मुलाखतीची ठळक वैशिष्ट्ये : -
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील चढ उतारांना सामोरं जातांना त्यांनी दाखवलेला धीर आणि संयम शब्दांत बांधणं कठीण 🙆🏼♂️ माझ्या परीने प्रयत्न करतोय तरीही सगळ्यांना हीच विनंती करेन की प्रत्यक्ष मुलाखत ऐकाच 🙏
1.जन्मताच कलेची आवड असणारे कात्रे सरांचं बालपण 'भोर' ह्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं.आजोबा शाडू मातीचे गणपती बनवायचे आणि सुदैवाने आजी-आजोबा 'हे करू नको, ते करू नको' असला सल्ला देणारे नसल्यामुळे कात्रे सरांचं मातीशी आणि पर्यायाने कलेशी नातं घट्ट होत गेलं.आईकडून गर्भातच शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रकला इत्यादींच देणं लाभल्याचं ते सांगतात.पुढे हि चित्रकलाच त्यांच्या आयुष्याची श्रेयस आणि प्रेयस झाली
2. एका शब्दात सांगायचं तर छपाई किंवा प्रिंटिंग हा कात्रे सरांचा व्यवसाय, पण त्याआधी आणि नंतरच्याही बऱ्याच प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि म्हणूनच सौमित्र सर त्यांना ' प्रिंटिंगवाले ' कात्रे सर असं संबोधतात
3.कुठल्याही व्यावसायिकाला विझिटिंग कार्ड, चलन किंवा जाहीरात पत्रक असं काहीतरी छापायला प्रिंटर ची गरज लागतेच.
प्रिंटिंगच्याही आधी डिझाइन करतांना ग्राहकाचं उत्पादन काय, कुठल्या भागात व्यवसाय करतात, वापरणारा ग्राहक वर्ग कोण इत्यादी गोष्टींचा विचार करून त्याअनुरूप आवश्यक त्या गोष्टी सुचवण्यापासून ते डिलिव्हरी देण्यापर्यंत ग्राहकाला जास्तीत जास्त मूल्याधारीत परतावा मिळवून देणे हा कात्रे सरांचा व्यवसाय मंत्र.
4.वडील हे एकटेच कमावणारे आणि कात्रे सर इयत्ता चौथीत असतांना वडिलांना मुतखड्याचा आजार झाला असतांना आपल्यालाही घर चालवण्यासाठी हातभार लावावा लागेल असं कात्रे सरांच्या मनाने घेतलं.संगीत आणि चित्रकला ह्या आपल्या आवडत्या छंदांपैकी संगीत क्षेत्रात काही एक मजल गाठून उत्पन्न मिळवण्याप्रत यायला वेळ लागेल हा विचार त्यावेळी कात्रे सरांनी केला आणि चित्रकलेत ते अधिक रस घेऊ लागले.अगदी तहानभूक हरपून दिवसच्या दिवस त्यांचा चित्र काढण्यात जात असे.
5.गुळवणी महाराजांचे अनुयायी आणि कात्रे कुटुंबाला वंदनीय असे श्री मामा देशपांडे यांनी दहावी नंतर कात्रे सर चित्रकलेत करिअर करणार असे वडिलांनी सांगताच थोडे नाराज झाले पण 2 - 3 दिवसातच कात्रे सरांची घालमेल पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना आपला हा छंद जोपासण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला मात्र त्याच्या बऱ्यावाईट परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल असेही बजावले.
6.अभिनव कॉलेजात कलेशी संबंधित शिक्षण घेत असतांना 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' पुणे ह्या संस्थेने कॅलिग्राफी (तेव्हाचं लेटरिंग आणि टायपोग्राफी) संदर्भातील कामासाठी कात्रे सरांची निवड केली.
मुंबई दूरदर्शनच्या एका कार्यक्रमाची श्रेयनामावली बनवून देण्याचं काम होतं आणि ते कात्रे सरांच्या अगदी हातचा मळ.
तिथे कात्रे सरांना छपाईतील पुनरुत्पादनाच्या (मूळ प्रतिसारख्याच अधिक प्रति तयार करण्याच्या) तंत्रज्ञानाची ओळख झाली.माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टींचं भांडारच उघडल्यासारखं झालं आणि त्याच्या कुतूहलापोटी कात्रे सर अधिक माहिती मिळवत गेले आणि नकळतपणे चित्रकलेची आवड असणाऱ्या कात्रे सरांचा 'प्रिंटिंग' च्या दुनियेत प्रवेश झाला.अभिनव मध्ये फोटोग्राफी शिकल्याचाही खूप उपयोग झाला हे ते इथे आवर्जून नमूद करतात.
पहिलंच काम 'लगान' चित्रपटातील अभिनेत्री 'सुहासिनि मुळ्ये' ह्यांच्यासाठी काही एक शक्कल लढवून काचेवर 'छपाई' केल्याचं ते सांगतात
7.त्याकाळी सरासरी 120 ते 150 रुपये पगार असताना व कॉलेजमध्ये शिकत असतानाच कात्रे सरांना मासिक 630 रुपये पगारावर FTII मध्ये काम करण्याची संधी मिळाली.त्यात कॉलेजमधून सकाळी 10 वाजताच निघून जाण्याची सवलतही होती. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम आणि 5 नंतर अगदी रात्री 1 वाजेपर्यंत कात्रे सर अनिमेशन शिकण्यात वेळ घालवू लागले. दोनेक वर्षांनी कात्रे सर तेथील जॉब सोडून एका 'ऍड एजन्सीत' रुजू झाले. एकच व्यक्ती ती एजन्सी चालवत होता त्यामुळे तिथे कात्रे सरांना भरपूर 'क्रिएटिव्ह स्पेस' मिळाला, निर्णयक्षमता वाढली आणि कामाचं समाधान ही मिळालं.
पण काही वर्षांनी कमअस्सल दर्जाच्या लोकांनी काम मिळवण्यासाठी अवाजवी सवलत देणे, त्याच काळात इंदिरा गांधींची हत्या आणि एकंदरच कामाच्या ठिकाणी अविश्वास अशा कारणांनी कात्रे सरांनी तेथील नोकरीचा राजीनामा दिला. स्वतःचा व्यवसाय सुरू करतांना कामाच्या दर्ज्याबाबत कसलीच तडजोड करायची नाही व आपले सहकारी हे आपल्यासाठी नव्हे तर आपल्याबरोबर काम करतायत अशी समान वागणूक त्यांना द्यायची असा त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा नियम ठरला.
8.छापील कागदाचा अपव्यय कात्रे सरांना मान्य नाही त्यात कुठलही काम व्यवस्थित पूर्ण करतांना थोडे अधिकचे कागद लागतातच.
एकदा काम हातात घेतल्यावर आज मशीन बिघडलंय किंवा मशीन ऑपरेटर आला नाही वगैरे कारणं ग्राहकांना सांगणं कात्रे सरांना अजिबात मान्य नाही त्यामूळे कुणावरही अवलंबित्व नसणारं, कागद वाया न जाता कुठल्याही आकाराच्या आणि कितीही प्रति काढता येतील असं एखादं तंत्रज्ञान नक्कीच अस्तित्वात असणार आणि म्हणून मित्रांच्या मदतीने इंटरनेटवर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना उत्तर सापडलं. मूळ प्रतिसारख्याच अनेक प्रति काढणं अर्थात ज्याला आपण (फोटो कॉपी म्हणतो) आणि ते देऊ करणारी कंपनी म्हणजे 'झेरॉक्स' ह्याची कात्रे सरांना माहिती झाली आणि त्यांच्या छपाई क्षेत्रातील 'डिजिटल' प्रवासाला सुरुवात झाली.
9.2006 - 07 साली 34 लाख रुपये किंमतीच 'झेरॉक्स' कंपनीचं मशीन अमेरिकेतुन पुण्यात मागवायचं असं कात्रे सरांनी ठरवलं. तशी ही त्याकाळी गरुड झेपच पण कात्रे सर त्या तंत्रज्ञानाने पूर्ण झपाटलेले त्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन मशीन मागवायचं ठरलं. बँकेनेही सुरुवातीला कर्ज देऊ असं मान्य करून ऐन वेळेला नाही म्हटलं आणि 34 लाख रुपये जमा करतांना कात्रे सरांची फार त्रेधातिरपीट उडाली पण तो ही अडथळा त्यांनी पार केला आणि मशीन पुण्यात आलं. झेरॉक्स कंपनी चं भारतातलं हे बहुधा पहिलं मशीन.
10.मशीनच्या वापराची माहिती घेतांना कुठल्या गोष्टी नाही करायच्या ह्याची अचूक नोंद कात्रे सरांनी करून ठेवली
12.सुझलॉन कंपनीचं एक काम आपल्या कुवतीच्या बाहेरचं आहे हे जाणवल्यामुळे त्यांच्या मित्राने कात्रे सरांना ह्या कामाबद्दल माहिती दिली.
खिशात दमडीही नसतांना कामावरील विश्वास व प्रामाणिकपणा कात्रे सरांच्या बोलण्यातून जाणवल्यामूळे, सुझलॉन कंपनी ते काम कात्रे सरांच्या अटी शर्ती वर त्यांना देऊ केलं.
13.प्रिंटिंग क्षेत्रात 'ऑस्कर' शी तुल्यबळ ठरेल अशा 'PIXI' ह्या पुरस्काराने कात्रे सरांना गौरवण्यात आले आहे. दुदैवाने पासपोर्ट वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित ह्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही पण झेरॉक्स कंपनीनं इथे पुण्यात एक छोटेखानी समारंभ आयोजित करून कात्रे सरांचा यथोचित गौरव केला
14.तशाच अजून एका कार्यक्रमात स्वतःकडच्या मशीनवर छापलेलं पुस्तक त्यांनी 'झेरॉक्स' कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरला दाखवलं आणि तो हबकलाच.हे काम आपल्याच कंपनीच्या मशीनवर केलंय ह्यावर त्याचा विश्वासच बसेना.त्याने लागलीच 'इंडियन प्रिंटर्स अँड पब्लिशर्स' ह्या मासिकाचा संपादक त्या कार्यक्रमात हजर होता त्याला बोलावून ताबडतोब कात्रे सरांची मुलाखत घ्यायला लावली.
15. वैयक्तिक आयुष्यात बरीच वादळं कात्रे सरांनी झेलली.
वडिलांना विस्मृतीचा आजार आणि त्यातच त्यांचं 2014 साली निधन, पुढे कात्रे सरांची आई कर्करोगाने गेली.आईच्या निधनानंतर चार महिन्याच्या कालावधीत धाकटा मुलगा रोशनला रक्ताचा कर्करोग असल्याचं निष्पन्न आणि अजूनही रोशनवर उपचार सुरू आहेत पण कात्रे सर डगमगलेले नाहीत आणि म्हणून त्यांना भेटलं की माझ्यातील सकारात्मकता दुप्पट होते असं सौमित्र सर म्हणतात.
16.त्यांना इथेच थांबायचं नाही.
स्वतः सारखं दर्जेदार आणि प्रामाणिक काम करणारी, पर्यावरणाची काळजी करणारी, ग्राहकांना त्यांनी दिलेल्या कामाचं समाधान आणि मोल मिळवून देणारी, अशी माणसं त्यांना तयार करायची आहेत.
इथे ते त्यांची सहकारी राजश्री जी अतिशय समर्पित होऊन काम करते तिचा जरूर उल्लेख करतात.
17.पुणे विदयार्थी गृहाच्या एका पुस्तकाच्या उदघाटनाप्रसंगी त्यांनी कात्रे सरांनाच वक्ता म्हणून पहिल्यांदा बोलायला सांगितलं,
तसेच सॅटर्डे क्लबच्या 'उद्योग दिंडी' ह्या समारंभात पडदयावर आधी भारताचा तिरंगा झळकला आणि त्यावर नंतर अशोक चक्र, पुढे अशोक चक्र हळूहळू धूसर होत जाऊन कात्रे सरांनी 'उद्योग दिंडी' चा केलेला लोगो झळकला.
वरील दोन प्रसंग आपल्याला मानाचे आणि कायम स्मरणात राहणारे असल्याचे ते सांगतात.
आपल्या वागण्या बोलण्यातून, कामातून, ओघवत्या वाणीतून व्यावसायिकतेचा आणि सकारात्मक विचारसारणीचा वस्तुपाठच घालून देणाऱ्या प्रसाद कात्रेंना 'निवडक उद्यमी' तर्फे मानाचा मुजरा 🙏🏾आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
No comments:
Post a Comment
निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.