Monday, 19 April 2021

Passion to Profession - ''You are here''

 कुठल्या तरी पुस्तकाच्या प्रस्तावनेत वाचल्याचं आठवतंय,
'मोठया कंपन्या किंवा मॉल मध्ये एक नकाशा असतो, 'You are here' असं दाखवणारा.तिथून तुमच्या इप्सित स्थळी कसं जायचं हे समजायला मदत व्हावी हा उद्देश, तरी बरेच जण गोंधळतात. पण काही जणांना अगदी पक्क ठाऊक असतं की आपण कुठं आहोत आणि आपल्याला कुठं आणि कसं जायचंय.

प्रणव म्हैसाळकर ची मुलाखत ऐकतांना हे पदोपदी जाणवलं.

1.घरात भाऊ अभियंता, बहीण CA, काकांची टॅक्स कन्सलटेशन कंपनी वगैरे, त्यामुळे त्याच जुनाट मार्गाने न जाता आपलं (नुसतं म्हणायला नव्हे) वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची समज विद्यार्थीदशेतच असणं आणि त्यादृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणं हे प्रणवच्या डोक्यात 'You are here' चा नकाशा पक्का असणार हेच दर्शवतं.

2.शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे आणि लहानपणापासून जनावरांबरोबर जवळीक असल्यामुळे निसर्गाबद्दलची आपुलकी आणि सजगता होतीच पण ,'लहानपणीच मला माझी आवड (पॅशन) गवसली' असला खोटा आणि अप्रामाणिक दावा प्रणव करत नाही

3.बारावी नंतर विज्ञान शाखेत जाण्यासाठी प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवून सुद्धा घरची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःचा 'कल' ह्याचा सुवर्णमध्य साधला जाईल हे ओळखून प्रणवने 'पर्यावरण विज्ञान' शाखेत प्रवेश घेतला आणि पुढील काही वर्षात त्याचा 'कल' त्याची 'आवड' (पॅशन) होऊ लागली.

4.मग काय निसर्गाच्या संगतीत प्राण्यांचे आवाज काढणं, स्वतःच्या निरीक्षणातून पक्ष्यांचे वागणं/बोलणं ह्याचा अंदाज बांधणं आणि त्यानुसार त्यांच्या बरोबर संवाद साधणं हे सुरू झालं आणि त्यातही कसलाच बडेजावपणा न मिरवता, 'हे अगदी कुणीही करू शकतं' असं प्रांजळ मत प्रणव नोंदवतो. (त्यासाठी आपल्या ताईच्या घरी येणाऱ्या पोपटाची प्रणव ने सांगितलेली कहाणी जरूर ऐका), फक्त निसर्गाच्या सानिध्यात राहणं महत्वाचं

5.मागच्या वर्षी ऐन लॉकडाऊन च्या मध्यात एका 'केस स्टडी' निमित्त 'भीमगड' अभयारण्यात जाण्याची प्रणवला संधी मिळाली.
'Slender loris' (वनमाणूस) ह्या प्राण्याची तिथे गोव्यामार्गे तस्करी चालते. तिथले स्थानिक निसर्गाची कशी काळजी घेतायत, उत्पन्नाचा स्रोत नसल्या कारणाने ती मंडळी तस्करी कडे वळतायत का?त्यामुळे पर्यावर्णाची कशी हानी होतेय का? तिथले स्थानिक आणि Slender Loris ह्यांची एकंदरीतच स्वभाववैशिष्ट्ये काय? असा प्रणव च्या केस स्टडी चा विषय.

Slender Loris हा प्राणी निशाचर असल्या कारणाने संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 3 अशा प्रणवच्या कामाच्या  वेळा व सगळं फिरणं हे पायीच असल्यामुळे वाघ, बिबट्या सारखे प्राणी समोरून पाहणं हा एक रोमांचकारी अनुभव असल्याचं प्रणव सांगतो.

6.कामाशी तडजोड करायची नव्हती आणि 'प्राण्यांचे मानसशास्त्र' किंवा संबंधित काही काम न मिळाल्यामुळे पुणे विद्यापीठातुन पदवीच्या अभ्यासक्रमात पहिला येऊनसुद्धा 3 महिने प्रणव ने नोकरी स्वीकारली नाही

7.दरम्यानच्या काळात 'ज्ञान प्रबोधिनी' तर्फे लहान मुलांना विज्ञान सहजपणे समजावण्यासाठी प्रणव काम करत असे

8.म्हैसूर विद्यापीठ भारताचाच भाग असणाऱ्या 'अंदमान आणि निकोबार' ह्या बेटांवर शिक्षण क्षेत्रात काम करत होते आणि प्रणवचा अर्ज त्यांना आवडला.नुसतं विज्ञान एके विज्ञान न करता त्याच्या प्रसारासाठी 'ज्ञान प्रबोधिनीत' प्रणव करत असलेल्या कामाची दखल त्यांनी घेतली व प्रणवला तिथे जायची संधी मिळाली.

9.तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जेव्हा तुम्ही सर्वस्व झोकून काम करता तेव्हा आपसूकच अनेक मदतीचे हात तुमचं कार्य सिद्धीस नेण्यास पुढे येतात.अंदमानला जाण्याचा दहा हजार रुपयाचा खर्च तेव्हा प्रणवच्या आवाक्याबाहेरचा होता पण 'ज्ञान प्रबोधिनीने' प्रणव ला कर्जाऊ रक्कम देऊ केली. आज अंदमान - निकोबार येथील 'शिक्षण धोरण' आणि पद्धत प्रणव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेली आहे.आज तिथे शिकवलं जाणारं 'पर्यावरण विज्ञान' प्रणव ने तयार केलेल्या धोरणावर आधारित आहे.

10.सध्या पुणे विद्यापीठात प्रणव सल्लागार म्हणून कार्यरत आहे, तसेच काही नवऊद्यमींनाही तो समुपदेशन करतो

उथळ काम करण्यापेक्षा विशिष्ठ ज्ञान मिळवल्यामुळे निसर्गाबद्दलची सजगता आणि किमान बुद्धिमत्ता वाढवता येईल असे प्रणव मानतो व त्यामुळे 'पर्यावरण विज्ञान' विषयात पदवी आणि 'जैवविविधता' विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेल्या प्रणवला पुढे युरोप किंवा अमेरिकेत जाऊन पी.एच.डी. मिळवायची आहे.

आयुष्यातील सगळ्यात जास्त वेळ हा आपण काम करण्यात घालवतो त्यामुळे काम हे आपल्या आवडीचेच असले पाहिजे पण आवडीच्या कामातून वेळेत आणि किमान गरजा भागवणारं उत्पन्न मिळण्याची शाश्वती नाही आणि आजच्या स्पर्धात्मक युगात पैशाची निकड भल्याभल्यांना ह्यात तडजोड करायला भाग पडते (ह्यात गैर असं काही नाही) पण पैशाच्या प्रलोभनांना बळी न पडता नेटाने आपल्या आवडीसाठी वेळ देऊन त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवणे आणि त्याचे पुढे उत्पन्नात रूपांतर करणे ह्यासाठी स्वतःवर विश्वास, आणि कमालीचं धाडस लागत.

(Delayed Gratification is a rare personality trait)

त्यात हे सगळं बोलणं सोपं पण करणं अवघड

अशा आड वळणावर चालणाऱ्या प्रणवशी आपली गाठभेट घालून देण्याच्या आणि एक नवीन उपक्रम सुरू करण्याच्या सौमित्र सरांच्या कल्पनेचं कौतुक आणि अभिनंदन 💐,

उद्योजगतेचा एक नवीन पैलू आपण अनुभवला.

आड वळणांवर चालायला सुरुवात करून पद्धतशीरपणे मुख्य प्रवाहात येताना प्रणवच्या 'You are here' च्या नकाशा आकलन शक्तीचे आणि ठरलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःत घडवायला लागणाऱ्या बदलांसाठीच्या जिद्दीला मनापासून सलाम 🙏

प्रणवच्या पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे शुभेच्छा 💐

4 comments:

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.