Tuesday 27 April 2021

Passion to Profession - 'वानरसेना'

अनिकेत आमडेकरांची मुलाखत ऐकली

स्पंज बनून शिकत राहिलं की एखाद्या गोष्टीबद्दलच्या कुतूहलाचं कौशल्यात रूपांतर होतं.मनाची आंतरिक ओढ कौशल्याचं आवडीत (Passion) रूपांतर करते आणि आवडीला प्रामाणिक अभ्यासाची जोड दिली की ते आपल्या उपजीविकेचं साधन (Profession) देखील होऊ शकतं.

  • 'पॅशन टू प्रोफेशन' चा हा एक साचेबद्ध आडाखा अनिकेत नी सांगितला खरा पण 'कुतूहल' म्हणून आपण काय 'निवडतो' हे आपल्यावरच अवलंबून आहे. उदा: वृत्तपत्रातील 'अग्रलेख' वाचून स्वतःच्या ज्ञानात भर घालायची की काही फुटकळ बातमी वाचून निराश व्हायचं हे मात्र आपण स्वतःच ठरवत असतो असं अनिकेत चं प्रामाणिक मत 🙂.
  • बाबांनी सांगितलेली हनुमानाची गोष्ट आवडल्यामुळे अनिकेतची अडीच वर्षांची मुलगी काही दिवस शेपटी लावून घरभर हिंडत असे आणि तिला कुतूहल म्हणून पुढे अनिकेतनी रामयणातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या अर्थातच तिच्या तोंडपाठ झाल्या आणि त्याचं आजूबाजूच्यांना फार आश्चर्य वाटे.तिथूनच अनिकेतला आपल्या ह्या गोष्टी सांगण्याच्या 'पॅशन' चं 'प्रोफेशन' मध्ये रूपांतर करता येईल असा विश्वास वाटला आणि त्याच्या ह्या 'वानरसेने' च्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला.
  • आपल्या पॅशन चं प्रोफेशन मध्ये रूपांतर होईस्तोवर आर्थिक निकड वरचढ ठरू नये म्हणून सुरुवातीच्या काळात नोकरीधंदा सांभाळूनच ही कसरत करावी असा अनिकेत सल्ला देतो पण एकदा का तुम्ही झोकून दिलंत की बरीच मंडळी तुमच्या पॅशन ला मूर्त स्वरूप देण्यास हातभार लावतात असंही तो मानतो (इथे अनिकेत 'मराठी कनेक्ट' मधील काही सहकाऱ्यांची आवर्जून नावं घेतो)

आपल्याला काय येतंय किंवा जमतंय ह्यापेक्षा आपल्या ग्राहकांना केंद्रबिंदू मानून त्यांची आवड, प्रेरणा किंवा त्यांचं दुःख, नैराश्य काय? हे समजून त्याअनुषंगाने स्वतःच्या सेवा किंवा उत्पादनात आवश्यक तो बदल करावा असं अनिकेत म्हणतो

'पॅशन टू प्रोफेशन' ह्या प्रवासात एकेक अडथळा पार करत डोंगर चढून माथ्यावर आल्यावर जेव्हा तुम्हांला जाणवतं की अजून बरेच डोंगर पार करायचेत, तेव्हा तुम्ही कच खाऊन मागे वळता की नव्या दमाने पुढचा अडथळा पार करायला सज्ज होता त्यावर तुमचा 'प्रोफेशन' ते 'व्यवसाय' हा पुढील प्रवास बेतलेला असतो असं अनिकेत सांगतो.

मित्रमंडळी, सहकारी,नातेवाईक जेव्हा आवर्जून तूमच्या नावाची शिफारस करतात हे ही एक प्रकारचं यशंच असल्याचं अनिकेत मानतो.आपल्या सहकाऱ्यांचं उत्पादन किंवा सेवा आपल्या व्यवसायाशी कसं जोडून घेता येईल ह्या विचारातून 'वानरसेने'चा लोगो साकारला गेलाय (प्रत्यक्ष मुलाखतीतच ऐका व पहा)

अनिकेतच्या गोष्टी ऐकता ऐकता अबोल मुलेही आता बडबडू लागलीयेत. मॅक्डोनल्डच्या नांममुद्रेची गोष्ट सांगून लहान मुलांमधल्या कल्पनाशक्तीला अनिकेत वाट करून देतोय.

रामायणातील कथा गोष्टींच्या रुपात सांगता सांगता हलकेच काही चांगले आणि आवश्यक संस्कारही अनिकेत लहान मुलांमध्ये घडवतोय (त्यासाठी ही मुलाखत जरूर ऐका)

गोष्टी सांगता सांगता मुलांना बोलतं करणं, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणं, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं, चांगले संस्कार रुजवणं, एकंदरीतच नकळतपणे एक पिढीच घडवण्याचं अनिकेत काम करतोय. 

न जाणो ह्या लहान मुलांमधील एखादा 'तान्हाजी' अनिकेत ने शिकवलेलं हे गोष्टी सांगण्याचं कसब उद्या दृकश्राव्य पद्धतीने रुपेरी पडद्यावर सादर करेल 🎥 🎬 ?

त्याच्या ह्या वानरसेने ला 'निवडक उद्यमीचा' सलाम 🙏 आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.