Tuesday, 25 May 2021

एका बीजापोटी, तरु कोटी, जन्म घेती सुमने फळे I आधी बीज एकले - स्मिता सोवनी यांची मुलाखत

बचपन से बडा कोई स्कूल नही, क्युरिओसिटी से बडी कोई टीचर नही - पार्लेजी बिस्किटाच्या जाहीरातीतील हि 'Tagline' डॉ स्मिता सोवनी ह्यांची मुलाखत ऐकताना सतत आठवत राहीली

महाविद्यालयात सुरुवातीला हुशार नसतानाही वाणीज्ज्य शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मानांकन प्राप्त विद्यार्थिनी आणि त्याच दरम्यान वित्त विषयाची गोडी निर्माण झाल्यामुळे पुढे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन २००२ साली डॉ स्मिता सोवनी विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे येथे वित्त विषयाच्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या 

व्यवसायात काही ठराविक लोकंच यशस्वी का होतात? पिढीजात व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसाय पद्धती आणि पैशा विषयीचा विशिष्ट दृष्टीकोन इत्यादी मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढे त्याच विषयांवर प्रबंध लिहून २००७ साली Ph. D (डॉक्टर ऑफ फिलोसोफी) ची पदवी मिळवली. (Ph D करतांनाची त्यांची निरिक्षणे आणि त्याचं त्यांनी केलेलं विश्लेषण प्रत्यक्ष मुलाखतीत ऐकण्याची संधी कुठल्याही उद्यमीने दवडू नये अशीच)

महाविद्यालयात व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना शिकवताना डॉ स्मिता सोवनी यांना जाणवलं कि, प्लेसमेंट कंपन्या आपल्याला कुठे घेऊन जाणार ह्यावर विद्यार्थी अवलंबून आहेत आणि एकंदरच आयुष्यात काय करायचं ह्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वत: काही गोष्टी आधी शिकून आत्मसात केल्या आणि व्हिजन बोर्ड ची संकल्पना जन्माला घातली. 'व्हिजन बोर्ड' म्हणजे आपल्या आयुष्याची ब्लू प्रिंट - (ती कशी काम करते ते प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका)

विद्यार्थ्यांना 'व्हिजन बोर्ड' द्वारे करिअर संदर्भात मार्गदर्शन केल्यामुळे महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतरही विद्यार्थी डॉ सोवनी च्या संपर्कात रहात आणि त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं कि विद्यार्थ्यांना एका मेंटरची गरज आहे. विद्यार्थी त्यांच्याशी अडचणीचे, सुख दुखाचे प्रसंग शेअर करत, कधी कुठलं अपयश पदरी पडलं, अपमान झाला तर ते ही सांगायचे, पण डॉ सोवनी यांची पार्श्वभूमी 'वित्त' विषयाशी संबंधित असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्याच्या त्या वेळच्या मानसिकतेचं नीटसं आकलन होत नसे आणि त्यांना असं जाणवलं कि आपण विद्यार्थ्यांना समजून घेण्यात कुठे तरी कमी पडतोय आणि म्हणून मग त्यांनी Landmark, Stress Management Professional, Silva UltraMind वगैरे मानसशास्त्राशी संबंधित विषयांचा अभ्यास करून प्राविण्य मिळविलं आणि त्याचा आपल्या समुपदेशनात उपयोग करू लागल्या 

Healing संदर्भात डॉ सोवनींच्या वाचनात काही आलं होत आणि सुरुवातीला त्यांचा त्याच्यावर विश्वास ही नव्हता पण हा सगळा खोटेपणा आहे कि खरच ह्यात काही तथ्य आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हे करून बघितलं पाहिजे आणि करायचं तर पूर्ण लक्ष केंद्रित करूनच अशी घरची शिकवणच असल्यामुळे त्या रेकी शिकल्या. ते त्यांना आवडू लागलं, जमू लागलं, म्हणून मग पहिली पायरी, दुसरी पायरी असं करत त्यांनी मास्टर्स ची पदवीदेखील मिळविली पण 'रेकी' काही त्यांनी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून निवडलं नाही. 'रेकी' चा समुपदेशन करतांना फार उपयोग होतो अस त्या सांगतात कारण दुखावलेल्या मनाच्या खुणा शरीरात कुठे तरी त्याचं अस्तित्व दाखवत असतात, उदा; वाढलेला रक्तदाब, केस गळणे, आम्लपित्त इत्यादी. अशा व्यक्तींना त्यांचे हे मानसिक आजार बरे करण्यासाठी स्वत:च्या शरीरातच अस्तित्वात असणाऱ्या 'रेकी' नामक एका शक्तीची डॉ सोवनी ओळख करून देतात व त्या शेत्रातील तज्ञांकडून सल्ला घेण्याचं सुचवतात

योग ह्या जीवनशास्त्राशी योगायोगानेच संबंध जुळला असं त्या सांगतात. घरी कुणा 'कोल्हटकर' नामक लेखकांचं असलेलं जाडजूड पुस्तक डॉ सोवनींच्या वाचनात आलं, ते ही आवडलं, मग अजून काही लेखकांची योगसूत्र वाचली, मग ते शिकवण्यासाठी काही व्यक्ती भेटल्या, वाचन घडलं आणि योगाभ्यास ही त्यांनी पूर्ण केला. डॉ सोवनींना जाणवलं कि योगामुळे आपली तब्येत उत्तम राहतेय, आपलं मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतंय, सकारात्मकता आणि आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणे हे योगामुळे चांगल्या प्रकारे जमतंय, तसेच काही उपाय नसल्यास आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची मानसिकताही रुजतेय

संगीताची आवड डॉ सोवनी ह्यांना लहानपणापासून होती, गम्मत म्हणून शाळेत असतांना गाण्याचा क्लास लावला होता पण सुरुवातीला ह्याच्याही परीक्षा द्याव्या लागतील म्हणून त्यांनी नाक मुरडलं होतं. शेवटी परीक्षा दिल्या, मग पुढच्या वर्गात गेल्या आणि कालांतराने त्याचीही गोडी लागली. सूर, ताल, राग, वाद्य वाजवणे अशी ती आवड वाढत गेली आणि पुढे संगीत विशारद पूर्ण केली. नाद आणि ध्वनी ह्यांच्याबद्दल 'सामवेदात' उल्लेख आहेत हे ऐकून माहित होतं, आयुर्वेदात 'संगीतातून मनस्वास्थ्य' अशी शाखा आहे हे ही वाचलं होतं आणि आयुष्यात जेव्हा उसंत मिळेल तेव्हा ह्या शाखेकडे वळायचं असं तेव्हाच डॉ सोवनींनी ठरवलं होत असं त्या सांगतात आणि तशा त्या आज वळल्यादेखील आहेत

नाद म्हणजे ध्वनी आणि योग म्हणजे जुळणे. आवाजांच्या दुनियेचं भान आपल्या पंचेन्द्रीयांमार्फत जोडून घेणे ह्याला नादयोग म्हणता येईल. नादयोगाची दोन महत्वाची इंद्रिय म्हणजे आपला घसा आणि कान पण त्याकडे आपण जागरूकपणे पहात नाही अस त्या म्हणतात. आपल्या घशातून निघणारा ध्वनी, वाणी आणि भाषा ह्यांच्या वापरातून आपण आयुष्यभरासाठी कुणाशी तरी नातं जोडून घेऊ शकतो किवा त्यात वितूष्ट ही येऊ देऊ शकतो (ह्याबद्दल डॉ सोवनी यांनी दिलेलं उदाहरण प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका)

गीत - संगीत हे सगळे नादयोगाचेच प्रकार. आपल्या शरीरातील सात चक्र आणि सात सुरांचा देखील संबंध आहे. 
घरात डॉ सोवनींना एक प्राचीन उपनिषिद सापडलं, त्याचा त्यांनी अधिक अभ्यास केला, पुढे गुरूंकडे जाऊन साधनाही केली आणि त्यातून मग Stress management through Nadyoga हा सुंदर कार्यक्रम तयार झाला. ह्या ध्वनींचा उपयोग करून आपल्यावर आलेला ताण कसा विसर्जित करून टाकता येईल असा तो कार्यक्रम आहे

Stress आला असल्यास राग दरबारी हा फार परिणामकारक ठरतो आणि त्याबद्दल डॉ सोवनींनी मुलाखतीत दिलेलं उदाहरण जरूर ऐका. तसा हा संपूर्ण कोर्स ५ दिवसांचा असतो पण कोर्पोरेट मध्ये कार्यक्रम करतांना मुख्यत्वे करून Stress Management वर भर असल्यामुळे ४ तासांचा वर्कशॉप आयोजित केला जातो. 

'व्हिजन बोर्ड' आणि 'करिअर' ह्यात मुलता: फरक आहे. करिअर हे अतिशय महत्वाचं असलं तरी 'व्हिजन बोर्ड' तुमच्या आयुष्याच्या इतर पैलूंवरही प्रकाश टाकतो. वास्तववादी 'व्हिजन बोर्ड' तयार केला असेल तर त्याला नक्की यश येत असं डॉ सोवनी सांगतात. त्यातही काय धरून ठेवायचं आणि कधी आहे त्या प्रवाहाबरोबर पुढे जायचं हे आपलं आपण ठरवायचं असत. करिअर आणि पैशाच्या मागे पळताना तुमच्या आवडी निवडी, कुटुंबासोबत वेळ घालवणं, उतारवयात आई वडिलांसाठी वेळ असणं, मित्र मंडळींबरोबर मजामस्ती इत्यादी गोष्टी राहून गेल्याची खंत वाटू नये ह्यासाठी 'व्हिजन बोर्ड' ही संकल्पना अतिशय प्रभावी आहे आणि ते पटवून देण्यासाठी डॉ सोवनी आपल्याला सौ सुधा मूर्ती ह्याचं उदाहरण देतात. 

सुधा मूर्ती ह्या इंजिनियर आणि एक अतिशय उत्तम करिअर डोळ्यासमोर असतांना, घरातील २ लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वत:हून घेतली, कारण हा त्यांनी तयार केलेल्या 'व्हीजन बोर्ड' मधून आलेला निर्णय होता.म्हणजे कुटुंबासाठी करतांना एखादी गोष्ट तुम्ही आवडीने करता की मारुनमुटकून जबाबदारीचं कुणीतरी ओझं टाकलंय म्हणून करता हे ठरविता यायला हवं आणि आयुष्यात वेळेतच प्राधान्यक्रम '' ठरविल्याने हि निराशा पदरी पडते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डॉ स्मिता सोवनी व्हिजन बोर्डवर घेतायत 

संगीत हे कंटाळवाणं नाही, त्यात एक सहजता आहे, झाडाला कशी फुलं, फळ लगडतात तसं आयुष्य भरभरून असावं, ओढून ताणून काही असू नये किंवा करू नये असं त्या सांगतात. संगीत हे फक्त मनोरंजन नाही तर ते आपलं आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकतं आणि त्यामुळेच 'नादयोग' आणि 'संगीत साधना' जनमानसात रुजेल ह्यालाच आपल्या पुढील आयुष्यात प्राधान्य राहील असं त्या सांगतात 

'कुतूहल' म्हणून वेगवेगळ्या गोष्टी शिकून पदव्या मिळविताना आपल्याबरोबर इतरांनादेखील त्याचा उपयोग होईल हे डॉक्टर स्मिता सोवनी ह्यांच्या आयुष्याचं श्रेयस आणि प्रेयस बनून गेलंय जणू 

अन्यथा महविद्यालयातील सुरुवातीच्या काळात स्वतः हुशार नसतानाही आजच्या पिढीला महाविद्यालयीन काळात संभ्रमावस्थेतून मार्ग दाखवण्यासाठी 'व्हिजन बोर्ड' सारखी अभिनव कल्पना त्या राबवित्या ना 

मुलाखतीत तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी केवळ उद्धृतंच केलेला नाही तर तसं त्या शब्दशः जगतायत. आधी स्वत: शिकतायत आणि मग इतरांनाही शिकवतायत. फक्त करिअर मध्ये गुंतून न पडता एक परिपूर्ण आणि भरभरून आयुष्य जगण्यासाठी 'व्हिजन बोर्ड' ची संकल्पना आणि तुकाराम महराजांच्या अभंगातील विचार बेमालूमपणे एकजीव झाल्यासारखे 

आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले |
एका बीजापोटी, तरु कोटी, जन्म घेती सुमने, फळे ||
आधी बीज एकले , आधी बीज एकले |

'नादयोग' आणि 'संगीत साधना' जनमानसात रुजविण्याच्या तुमच्या पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे अनेक शुभेच्छा 💐आणि 'व्हिजन बोर्ड' ही संकल्पना 'निवडक' साठी ही राबवावी अशी नम्र विनंती 🙏

3 comments:

  1. फारंच छान शब्दांकन! त्यामुळे स्मिता सोवनी या व्यक्तीमत्त्वाची आणि त्यांच्या कामाची माहिती झाली!

    ReplyDelete
  2. व्हिजन बोर्ड कन्सेप्ट खुप छान वाटला. मॅम तुम्ही multitalented आहात. तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

    ReplyDelete
  3. Thanks for such a wonderful commentary on the interview.

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.