Monday 17 May 2021

अडथळ्यांची शर्यत - रेवथी पाटील ह्यांची मुलाखत

 "अडथळ्यांची शर्यत" - 

1.तीन वर्षे पाळणाघरात राहिल्यानंतर मुलाने हट्ट धरला की आता तू घरूनच काम करायचं, मी पाळणाघरात जाणार नाही,

2.घरची आघाडी सांभाळून अजून काय करता येईल असा विचार करता रेवथीला जाणवलं की आपलं पाककौशल्य उत्तम आहे, त्यामुळे त्यालाच समांतर असे 'बेकरी प्रॉडक्टस्' जर आपण बनवायला शिकलो तर ? 'केक' हा सगळ्याच आनंदी सोहळ्यांचा अविभाज्य भाग आहे आणि 'कुकीज' लहानांपासून - मोठ्यांपर्यंय सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे नक्कीच त्यातून एक व्यवसाय उभा करता येऊ शकेल

3.म्हणून मग वर्षभर कोर्स वगैरे करून ते कौशल्य रेवथीने शिकून घेतलं खरं पण तिला व्यवसाय जमेल का ह्याबद्दल सुरुवातीला घरची मंडळी थोडी साशंकच होती, त्यात व्यवसाय करणार कुठून? साधनसामग्री, गुंतवणूक वाया गेली तर असा विचार करून रेवथीला व्यवसाच्या विचारापासून परावृत्त करण्याचादेखील प्रयत्न झाला

4.रेवथी तिच्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे हळूहळू 'तो' विरोध मावळला आणि 'स्पार्कल बेकर्स' ची सुरुवात झाली पण घरून काम करताना लोकांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येत होते, 

5.सुरुवातीला जवळच्या ओळखीतून, मित्रमंडळींच्या शिफारसीतून ऑर्डर मिळत गेल्या आणि घराच्या खालीच असलेल्या छोटयाशा जागेतून व्यवसाय पुढे चालू राहिला खरा पण एका स्त्री मालकीणीबरोबर जुळवून घेण्यात हाताखालच्या माणसांना सुरुवातीला अवघड गेलं

6.पाच किलोचा केक एकदा 'डिलिव्हरी बॉय' कडून गहाळ झाला. अर्थात रेवथी ने पुन्हा नवीन केक बनवून दिला खरा पण कच्चा माल आणि कष्ट वाया गेले, त्यात केक वेळेत न पोहोचल्यास एखाद्याचा हिरमोड होऊ शकतो त्यामूळे 'डिलिव्हरी' विषयाकडे रेवथी कटाक्षाने लक्ष देऊ लागली

7.मागच्या वर्षी लॉकडाउनमध्ये तर रेवथीच्या व्यवसायाला घरघर लागेल असाच सगळ्यांचा कयास होता पण वेळेत केक बनवून देत असल्यामूळे काही हॉटेलमालकांनी आपल्या हॉटेलातच काही केक ठेवण्याचा आग्रह धरला

8.चोखंदळ ग्राहक बऱ्याच वेळेला स्पर्धकाचा दर्जा आणि किंमतीची तूलना करतात तेव्हा रेवथी चतुरपणे 'हरकत हाताळणी' करते. आपण वापरत असलेल्या कच्च्या मालाचा ब्रँड आणि दर्जा ती ग्राहकांना दाखवते, आपण फक्त 'एगलेस' केकच बनवतो हे सिद्ध करून दाखवते, आपल्या कामाला ग्राहकांकडून मिळालेले रिव्ह्यूज आणि शिफारसी ती ग्राहकांना दाखवून त्यांचं मत वळवण्याचा प्रयत्न करते. तसेच स्पर्धकाच्या दुकानात जाऊन ते काय किमतीत काय देऊ करतायत ह्याचाही आढावा घेते, तसंच महिन्यातून एकदा तरी नवीन फ्लेवर्स बनवून त्याची ग्राहकांना माहिती देत असते

व्यवसाय सुरू केल्यापासून आलेल्या अडथळ्यांचे असे अनेक किस्से सांगता येथील

व्यवसायाचं पाहिलं वर्ष कसं गेलं, फूड डिलिव्हरी ऍप आणि वेबसाईट मुळे कसा व्यवसाय वाढत गेला, व्यवसायाचं बाळकडू कधी आणि कुणाकडून मिळालं, ग्राहकांची टीका आणि स्तुती दोन्ही लक्षात का आणि कशी राहते, प्रोक्युरमेन्ट आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं चोख तंत्र, केकमधील रेवथीची स्पेशालिटी, व्यवसाय वाढवण्याचे तिचे प्लॅन काय, नेट्वर्किंचे महत्व, पहिला गुगल रिव्ह्यू आणि सॅटर्डे क्लबच्या 'वूमन्स् डे' च्या दिवशी घडलेला किस्सा ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष ऐकण्यातली मजा दवडू नका

'आयुष्यात अडचणी आल्या का'? ह्या प्रश्नाचं उत्तर देताना रेवथी म्हणते - मुलगा सकाळी 7.30 वाजता शाळेत जातो त्यामुळे त्याआधी स्वयंपाक, शाळेची तयारी, घरच्या वडीलधाऱ्या मंडळींना काही हवं - नको हे सगळं पाहून आणि कामं उरकून 8.30 - 9 च्या आसपास मी दुकानात हजर असते. किंबहुना व्यवसाय आणि घर जवळ असल्यामुळे मुलाकडे व्यवस्थित लक्ष देता आलं, त्याला शाळेत सोडणं, परत आणणं, त्याच्या आवडी निवडी जोपासणं, अभ्यास आणि इतर गोष्टीसाठी वेळ देणं आणि व्यवसाय ही सांभाळणं जमलं त्यामुळे फारशी काही अडचण जाणवली नाही - म्हणजे 😳?

त्यासाठी दररोज सकाळी पाच वाजता उठून ते दिवस संपेपर्यंत घरच्या मंडळींपासून ग्राहकांपर्यंत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालणं हे काही दखलपात्र आव्हान नाहीच मूळी एवढया सहजतेने रेवथी बोलून गेली.

मातृत्वाच्या जबाबदरीमुळे घरची आघाडी आणि एकंदरच प्राधान्यक्रमात झालेले बदल स्वीकारताना करावी लागणारी तारेवरची कसरत, त्यासाठी प्रसंगी आपल्या करिअरमध्ये घ्यावी लागणारी माघार आणि पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याच्या इर्ष्येने व्यावसायिक कामात स्वतःला झोकून देणाऱ्या 'निवडक महिला उद्योजिका' गायत्री, शलाका, दीप, अनिता कासोदेकर,ज्योत्स्ना गोडबोले, आदिती कुलकर्णी आणि आज 'रेवथी पाटील' सगळ्यांनाच मानाचा मुजरा🙏आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 💐

4 comments:

  1. Revati love your work and truly admire you❤

    ReplyDelete
  2. Revati, खरच तुम्हाला मानाचा मुजरा👍

    ReplyDelete
  3. Revati, खरच तुम्हाला मानाचा मुजरा👍

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.