Monday, 3 May 2021

आवाज कि दुनिया के दोस्तो - मै आदिती कुलकर्णी

 आवाज' हेच आदितीचं मुख्य प्रॉडक्ट असल्यामुळे तिच्या कामाचा परीघ मोठा असणार ह्याची प्रचीती केस स्टडी दरम्यान आलीच होती पण तिचा व्यावसायिक प्रवास मुलाखतीतून ऐकतांना जाणवलं की तो परीघ मोठाच नाही तर लांब आणि प्रशस्तदेखील आहे आणि तसा तो  असण्यामागे कालानुरूप होणारे बदल डोळसपणे स्वीकारत स्वतःला अध्ययावत ठेवण्यासाठी आदिती ने घेतलेली मेहनत आहे

'आवाज' हे मुख्य अस्त्र असलं तरी कार्यक्रमाचा बाज आणि मागणी ह्याप्रमाणे सादरीकरण करतांना विषय, कथा, पटकथा, आवाजातील चढ-उतार, अविर्भाव, ह्या आणि अजून बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागतं जे आदितीच्या मुलाखतीतून स्पष्ट जाणवलं आणि जसं सौमित्र सर म्हणाले तसं केस स्टडीसाठी 'बदल आणि ते स्वीकारण्याची मानसिकता' हाच विषय आदितीने का निवडला ह्यामागील मर्म उलगडलं

व्हॉइस आर्टिस्ट, सूत्रसंचालन, स्पीच आणि व्हॉइस वर्कशॉप ट्रेनर, हास्यनीती हा एकपात्री कार्यक्रम आणि "आदि एंटरटेनमेंट" हे स्वतःचे यु ट्यूब चॅनेल असे तिचे कामाचे मुख्य प्रकार असले तरी त्याच्या अलीकडे आणि पलीकडेही आदीतीने केलेल्या कामाची यादी लिहायला गेल्यास रकाने भरतील त्यामुळे प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका

2002 ते 2006 ह्या कालावधीत पुणे आकाशवाणी केंद्रावर व्हॉइस आर्टीस्ट म्हणून काम पण ह्या कामातून फारसं उत्पन्न नसल्यामुळे मनाविरुद्ध 2006 ते 11 ह्या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यात मॅनेजमेंट इनफॉर्मेशन सिस्टम (MIS) ह्या क्षेत्रात अगदी रिजनल हेड (प्रादेशिक प्रमुख) पदापर्यंत मजल (तिथे काम करताना ट्रेनिंग, प्रेझेन्टेशन,संभाषण कौशल्य ह्या अनुभवाचा पुढे सुत्रसंचालनात उपयोग झाल्याचं आदिती नमूद करते)

2011 साली 'सुत्रसंचालनात' परतताना एकूणच लोकांच्या ऐकण्याच्या सवयीत आणि चवीत  झालेले बदल आदितीने अचूक हेरले आणि त्यानुसार स्वतःत बदल घडवायला सुरुवात केली

2011 च्या आसपास खाजगीतली व्हॉइस आर्टिस्ट ना मिळणारी बरीच कामं रेडिओवरील (FM) च्या चॅनेलवर सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या काही रेडिओ जॉकीजकडे जाऊ लागल्याचं निरीक्षण ती नोंदवते

त्यावेळची कामं म्हणजे, गाण्यांच्या कार्यक्रमात 25 ते 30 गाण्यांची प्रस्तावना लिहून सुत्रसंचालन करणे पण आपल्याकडे Resources नसल्यामुळे आपली तयारी नाही आणि त्यामुळे सुरवातीचे काही दिवस तसली कामं टाळण्याकडेच आपला कल होता असं आदिती प्रामाणिकपणे कबूल करते

पुढे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू आत्मसात करत ओळखीतल्या लोकांकडून किंवा मित्रमैत्रिणींनी शिफारस केल्यामुळे कामं मिळत गेली आणि आदिती एकेक पायरी पुढे चढत गेली.काही कार्यक्रमाच्या जाहिराती सकाळ ह्या वृत्तपत्रात छापून येत आणि बऱ्याच वेळा आयोजक मंडळी नवीन चेहऱ्यांच्या शोधार्थ अशा कार्यक्रमांना हजेरी लावत असल्यामुळे कामं मिळण्यास त्याचा हातभार लागल्याचं आदिती सांगते

ह्या सगळ्या प्रकारात स्वतःच्या आदि एंटरटेनमेंट ह्या "यु ट्यूब" चॅनेलवर 'एक पाऊल एक्स्ट्राँ' ह्या कार्यक्रमात नुसतंच व्यवसाय एके व्यवसाय न करता समाजाप्रति भान असणाऱ्या लोकांच्या मुलाखती ती घेतेय.(तिच्या चॅनेल ला सबस्क्राईब करून मुलाखती पाहता/ऐकता येतील)
कोविडकाळात तिने आपलं ट्रेनिंग वर्कशॉप आणि हास्यनीती हा एकपात्री कार्यक्रम ऑनलाइन आणलाय

काही प्रथितयश कलाकार मंडळी कोविडकाळात फेसबुक लाईव्ह वर सहज उपलब्ध झाल्यामुळे ज्युनिअर आर्टिस्टच्या हातचं काम गेलं असा आक्षेप आदिती नोंदवते पण त्याच बरोबर ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे स्वतःही एका वेळी देशा परदेशात पोहोचू शकले ह्याचा आनंदही ती व्यक्त करते

नेटवर्किंग म्हणजे गुडविल तयार करणे असं ती मानते आणि आपल्याला रेफरन्स मिळाल्यास अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते

एवढं काम करूनही आदीतीचे पाय अजूनही जमिनीवर आहे.ती ज्या क्षेत्रात काम करते तिथे लोकप्रियतेचा सोस भल्याभल्यांना आवरत नाही पण एकदा का लोकप्रियतेला झुकतं माप दिलं की आपली साधना, आपला व्यासंग, ह्याकडे दुर्लक्ष होत असं ती मानते. सुदैवाने ह्या सगळ्याचा नैतिक पातळीवर विचार करत असल्याने आदिती ह्या प्रलोभनांपासून दूर आहे 😀(ह्याबद्दल सौमित्र सरांनी सांगितलेली गोष्टही जरूर ऐका), आदीतीच्या मते स्वतःचं ह्या क्षेत्रात येण्यामागचं प्रयोजन काय हा विचार म्हणजे एक प्रकारचा रियाजच आहे, कोविडकाळात मिळालेल्या वेळेचा स्वतःची कौशल्ये वाढवण्यासाठी उपयोग करण्याचा ती सल्ला देते.

अशा या 'आवाज की दुनिये'तल्या बहुआयामी आदितीला तिच्या कारकिर्दीच्या पुढील वाटचालीस निवडक उद्यमी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा 💐

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.