवा' ही अमुक एका क्षेत्राशी बांधिल नाही (Domain Independent service)ह्याची आवश्यक ती जाणीव करून देणारे
3.देशातील 65 लाख व्यवसाय-उद्योग हे सूक्ष्म, लघू व मध्यम ह्या प्रकारात मोडतात व ज्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळात समर्पित असं खातं असून सुद्धा एक टक्क्यांपेक्षा कमी उद्योग पुढील पातळी गाठतात आणि ह्या (MSME) क्षेत्रात देशाला प्रगतीपथावर नेण्याची क्षमता आहे हे ओळखून आपल्या बिझिनेस कोचिंगने अशा उद्योगांना पुढील पातळीवर नेण्याचं उद्दिष्ट ठेवून गांधी सर गेली 6 वर्ष काम करतायत
4.1993 साली अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर 2015 सालापर्यंत मोठमोठया देशी व परदेशी कंपनीत वेगवेगळ्या पदांवर काम करताना व जगातले जवळपास 40 देश पालथे घालतांना मिळालेला अनुभव आज ते लघु उद्योजकांबरोबर शेअर करतायत
5.वैयक्तिक कोचिंग आणि छोट्या छोटया समूहांसाठी 'बिझिनेस क्रिटिकल स्किल वर्कशॉप' द्वारे ते मार्गदर्शन करतात
6.स्वतःच्या 'सेवे'चे मार्केटिंग करतांना समाजमाध्यमांवर सतत व दर्जेदार कॉन्टेन्ट तयार करून पोस्ट करणे व 'नेटवर्किंग' ला ते प्राधान्य देतात
7.एक वेळचं काम किंवा पोस्टिंग करून दृश्यमानता (Visibility) साध्य होत नाही, तसेच निव्वळ व्यावसायिक परतावा मिळण्यासाठी काम करण्यात आपली अधिकची क्रयशक्ती खर्ची पडते असं ते म्हणतात
8. "सॅटर्डे क्लब" चे ते मेंबर आहेत तर "भारतीय युवा शक्ती ट्रस्ट" तसेच "पुणे मॅनेजमेंट असोसिएशन" सारख्या सेवाभावी संस्थांमध्ये ते विना मोबदला कार्यरत आहेत.तिथे काम करतांना तयार झालेली विश्वासार्हता, प्रतिष्ठा आणि दृश्यमानता आपोआपच त्यांच्या व्यवसायात काम मिळवून देण्यास कारणीभूत ठरतेय.
उदा: 'भारत फोर्ज' ह्या नामांकित कंपनीचं एक प्रोजेक्ट अशाच सेवाभावी संस्थांमधील कामामुळेच त्यांना मिळालं असल्याचं ते सांगतात
9. नुकतीच त्यांची "पुणे मॅनेजमेंट असोसिएशन'च्या 'Entrepreneurship Development' च्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
10.सूक्ष्म किंवा लघु उद्योजकांना व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांची 'सेवा' कदाचित आवाक्याबाहेरची वाटू शकेल हे लक्षात घेऊन त्यांनी 'मास्टरक्लास' ही शृंखला सुरू केली आहे जिथे साधारण 8 पेक्षा कमी लोकांच्या ग्रुप ला ते एका वेळी साधारण 6 ते 7 सेशन्समध्ये व पुढे एक वैयक्तिक सेशन असं मार्गदर्शन करतायत
11.व्यवसायाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर व्यावसायिक कसा भरकटू शकतो आणि कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक असतं हे समजून घेण्यासाठी त्यांची मुलाखत जरूर ऐका
12.कामानिमित्त सतत 'जर्मनी' ला जावं लागणारे मात्र सध्या स्वयंप्रेरणेने वरचेवर 'जेजुरी' ला जाणारे श्री बिमन गांधी ह्यांना 'निवडक उद्यमी' तर्फे धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Thursday, 28 January 2021
'रीवोल्युशन' चे प्रिंटींगवाले - प्रसाद कात्रे
मुलाखतीची ठळक वैशिष्ट्ये : -
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील चढ उतारांना सामोरं जातांना त्यांनी दाखवलेला धीर आणि संयम शब्दांत बांधणं कठीण 🙆🏼♂️ माझ्या परीने प्रयत्न करतोय तरीही सगळ्यांना हीच विनंती करेन की प्रत्यक्ष मुलाखत ऐकाच 🙏
1.जन्मताच कलेची आवड असणारे कात्रे सरांचं बालपण 'भोर' ह्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं.आजोबा शाडू मातीचे गणपती बनवायचे आणि सुदैवाने आजी-आजोबा 'हे करू नको, ते करू नको' असला सल्ला देणारे नसल्यामुळे कात्रे सरांचं मातीशी आणि पर्यायाने कलेशी नातं घट्ट होत गेलं.आईकडून गर्भातच शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रकला इत्यादींच देणं लाभल्याचं ते सांगतात.पुढे हि चित्रकलाच त्यांच्या आयुष्याची श्रेयस आणि प्रेयस झाली
2. एका शब्दात सांगायचं तर छपाई किंवा प्रिंटिंग हा कात्रे सरांचा व्यवसाय, पण त्याआधी आणि नंतरच्याही बऱ्याच प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि म्हणूनच सौमित्र सर त्यांना ' प्रिंटिंगवाले ' कात्रे सर असं संबोधतात
3.कुठल्याही व्यावसायिकाला विझिटिंग कार्ड, चलन किंवा जाहीरात पत्रक असं काहीतरी छापायला प्रिंटर ची गरज लागतेच.
प्रिंटिंगच्याही आधी डिझाइन करतांना ग्राहकाचं उत्पादन काय, कुठल्या भागात व्यवसाय करतात, वापरणारा ग्राहक वर्ग कोण इत्यादी गोष्टींचा विचार करून त्याअनुरूप आवश्यक त्या गोष्टी सुचवण्यापासून ते डिलिव्हरी देण्यापर्यंत ग्राहकाला जास्तीत जास्त मूल्याधारीत परतावा मिळवून देणे हा कात्रे सरांचा व्यवसाय मंत्र.
4.वडील हे एकटेच कमावणारे आणि कात्रे सर इयत्ता चौथीत असतांना वडिलांना मुतखड्याचा आजार झाला असतांना आपल्यालाही घर चालवण्यासाठी हातभार लावावा लागेल असं कात्रे सरांच्या मनाने घेतलं.संगीत आणि चित्रकला ह्या आपल्या आवडत्या छंदांपैकी संगीत क्षेत्रात काही एक मजल गाठून उत्पन्न मिळवण्याप्रत यायला वेळ लागेल हा विचार त्यावेळी कात्रे सरांनी केला आणि चित्रकलेत ते अधिक रस घेऊ लागले.अगदी तहानभूक हरपून दिवसच्या दिवस त्यांचा चित्र काढण्यात जात असे.
5.गुळवणी महाराजांचे अनुयायी आणि कात्रे कुटुंबाला वंदनीय असे श्री मामा देशपांडे यांनी दहावी नंतर कात्रे सर चित्रकलेत करिअर करणार असे वडिलांनी सांगताच थोडे नाराज झाले पण 2 - 3 दिवसातच कात्रे सरांची घालमेल पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना आपला हा छंद जोपासण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला मात्र त्याच्या बऱ्यावाईट परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल असेही बजावले.
6.अभिनव कॉलेजात कलेशी संबंधित शिक्षण घेत असतांना 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' पुणे ह्या संस्थेने कॅलिग्राफी (तेव्हाचं लेटरिंग आणि टायपोग्राफी) संदर्भातील कामासाठी कात्रे सरांची निवड केली.
मुंबई दूरदर्शनच्या एका कार्यक्रमाची श्रेयनामावली बनवून देण्याचं काम होतं आणि ते कात्रे सरांच्या अगदी हातचा मळ.
तिथे कात्रे सरांना छपाईतील पुनरुत्पादनाच्या (मूळ प्रतिसारख्याच अधिक प्रति तयार करण्याच्या) तंत्रज्ञानाची ओळख झाली.माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टींचं भांडारच उघडल्यासारखं झालं आणि त्याच्या कुतूहलापोटी कात्रे सर अधिक माहिती मिळवत गेले आणि नकळतपणे चित्रकलेची आवड असणाऱ्या कात्रे सरांचा 'प्रिंटिंग' च्या दुनियेत प्रवेश झाला.अभिनव मध्ये फोटोग्राफी शिकल्याचाही खूप उपयोग झाला हे ते इथे आवर्जून नमूद करतात.
पहिलंच काम 'लगान' चित्रपटातील अभिनेत्री 'सुहासिनि मुळ्ये' ह्यांच्यासाठी काही एक शक्कल लढवून काचेवर 'छपाई' केल्याचं ते सांगतात
7.त्याकाळी सरासरी 120 ते 150 रुपये पगार असताना व कॉलेजमध्ये शिकत असतानाच कात्रे सरांना मासिक 630 रुपये पगारावर FTII मध्ये काम करण्याची संधी मिळाली.त्यात कॉलेजमधून सकाळी 10 वाजताच निघून जाण्याची सवलतही होती. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम आणि 5 नंतर अगदी रात्री 1 वाजेपर्यंत कात्रे सर अनिमेशन शिकण्यात वेळ घालवू लागले. दोनेक वर्षांनी कात्रे सर तेथील जॉब सोडून एका 'ऍड एजन्सीत' रुजू झाले. एकच व्यक्ती ती एजन्सी चालवत होता त्यामुळे तिथे कात्रे सरांना भरपूर 'क्रिएटिव्ह स्पेस' मिळाला, निर्णयक्षमता वाढली आणि कामाचं समाधान ही मिळालं.
पण काही वर्षांनी कमअस्सल दर्जाच्या लोकांनी काम मिळवण्यासाठी अवाजवी सवलत देणे, त्याच काळात इंदिरा गांधींची हत्या आणि एकंदरच कामाच्या ठिकाणी अविश्वास अशा कारणांनी कात्रे सरांनी तेथील नोकरीचा राजीनामा दिला. स्वतःचा व्यवसाय सुरू करतांना कामाच्या दर्ज्याबाबत कसलीच तडजोड करायची नाही व आपले सहकारी हे आपल्यासाठी नव्हे तर आपल्याबरोबर काम करतायत अशी समान वागणूक त्यांना द्यायची असा त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा नियम ठरला.
8.छापील कागदाचा अपव्यय कात्रे सरांना मान्य नाही त्यात कुठलही काम व्यवस्थित पूर्ण करतांना थोडे अधिकचे कागद लागतातच.
एकदा काम हातात घेतल्यावर आज मशीन बिघडलंय किंवा मशीन ऑपरेटर आला नाही वगैरे कारणं ग्राहकांना सांगणं कात्रे सरांना अजिबात मान्य नाही त्यामूळे कुणावरही अवलंबित्व नसणारं, कागद वाया न जाता कुठल्याही आकाराच्या आणि कितीही प्रति काढता येतील असं एखादं तंत्रज्ञान नक्कीच अस्तित्वात असणार आणि म्हणून मित्रांच्या मदतीने इंटरनेटवर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना उत्तर सापडलं. मूळ प्रतिसारख्याच अनेक प्रति काढणं अर्थात ज्याला आपण (फोटो कॉपी म्हणतो) आणि ते देऊ करणारी कंपनी म्हणजे 'झेरॉक्स' ह्याची कात्रे सरांना माहिती झाली आणि त्यांच्या छपाई क्षेत्रातील 'डिजिटल' प्रवासाला सुरुवात झाली.
9.2006 - 07 साली 34 लाख रुपये किंमतीच 'झेरॉक्स' कंपनीचं मशीन अमेरिकेतुन पुण्यात मागवायचं असं कात्रे सरांनी ठरवलं. तशी ही त्याकाळी गरुड झेपच पण कात्रे सर त्या तंत्रज्ञानाने पूर्ण झपाटलेले त्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन मशीन मागवायचं ठरलं. बँकेनेही सुरुवातीला कर्ज देऊ असं मान्य करून ऐन वेळेला नाही म्हटलं आणि 34 लाख रुपये जमा करतांना कात्रे सरांची फार त्रेधातिरपीट उडाली पण तो ही अडथळा त्यांनी पार केला आणि मशीन पुण्यात आलं. झेरॉक्स कंपनी चं भारतातलं हे बहुधा पहिलं मशीन.
10.मशीनच्या वापराची माहिती घेतांना कुठल्या गोष्टी नाही करायच्या ह्याची अचूक नोंद कात्रे सरांनी करून ठेवली
12.सुझलॉन कंपनीचं एक काम आपल्या कुवतीच्या बाहेरचं आहे हे जाणवल्यामुळे त्यांच्या मित्राने कात्रे सरांना ह्या कामाबद्दल माहिती दिली.
खिशात दमडीही नसतांना कामावरील विश्वास व प्रामाणिकपणा कात्रे सरांच्या बोलण्यातून जाणवल्यामूळे, सुझलॉन कंपनी ते काम कात्रे सरांच्या अटी शर्ती वर त्यांना देऊ केलं.
13.प्रिंटिंग क्षेत्रात 'ऑस्कर' शी तुल्यबळ ठरेल अशा 'PIXI' ह्या पुरस्काराने कात्रे सरांना गौरवण्यात आले आहे. दुदैवाने पासपोर्ट वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित ह्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही पण झेरॉक्स कंपनीनं इथे पुण्यात एक छोटेखानी समारंभ आयोजित करून कात्रे सरांचा यथोचित गौरव केला
14.तशाच अजून एका कार्यक्रमात स्वतःकडच्या मशीनवर छापलेलं पुस्तक त्यांनी 'झेरॉक्स' कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरला दाखवलं आणि तो हबकलाच.हे काम आपल्याच कंपनीच्या मशीनवर केलंय ह्यावर त्याचा विश्वासच बसेना.त्याने लागलीच 'इंडियन प्रिंटर्स अँड पब्लिशर्स' ह्या मासिकाचा संपादक त्या कार्यक्रमात हजर होता त्याला बोलावून ताबडतोब कात्रे सरांची मुलाखत घ्यायला लावली.
15. वैयक्तिक आयुष्यात बरीच वादळं कात्रे सरांनी झेलली.
वडिलांना विस्मृतीचा आजार आणि त्यातच त्यांचं 2014 साली निधन, पुढे कात्रे सरांची आई कर्करोगाने गेली.आईच्या निधनानंतर चार महिन्याच्या कालावधीत धाकटा मुलगा रोशनला रक्ताचा कर्करोग असल्याचं निष्पन्न आणि अजूनही रोशनवर उपचार सुरू आहेत पण कात्रे सर डगमगलेले नाहीत आणि म्हणून त्यांना भेटलं की माझ्यातील सकारात्मकता दुप्पट होते असं सौमित्र सर म्हणतात.
16.त्यांना इथेच थांबायचं नाही.
स्वतः सारखं दर्जेदार आणि प्रामाणिक काम करणारी, पर्यावरणाची काळजी करणारी, ग्राहकांना त्यांनी दिलेल्या कामाचं समाधान आणि मोल मिळवून देणारी, अशी माणसं त्यांना तयार करायची आहेत.
इथे ते त्यांची सहकारी राजश्री जी अतिशय समर्पित होऊन काम करते तिचा जरूर उल्लेख करतात.
17.पुणे विदयार्थी गृहाच्या एका पुस्तकाच्या उदघाटनाप्रसंगी त्यांनी कात्रे सरांनाच वक्ता म्हणून पहिल्यांदा बोलायला सांगितलं,
तसेच सॅटर्डे क्लबच्या 'उद्योग दिंडी' ह्या समारंभात पडदयावर आधी भारताचा तिरंगा झळकला आणि त्यावर नंतर अशोक चक्र, पुढे अशोक चक्र हळूहळू धूसर होत जाऊन कात्रे सरांनी 'उद्योग दिंडी' चा केलेला लोगो झळकला.
वरील दोन प्रसंग आपल्याला मानाचे आणि कायम स्मरणात राहणारे असल्याचे ते सांगतात.
आपल्या वागण्या बोलण्यातून, कामातून, ओघवत्या वाणीतून व्यावसायिकतेचा आणि सकारात्मक विचारसारणीचा वस्तुपाठच घालून देणाऱ्या प्रसाद कात्रेंना 'निवडक उद्यमी' तर्फे मानाचा मुजरा 🙏🏾आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
शलाका टोळ्ये - 'IP Adventure LLP' ची पार्टनर - ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि पेटंट एजंट
मुलाखतीची ठळक वैशिष्ट्ये :-
1. सौ शलाका टोळ्ये हिचा जन्म मुंबईतील उपनगर - डोंबिवलीचा, तिथेच बालपण, महाविद्यालयीन शिक्षण, रसायनशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम तिने पूर्ण केला
2. यु.एस.व्हिटामिन ह्या कंपनीच्या 'संशोधन व विकास' ह्या विभागात अधिकारी पदावर 7 वर्षे कार्यरत
3.त्याकाळात प्रयोगशाळेत काम करताना वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियांचे निरीक्षण, नमूने तयार करणे, त्याच्या नोंदी, कच्चा माल मागविण्यापासून ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन चाचणी करणे इत्यादी कामाचा अनुभव
4.दरम्यानच्या काळात लग्न व मुलगी झाल्यानंतर तिच्या संगोपनासाठी शलाकाने तात्पुरत्या काळासाठी व्यावसायिक कामातून रजा घेतली
5.पुढे पती श्री राजीव टोळ्ये ह्यांची नोकरीनिमित्त पुण्यातील कोथरूड भागात बदली झाल्यामुळे जून 2008 साली शलाका पुण्यात आली
6.चार ते पाच महिने मैत्रिणीच्या केकशॉप मध्ये सुपरवायझर म्हणून काम केल्यावर एस.एन.डी.टी. महाविद्यालयात रसायनशास्त्राची व्याख्याता म्हणून ती रुजू झाली
7.जवळच्या पाळणाघरात मुलीला ठेवून महाविद्यालयात शिकवणे अशी कसरत जवळपास वर्षभर शलाकाने केली
8.पुढे 2010 साली पुण्यातील हडपसर भागात रहायला गेल्यामुळे शलाकाला अध्यापन अर्धवट सोडून द्यावे लागले
9.पुढील 5 ते 6 वर्षे आठवी ते दहावीच्या विदयार्थ्यांना विज्ञान व गणित विषयाची शलाका शिकवणी देत असे
10.दरम्यानच्या काळात कौटुंबिक जबाबदारीमूळे नोकरी किंवा व्यवसायात खंड पडलेल्या पदवीधर, इंजिनियर किंवा अगदी पीएचडी मिळवलेल्यांना सुद्धा व्यावसायिकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या भारत सरकारच्या 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' विभागाच्या 'महिला वैज्ञानिक उपक्रमाची'(Woman Scientist Scheme) माहिती एका मैत्रीणीने शलाका दिली
11.ह्या उपक्रमाअंतर्गत शलाका ने 'बौद्धिक मालमत्ता अधिकार' ह्या विषयावरील 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, तसेच त्याच्या अभिमुखतेसाठी महिनाभर दिल्लीला देखील वास्तव्य करावं लागलं
12.त्यानंतर वर्षभर एका कायदेविषयक कंपनीत ट्रेडमार्क व पेटंट संदर्भातील खटले दाखल करणे, पेटंटचा मसुदा तयार करणे इत्यादी कामात प्राविण्य मिळवतानाच, अभ्यास करून 'पेटंट एजंट' ची परीक्षा उत्तीर्ण होऊन शलाका 'नोंदणीकृत भारतीय पेटंट एजंट' झाली
13.संभाव्य संशोधक आपल्या संशोधनाबद्दल भावुक असतात आणि आपल्या संशोधनाला कुठल्याही परिस्थितीत मान्यता मिळावी अशीच त्यांची इच्छा असते परंतु त्यांच्यासारखे संशोधन जगात पूर्वी कुठे झालेले आहे का हे पाहणे पेटंट एजंटचे मुख्य काम. ह्या वर्षभरात संभाव्य संशोधकांशी बोलताना ह्या विषयावर जनजागृती करण्याची गरज शलाकाच्या लक्षात आली होती व त्याबद्दल तिने ब्लॉग लिहायचा प्रयत्न देखील केला होता
14.बौद्धिक मालमत्ता अधिकार संदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण करतांना भेटलेल्या मैत्रिणीबरोबर (सौ पल्लवी कदम) सतत ह्या जनजागृती व्यवसायाबद्दल चर्चा होत असे आणि म्हणून त्यादोघींनी 13 सप्टेंबर 2019 रोजी IP Adventure Llp ही कंपनी सुरू केली
15.कंपनी सुरू झाल्यापासून 'बौद्धिक मालमत्ता अधिकार' ह्या विषयावर,
-10 ते 12 जनजागृती व्याख्याने,
-15 पेटंट
- 8 ते 10 ट्रेडमार्क त्यांच्यातर्फे नोंद झाली आहेत.
-हार्ट ऍग्रो इन्स्टिट्यूटचे प्रोसिक्युशन पेटंट वर्षभरातच मान्यता मिळण्याच्या वाटेवर आहे
-इंडस्ट्रीयल डिझाइन संदर्भातील पेटंटवर देखील काम सुरू आहे
शलाका आणि पल्लवी ' भारतीय युवा शक्ती ट्रस्ट च्या मेंटर्स आहेत.
16.ताणतणाव दूर करण्यासाठी वाचन आणि व्यायामाला शलाका महत्व देते पण तिचं कामं च तिची आवड असल्यामुळे दमत जरी असली तरी फारसा तणाव येत नाही असं ती सांगते
17. परदेशी मुलांना अगदी तपशिलात नसली तरी 'बौद्धिक संपदे' बद्दल किमान माहिती असते, त्यामुळे आपल्याकडच्या मुलांना विद्यार्थीदशेतच ह्या क्षेत्राची माहिती व्हावी आणि त्याचे महत्व पटल्यामुळे त्यांच्याकडून नवनिर्मिती व्हावी, निरनिराळे शोध लागले जावे ह्या दृष्टीने प्रयन्त करण्याचे आणि खऱ्या अर्थांने आपली कंपनी वैश्विक करण्याचे शलाका आणि पल्लवीचे उद्दिष्ट आहे.
त्यांच्या ह्या उपक्रमाला 'निवडक उद्यमी' तर्फे शुभेच्छा 💐
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या
www.ipadventure.in
गायत्री अकोलकर - "विद्युत विकास" ह्याकंपनीची तिसऱ्या पिढीची महिला उद्योजिका
मुलाखतीची जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये :
1.आजोबांपासूनचा व्यवसाय आणि घरात सतत त्यासंबंधीचे शब्द जरी कानी पडत असले तरी त्याच क्षेत्रात अभियांत्रिकीची पदवी आपण घ्यायची असं ठरविणे आणि जिद्दीने ती मिळवणे ह्याबद्दल गायत्रीचे अभिनंदन
2.सर्वसाधारणपणे पुरुषांचाच वावर असणाऱ्या ह्या व्यवसायात येताना स्त्रीत्वाचा कसलाही न्यूनगंड न बाळगणे व वडीलांनीही काही पायघड्या घातल्या नाहीत आणि त्यामुळे तो प्रवास रंजक किंवा छान झाला ह्या गायत्रीच्या विचारसरणीचे देखील कौतुक
3.सासऱ्यांच्या व्यवसायात येण्याचा गायत्रीचे पती श्री कुणाल जोशी यांचा निर्णय तसा बऱ्याच अर्थानी धाडसी म्हणावा असा 🙂
4.ग्राहकांच्या प्रतिक्रियेकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांचे विजेचे बिल कमी करण्यासाठी काय करता येईल ह्या विचाराने गायत्रीने पुढे एनर्जी मॅनेजमेंट ह्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे
5.कमिन्स इंडिया ह्या कंपनीत काम करतांना 'एनर्जी सेविंगचे प्रारूप' तयार करून दिल्यामुळे कंपनीचे दरवर्षाला 67 लाख रुपये वाचतायत हे गायत्री कंपनीतुन निघाल्यानंतरही तिच्या परदेशी वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःहून तिच्या 'लिंकड इन' प्रोफाइल वर आवर्जून सांगणे
6.ऑफिस मध्ये बसूनच काम करण्याचा रटाळपणा न मानवल्यामुळे 'विद्युत विकास' साठी पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय
7.'विद्युत विकास' ह्या घरच्याच कंपनीत 'एनर्जी ऑडिट' हा पूरक असा अजून एक महसूल स्रोत सुरू करणे
8.'एनर्जी ऑडिट' ह्या क्षेत्रात शैक्षणिक संस्था व बँका ह्या दोन उद्योगक्षेत्रात वेगवेगळे ग्राहक कायमस्वरूपी जोडून घेणे
9.पती श्री कुणाल जोशींनी कॉर्पोरेट क्षेत्रातील ग्राहक जोडणे
10.उद्यम रजिस्ट्रेशन असल्यामुळे सरकारी टेंडर भरताना EMD (Earnest Money Deposit) बात करून घेता येतो ही महत्वपूर्ण माहिती देणे
11.घरावर सोलर पॅनल बसवून तयार होणारी वीज वापरून एम एस इ बी च्या वीज वापरात वजावट करून देणे अशा प्रकारचे प्रकल्प सध्या गायत्री राबवतेय.
तिच्या व्यवसायतील पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे
शुभेच्छा 💐
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या
www.vidyutvikas.com















