Saturday, 15 May 2021

भाग 6 - 'The Marshmallow Test' - Delayed Gratification'


मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये :- 

1.चक्रवाढ व्याजाची ताकत (Power of Compounding) आणि त्याच्या समीकरणातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे वेळ - आणि त्याची काही उदाहरणे आपण पहिली. 

2.Power of compounding चा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असल्यास दीर्घकाळ गुंतवणूक करणे आणि त्यासाठी शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे इतकं ते सोपं आहे
=========================================================================
सोपं आहे 🤔? 
पण मग हा फॉर्म्युला यशस्वी करून दाखवणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या इतकी कमी कशी काय?

आकडेमोड तर पटण्यासारखी आहे आणि फार काही रॉकेट सायन्सही नाही त्यात मग नक्की कठीण किंवा असाध्य असं काय आहे? 

वॉरन बफेट म्हणालेयत - 'Investing is simple however not easy'

म्हणजे गुंतवणूक ही तशी सोपी प्रक्रिया आहे पण सहजसाध्य नाही - का ? त्याचं उत्तर आहे ,

'Delayed Gratification'
अर्थात, 'उस्फुर्त कृतीमूळे ताबडतोब मिळणारी बक्षिसी टाळण्याचं मानसिक कसब' (ह्यापेक्षा कमी शब्दात योग्य अर्थ पोहोचवण्याचं कसब मी ही अजून शिकतोय - त्याबद्दल क्षमस्व 😔) - 

एक व्हिडिओ पोस्टमध्ये जोडला आहे तो पहा

म्हणजे काही गोष्टींना निसर्गतःच वेळ लागतो. आज पेरलं आणि उद्या उगवलं असं सहसा होत नाही. काही जटील प्रश्नांची चटकन उत्तरे शोधण्याच्या आपल्या सवयीमुळे बऱ्याच वेळेला 'शॉर्ट कट' मारले जातात. म्हणजे थोड्या वेळ थांबल्यास अजून एक मार्शमेलो मिळणार हे आगाऊ माहीत असून सुद्धा मुलांना तो मोह आवरत नाही. बऱ्याच अंशी प्रौढांच्या बाबतीतही हे सत्य आहे. इथे आपल्या भावना आपल्या मेंदूवर मात करतात आणि बहुतांशी ही एक सवय आपलं आयुष्य किंवा एकंदरीतच आपलं जगणं नियंत्रित करत असते.

Delayed Gratification  हा मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे 'अर्थसाक्षरता आणि गुंतवणूक' ह्या आपल्या ब्लॉग च्या मूळ विषयाच्या चौकटीतच राहूनच मी भाष्य करतो. 

इथे वॉरन बफेट ह्यांचं अजून एक वाक्य मी उद्धृत करतो

'In short term stock markets are voting machines however in long term they are weighing machine' - अर्थात अल्प कालावधीचा विचार करता भांडवली बाजारातील चढउतार हे भावनांच्या कल्लोळामुळे होत असतात. त्याआधारे एखाद्या कंपनीत किंवा व्यवसायात केलेली गुंतवणूक योग्य किंवा अयोग्य ठरविता येत नाही. भांडवली बाजार हा पुढे किंवा वर जाण्यासाठीच जन्माला आलाय हे तत्व मान्य केल्यास योग्य व्यवसायात केलेली गुंतवणूक दीर्घकालावधीत संपत्तीनिर्मिती साध्य करते.

मागील एका पोस्टमध्ये मी महिनाभर दरदिवशी दुप्पट रक्कम देण्याचं एक काल्पनिक उदाहरण दिलं होतं. दररोज दुप्पट परतावा देणारं कुठलंही उत्पादन ह्या जगात अस्तित्वात नाही. त्या उदाहरणातील 30 दिवस म्हणजे प्रत्यक्षात 30 वर्षे समजावी

गुंतवणूक हा बराचसा 'पॅसिव्ह' असा विषय आहे. इथे सामान्य व्यवहाराज्ञानाबरोबरच भावनांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. रोज बाजाराकडे लक्ष देत राहिल्यास काही तरी कृती करण्याचा मोह होतो, दोन - पाच टक्के आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढल्यास नफ्यासकट मूळ मुद्दल काढून घेण्याचा मोह होतो आणि हीच ती ताबडतोब मिळणारी 'बक्षिसी' आपल्याला प्रचंड अशा संपत्तीनिर्मिती पासून दूर ठेवते 

Power of Compounding चं तत्व समजणं आणि मान्य करणं हे व्यवहारज्ञान सोपं आहे पण निर्णय घेताना भावनांवर नियंत्रण ठेवणं सहजसाध्य नाही. म्हणूनच फार कमी गुंतवणूकदार संपत्तीनिर्मितीत यशस्वी झाल्याचं दिसतं

पण तज्ज्ञांच्या मते सरावाने बऱ्याच अंशी भावनांवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.

Delayed Gratification is an important personality trait

पुढील भागात - "Mental Heuristics and Biases"

धन्यवाद 🙏 Happy Investing 💐

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.