वयाच्या विशी - पंचविशीत पोटापाण्यापूरतं शिक्षण घेऊन एकदा का आपण कामाधंद्याला लागलो की पुन्हा शिक्षणाकडे वळणं कठीण.पैशाचं आकर्षण, नोकरीधंदा व संसारामुळे बदललेले प्राधान्यक्रम आणि शिक्षणासाठी लागणारी मानसिक शिस्त, ऊर्जा गमावल्यामुळे असं होत असावं पण डॉ गिरीश तेलंग ह्यांनी हा समज खोटा ठरवण्याचा जणू पण केला असावा असंच त्यांची मुलाखत घेताना जाणवलं.1983 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून ते मागच्या वर्षी (नोव्हेंबर 2020) मध्ये वकिलीची (L.L.B.)परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत डॉक्टरांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेल्या पदव्या ऐकल्या आणि श्रीकांत जीचकारांची आठवण झाली.
डॉ.तेलंग मूळचे 'जालन्या'चे.1985 साली डिप्लोमा इन फार्मसी ची पदवी त्यांनी मिळविली.पुढे 1990 साली डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवीदेखील मिळवली पण अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचं मन रमलं नाही आणि ते मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून एका कंपनीत रुजू झाले.1990 ते 2000 ह्या दहा वर्षाच्या कालावधीत, वयाच्या 27 व्या वर्षीच सर्वात 'तरुण रिजनल हेड' म्हणून ते नावाजले गेले. ह्याच दरम्यान म्हणजे 1995 च्या आसपास अनौपचारिकरित्या लोकांना फार्मा क्षेत्रात नोकरी मिळवून देण्यासाठी ते मदत करत होते आणि त्याच सुमारास पुढेमागे आपलंही स्वतःचं केबिन/ऑफिस, कन्सल्टन्सी असावी असे विचार त्यांच्या मनात रुजू लागले असं ते सांगतात.'रिक्रूटमेंट कन्सल्टंट' ह्या व्यवसायातली संधी आणि पुढे जाऊन पी.एच.डी. करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल ह्या हेतूने 3 जानेवारी 2000 साली डॉक्टर पुण्यात आले.सकाळी 10 ते 6 तुमच्या ऑफिसात काम आणि संध्याकाळनंतर मला माझ्या कन्सल्टन्सीच्या कामासाठी वेळ मिळावा ह्या अटीवर डॉक्टरांनी एका कंपनीत काही काळ नोकरी केली आणि 2001 साली फार्माफोकस ह्या नावाने पुण्यातील कर्वे रोड येथे स्वतःची रिक्रूटमेंट कन्सल्टन्सी सुरू केली. पुढे 2004 साली त्यांनी सदाशिव पेठेत ऑफिस थाटलं आणि आजपर्यंत तेथूनच ते आपला व्यवसाय चालवतायत
फार्मा क्षेत्रातच काम करायचं ह्याचा आडाखा मनात पक्का असल्यामुळे 2001 सालीच डॉक्टरांनी 'फार्माफोकस' ह्या नावाचं ट्रेडमार्क करून घेतलं.
रिक्रूटमेंट क्षेत्राशी संबंध असला तरी वृत्तपत्रात जाहिराती देण्यापासून ते कंपन्यांबरोबर कंत्राट करतांना कुठले मुद्दे विचारात घ्यावे इत्यादी गोष्टी शिकण्यात 2 ते 3 वर्षे लागल्याचं डॉक्टर नमूद करतात. मेडिकल रेप्रेझेन्टेटिव्हज् ना तेव्हा मागणी असल्यामुळे आणि फार्माफोकसची जाहिरातदेखील होईल ह्या उद्देशाने डॉक्टर 'How to become MR ?' ह्या विषयावर ट्रेंनिग वर्कशॉप देखील घेत. कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग हे दोन्ही विषय हातात हात घालून जात असल्यामुळे 2004 ते 2011 ह्या 7 वर्षात दर रविवारी डॉक्टर वेगवेगळ्या विषयांवर ट्रेनिंग घेत असंत.कंपन्यांची नोकरभरतीची जाहिरात पाहिल्यावर वृत्तपत्रातील त्याची कात्रणं डॉक्टर कापून ठेवत पण पत्रव्यवहार मात्र 8 ते 10 दिवसांनंतर करत (त्यामागील कारण मुलाखतीतच ऐका)
सलग 4 वर्षे एकाच कॉलेजमध्ये 'फार्मा क्षेत्रातील करिअरच्या संधी' ह्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉक्टरांना आमंत्रित केलं जात होतं
डॉक्टरांना स्वतः त्या क्षेत्रात अनुभव असल्या कारणाने फार्मा क्षेत्रातदेखील 'सेल्स आणि मार्केटिंग' ह्याच विभागात ते प्राधान्याने नोकरभरती करत आणि त्याअनुषंगाने त्यांनी स्वतःची टीम देखील तयार केली आहे. फार्माफोकस साठी कर्मचारी नेमताना उमेदवाराला दहावीला किमान 75 टक्के गुण मिळालेले असावेत, ती व्यक्ती 7 किलोमीटरच्या परिघातच वास्तव्यास हवी जेणेकरून येण्याजाण्यात अधिकचा वेळ जाणार नाही आणि क्रयशक्ती टिकून राहील तसेच फार्मा क्षेत्रातील तज्ञ हवी असे निकष ते लावतात.कंपनीच्या यशात सहकाऱ्यांचा वाटा मोठा आहे असं डॉक्टर मानतात आणि आपल्या सहकाऱ्यांच्या व्यावसायिक वाढीसाठी जातीने प्रयत्न केल्यामुळे बरेचसे जुने सहकारी आजही फार्माफोकस सोबत असल्याचं ते आवर्जून नमूद करतात.
कंपन्यांकडून कशा प्रकारचा उमेदवार हवाय हे तपशिलात समजून घेतल्यामुळे व प्राथमिक फेरीच्या मुलाखतीत एखाद्या पदासाठी आवश्यक ते शिक्षण व उमेदवाराच्या जमेच्या बाजू पारखून शक्य तितका योग्य उमेदवार पुरविल्यामुळे सगळ्या व्यावसायिक कंपन्यांशी फार्माफॉकसचे उत्तम संबंध आहेत.ही कामाची संस्कृती रुजवण्यासाठी डॉक्टरांनी प्रचंड बौद्धिक मेहनत घेतलीये.'गुणवत्ता व्यवस्थापन' ह्या विषयाचं शिक्षण घेतलं असल्याने कामाचा दर्जा राखायचा तर त्यात सातत्य हवं आणि हे सातत्य राखायचं तर कामाच्या पद्धतींचं प्रमाणिकरण आवश्यक आहे हे उमजल्यामुळे त्यांनी त्याच्या लिखित स्वरूपात नोंदी करून ठेवल्या आहेत. कामाची एक चौकट आखून ठेवलीयेय. नवीन कर्मचारी फार्माफोकसमध्ये रुजू झाल्यास त्याला ह्या लिखित स्वरुपातल्या नोंदी वाचण्यासाठी दिल्या जातात ज्याने त्या व्यक्तीस आपल्या कामाचा आवाका समजतो.पुढील 3 ते 4 महिने त्याला प्रत्येक कामात सहकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन केलं जातं. उमेदवारांचे अर्ज पोर्टलवरून कसे शोधायचे, त्यांना कुठले प्रश्न विचारायचे, कंपन्यांबरोबरचं संभाषण कसं असावं, मुलाखतीचे पत्र कसे लिहावे इत्यादीबद्दल सराव करून घेतला जातो. ह्यानंतरही एखादा कर्मचाऱ्याला यशस्वीरीत्या उमेदवार कंपन्यांमध्ये दाखल करून द्यायला 3 - 4 महिने लागू शकतात हे डॉक्टरांनी गृहीत धरलेलं आहे आणि त्यासाठीच कुठलाही व्यक्ती कर्मचारी म्हणून रुजू करून घेण्याआधी त्याच्या किमान 6 महिन्याच्या एकूण खर्चाची (Cost to company) डॉक्टर तजवीज करून ठेवतात. ही सगळी प्रक्रिया कमालीची व्यावसायिक आणि दर्जेदार असल्यामुळे ह्यातून प्रत्येक व्यावसायिकाला घेण्यासारखं बरंच आहे.
2009 - 2010 मध्ये एक काळ अडचणींचा असा आला होता की 4 कर्मचारी मिळून 4 महिन्यात एकही उमेदवार रिक्रुट करू शकले नाही, अर्थात संयम राखल्यामुळे पुढे ती व्यवसाय पोकळी भरून काढता आली. मुदलात रिक्रूटमेंट ह्या व्यवसायाचं प्रारूपंच असं आहे की आज केलेल्या कामाचा मोबदला हा 3 ते 4 महिन्यांनी मिळतो. उमेदवार 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ कंपनीत 'टिकला' तरच 'रिक्रूटमेंट कन्सल्टंट' ना त्यांची व्यावसायिक फी दिली जाते आणि ह्या 3 महिन्यात बऱ्याच गोष्टींवर आपलं पूर्णतः नियंत्रण नसल्यामुळे संयम राखणं आवश्यक आहे असं डॉक्टर सांगतात.
मागच्या वर्षी (2020) मध्ये वकिलीची (L.L.B.) पदवी मिळवल्यानंतर इच्छापत्र किंवा मृत्युपत्र ह्या विषयावर आपल्या समाजात बरेच गैरसमज आहेत असं डॉक्टरांना जाणवलं आणि त्यांनी ह्या विषयावर जनजागृती करण्याचं मनावर घेतलंय. त्यासाठी आजवर त्यांनी जवळपास 8 वेबिनार्सही घेतली आहेत.
आयुष्यभर आपण कष्टाने मिळवलेला पैसा किंवा स्थावर/जंगम मालमत्तेचा आपल्या पश्चात योग्य विनियोग व्हावा आणि आपल्या वारसदारांना कसलाच मनस्ताप होऊ नये ह्यासाठी चालढकल न करता आपण धडधाकट असतांनाच प्रत्येकाने मृत्युपत्र करून घेण्याचा ते सल्ला देतात.
नेटवर्किंगचं महत्व अधोरेखित करतांना उत्तम संबंध प्रस्थापित करण्याला ते प्राधान्य देतात. व्यावसायिक परताव्याचा उद्देश आपोआप साधला जातो असं ते म्हणतात
निवडक उद्यमी हे उद्यमींचे डिजीपीठ आहे, इथे होणाऱ्या चर्चांमुळे विचारांचे आणि माहितीचे आदानप्रदान होते ज्याचा व्यवसायात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे प्रचंड उपयोग होतो असं ते नमूद करतात.
बिझिनेस मॅनेजमेंट, रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह, हॉस्पिटल रिसेप्शनिस्ट, आणि मृत्युपत्र ह्या आणि इतर बऱ्याच विषयावर डॉक्टर वर्कशॉप देखील घेतात.
डॉक्टर गिरीश तेलंग ह्यांनी आजवर मिळवलेल्या पदव्या खालीलप्रमाणे,
1. सन 1985 - डिप्लोमा इन फार्मसी
2.1990 - डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग
3.1993 - बॅचलर ऑफ आर्टस्
4.1994 - डिप्लोमा इन बिझिनेस मॅनेजमेंट
5.1995 - मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट सायन्स
6.2005 - मास्टर ऑफ फिलॉसॉफी - M Phil (ह्युमन रिसोर्स)
7.2015 - डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी - Ph.D - (ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट)
8. 2020 - L.L.B
इतर शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाचा गाढा अभ्यास असल्यामुळे तो डॉक्टरांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत वागण्या - बोलण्यात स्पष्ट जाणवतो. वेळेत प्रतिसाद देणं, योग्य तयारीनिशी विषय मांडणं, इतरांच्या वेळेचा आदर राखणं आणि मुख्य म्हणजे नम्रपणा हे इतक्या दिवसांत डॉक्टरांबरोबर झालेल्या संभाषणातून भावलेले गुण.
डॉक्टर गिरीश तेलंग यांनी त्यांच्या व्यावसायिक प्रवासातून दिलेल्या प्रेरणेस निवडक उद्यमी तर्फे मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील व्यावसायिक आणि शैक्षणिक कारकिर्दीस अनेक शुभेच्छा 💐
विद्या विनयेन शोभते 💐
वा. डॉ. तेलंग व ही केस स्टडी लिहिणारे लेखक, दोघांचे अभिनंदन.
ReplyDeleteतेलंग सरांची संपुर्ण माहीती फार छान पध्दतीने शब्दांकित केली आहे. खुप प्रेरणा देणारी व्यक्ती.
ReplyDeleteतेलंग सरांची संपुर्ण माहीती फार छान पध्दतीने शब्दांकित केली आहे. खुप प्रेरणा देणारी व्यक्ती.
ReplyDeleteअत्युत्कृष्ट डॉ.गिरीशजी तेलंग, तुमची अत्यंत परिश्रम घेण्याची तयारी व असामान्य जिद्द तसेच वाखाणण्याजोगी चिकाटी त्यामूळे यशाची शिखरे तुमच्या पायाशी लोळण घेत आहेत. अत्यंत कठिण परिस्थिती व मार्गदर्शनाचा अभाव असतानांही तुम्ही अंगी बाळगलेला आत्मविश्वास तसेच अतूट ध्येयनिष्ठा या बळावर तुमचे सामाजिक उत्तरदायीत्व या नात्याने हजारोन्ना मिळवून दिलेला रोजगार निश्चीतच अनेकांना प्रेरणादायी आहे व भविष्यातही राहिल याबाबत शंका नाही.आपण नवयुवकांना अविरतपणे मार्गदर्शन करुन प्रेरणा द्यावी,ही विनंती.
ReplyDeleteअत्युत्कृष्ट डॉ.गिरीशजी तेलंग, तुमची अत्यंत परिश्रम घेण्याची तयारी व असामान्य जिद्द तसेच वाखाणण्याजोगी चिकाटी त्यामूळे यशाची शिखरे तुमच्या पायाशी लोळण घेत आहेत. अत्यंत कठिण परिस्थिती व मार्गदर्शनाचा अभाव असतानांही तुम्ही अंगी बाळगलेला आत्मविश्वास तसेच अतूट ध्येयनिष्ठा या बळावर तुमचे सामाजिक उत्तरदायीत्व या नात्याने हजारोन्ना मिळवून दिलेला रोजगार निश्चीतच अनेकांना प्रेरणादायी आहे व भविष्यातही राहिल याबाबत शंका नाही.आपण नवयुवकांना अविरतपणे मार्गदर्शन करुन प्रेरणा द्यावी,ही विनंती.
ReplyDeleteDr.Girishji Congratulations &Best wishes for ur future Achievements
ReplyDelete