Friday, 30 April 2021

एका झटक्यात नकारात्मक ते सकारात्मक होता येत ?

बऱ्याच वेळा सकाळी सकाळी जागे झाल्यावर समोरचे problems मन:पटला वर दृश्यमान व्हायला लागतात. काहीना हे अगदी सहज बाजूला ठेवायला जमतही असेल. पण मला मात्र विशेष असे प्रयत्न करायला लागतात ह्याच्या करिता. खास प्रयत्न, खास टूल्स वापरून. नाहीतर गाडी जाऊ लागते चिंतेच्या रुळांवरून, चिंतापूर जंक्शन ला.

तरी मला अगदी हल्ली हल्ली उमगलेलं एक लेटेस्ट realization म्हणजे :-

हे  नकारात्मक विचार किंवा भाव बऱ्याच वेळा  ALERTS सारखं काम करीत असतात. 

उदाहरणादाखल सध्या चालू असलेली Pandemic ची चिंता. हे शब्द ऐकले कि मनात चिंतेचं बीज पेरलं जातं :  ह्याचं पुढे मोठ्ठं झाड होऊ शकेल. हो, हे ते नकारात्मक असेल, जर पुढचा विचार भीती, धास्ती ह्याकडे गेला तर. उलटपक्षी हा विचार करताना जर आत्म स्वगत बदललं, तर मात्र हेच नकारात्मक बीज आपला मित्र होऊ शकेल. 

  1. बीज : काळजी वाढविणारी बातमी आली पडद्यावर  " वाढवलाय यार lockdown" 
  2. आत्म स्वगत : " कसं व्हायचं व्यवसायाचं !" किंवा " कसं होणार माझं पुढे !" वगैरे वगैरे !
  3. इथे एखादा Anchor लावता येईल : मी माझ्या स्वत:च्याच टपलीत हळूच मारून घेतो. Anchor म्हणजे अशी एखादी कृती करायची : Quick : जी केल्याने तुम्ही पुढच्या अपेक्षित विचारांकडे मनाला आणू शकाल. हि काहीही असू शकेल. आता मला इथे "चल, हे विचार बंद कर आधी, हे निष्फळ आहेत, ही विचार शृंखला बंद कर" ह्या विचारावर मनाला आणायचे आहे. ह्याच्याशी Connected अशी माझ्या आईने लहानपणापासून मारत आलेली टप्पल हि कृती मला ताळ्यावर आणते, हे माझ्या मनाला परिचित आहे. म्हणजेच मी माझ्या टप्पल ह्या कृतीने मनाला सांगितलं , की ही विचार शृंखला तोड. बस्स !
  4. आता स्वीकार : "हे असणार आहे भाऊ काही काळ. सगळ्यांच्या सोबत."
  5. आश्वासन : ह्यातूनच मार्ग निघेल, असंख्य प्रसंगांतून निघतो , तसा. 
  6. Alert : चल मित्रा,कामाला लागू. योग्य ते सर्व measures घेवून !

मी येतो बाहेर, आणि आपली नित्यकर्मे करायला लागतो. ना नकारात्मक , ना सकारात्मक. एवढे तरी करता येतं.

अशा तुमच्या आहेत काही आयडीया ? share करा ! 


Wednesday, 28 April 2021

आपण लोकांकडे जायचं आहे:स्वत: साठी!

online वर व्यक्तींचं वागणं हे वेगळंच असतं offline पेक्षा. मुळात offline ला जसं तोंडावर "तू छान, मी छान" असं जे वागावं लागतं तसं Online मध्ये काही बंधनकारक नसतं. त्यामुळे आपल्याला "भारी" वाटणारा एखादा Content हा कदाचित Online खूपच कमी लोक पाहतात; असं होऊ शकतं. 

हे असं आहे Boss !

तुम्ही हे समजूनच घ्या, कि मला जे भारी वाटतं, किंवा कधी कधी खूप लोकांना उपयोगी पडणार आहे असं मनापासून वाटतं, किंवा मित्र मंडळींनी किमान स्वत: विषयी काही आलंय ते पाहून प्रतिक्रिया द्याव्यात असं वाटतं; ते माणूस म्हणून ठीकच आहे. तरीही ते समोरच्या मंडळींना आवडू नाही शकणार, हि शक्यता आहेच कि. शिवाय त्यांना नसेल वाटत कि हे अग्रक्रमाने वाचावं, ऐकावं म्हणून. And It's perfectly Okay about that. हे नीट समजून घेतलं तर स्वत:ला होणारा त्रास तर नक्की थांबतो.

तुम्ही स्वत: घ्या मेहनत !

आपोआप माझं कुणी वाचणार ऐकणार नाही, मला किती मंडळी ओळखतात, किती लोकांशी मी स्वत:हून परिचय करून घेतलाय, कोणतं काम ग्रुप मध्ये स्वत:हून घेतलंय, हे सुद्धा लोक पाहतात. मग तुमच्या विषयी कुतूहल निर्माण होऊ शकतं. मुळात माझा स्वत:चा फायदा मला करून घ्यायचा असेल, तर मला स्वत: ला काही करावं लागेल त्या करिता. निदान माझ्या विषयी अमुक आलंय, ह्यावर नक्की अभिप्राय द्या असं विनम्र आवाहन तरी निश्चित करता येतं.

फायदा होतोच !

आपण जेव्हा लोकांकडे जायला लागतो ना , हळूहळू निश्चित पणे network वाढू लागतं. ह्याच्याच करता तर आलोय ना आपण. शिवाय, आपल्याला एक सवय लागते, ज्यातून आपलं अधिक दृढ असं संपर्कजाल तयार होऊ शकतं. आंपण लोकांकडे जात असल्याने, Visibility वाढू लागते. 

Tuesday, 27 April 2021

Passion to Profession - 'वानरसेना'

अनिकेत आमडेकरांची मुलाखत ऐकली

स्पंज बनून शिकत राहिलं की एखाद्या गोष्टीबद्दलच्या कुतूहलाचं कौशल्यात रूपांतर होतं.मनाची आंतरिक ओढ कौशल्याचं आवडीत (Passion) रूपांतर करते आणि आवडीला प्रामाणिक अभ्यासाची जोड दिली की ते आपल्या उपजीविकेचं साधन (Profession) देखील होऊ शकतं.

  • 'पॅशन टू प्रोफेशन' चा हा एक साचेबद्ध आडाखा अनिकेत नी सांगितला खरा पण 'कुतूहल' म्हणून आपण काय 'निवडतो' हे आपल्यावरच अवलंबून आहे. उदा: वृत्तपत्रातील 'अग्रलेख' वाचून स्वतःच्या ज्ञानात भर घालायची की काही फुटकळ बातमी वाचून निराश व्हायचं हे मात्र आपण स्वतःच ठरवत असतो असं अनिकेत चं प्रामाणिक मत 🙂.
  • बाबांनी सांगितलेली हनुमानाची गोष्ट आवडल्यामुळे अनिकेतची अडीच वर्षांची मुलगी काही दिवस शेपटी लावून घरभर हिंडत असे आणि तिला कुतूहल म्हणून पुढे अनिकेतनी रामयणातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या अर्थातच तिच्या तोंडपाठ झाल्या आणि त्याचं आजूबाजूच्यांना फार आश्चर्य वाटे.तिथूनच अनिकेतला आपल्या ह्या गोष्टी सांगण्याच्या 'पॅशन' चं 'प्रोफेशन' मध्ये रूपांतर करता येईल असा विश्वास वाटला आणि त्याच्या ह्या 'वानरसेने' च्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला.
  • आपल्या पॅशन चं प्रोफेशन मध्ये रूपांतर होईस्तोवर आर्थिक निकड वरचढ ठरू नये म्हणून सुरुवातीच्या काळात नोकरीधंदा सांभाळूनच ही कसरत करावी असा अनिकेत सल्ला देतो पण एकदा का तुम्ही झोकून दिलंत की बरीच मंडळी तुमच्या पॅशन ला मूर्त स्वरूप देण्यास हातभार लावतात असंही तो मानतो (इथे अनिकेत 'मराठी कनेक्ट' मधील काही सहकाऱ्यांची आवर्जून नावं घेतो)

आपल्याला काय येतंय किंवा जमतंय ह्यापेक्षा आपल्या ग्राहकांना केंद्रबिंदू मानून त्यांची आवड, प्रेरणा किंवा त्यांचं दुःख, नैराश्य काय? हे समजून त्याअनुषंगाने स्वतःच्या सेवा किंवा उत्पादनात आवश्यक तो बदल करावा असं अनिकेत म्हणतो

'पॅशन टू प्रोफेशन' ह्या प्रवासात एकेक अडथळा पार करत डोंगर चढून माथ्यावर आल्यावर जेव्हा तुम्हांला जाणवतं की अजून बरेच डोंगर पार करायचेत, तेव्हा तुम्ही कच खाऊन मागे वळता की नव्या दमाने पुढचा अडथळा पार करायला सज्ज होता त्यावर तुमचा 'प्रोफेशन' ते 'व्यवसाय' हा पुढील प्रवास बेतलेला असतो असं अनिकेत सांगतो.

मित्रमंडळी, सहकारी,नातेवाईक जेव्हा आवर्जून तूमच्या नावाची शिफारस करतात हे ही एक प्रकारचं यशंच असल्याचं अनिकेत मानतो.आपल्या सहकाऱ्यांचं उत्पादन किंवा सेवा आपल्या व्यवसायाशी कसं जोडून घेता येईल ह्या विचारातून 'वानरसेने'चा लोगो साकारला गेलाय (प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका व पहा)

अनिकेतच्या गोष्टी ऐकता ऐकता अबोल मुलेही आता बडबडू लागलीयेत. मॅक्डोनल्डच्या नांममुद्रेची गोष्ट सांगून लहान मुलांमधल्या कल्पनाशक्तीला अनिकेत वाट करून देतोय.

रामायणातील कथा गोष्टींच्या रुपात सांगता सांगता हलकेच काही चांगले आणि आवश्यक संस्कारही अनिकेत लहान मुलांमध्ये घडवतोय (त्यासाठी ही मुलाखत जरूर ऐका)

गोष्टी सांगता सांगता मुलांना बोलतं करणं, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणं, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं, चांगले संस्कार रुजवणं, एकंदरीतच नकळतपणे एक पिढीच घडवण्याचं अनिकेत काम करतोय. 

न जाणो ह्या लहान मुलांमधील एखादा 'तान्हाजी' अनिकेत ने शिकवलेलं हे गोष्टी सांगण्याचं कसब उद्या दृकश्राव्य पद्धतीने रुपेरी पडद्यावर सादर करेल 🎥 🎬 ?

त्याच्या ह्या वानरसेने ला 'निवडक उद्यमीचा' सलाम 🙏 आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐

बरबादियो का जश्न !

TV वर "epic" channel वरचा राजा रसोई और अन्य कहानिया  कार्यक्रमात रणवीर ब्रार त्याची एक रेसिपी share करत होता. बोलता बोलता अगदी सहज पणे त्याचं बोस्टन इथलं एक उपहारगृह कसं बंद पडलं आणि त्याच्या पार्टनर ने किंवा जो ते उपहारगृह चालवायचा, त्याने उरले-सुरले ५००० डॉलर्स त्याला कसे देवू केले हा अनुभव म्हणून सांगितला. आणि शेवटी म्हणाला : " पकाने वाले को क्या , एक चूल्हा ही मिल जाय, बस है ना ! "

इतकं सहजपणे सो called अपयश पचवता येणं , आणि ते व्यवस्थित पचवलं गेलंय, कारण त्याच्यावर हसून ते इतरांबरोबर share सुद्धा केलं गेलं, बरबादियो का जश्न !

आम्ही पूर्वी "अपयशातून शिक्षण" असा एक वार ... मला वाटतं .... गुरुवार चालवायचो निऊ वर. नंतर नंतर वाटू लागलं हे अपयश तर आपल्याला पुढे घडवतं ना. शिवाय अजून पुढे गेल्यावर वाटायला लागलं कि कुठलीही नवी वाट धरताना, चटकन हवं ते मिळालं, असं सहसा होत नाही. आणि तेच बरं आहे. मग त्याचा पिच्छा पुरवून ते पुढे मिळविणे वगैरे हे आपल्या ध्यासावर, वेडावर अवलंबून आहे.

किती चिकटून असतो मी माझ्या यशांना, अपयशांना ! अपयशाची सल अगदी खोल खोल रुतलेली असते. मग ती खंत, सल बाळगत राहून , पुन्हा बात निकली तो हरेक बात पे रोना  येतंच ! अर्थात हे जुनं - पानं काढून रडणं हे सुद्धा आवश्यक वाटतं मला कधी कधी. मुळात स्वीकारून तर टाकू, कि मला असं असं वाटतंय म्हणून ! मग पुढे काय ते करू त्याचं !

मला हवं ते मिळालं : यश , ते नाही मिळालं , दुसरं काही गवसलं , तिकडे आहे लक्ष माझं ? नाहीये. कारण "ते नाही मिळालं" हि वीणा सतत चालू आहे. नकारात्मक चिंतन. ह्याच्या वर मी एक साधा उपाय काढलाय : अगदी जवळच्या सह अनुभवी मित्रा सोबत बसावं आणि भरपूर रडून बिडून घ्यावं - क्या खोया  ह्याच्यावर. उपयुक्त आहे का हि कृती ? काही काळ तरी निश्चित चालते. कुणीच जर मला नाही सापडलं तर मी चक्क youtub वर दर्द भरे गीत लावतो आणि समरस होतो. मोकळं मोकळं वाटतं. मला वाटतं काही दिवस - महिने - वर्ष तरी हे Infection त्रास देत नाही.

मग कधी लक्षात येतं , कि अरे , मी त्या त्या deal मध्ये गंडलो, कारण कागदपत्रे नीट पाहिली नव्हती. जेव्हा त्याचा त्रास झाला, दू:ख बीख्ख झालं , बोचलं ते, किंवा सल राहिली आत, तर त्यालाही कारण आहे. ती सल, ती वेदनाच तर त्या चुकीची आठवण करून देत असते. कदाचित लाखो रुपये आणि वेळ खर्चून केलेला एखादा कोर्स हि देणार नाही हे. हेच तर ते प्रवाहा सोबत राहणे, वाहणे, प्रवाही जीवन.

हल्ली हल्ली तर मला वाटू लागलंय कि आपल्या आयुष्याच्या रस्त्यावरचा यश काय अन अपयश काय .... एक अनुभव , बस !


Monday, 26 April 2021

कुणासोबत नेट्वर्किंग करायचं ?

 बिझनेस नेट्वर्किंग मीटिंग ला गेल्यावर खूप लोक भेटतात,आणि वाटू लागत : सगळेच कामाचे आहेत की ! तरीही त्यातून कशी निवड कराल ?

प्रथम एक पक्क समजून घेऊ ; कि इथे सर्वच "रेफरल" ह्या उद्देशाने आलेले आहेत. सगळेच दुकानदार. नाही म्हणायला काही खरेदीदार सुद्धा असतात आलेले, तरी खूपच कमी. त्यामुळे पुन्हा इथून ग्राहके नका शोधू. हा लेख जरूर वाचा

आता मग कसं काम करायचं ?

जाणून घ्या स्वत:चा रेफरल फनेल 

प्रथम आपल्या व्यवसायाचा नीट विचार झालेला असायला हवा : म्हणजे मी काय करतो, आणि कोण माझ्यासाठी उत्तम रेफरल partners ठरतील ! जरा एखादं उदाहरण घेऊन पाहूयात. आपले एक सदस्य , समजा " Industrial पेंटिंग" ची कामे करतात. तर त्यांनी हे रेफरल partners कसे शोधायचे ?

काम काय आहे ?     कारखान्याचे रंगकाम 

आदर्श ग्राहक कोण ?   जरा मोठ्या कंपन्या (लिमिटेड कंपन्या )==> तेथील परचेस किंवा मेंटेनन्स व्यवस्थापक : ह्यांच्या पर्यंत पोचायचे आहे.

👉म्हणजेच ह्यांच्या पर्यंत पोहोचवू शकणारे नेटवर्क partners हवेत. रेफरल Partners म्हणूयात. म्हणजेच हे पहायचं आहे कि , इतर कोणत्या प्रकारच्या सेवा किंवा उत्पादने देणारे व्यावसायिक ह्या मंडळींच्या नियमित संपर्कात असू शकतात ते. सोपं झालं काम. आता लागुयात कामाला :-

  • कॅन्टीन व्यवस्थापन agency : Industrial Caterers 
  • Water Plant AMC Contractor
  • Computer Hardware Suppliers
  • Oils and Consumables चे सप्लायर 
  • सिविल कंत्राटदार 
  • आणि इतरही...
ही अशी एक लिस्ट तयार केली, कि झालं ! पुढच्या वेळी नेटवर्क ला गेलात, किंवा आत्ताच्याच नेटवर्क मधून असे partners शोधा आणि मिळवा. ह्याच्या करता एक सोप्पी युक्ती म्हणून सांगतो :-

"कहां से तू आया और कहां तुझे जाना है " हे पहात राहायचं, म्हणजे काय; तर आपला ग्राहक आधी कुठून किंवा कुणाकडून आपल्या कडे आला आणि नंतर कुणाकडे जाणार , अशा मंडळींचे प्रकार ओळखून घ्यायचे. टिपायचे. आणि लिहून ठेवायचे. नजर अपोआप त्यात होईल.

  • कहां से तू आया  : Civil Contractor 
  • कहां तुझे जाना है  :  Electrical Contractor
Civil Construction झाल्यावर पेंटिंग होत असतं , तसेच 
पेंटिंग झाले कि पुढचे काम : Electrical Work.

मीटिंग मध्ये असे बिझनेसमन शोधायचे , आणि त्यांच्याशी घट्ट नेटवर्क करायचे !

नेट्वर्किंग म्हणजे  शिकार शेती

Saturday, 24 April 2021

भाग ३ - ''Rule of 72"

 मागील पोस्टमधील ठळक वैशिष्ट्ये :-

1.किमान जोखीम ही जगतांना प्रत्येक क्षणी असते - 'गुंतवणूक' त्याला अपवाद नाही

2.(Inflation) - म्हणजे काय हेच मुदलात न समजल्यामुळे (आणि समजावून घेण्याचा किमान प्रयत्नही न केल्यामुळे) भारतीय मंडळी FD करण्यात किंवा सोनं विकत घेण्यात धन्यता मानतात - परीणामी आपली संपत्ती स्वतःच्या हाताने (म्हणजे निर्णयाने) उत्तरोत्तर कमी कमी करून घेतात

3.भांडवली बाजार - (स्टॉक मार्केट) आणि 'म्युच्युअल फंड' ह्या दोन साधनांनी सातत्याने Inflation पेक्षा किती तरी अधिक पट परतावा दिला आहे

परताव्याचा दर कसा मोजायचा? आणि त्याने आपल्याला काय समजतं?

        💐Rule of 72💐

"72 ह्या संख्येला जर तुम्ही परताव्याच्या व्याज दराने भागलंत तर येणारं उत्तर हे तुमची मूळ रक्कम दुप्पट होण्यास साधारण किती वर्ष लागतील हे दर्शवतं"

ऑ 🤔 म्हणजे काय?

समजा FD ला तुम्हांला 8 टक्के परताव्याचा व्याज दर मिळत असेल तर,

72/8 = 9

म्हणजे आज जर तुम्ही 1 लाख रुपयांची FD केलीत आणि दरवर्षी मिळणारं व्याज काढून न घेता परत मूळ रक्कमेत गुंतवलेत तर 9 वर्षांनी तुमची रक्कम 2 लाख झालेली असेल (Calculator वर करून बघू शकता)

ह्याच तत्वाने आपल्याला समजा अमूक इतक्या वर्षात रक्कम दुप्पट व्हायला हवी असेल तर किती परताव्याचा दर मिळायला हवा हे ही समजते आणि त्या अनुषंगाने कुठल्या साधनांमध्ये 'गुंतवणूक' करावी हे ठरविता येतं.

उदा: मला 6 वर्षात रक्कम दुप्पट व्हावी असं वाटत असेल तर,

72/6 = 12 , म्हणजे 12 टक्के परतावा मिळणाऱ्या साधनांत गुंतवणूक करावी लागेल

भारतीयांची सरासरी आयुर्मर्यादा 75 वय वर्षे धरून चालल्यास आपल्या हातात किती वेळ आहे आणि आपण किती संपत्ती निर्मिती करू शकतो ह्याचा साधारण अंदाज बांधता येतो.

1987 साली पब्लिक सेक्टर बँका आणि 1993 साली प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांना म्युच्युअल फंड व्यवसायाची मान्यता देण्यात आली आणि तेव्हापासून आता 2021 पर्यंत काही चांगल्या फंडांनी सातत्याने सरासरी 12 ते 15 टक्के परतावा दिलेला आहे.

भांडवली बाजारात तर समंजसपणे गुंतवणूक करून दिर्घकालावधीसाठी 18 ते 24 टक्के परताव्याचा दर मिळवण्याची संधी असते आणि त्याची अनेक उदाहरणेदेखील आहेत


तळ टीप-भांडवली बाजाराला 'सट्टा बाजार' म्हणूनही हिणवले जाते.काही उत्पादने सोडल्यास (जिथे समभागांच्या किंमतीतील चढउतारात मानवी भावना आणि नशिबाचा भाग अधिक असतो), हा अतिशय पद्धतशीरपणे आणि कसलीही अतार्किक क्रिया किंवा जादू न होता चालणारा बाजार आहे जो सगळ्यांना समान संधी देतो.

पुढील भागात - संपत्तीनिर्मिती कशी साधायची - 'Magic of Compounding' -

धन्यवाद 🙏

Gives आणि Asks

काल निऊ च्या मीटिंग मध्ये गायत्री ने Give तसेच Ask बद्दल सांगितले. काय आहे हे ?

Give 


Networking च्या भाषेत बोलायचे, तर आपण इतर Members ना कुठे जोडून देवू शकतो ते सांगणे. बहुतेक वेळा आपण आपली Certifications किंवा Recognitions सांगताना ह्याबद्दल बोलतोच. नाहीच तर ग्राहकांबाद्द्ल बोलताना तर निश्चितच सांगतो. नेमके सांगितल्यास अजून उत्तम. 

उदा : मी माझ्या १ मिनिट मध्ये माझ्या संपर्कातील BYST , DE ASRA , SATURDAY CLUB तसेच खुद्द निवडक उद्यमी ह्यातील शेकडो उद्योजक ह्यांच्याशी जोडून देण्याबद्दल सांगतो, आणि प्रत्यक्ष त्या संपूर्ण network ला connect करून द्यायची खरोखर क्षमता देखील आहे माझी. असे आपले solid connects आपणच आपले ठरवायचे आणि open करायचे.

Asks


म्हणजे मला काय हवय , कोणते connects हवेत हे सांगणे. वरकरणी अगदी सोप्पी वाटणारी हि कृती तशी विचार करायला लावणारी आहे. आपण जितक नेमकं सांगू ना, तितके नेमके results मिळू शकतात. उदाहरण दाखल आपण एखाद्या उपहार गृहात आपण गेलो आहोत असं समजू :-

वेटर : साहेब काय देवू खायला ?
मी : काहीही दे , भूक लागली आहे 

वेटर : काहीही म्हणजे काय ?
मी : अरे काय काय आहे तुझ्याकडे ?

वेटर : पंजाबी, दाक्षिणात्य, महाराष्ट्रीय .... हे बघा मेनू कार्ड आणि सांगा 
मी : बर .

मी त्या मेनुकार्ड मधून निवडीन वगैरे ठीक हो. पण नेटवर्क मिटिंग ला फक्त काहीच लोक आपले ग्राहक वगैरे सांगतात. आणि ते आपल्याला हवे असतील असे नाही ना ! सर्वात उत्तम, म्हणजे मला स्वत:ला ठाऊक असणे कि , मला काय order करायचीये ते , निदान प्रकार तरी ! उदा : नाश्त्यात काय मिळेल, किंवा दाक्षिणात्य कोणती Dish आहे इतकं तरी. त्यात पुन्हा जास्त नेमकं सांगता आलं , तर भारीच कि !

नवीन संवाद ...


वेटर : साहेब काय देवू खायला ?
मी : काहीही दे , भूक लागली आहे  Onion उत्तप्पा  आहे का  ?

वेटर : काहीही म्हणजे काय ? त्याला जरा वेळ लागेल; मसाला डोसा  आणू ?
मी : अरे काय काय आहे तुझ्याकडे ? आण !

संवाद संपला, प्रेमाने. शिवाय त्याने मला कामाला नाही लावल , तर तो लागला त्याच्या कामाला 

आता हे networking मध्ये कसं उपयुक्त ठरेल ?


विषय मोठा असला, तरी समजायचा यत्न करू.

समजा माझ्याकडे एका प्रवासी कंपनीची agency आहे. मला ठाऊक आहे कि काही कंपन्या ह्या वर्षाकाठी प्रवास भत्ता देतात. तर अशीच एक कंपनी :  Infosys असे समजू आपण. ह्यात काम करणारे कर्मचारी ह्यांचा ask आपण मागू शकतो ना ! 

काय असेल तुमचा "ASK" ? 




अगदीच आवश्यकता नसेल, तर अचानक रणनीती बदलू नये !

एक नवीन स्थिती उभी राहिल्याने घरूनच काम करायचं आहे. साथीला इंटरनेट आहे, त्यामुळे ह्या स्थितीचा "जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा " ह्याकरीता बरेच उद्योजक त्यांच्या नेहमीच्या व्यवसाय करण्याच्या  वेगळे प्रकार अचानक बदल करताना दिसून येत आहेत. उदा. अचानक online trainings घ्यायला सुरुवात करणे , किंवा भरपूर zoom meetings करणे किंवा विविध trainings attend करणे इत्यादी.

मला वाटतं , की असं करताना लक्षात ठेवायला हवं कि ह्या सर्व प्रकारांना follow up कृती सुधा अपेक्षित असतात. म्हणजे आत्ता वेळ असताना आपण बीजे पेरली, तर काही काळाने (जेव्हा ही "तात्पुरती" स्थिती ओसरेल) तेव्हा ह्यातून जे उत्पादित होईल, ते हाताळणे आपल्याला शक्य असणार आहे ना ! 

ऐवजी, आत्ताच्या आपल्या कार्य पद्धतीत असलेल्या उणीवा आपण भरून काढण्यावर जास्त भर दिला तर ? आपल्या व्यवसायाला अधिक सबळ करण्यावर जोर दिला , तर ? हे कायमस्वरूपी होईल. तात्पुरती स्थिती ओसरली तरी !

कोणत्या प्रकारची कामं करता येतील ?

  • Orders पूर्तता करताना असलेल्या उणीवा 
  • सेल्स चे follow ups साठी CRM
  • Online प्रोफाईल व्यवस्थित तयार करणे 
  • आपली Range वाढविण्यासाठी नव नवे Strategic भागीदार शोधणे 
  • Cash Flow चा पुनर्विचार 
  • कंपनीचा ३, ५ वर्षांचा प्लान तयार करायचा

इत्यादी असंख्य गोष्टी आहेत. विचार करून पहा. 

कारण उत्तम व्यवसाय करणे, म्हणजे फक्त जास्त सेल करणे नव्हे !

Thursday, 22 April 2021

Intro Video कसा असावा ?

Videos हा एक खूपच प्रभावी मार्ग आहे आपल्याबद्दल सांगण्यासाठी. हे Intro प्रकारचे Videos खूप popular सुद्धा आहेत सध्या. आजच मला एक Video पाठविला एका मित्राने व त्यावर प्रतिक्रिया द्यायला सांगितले, त्यावरून वाटलं कि एक छोटीशी पोस्टच करावी म्हणून. 

इंट्रो Videos हे जास्त करून "पाठविले" जातात. म्हणजे कंपन्या आपल्याबद्दल त्या मार्फत सांगतात. त्याचमुळे त्यात नेमके पणा यायला खालील मुद्दे उपयोगी ठरतील :-

पहिला सीन :सुरुवात :लोगो ने व्हावी (५ सेकन्द)

दुसरा : कंपनीबद्दल स्वत: founder ने बोलावे : ( १० ते २०  सेकंद )

ह्यात स्वत: बद्दल थोडे + कल्पना कशी सुचली + काय Value देण्याने प्रेरित झालात , हे सांगणे अधिक महत्त्वाचे. उदा : लाकडी घाणा तेल उत्पादकाने refined तेलाने होणारे दुष्परिणाम , त्यापासून मुक्त करणे हा purpose सांगता येईल.

तिसरा : facility दाखविणे : (१० ते १५  सेकंद)

फक्त फोटोज द्वारे हे दाखवता येईल, फोटोज एकामागे एक लावून Video करता येतो.

सीन ४ : मान्यता , मानांकने इत्यादी : (५ ते १५ सेकंद)

ह्यात कोणती विशेष Certifications , प्रमाणपत्रे तसेच तांत्रिक उपलब्धी, इतर पुरस्कार इ बद्दल बोलावे.

सीन ५ : ग्राहक - Reach ( ५ ते १० सेकंद ) 

शक्य असल्यास महत्त्वाचे ग्राहक, त्यांच्या कडून मिळविलेली Testimonials तसेच कुठे कुठे माल जातो इ. माहिती द्यावी. 

सीन ६ : संपर्क ( ५ सेकंद )

प्रत्यक्ष पत्ता, दूरध्वनी, तसेच इमेल 

सीन ७ : Engagement (५ सेकंद)

खूप महत्त्वाच आहे हे. Linked In, फेसबुक, GMB इ च्या Links तसेच Newsletter चालवत असाल, तर त्याला जोडून घेणे , नसल्यास whatsapp लिस्ट ला तरी - आवाहन !

सीन ८ : आभार अखेरीस (५ सेकंद)

धन्यवाद म्हणा , Subscribe चे आवाहन करा, बेल Icon बद्दल सांगा , लोगो दिसू द्या 

टाळायचं काय :-

  • तपशीलवार बोलणे 
  • अभिप्राय दाखविणे 

तयार कसे करायचे ?


व्यावसायिक Video बनविणाऱ्या माणसाकडून करून घ्या,हो,ही गुंतवणूक कराच. product सुद्धा व्यावसयिक व्यक्तीकडून शूट करून घ्या. आपण काय बोलावे हे सुचत किंवा उमजत नसेल, तर तुम्हाला हि मंडळी तज्ज्ञ मंडळी सुचवितात. 

Monday, 19 April 2021

Passion to Profession - ''You are here''

 कुठल्या तरी पुस्तकाच्या प्रस्तावनेत वाचल्याचं आठवतंय,
'मोठया कंपन्या किंवा मॉल मध्ये एक नकाशा असतो, 'You are here' असं दाखवणारा.तिथून तुमच्या इप्सित स्थळी कसं जायचं हे समजायला मदत व्हावी हा उद्देश, तरी बरेच जण गोंधळतात. पण काही जणांना अगदी पक्क ठाऊक असतं की आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठं आणि कसं जायचंय.

प्रणव म्हैसाळकर ची मुलाखत ऐकतांना हे पदोपदी जाणवलं.

1.घरात भाऊ अभियंता, बहीण CA, काकांची टॅक्स कन्सलटेशन कंपनी वगैरे, त्यामुळे त्याच जुनाट मार्गाने न जाता आपलं (नुसतं म्हणायला नव्हे) वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची समज विद्यार्थीदशेतच असणं आणि त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणं हे प्रणवच्या डोक्यात 'You are here' चा नकाशा पक्का असणार हेच दर्शवतं.

2.शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे आणि लहानपणापासून जनावरांबरोबर जवळीक असल्यामुळे निसर्गाबद्दलची आपुलकी आणि सजगता होतीच पण ,'लहानपणीच मला माझी आवड (पॅशन) गवसली' असला खोटा आणि अप्रामाणिक दावा प्रणव करत नाही

3.बारावी नंतर विज्ञान शाखेत जाण्यासाठी प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवून सुद्धा घरची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःचा 'कल' ह्याचा सुवर्णमध्य साधला जाईल हे ओळखून प्रणवने 'पर्यावरण विज्ञान' शाखेत प्रवेश घेतला आणि पुढील काही वर्षात त्याचा 'कल' त्याची 'आवड' (पॅशन) होऊ लागली.

4.मग काय निसर्गाच्या संगतीत प्राण्यांचे आवाज काढणं, स्वतःच्या निरीक्षणातून पक्ष्यांचे वागणं/बोलणं ह्याचा अंदाज बांधणं आणि त्यानुसार त्यांच्या बरोबर संवाद साधणं हे सुरू झालं आणि त्यातही कसलाच बडेजावपणा न मिरवता, 'हे अगदी कुणीही करू शकतं' असं प्रांजळ मत प्रणव नोंदवतो. (त्यासाठी आपल्या ताईच्या घरी येणाऱ्या पोपटाची प्रणव ने सांगितलेली कहाणी जरूर ऐका), फक्त निसर्गाच्या सानिध्यात राहणं महत्वाचं

5.मागच्या वर्षी ऐन लॉकडाऊन च्या मध्यात एका 'केस स्टडी' निमित्त 'भीमगड' अभयारण्यात जाण्याची प्रणवला संधी मिळाली.
'Slender loris' (वनमाणूस) ह्या प्राण्याची तिथे गोव्यामार्गे तस्करी चालते. तिथले स्थानिक निसर्गाची कशी काळजी घेतायत, उत्पन्नाचा स्रोत नसल्या कारणाने ती मंडळी तस्करी कडे वळतायत का?त्यामुळे पर्यावर्णाची कशी हानी होतेय का? तिथले स्थानिक आणि Slender Loris ह्यांची एकंदरीतच स्वभाववैशिष्ट्ये काय? असा प्रणव च्या केस स्टडी चा विषय.

Slender Loris हा प्राणी निशाचर असल्या कारणाने संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 3 अशा प्रणवच्या कामाच्या  वेळा व सगळं फिरणं हे पायीच असल्यामुळे वाघ, बिबट्या सारखे प्राणी समोरून पाहणं हा एक रोमांचकारी अनुभव असल्याचं प्रणव सांगतो.

6.कामाशी तडजोड करायची नव्हती आणि 'प्राण्यांचे मानसशास्त्र' किंवा संबंधित काही काम न मिळाल्यामुळे पुणे विद्यापीठातुन पदवीच्या अभ्यासक्रमात पहिला येऊनसुद्धा 3 महिने प्रणव ने नोकरी स्वीकारली नाही

7.दरम्यानच्या काळात 'ज्ञान प्रबोधिनी' तर्फे लहान मुलांना विज्ञान सहजपणे समजावण्यासाठी प्रणव काम करत असे

8.म्हैसूर विद्यापीठ भारताचाच भाग असणाऱ्या 'अंदमान आणि निकोबार' ह्या बेटांवर शिक्षण क्षेत्रात काम करत होते आणि प्रणवचा अर्ज त्यांना आवडला.नुसतं विज्ञान एके विज्ञान न करता त्याच्या प्रसारासाठी 'ज्ञान प्रबोधिनीत' प्रणव करत असलेल्या कामाची दखल त्यांनी घेतली व प्रणवला तिथे जायची संधी मिळाली.

9.तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जेव्हा तुम्ही सर्वस्व झोकून काम करता तेव्हा आपसूकच अनेक मदतीचे हात तुमचं कार्य सिद्धीस नेण्यास पुढे येतात.अंदमानला जाण्याचा दहा हजार रुपयाचा खर्च तेव्हा प्रणवच्या आवाक्याबाहेरचा होता पण 'ज्ञान प्रबोधिनीने' प्रणव ला कर्जाऊ रक्कम देऊ केली. आज अंदमान - निकोबार येथील 'शिक्षण धोरण' आणि पद्धत प्रणव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेली आहे.आज तिथे शिकवलं जाणारं 'पर्यावरण विज्ञान' प्रणव ने तयार केलेल्या धोरणावर आधारित आहे.

10.सध्या पुणे विद्यापीठात प्रणव सल्लागार म्हणून कार्यरत आहे, तसेच काही नवऊद्यमींनाही तो समुपदेशन करतो

उथळ काम करण्यापेक्षा विशिष्ठ ज्ञान मिळवल्यामुळे निसर्गाबद्दलची सजगता आणि किमान बुद्धिमत्ता वाढवता येईल असे प्रणव मानतो व त्यामुळे 'पर्यावरण विज्ञान' विषयात पदवी आणि 'जैवविविधता' विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या प्रणवला पुढे युरोप किंवा अमेरिकेत जाऊन पी.एच.डी. मिळवायची आहे.

आयुष्यातील सगळ्यात जास्त वेळ हा आपण काम करण्यात घालवतो त्यामुळे काम हे आपल्या आवडीचेच असले पाहिजे पण आवडीच्या कामातून वेळेत आणि किमान गरजा भागवणारं उत्पन्न मिळण्याची शाश्वती नाही आणि आजच्या स्पर्धात्मक युगात पैशाची निकड भल्याभल्यांना ह्यात तडजोड करायला भाग पडते (ह्यात गैर असं काही नाही) पण पैशाच्या प्रलोभनांना बळी न पडता नेटाने आपल्या आवडीसाठी वेळ देऊन त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे आणि त्याचे पुढे उत्पन्नात रूपांतर करणे ह्यासाठी स्वतःवर विश्वास, आणि कमालीचं धाडस लागत.

(Delayed Gratification is a rare personality trait)

त्यात हे सगळं बोलणं सोपं पण करणं अवघड

अशा आड वळणावर चालणाऱ्या प्रणवशी आपली गाठभेट घालून देण्याच्या आणि एक नवीन उपक्रम सुरू करण्याच्या सौमित्र सरांच्या कल्पनेचं कौतुक आणि अभिनंदन 💐,

उद्योजगतेचा एक नवीन पैलू आपण अनुभवला.

आड वळणांवर चालायला सुरुवात करून पद्धतशीरपणे मुख्य प्रवाहात येताना प्रणवच्या 'You are here' च्या नकाशा आकलन शक्तीचे आणि ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःत घडवायला लागणाऱ्या बदलांसाठीच्या जिद्दीला मनापासून सलाम 🙏

प्रणवच्या पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे शुभेच्छा 💐

Sunday, 18 April 2021

1 Minute Intro : काय हवे, काय नको !

products /services बद्दल अगदी एकाच वाक्यात बोलायचं !

सर्वात पहिले हे भान हवे कि, इथे आपले products/services खूप तपशीलात नाही सांगायच्या. ४०- ते ५० मेम्बर्स असतात मीटिंग ला, प्रत्येक जण वरवर gross मध्ये उत्सुक असतो कळून घ्यायला, कि तुमची साधारण category काय आहे आणि तुमच्याशी connect व्हायचा काय फायदा.

शिवाय विक्री करण्यासाठी जाऊच नका. त्या ऐवजी आपल्या उत्पादन/सेवा ह्याबद्दल एखाद्या वाक्यातच सांगा. आपल्या बरोबर का व्यवसाय करावा, हे जास्त बोला. ते सुद्धा मोजकेच. 

उदा आज बाचल सर म्हणाले , कि :-

  1. मी स्वत: architect आहे , ३५ वर्षांपासून ( स्वत: च्या शिक्षणाबद्दल , अनुभवाबद्दल बोलले )
  2. अनेक संस्था जसे कि भारती विद्यापीठ ( आपल्या नामांकित ग्राहकांबद्दल बोलले ), जिथे मी तुम्हाला Connect देवू शकतो ( आधी सांगितलं - काय देवू शकतो )
  3. माझं एक अवंती कलाग्राम आहे ( product / सेवेबद्दल इतकंच बोलले )
  4. महाराष्ट शासनाच्या अधिकृत १२ resorts पैकी एक असा उल्लेख केला ( पुन्हा "why me" ) ह्याच्यावरच फोकस !
  5. अगदी शेवटी ask, तो सुद्धा कमीत कमी शब्दांत मागितला.

असंच कात्रे ह्यांच्याबद्द्लही म्हणता येईल :-

  1. Commercial Artist + ४० वर्षे प्रिंटींग क्षेत्रात काम शकतो (अनुभव व शिक्षण )
  2. Persistent, Horbeiger व Access Health Care  मध्ये connect देवू शकेन ( इथे ग्राहकांचा दर्जा + देण्याची वृत्ती म्हणजे Giving आधी )
  3. Pixie हे प्रतिष्ठेचे Award - ह्याबद्दल अधिक बोलले ( Why me )
  4. पुन्हा ask कमीत कमी शब्दांत !

ह्याउलट आपले अनेक मेम्बर्स आपल्या सेवा, उत्पादने खूप तपशीलवार सांगत बसले. त्यांच्याकडे का यावं , किंवा आपण काय connect देवू शकतो ह्यावर भर दिला तर आपण जास्त लक्षात राहतो. Gives बद्दल खरोखर विचार करून ठेवा , त्याबद्दल जास्त, मनापासून मदत करा, येईल अपोआप आपल्याकडे. सहज, नक्की. 

ह्यात पारंगत व्हायलाच लागेल !

हे कौशल्य आत्मसात करावेच लागेल. तयार करून ठेवा तुमचे १ मिनिट , आपली आधीची एक पोस्ट रेफर करू शकता, किंवा चक्क कसलेल्या मंडळींची मदत घ्या कि !

Saturday, 17 April 2021

भाग - २ "काय नाही करायचं"......


 

मागील पोस्ट मधील ठळक वैशिष्ट्ये 
1.चलनवाढ (महागाई) हा एक प्रकारचा खर्चच आहे जो दरवर्षी साधारण 6 टक्क्याने वाढतोय

2.उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी गुंतवणूक ही 'निवड' न राहता 'निकड' झाली आहे (Its no more a choice, rather a compulsion)

आता एकदा का आपल्याला कळलं की गुंतवणुकीच्या परताव्याचा दर 6 टक्क्यांपेक्षा अधिक हवा की काही गोष्टी स्पष्ट होतात...

कुठल्या?

1.बँकांची कुठलीही उत्पादने (Inflation) ला मागे काढत नाहीत...करंट किंवा सेविंग अकाउंट मध्ये परताव्याचा दर Inflation पेक्षा कायमच कमी असतो. FD ला वयस्कर व्यक्तींना काही बँका 6 टक्के परतावा देतील सुद्धा पण ज्या दिवशी तुम्ही गुंतवणूक काढून घ्याल, तेव्हा ती रक्कम हे तुमच त्यावर्षीचे उत्पन्न गणले जाईल आणि त्याअनुषंगाने तुम्ही ज्या करपात्र प्रकारात (Tax Bracket) मध्ये याल त्यानुसार कर भरावा लागेल. थोडक्यात तुमच्या अपेक्षित खर्चापेक्षा परताव्याचा दर कमी होईल. (ह्याचाच अर्थ जेव्हा तुम्ही 15 वर्षांसाठी लाखांनी/कोट्यांनी रुपयांची FD करता, तेव्हा उत्तरोत्तर तुम्ही तुमची संपत्ती कमी कमी करून घेता 🙆🏽‍♂️😱)

2.किसान विकास पत्र, पोस्टातली गुंतवणूक, सरकारी रोखे , सोनं इत्यादी कुठलीच उत्पादने Inflation पेक्षा अधिक परतावा देत नाहीत

3.वरील उत्पादनांना काही लोकं 'जोखीम विरहीत' उत्पादने मानतात (घरबसल्या सिलिंग फॅन माझ्या डोक्यावर पडू शकतो - हे ऐकायला जितकं अतर्क्य वाटतं त्याच न्यायाने एवढी किमान जोखीम जगतांना प्रत्येक क्षणी असते) त्यामुळे गुंतवणुकीचे निर्णय डोळसपणे घ्यावेत.

मग कुठल्या साधनांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा अधिकचा परतावा देण्याची क्षमता आहे? 

भारतातील गेल्या 40 वर्षाचा इतिहास पाहता खालील दोन साधनांमधील गुंतवणुकीने सातत्याने inflation ला मागे काढलंय - 

1.भांडवली बाजार (स्टॉक मार्केट) 
2.म्युच्युअल फंड

कसं? परताव्याचा दर कसा मोजायचा इत्यादी पुढील भागात 💐

 'तळ टीप' - 'Rule of Inversion' - Instead of asking, 'How do i save and invest? Ask yourself, How would i get broke - You will find the right track 
 
धन्यवाद💐

Friday, 16 April 2021

डिजिटल म्हणजे .... अगदीच अतर्क्य का ?

कालच माझं माझ्या एका ग्राहकाशी बोलणं चालू होतं. त्याने नुकतेच त्याच्या व्यवसायासाठी डिजिटल मार्केटिंग सुरु केलंय. एक ३ ते ४ महिने झाले असतील. पूर्वी कधीही केलेले नाही. त्यामुळे आमच्या शिरस्त्याप्रमाणे मी सर्वात प्रथम  एक रणनीती तयार केली. अर्थात डिजिटल presensce अजिबात नसल्याने प्रथम तो निर्माण करणे व सोबत गुगल वर थेट search मध्ये जाहिरात देणे अशी पहिल्या ३ महिन्याची strategy म्हणजे रणनीती ठरली. अर्थात results येतील, त्यानुसार पुढची पावले.

अजिबात... एकही कसा call नाही येत ?

हा प्रश्न मला ग्राहक वारंवार विचारात राहतोय ह्या दरम्यान. खरं तर जेव्हा तुम्हाला कुणीच ओळखत नसतं, तेव्हा आधी ओळखायला लागावे लागतात लोक. हाच फंडा डिजिटल मध्ये सुद्धा लागू होतो. मुळात डिजिटल हा पूर्णपणे Unknown असा Audience असतो. शिवाय तो Offline सारखा समोर नसतो, प्रतिक्रिया द्यायला. त्यामुळे, जाहिरात---> call असे results अपेक्षित नसतात. आणि जर तुम्ही गुगल ला "call" असा जरी पर्याय दिलात, तरी येणारे सर्व call अगदीच आपल्याला अपेक्षित असेच येत राहतील हि सुद्धा चुकीची अपेक्षा आहे.

कॅम्पेन्स हळूहळू फिक्स होत जातात 

ह्या प्रकाराला थोडा धीर लागतो , विश्वास लागतो. शेतकऱ्या सारखा. उगवेल नक्की, पण अगदी निश्चित नाही सांगता येणार , कि कधी Exactly फलधारणा होईल. हां - होईल हे निश्चित, आणि झाली कि अतिशय तुफ्फान पीक येतं हेसुद्धा निश्चित, पण त्याला खते, मशागत इत्यादी करत राहून, बाजू बाजूने सतत येणारे results तपासत एक method निश्चित करावी लागते.मग हि कॅम्पेन्स म्हणजेच एक ठराविक पद्धतीची विक्री प्रणाली निश्चित होत जाते.

म्हणजे काहीच निश्चित नाही ?

आहे ना ! सातत्याने आणि विश्वासाने हे करीत जाणे, राहणे. एक work नाही झालं तर दुसरे. यश नक्की आहे. बस , एकदा का method बसली, कि हळूहळू results येवू लागतात. ह्यात search आणि सोशल तसेच Reputation ह्या ३ ही मार्गांवर काम करीत राहणे आवश्यक असते, आणि Long Term !  शेवटी डिजिटल हाच मार्ग आहे हे लक्षात असू द्या , आणि तेही Sensibly करायचे आहे, उगाच वरवर दिसणाऱ्या उथळ मार्गांनी नव्हे !

Thursday, 15 April 2021

व्यावसायिक प्रक्रियांचे Digitization : एक महत्त्वाचं पाउल !

आपल्या बिजनेस मधल्या रुटीन क्रिया करण्यात जाणारा वेळ वाचवला तर खूप ताण हलका होऊ शकेल. अगदी लहान सहान , ते अगदी गुंतागुंतीच्या प्रक्रिया digitize करायला सुरुवात करा, खूप फरक पडेल, आणि सध्याचा काळ आणि वेळ, दोन्हीही सत्कारणी लागेल !

सुरुवात ज्यांनी महत्त्वाचा फरक पडेल त्या क्रियांनी करा 

पुरवठादार तसेच ग्राहकांचे GST तसेच PAN नंबर्स मागविणे : एक गुगल form करून पाठवून द्या. सोपा मार्ग.

वेबसाईट वर आलेल्या पाहुण्यांना ( संपर्क form भरलेल्यांना) जाणारा आपोआप निरोप. हा तुमचा web developer अगदी सहज सेट करून देईल. असेच निरोप whatsapp, GMB तसेच फेसबुक वर स्वत:लाच तयार करता येतात.

email चे Automation : Gmail वापरत असाल, तर templates मार्फत विशिष्ट प्रकारच्या इनकमिंग मेल ला विशिष्ट प्रकारचा प्रतिसाद आपोआप जाऊ शकतो. तसेच परस्पर लेबल्स लावणे वगैरे क्रिया देखील Gmail द्वारे अगदी आरामात, सहज होऊ शकतात.

ह्याशिवाय काही online softwares SAAS पद्धतीने मिळतात, ज्यात आपण फक्त महिन्याचे भाडे देत राहतो. गुंतवणूक आहेच, परंतु परिणाम पाहिलात तर काहीच नाही.

सरकारच्या fssai ने आता पाण्याच्या बिजनेस मधील duplicate व्यवसाय रोखण्यासाठी BIS चे प्रमाणपत्र online upload करण्याचे एका order द्वारे जाहीर केलय. भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात एखादा कायदा राबविणे जर ह्यामुळे शक्य होतंय , तर आपल्या व्यवसायात आपल्याला नक्कीच वाव आहे, नाही का ?

तुम्ही वापरत असलेल्या एखाद्या software बद्दल किंवा process बद्दल निश्चित माहिती द्या ! 

Wednesday, 14 April 2021

नकारात्मक प्रतिक्रिया कशा हाताळायच्या ?

नुकताच मला एका नव्या forum ला negative review आला. पाहिल्या पाहिल्या अगदी बोअर वाटलंच, रागही आला review देणाऱ्याचा. एक तर आपली सेवा कुणाला तरी आवडू शकत नाही हे आपल्याला मान्यच होत नाही. कोण हा किंवा हि व्यक्ती ? इथे अशी घाण ओकायची काय गरज वगैरे प्रथमोपचार झाले माझ्या मनाचे, नंतर काही वेळाने मी नीट विचार केला आणि ...

आधी स्वीकारलं कि कुणाला तरी आपली सेवा नाही आवडू शकत, आणि हे अगदीच ठीक आहे. हे त्याचं वैयक्तिक मत आहे, अनुभव आहे. 

म्हणजे काही माझी सेवा वाईटच किंवा चांगलीच वगैरे labeling करण्याची आवश्यकता नाहीये काही. कुणाला आवडेल, कुणाला नाही. एखादा व्यक्त होतो, एखादा नाही. जसे सर्व जण कौतुक करत नाहीत, तसेच सर्वच जण नापसंती देखील व्यक्त नाही करीत. त्यामुळे ठीकच आहे हे.

मी देत असलेली सेवा जर खरोखरीच "वाईट" ह्या सदराखाली मोडली जात असेल, तर इतके वर्षे मी व्यावसायिक म्हणून समाजाकडून स्वीकारला जाणे शक्यच नाही. त्याचमुळे मी माझ्या बद्दल तोकडा विचार करण्याची आवश्यकता नाही.

आता त्या review ची सत्यासत्यता पडताळून पहायची वेळ आहे. पहायला हवं कि नक्की कोणत्या गोष्टीबद्दल तक्रार केलेली आहे ते, बऱ्याचदा आपल्या सडेतोड स्वभावाचा वगैरे राग आल्याने अगदी वरवर नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविलेली असू शकते, तेव्हा खोदून विचारावे , कि नक्की कोणती गोष्ट असमाधानकारक वाटली. ह्याला नेमकं उत्तर आलं , तर ती कमी खरोखर दूर करण्याचा प्रयत्न करावा.

परंतु असे नसेल, तर मात्र ह्या गोष्टीचा शांतपणे परंतु व्यवस्थित समाचार घ्यावा. ह्याने जाहीर फोरम वर आपली निष्कारण होणारी बदनामी टाळू शकेल. माझ्या वरील बाबतीत, सदर व्यक्तीने त्याचे details अजिबात दिले नव्हते, शिवाय दिलेला इमेल आयडी देखील fake आढळून आला. त्यामुळे फोरम चालकांनी स्वत:हूनच हा review काढून टाकला. 

पण गुगल वर वगैरे असे करायची संधी नाही मिळत आपल्याला. अशा वेळी ते ते reviews व्यवस्थित, डोकं शांत ठेवून वस्तुनिष्ठपणे हाताळावेत. अजून एक गोष्ट करायची , म्हणजे सतत +ve reviews घेत राहायचे. शेवटी reviews चा score म्हणजे ह्यातलं गुणोत्तर असतं. शिवाय सतत +ve reviews मुळे आपल्या व्यवसायातही खूप वाढ होऊ शकते , हा अधिक चा फायदा ! 

👉हि पोस्ट जरूर वाचा : +ve reviews चा उपयोग 


Tuesday, 13 April 2021

भाग १ - "गुंतवणूक म्हणजे काय"?


 "If you don't find a way to make money while you sleep, you will work until you die' - इति श्री. वॉरन बफेट - अर्थात नोकरी धंद्यातून पैसे कमावताना त्याला गुंतवणुकीची जोड न दिल्यास निवृत्तीच्या वयात ही काम करावं लागेल.

असं का?

त्याच्या अनेक उत्तरांपैकी एक म्हणजे 'Inflation' - (चलनवाढ) - थोडक्यात 'महागाई' जी सतत वाढत असते, किंबहुना चलनवाढ होत राहणंच अपेक्षित असतं कारण हा कुठल्याही अर्थव्यवस्थेचा स्थायीभाव असतो.(आपला पगार किंवा उत्पन्न जसं उत्तरोत्तर वाढावं अशी आपली इच्छा असते ना तसंच)

पण विरुद्ध अर्थाने म्हणजे महागाई वाढणे ह्याचा अर्थ खर्च देखील वाढला आणि खर्चाच्या प्रमाणात उत्पन्नाचा ताळमेळ साधतांना किंवा आपली एक किमान जीवनशैली अबाधित राखतांना जी तारेवरची कसरत करावी लागते ते पाहून वॉरन बफेट ह्यांनी वरील उद्गार काढलेत.

त्या अर्थाने सध्याच्या युगात 'गुंतवणूक' हा निवडीचा विषय न राहता गरजेचा विषय झालाय.

गेल्या दशकभरात भारतात सरासरी चलनवाढ ही साधारण 5 ते 6 टक्क्यांच्या मध्ये राहिली आहे.

म्हणजे ह्या वर्षीच्या दर 100 रुपये खर्चाच्या मागे पुढील वर्षी अधिकचे 6 रुपये , म्हणजे एकूण सरासरी 106 रुपये खर्च करावे लागतील

ह्याचाच अर्थ आपल्याला गुंतवणुकीतून किमान 6 टक्क्यांपेक्षा अधिकचाच परतावा मिळवावा लागेल

तो मिळतो का? कुठल्या साधनांद्वारे मिळतो?नसल्यास कसा मिळवावा? पुढील भागात 💐

Contextual Posting : सणाच्या बरोबर आपलं Offering लिंक करा !

सणासुदीला ग्रीटिंग सारख्या पोस्ट्स टाकणे हे अजिबात नवीन नाही. चांगलाही आहे उपक्रम. तरी अजून थोडं creative व्हायला नक्की वाव आहे इथे.

उदाहरणार्थ :

गुढी पाडव्याचे निमित्त साधून कल्पक पोस्टिंग. कसं करता येईल ?

तर पहायचं कि सणाचं साधारण काय महत्त्व आहे ? तर मराठी वर्षाचा पहिला वहिला दिवस, शिवाय साडे ३ मुहूर्तांपैकी एक. या दिवशी साधारणपणे उत्कृष्ट , चांगले, मंगल असे संकल्प केले जातात. ह्याला Highlight करता येईल ; एक उदाहरण म्हणून माझ्याच व्यवसायाचे उदाहरण घेतो !

पोस्ट हेडिंग : हे आकर्षक हवं.

"मग , मंडळी पाडव्यापासून सुरुवात करताय तुमच्या online प्रवासाला ? "

👉ह्यात पहा कि पाडवा हा Context  म्हणून Highlight केलाय. आणि Online प्रवास हे माझ्या व्यवसायाचे वैशिष्ट्य म्हणून आणलं आहे समोर.

आता पाहू : पोस्ट Body 

थोडसं विस्ताराने सणाचं महत्त्व , आणि त्याला जोडून आपले व्यवसाय वैशिष्ट्य अधोरेखित करायचं

"गुढी पाडवा हा मराठी वर्षाचा प्रथम दिन, ह्याच दिवशी नव नवीन, मंगलमय, महात्त्वाकांक्षी संकल्प केले जातात. आपल्या व्यवसायाकरिता online किंवा digital मार्गाने न्यायचा संकल्प सुद्धा आजच केलात तर ?"

कॉल टू Action 

ह्याचा अर्थ, पुढे आपल्या व्यवसायाकरिता ग्राहकाला उद्युक्त करणारे आवाहन :-

"आजच जॉय ला संपर्क करा, आणि मिळवा पहिले विनामुल्य Consultation! "

आणि सोबत साजेशी एखादी इमेज : झाले कि छानसे Contextual Posting तय्यार !


Monday, 12 April 2021

कॉलेजमधला पहिला दिवस

 २००१ मधे मी प्रथम पुण्याच्या सुप्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधे शिकवायला सुरुवात केली. मुलगा झाल्यावर करीयर मधे २वर्षं ब्रेक घेऊन पुन्हा नोकरी घेतली होती. शिकवायला जॉईन झाले खरी, पण पहिल्याच दिवशी बघितले तर अधिकांश ‘मुलं’ (?) नोकरी करणारी. प्रमोशनसाठी मास्टर डिग्री हवी म्हणून एम.पी.एम. ला ऍडमिशन घेतलेले लोक स्मिता ‘मॅडमच्या’ वर्गात होते.

मी स्वत: पुणे विद्यापीठाची रॅंक होल्डर, नेट-सेट उत्तीर्ण असल्यामुळे वर्गात शिकवण्याच्या आत्मविश्वासाची कमी नव्हती. २-३ वर्षे इंडस्ट्रीत कामही केले होते. पण समोरच्या ‘मुलांचे’ वय माझ्या दुप्पट असेल अशी मात्र मला अजिबातच कल्पना नव्हती. पहिल्या तासाला गेले आणि एकदम पोटात गोळाच आला. माझं वय बघून काही जणांच्या चेह-यांवर प्रश्नचिन्ह आलं, तर काही जणांनी नाकं मुरडली. उत्साहाने साडी नेसून गेल्यामुळे वय मोठे दिसत आहे अशी मी स्वत:ची समजूत घातली व विद्यार्थ्यांना स्वत:चा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांना सांगितले की तुम्हीही तुमचा परिचय करून द्या. (खरे तर माझी घाबरगुंडी उडाली होती आणि मला थोडा वेळ काढायचा होता.)

पहिल्या बाकावरच्या पहिल्या मुलाने 😀सांगितले, "मी लेफ़्टनंट कर्नल शर्मा. याच्या आधीचे पोस्टिंग कारगिल. सध्या २ वर्षे पुण्यात शिकत आहे." मला आनंद झाला? की घाबरगुंडीमधे वाढ झाली? कळेना. मी यांना काय शिकवणार? कसं शिकवणार? एकदम खुजं वाटायला लागलं. तेव्हा वृत्तपत्रीय भाषेत एक ‘संमिश्र प्रतिक्रिया’ देऊन पुढे गेले. तर हे साहेब कॅप्टन, त्यांच्या पुढच्या बाकावर कर्नल. (आपण मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधे शिकवायला आलोय की अजून कुठे..... अर्थातच मनातल्या मनात...) असे एकामागून एक फ़ौजी उभे राहून ऒळख करून देत होते. त्यांचा मोठमोठ्या रँक्स असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यातील नम्रता, आत्मविश्वास, दांडगा अनुभव असूनही अजून पुढे शिक्षण घेण्याची इच्छा हे सगळं मलाच बळ देऊन गेलं. आणि एकदम मला हलकं हलकं वाटायला लागलं.

तिस-या रांगेपासून नुकतीच ग्रॅजुएट झालेली मुलं, मोठ्या कंपन्यांमधील अधिकारी, घरचा व्यवसाय सांभाळून पुढे शिकणारे तरूण, लग्नानंतर शिक्षणात पडलेली गॅप भरून काढणा-या गृहिणी अश्या अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांची ओळख झाली. शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्याने नाव सांगेपर्यंत माझी घाबरगुंडी पळून गेली होती.

माझ्याजवळ जे होतं, पण त्याचं महत्त्व या आधी लक्षात आलं नव्हतं असं काहीतरी सापडलं होतं. मी विद्यार्थ्यांना सांगितलं. माझ्याकडे आहे ते भरपूर पुस्तकी ज्ञान. कारण मी स्वत: गाईड वाचून कसाबसा फ़र्स्टक्लास मिळवणारी विद्यार्थिनी कधीच नव्हते. मला होती सिलॅबसची सखोल माहिती. अभ्यास कसा करायचा, प्रोजेक्ट कसे करायचे, सेमिनार मधे कसे प्रेझेंटेशन करायचे, पोस्ट-ग्रॅजुएशनच्या उत्तरपत्रिकेत मुद्द्यांची मांडणी कशी असावी, अवांतर वाचनासाठी कोणती पुस्तके वाचायला हवी असे अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे पी.जी. उत्तम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी. आणि या ज्ञानाला अनुभवाची जोड देणारे आपल्या वर्गातले फ़ौजी बंधू आणि इतर वर्किंग प्रोफ़ेशनल्स. असे आपण एकमेकांकडून शिकूया. And let's make these 2 years in our lives most impactful, most memorable. हे बोलून झाले तेव्हा वर्गातला ताण निघून गेला होता. सगळ्या चेह-यांवर सहजता आणि माझ्या लेक्चरला बसण्याची इच्छा दिसायला लागली होती.
माझ्या कॉलेजमधल्या नोकरीच्या पहिल्याच वर्षी माझ्या विद्यार्थ्यांकडून मला खूप अनुभवाचं ज्ञान मिळालं. आम्ही अनेक मुद्यांवर अनुभवावर आधारलेल्या केस स्टडी लिहायचो, कधी फ़ॅक्टरी बघायला जायचो, फ़ौजी बंधूंसोबत तर खूप गोष्टी नव्याने शिकलो - हसलो - रडलो. मल्टिनॅशनल मधल्या माझ्या ५० वर्षांच्या मुलाने 😁 त्यांच्या अमेरिकन बॉसला बोलावून पंचतारांकित कॉन्फ़रन्स पण केली. आणि अशी माझी मास्तरकीची सुरुवात सुफ़ळ संपूर्ण झाली.

स्मिता सोवनी

1 मिनिट इंट्रो : एक प्रभावी माध्यम

काय आहे हे १ मिनिट इंट्रो ?


बिझनेस नेट्वर्किंग मिटींग्स मध्ये साधारणत: २० ते ५० व्यावसायिक एकत्र येतात , आणि आपापल्या व्यवसायाची ओळख देतात. मुळात ह्या मिटींग्स साधारण ९० ते १२० मिनिटे म्हणजे दीड ते जास्तीत जास्त 2 तास चालतात. ह्या मिटींग्ज मधून व्यवसायाच्या संधी निर्माण होणे हे अपेक्षित असते त्यामुळेच ह्या मर्यादित वेळात काही गोष्टी घडणे हे व्हायला हवं :-
  • प्रत्येक मेंबर चा व्यवसाय सर्वांना कळणे ( नक्की व्यवसाय काय ?)
  • तो त्यात किती पारंगत आहे ( शिक्षण, मान्यता, ग्राहक इत्यादी )
  • त्याला नक्की काय मदत हवी आहे ( एखादं चांगलं बिझनेस कनेक्शन )
  • तो नक्की काय मदत देवू शकतो ( त्याचं एखादं उत्तम कनेक्शन )
  • नजीकच्या काळातील एखादा ताजा ताजा बिझनेस अपडेट ( समाधानी ग्राहक वगैरे )
हे सर्व , प्रत्येक मेंबर चं घडवून आणायचं असेल, तर त्याला वेळेचं बंधन आलंच ओघाने. शिवाय, एखाद्याच्या बिजनेस मध्ये अधिक रस वाटल्यास, पुढे नंतर न्याहारी च्या वेळात अधिक चर्चा करून संबंध अधिक वाढविता येऊ शकतात की ! 

शिवाय, ह्या प्राथमिक ओळखीत व्यावसायिकाची प्राथमिक बिजनेस category कळली, तरी पुरेसं असतं ! त्यामुळे खूप खोलात जावून व्यवसायाचा प्रत्येक पैलू न पैलू उलगडून सांगण्याची आवश्यकता नाहीये. ह्यामुळेच , एक मिनिट ही एक सर्वसाधारणपणे स्वीकृत ओळख-वेळ मानली गेलीये, आणि हे रुजलंय देखील चांगलंच.

ह्या एक मिनिटात आश्चर्य कारक घटना घडू शकतात !

नीट लक्ष देवून जर हे हत्यार-अवजार आपण वापरल , तर मात्र आश्चर्य कारक, अफाट deals होऊ शकतील. ह्या करीता खालील गोष्टी अगदी काटेकोरपणे करणे गरजेचं आहे :-

  1. ह्या एक मिनिट ची कसून तयारी करणे.
  2. प्रत्येकाची इंट्रो कान देवून ऐकणे.
  3. उपयुक्त वाटल्यास टिपून ठेवणे. ( कुठे एकत्र काम करता येईल का हे तपासणे)
  4. मागत काय आहेत, हे समजून घेणे (ह्यातून आपल्याला त्यांचा ग्राहक वर्ग कळतो). समान ग्राहक वर्ग भिन्न उत्पादन किंवा सेवा ह्याचं छान ग्याट मेट होऊ शकतं. 
  5. ग्राहकांची नावे सांगितल्यास, आणि अपेक्षित सापडल्यास नोंद करणे.

रेफरल ची देव घेव :-


ह्या नंतर रेफरल ची देव घेव होते. ह्यातून पुढच्या संधी वगैरे निर्माण होतात. ह्या पुढे नेताना मात्र काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणजे ज्यांना रेफरल देत आहोत ते त्या योग्य आहेत कि नाही हे पडताळून घेणे , तसेच मिळालेले रेफारल्स नीट समजून घ्यायचे. हे एका वेगळ्या पोस्ट मध्ये पाहू.

तरी, पुढच्या बिजनेस नेटवर्क मीटिंग ला जाण्यापूर्वी नीट तयारी करून जा, हे मात्र नक्की !


Sunday, 11 April 2021

निलेश बाक्षे ची मुलाखत

डिप्लोमा च्या तिसऱ्या वर्षाला चांगले गुण मिळाल्यामुळे हातात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज ऑटो सारख्या नामांकित कंपन्यांचे ऑफर लेटर,

वडील शेतकरी, त्यात घरची बिकट परिस्थती पण 'ह्याला' मात्र अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करायची इच्छा

वडिलांनी पैशाची जुळवाजुळव करतो म्हणून धीर दिला आणि आपल्याला 'निलेश पांडुरंग बक्षे' हा हाडाचा अभियंता मिळाला.

हाडाचा अशासाठी की,

1.अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये 180 विद्यार्थ्यांच्या बॅच मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने निवडलेल्या दोघांपैकी एक विद्यार्थी म्हणजे निलेश (त्या अर्थाने त्याने वडिलांचा निर्णय आणि विश्वास ही सार्थ ठरविला

2.10 - 12 वर्ष अभियंता म्हणून नोकरी केल्यानंतर चाकोरीबद्ध तोच तोचपणाचा निलेशला कंटाळा आला, आपल्याला वेगळं काय करता येईल हा किडा त्याच्या डोक्यात वळवळू लागला आणि त्याचंच रूपांतर म्हणजे 'ऑटोमॅटिक बाईक आणि कार वॉशिंग सिस्टम' हे पेटंटेड मशीन बनवून त्यानं स्वतःतील 'अभियंते'पण सिद्ध केलं आणि त्यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या एका व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली

ऑगस्ट 2017 ते आजतागायत देशात आणि परदेशात मिळून साधारण दर महिन्याला 1 पेक्षा जास्त ह्या हिशोबाने निलेश ने 45 बाईक आणि 10 पेक्षा जास्त कार वॉशिंग मशीन विकल्या आहेत

ग्रामीण भारतात रोजगार वाढावा ह्या उद्देशाने आपलं हे मशीन कमीत कमी खर्चात कसं बनविता येईल, ह्यावर निलेश सध्या काम करतोय, तसेच बस वॉश करण्याचं एक पोर्टेबल मशीनही तो तयार करतोय.

क्लीनिंग ह्या क्षेत्राला ऑटोमेशन ची जोड देऊन ज्या काही नवनवीन कल्पना राबवता येतील त्या सगळ्यां निलेश ला करुन पहायच्यात

बाकी अभियांत्रिकी पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर 10 - 12 वर्ष नोकरीचा अनुभव, स्वतःचं काही तरी करण्याची उर्मी, सगळा विचार करून केलेलं डिझाइन फेल जातंय की काय असं वाटायला लावणारा ओढवलेला प्रसंग, काहीच मनाजोग घडत नसल्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयाप्रत आलेला निलेश आणि तिथून पुढे कशाचीच तयारी नसतांना निव्वळ कागदावरील डिझाइन आणि पूर्वी यु ट्यूब वर आपल्या मशीनचा अपलोड केलेला एक व्हिडिओ ह्याच्या जोरावर मिळवलेली पहिली ऑर्डर, ही सगळी कहाणी अतिशय रंजक त्यामुळे स्वतःच ऐका.

अभियंता आणि व्यावसायिक असून सुद्धा स्व-आनंदासाठी कोथरूड येथील 'प्रबोधन वाद्य पथकातर्फे गणपती मिरवणुकीत आजही ढोल वाजवणार्या निलेश ला त्याच्या पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे अनेक शुभेच्छा 💐

Business networking साठी लागणारी मानसिक बैठक

नेटवर्क तयार करणे म्हणजे जाळे विणणे ....

network करणे म्हणजे विक्री नव्हे ! एखाद्या बिजनेस नेटवर्क ला जाताना ....

  • आपल्याला फक्त लोकांना भेटायचं आहे , तेही अगदी समोर कोण आल्यास. network करणे म्हणजे अगदी चंट व्यक्ती हवी, पुढे होवून बोलणारी, वगैरे प्रचंड गैर समज असतात. बरोबर कार्ड्स वगैरे ठेवा; तरीही अगदी स्वत:हून , आपला स्वभाव असा नसेल, तर असलं अचाट साहस करण्याची अजिबात आवश्यकता नाही, Be Yourself. 
  • अर्थात कुणी ओळख करून घ्यायला आलं स्वत: हून, तर करून घ्या. तरीही तुमच्या पद्धतीने. प्रत्येकच माणसाशी तुमचं network जुळेल असं काही नाही, तेव्हा, निवांत ! तुमचं visiting कार्ड असेल, तर उत्तमच, नसेल तरीही ठीक, आपला व्यवसाय सांगता येतोच कि ! 
  • साधारणपणे १ मिनिटात ओळख, नंतर presentation (त्या त्या network च्या एखाद्या मेंबर चं ) , नंतर referral rounds असा हा agenda असतो. ह्यात आपला role हा बघ्या आणि ऐक्या चा ठेवायचाय ! ऐकून महत्त्वाच्या काही गोष्टी जाणवल्या तर त्या टिपून ठेवायच्या. 
  • एकदम कोणत्याही प्रकारचं commitment देवू नका. अर्थात, नेटवर्क सर्वार्थाने योग्य वाटल्यास जॉईन करा देखील, तरीही ४८ तास तरी निर्णय राखून ठेवायचाय !
  • Network साठी बऱ्या पैकी खर्च येत राहतो. BNI सारखे नेटवर्क असेल, तर वर्षाकाठी १ लाख रुपये इतका खर्च धरून चाला. Saturday क्लब ला जरासा कमी, तरी ५० ते ६० हजार येतोच ! हा सध्यातरी "खर्च" ह्या प्रकारातच बांधून टाका. ह्यातून किती धंदा मिळाला हा हिशोबच नाही करायचा ! साधारण ३ ते ५ वर्षानंतर तुम्हाला ह्याचा खरा उपयोग व्हायला लागेल. Network हि व्यायामा प्रमाणे असलेली सवय आहे !
  • Network साठी वेळही द्यावा लागेल. मिटींग्स ही फक्त एक घटना असते. त्यातून जाणीव पूर्वक घटनांची नोंद घेणे, माणसे काय बोलतात ते नीट लक्ष देवून ऐकणे तसेच भेटलेल्या माणसांवर पुन्हा "नीर-क्षीर" विवेक ठेवून काम करणे; सतत network वाढवीत राहणे, जोपासणे ह्याला वेळ द्यायला हवा, लागतो !
  • हे करता करता एक वेगळा कसलेला व्यावसायिक आपल्यात घडू लागतो ! आपण आपल्या व्यवसायात कदाचित उत्तम असू देखील, पण एकत्र team सोबत काम करण्याची सुद्धा आपल्याला सवय होऊ लागते, अर्थात व्यवसाय एका वेगळ्या level वर नेणे !
  • फक्त मला काय मिळेल , ह्याचा विचार करण्या ऐवजी team कशी वाढविता येईल हा विचार जरा जास्त प्रचलित करा, म्हणजे आपले passive earning वाढू लागेल !

Saturday, 10 April 2021

अनेक वि एखादे network

अनेक व्यावसायिक विविध पद्धतीने संपर्क , networking करताना दिसतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे : अनेक networks ना जॉईन होणे व तिथून "नेमके" मासे उचलणे. एक पद्धत झाली ही. ह्यातून उपयोग होतो का ? होतंच असेल, म्हणून तर ही मंडळी इतक्या networks ना जात असतात ना 

माझं मात्र थोडंसं वेगळ मत आहे ह्या संदर्भात ....

व्यवसाय उत्तरोत्तर कमी कष्टप्रद होत जायला हवा. ह्यात sales हि प्रक्रिया "Recommendation" द्वारे अधिक व्हावी, ह्याकरीता नेमके मासे उचलणे हे अगदी योग्य आहे. शिवाय एकदा का हे नेमके मासे उचलले, की अशा नेमक्या माशांच्या पसंतीस उतरणारे काम आपलं होतंय का, हे तपासत राहायला हवं आणि ते upgrade करतही राहायला हवं ना ! नाहीतर जे मिळतंय ते घेत रहा ह्या नादात हे मोठ्ठे मासे निघून जायचे परस्पर !

मुळात हे नेमके , मोट्ठे मासे कमीच असतात. आणि ते ओळखता येणं हा एक सरावाचा भाग आहे. सराव कसला ? तर जरा जास्त नेटवर्क असलेली माणसे जाणून हुडकत राहण्याचा. हे करताना आपल्याबद्दल आपण काय सांगतोय हे खूप जास्त महत्त्वाच ठरत ; शिवाय दुसऱ्या बद्दल ऐकणेही ! हे जे मोठे मासे असतात ना, हे जरा कमी वगैरे बोलणारे असतात. त्यामुळे आपल्यालाही जरा स्वत:त गर्क न राहता कान तीक्ष्ण करावे लागतील !

हळू हळू पण निश्चितपणे हि सवय लागू शकते, आणि आपला वेळ हा जास्त Valuable गोष्टींकडे लागून "नीर - क्षीर" विवेक , अर्थात जास्त महत्त्वाचे/ कमी महत्त्वाचे संपर्क आपल्याला सहज कळू लागतील. आता कमी महत्त्वाच्या नेटवर्क्स मध्ये कमी active राहणे इथपासून तरी आपण निश्चित सुरुवात करू शकू नाही का ?

Friday, 9 April 2021

Case Studies बद्दल थोडंसं ....

मुळात Case Studies म्हणजे काय ?

एखाद्या विषयावर धरून केलेला खास report म्हणजे केस study म्हणू शकतो. आता इथे निऊ मध्ये काही आपण शोध निबंध अपेक्षित करीत नाही आहोत. तर मेम्बर्स ने त्यांच्या आवडीच्या किंवा अधिकाराच्या एखाद्या पैलू विषयी थोडासा मजकूर लिखित स्वरूपात मांडणे हे अपेक्षित आहे. 

साधारणत: त्यांच्या व्यवसायाबद्दल किंवा त्यांच्या एखाद्या विशिष्ट कौशल्या बद्दल मांडल्यास त्यांच्या विषयी इतर मेम्बर्स ना अधिक माहिती होईल हे निश्चित. आपला निऊ चा प्रमुख उद्देश हा मेंबर अधिक रेफरेबल होणे हा असल्याने केस स्टडीज ह्या हेतूला सपोर्ट करतील हे नक्की.

ह्याशिवाय एखादा विषय उत्तम प्रकारे मांडण्याचे आपले एक कौशल्य आपोआप Develop होईल, ही सुद्धा मोठी उपलब्धी आहे. आपल्याला लिहिता येत नसेल उत्तम, लिहिले नसेल, तरी कचरू नका. निशांत स्वत: यात आवडीने मदत करतील आपल्याला.

दवडू नका ही मौलिक संधी !

Tuesday, 6 April 2021

निऊ वर जरा वेगळ्या प्रकारे काम करणे अपेक्षित आहे !

तुम्ही निऊ जॉईन केलात, अर्थात अभिनंदन आपलं. इथलं वेगळ्या प्रकारचं पोस्टिंग च schedule आवडल असेल किंवा काही. तरीही, अगदी कुणालाही, म्हणजे कुणालाही इथे पोस्टिंग करण्याचा मोह होऊ शकतोच. म्हणजे आपण दिलेल्या फ्रेमवर्क च्या बाहेर. आणि प्रत्येक जण "व्यवसाय वाढवायचा" ह्या हेतूने , अगदी थेट नसेल तरी आलेला असतोच ! 

मित्रांनो, तरीही, निऊ वरून आपण अशी येता जाता , इतर ग्रुप्स प्रमाणे १-२-१ करून वगैरे नाती प्रस्थापित नाही करत, तर आपला भर सगळा योग्यते वर आहे. आणि हि योग्यता " छाप" पाडून नाही कमावता येणार. तर हि विविध उपक्रमांतून दाखवावी लागेल, व्यक्त व्हावं लागेल. 

फक्त प्रमोशन च्या दिवशी प्रमोशनल पोस्ट केली; आणि मग मंगळवारी, एखादा review फेकला, इतक्या गोष्टींमुळे तुमचं reputation कांही प्रमाणात सिध्द होईल निश्चित; नियमित पणे केलेत तर थोडं अधिक जलद होईल, इतकच ! पण फरक कशाने पडेल ठाऊक आहे ? चर्चांमध्ये भाग घ्या

काय होईल ह्यामुळे ?

एकत्र भाग घेताना आपण फक्त "१ मिनिट इंट्रो" ला आलेले नसतो, त्यामुळे सतर्क राहतो, अनेकांचे ज्ञानामृत मला रेडीमेड मिळते. त्यात मी देखील माझे विचार मांडल्याने माझ्या विचारांची लोकांना ओळख होते. लक्षात घ्या, एखादा खूप चांगला श्रोता ह्यामध्ये असू शकतो, ज्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणजे प्रो active असणे. 

तुमच्या सोबत तुमच्या विचारांचीही ओळख होऊ शकते लोकांना. जितक अधिक हे वाढवलं, तितके अधिक प्रभावी होत जाल. 

लोक स्वत:हून तुम्हाला संपर्क करतील 


१-2-१ सारखे तुम्ही भेटत राहण्याची गरज राहणार नाही, तर स्वत:हून तुमचे संपर्क वाढतील. तुम्हीही , जास्त योग्य संपर्क निवडू शकाल.

आपल्याला वेचक काम करायची सवय लागू लागते !


जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे हे जणू प्रत्येकाने सूत्र केलेलं आढळत आहे हल्ली. तरी त्यात जास्त योग्य हे सूत्र धरलं तर मात्र वेचक काम करावे लागेल, म्हणजेच आपले ग्राहक आपण "निवडायचे" म्हणून निवडक !


Monday, 5 April 2021

Forwards बद्दल थोडंसं .....

 whatsapp चा वापर वाढल्यापासून लोकांना ज्ञान वाटण्याची प्रचंड सुरसुरी येवू लागली आणि प्रचंड सवंग पणाचा महापूर जणू लोटू घातलाय. त्यातून उथळ साहित्य भरभरून वाहू लागलं , आणि येईल जाईल ती मंडळी ढकल करू लागली.

उपयुक्त वगैरे वाटण्याची हौस समजू शकतो; तरी जरा समजावतील तरी ! तर ते पण नाही ! नुसती बातमी पाहिली, धडाक ... उपयुक्त .... select group ... forward ही अगदी नित्याची झालीये कृती. 

मी माझ्यापुरता तरी एक नियम घेतलाय लावून ...

एक तर फारच मोजक्या ग्रुप्स वरचा मजकूर पहायचा. खूप चांगलं मिळालं तर त्यातली अगदी मोजकीच १ ते 2 गोष्टी सूत्र स्वरूपात आपल्या  group बरोबर share करायच्या. ह्याने निदान ग्रुप सदस्यांना नेमका मसला झटक्यात मिळतो; शिवाय शेवटी लिंक देवून टाकावी , ज्याला हवीत details तो पाहून घेईल कि !

निवडक कृती करणारे निवडक उद्यमी