Monday 12 April 2021

कॉलेजमधला पहिला दिवस

 २००१ मधे मी प्रथम पुण्याच्या सुप्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधे शिकवायला सुरुवात केली. मुलगा झाल्यावर करीयर मधे २वर्षं ब्रेक घेऊन पुन्हा नोकरी घेतली होती. शिकवायला जॉईन झाले खरी, पण पहिल्याच दिवशी बघितले तर अधिकांश ‘मुलं’ (?) नोकरी करणारी. प्रमोशनसाठी मास्टर डिग्री हवी म्हणून एम.पी.एम. ला ऍडमिशन घेतलेले लोक स्मिता ‘मॅडमच्या’ वर्गात होते.

मी स्वत: पुणे विद्यापीठाची रॅंक होल्डर, नेट-सेट उत्तीर्ण असल्यामुळे वर्गात शिकवण्याच्या आत्मविश्वासाची कमी नव्हती. २-३ वर्षे इंडस्ट्रीत कामही केले होते. पण समोरच्या ‘मुलांचे’ वय माझ्या दुप्पट असेल अशी मात्र मला अजिबातच कल्पना नव्हती. पहिल्या तासाला गेले आणि एकदम पोटात गोळाच आला. माझं वय बघून काही जणांच्या चेह-यांवर प्रश्नचिन्ह आलं, तर काही जणांनी नाकं मुरडली. उत्साहाने साडी नेसून गेल्यामुळे वय मोठे दिसत आहे अशी मी स्वत:ची समजूत घातली व विद्यार्थ्यांना स्वत:चा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांना सांगितले की तुम्हीही तुमचा परिचय करून द्या. (खरे तर माझी घाबरगुंडी उडाली होती आणि मला थोडा वेळ काढायचा होता.)

पहिल्या बाकावरच्या पहिल्या मुलाने 😀सांगितले, "मी लेफ़्टनंट कर्नल शर्मा. याच्या आधीचे पोस्टिंग कारगिल. सध्या २ वर्षे पुण्यात शिकत आहे." मला आनंद झाला? की घाबरगुंडीमधे वाढ झाली? कळेना. मी यांना काय शिकवणार? कसं शिकवणार? एकदम खुजं वाटायला लागलं. तेव्हा वृत्तपत्रीय भाषेत एक ‘संमिश्र प्रतिक्रिया’ देऊन पुढे गेले. तर हे साहेब कॅप्टन, त्यांच्या पुढच्या बाकावर कर्नल. (आपण मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधे शिकवायला आलोय की अजून कुठे..... अर्थातच मनातल्या मनात...) असे एकामागून एक फ़ौजी उभे राहून ऒळख करून देत होते. त्यांचा मोठमोठ्या रँक्स असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यातील नम्रता, आत्मविश्वास, दांडगा अनुभव असूनही अजून पुढे शिक्षण घेण्याची इच्छा हे सगळं मलाच बळ देऊन गेलं. आणि एकदम मला हलकं हलकं वाटायला लागलं.

तिस-या रांगेपासून नुकतीच ग्रॅजुएट झालेली मुलं, मोठ्या कंपन्यांमधील अधिकारी, घरचा व्यवसाय सांभाळून पुढे शिकणारे तरूण, लग्नानंतर शिक्षणात पडलेली गॅप भरून काढणा-या गृहिणी अश्या अनेक प्रकारच्या विद्यार्थ्यांची ओळख झाली. शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्याने नाव सांगेपर्यंत माझी घाबरगुंडी पळून गेली होती.

माझ्याजवळ जे होतं, पण त्याचं महत्त्व या आधी लक्षात आलं नव्हतं असं काहीतरी सापडलं होतं. मी विद्यार्थ्यांना सांगितलं. माझ्याकडे आहे ते भरपूर पुस्तकी ज्ञान. कारण मी स्वत: गाईड वाचून कसाबसा फ़र्स्टक्लास मिळवणारी विद्यार्थिनी कधीच नव्हते. मला होती सिलॅबसची सखोल माहिती. अभ्यास कसा करायचा, प्रोजेक्ट कसे करायचे, सेमिनार मधे कसे प्रेझेंटेशन करायचे, पोस्ट-ग्रॅजुएशनच्या उत्तरपत्रिकेत मुद्द्यांची मांडणी कशी असावी, अवांतर वाचनासाठी कोणती पुस्तके वाचायला हवी असे अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे पी.जी. उत्तम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी. आणि या ज्ञानाला अनुभवाची जोड देणारे आपल्या वर्गातले फ़ौजी बंधू आणि इतर वर्किंग प्रोफ़ेशनल्स. असे आपण एकमेकांकडून शिकूया. And let's make these 2 years in our lives most impactful, most memorable. हे बोलून झाले तेव्हा वर्गातला ताण निघून गेला होता. सगळ्या चेह-यांवर सहजता आणि माझ्या लेक्चरला बसण्याची इच्छा दिसायला लागली होती.
माझ्या कॉलेजमधल्या नोकरीच्या पहिल्याच वर्षी माझ्या विद्यार्थ्यांकडून मला खूप अनुभवाचं ज्ञान मिळालं. आम्ही अनेक मुद्यांवर अनुभवावर आधारलेल्या केस स्टडी लिहायचो, कधी फ़ॅक्टरी बघायला जायचो, फ़ौजी बंधूंसोबत तर खूप गोष्टी नव्याने शिकलो - हसलो - रडलो. मल्टिनॅशनल मधल्या माझ्या ५० वर्षांच्या मुलाने 😁 त्यांच्या अमेरिकन बॉसला बोलावून पंचतारांकित कॉन्फ़रन्स पण केली. आणि अशी माझी मास्तरकीची सुरुवात सुफ़ळ संपूर्ण झाली.

स्मिता सोवनी

7 comments:

  1. उत्सुकता चाळवलीयेय,पुढील लेखात काय अनुभवयाला मिळेल 🤔👍?

    ReplyDelete
  2. अत्यंत प्रांजळपणे लिहिलंय ! हेच ते Expression. Blog. आणखी छान होण्याकरता, इतर ठिकाणहून कॉपी पेस्ट करण्या ऐवजी blogger च्याच interface चा वापर करा, सोबत formatting सुद्धा वापरा, अजून जास्त मज्जा येईल !

    ReplyDelete

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.