Monday, 18 August 2025

कठीण काळ समोर : अमेरिकी निर्बंध .....

Whatsapp वरून खूप उथळ मजकूर समोर येतो. नुकताच एक मेसेज आला की कसे आपले पंतप्रधान प्रचंड मुत्सद्दी आहेत, कशा सावध आणि संयमी खेळ्या खेळत आहेत आणि ट्रम्प ह्यांची नाकेबंदी वगैरे करून ठेवली आहे. सोबत अगदि अभ्यासपूर्वक ( तो बेतलेली तत्वेच गन्डलेली आहेत ) प्रतिपादन केलेले आहे, घटनांचे. 

"Whatsapp मेसेज : कुठे गांभीर्याने घेताय" असं बोलायला ठीक आहे हो, पण ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे गांभीर्याने घ्यायला हवं. जबाबदारीने. प्रतिपक्ष म्हणून नव्हे.

तर पहिलं म्हणजे " हे काय किरकोळ आहे, आपला देश भारी आहे " किंवा "लोकसंख्या आपली ताकद आहे " वगैरे देशप्रेमाच्या स्वस्त संकल्पनांतून बाहेर पडून, प्रथम हे एक गंभीर आर्थिक आव्हान आहे हे स्वीकारायला हवे. कारणे सुद्धा तशीच आहेत.

अमेरिका हा सर्वात जास्त कर्जे घेणारा देश आहे, त्यांचे राष्ट्रीय पातळीवरचे Saving हे त्यांच्या खरेदी पेक्षा कमी असते, मग हा देश श्रीमंत कसा , असा बाळबोध प्रश्न नक्कीच पडू शकतो. बाळबोध ह्याकरिता म्हणतोय, कि एकंदरीत आपल्याकडे असलेली आर्थिक समज दारिद्र्य रेषेच्याही खाली आहे. आणि म्हणूनच वर दिलेल्या Whatsapp पोस्ट्स सहज, ज्ञान म्हणून खपतात, लोक त्यावरून हिरीरीने भाष्य करतात. 

तर कर्जे ही कशाकरता घेतली जातात हे महत्त्वाचे. आपल्यासारखा देश ही जगण्यासाठी, तरण्यासाठी घेत असतो, तर अमेरिकन नागरिक चैनीच्या गोष्टी, किंवा उपजीविके बाहेरील खरेद्या करण्याकरिता. मुळातच अमेरिकेतील गुंतवणूक ही खूप सुरक्षित आहे, त्यामुळे परदेशीय इथे गुंतवणूक करण्यात उत्सुक असतात. त्यामुळे ही कर्जे अमेरिका रणनीती म्हणून वापरते. स्वत:चे सर्व सुरक्षित ठेवून. त्यामुळे अमेरिकेला नाक वगैरे घासायची वेळ आपण नाहीच आणू शकत.

अमेरिका ज्या देशांकडून आयात करते, त्या देशांत भारत १० व्या स्थानी आहे. आणि आपण असे काहीही निर्यात करत नाही, कि ज्यांना पर्याय उभा राहू शकत नाही. उलट आपल्या काही क्षेत्रांना प्रचंड तडाखा बसू शकतो. पर्यायाने नोकऱ्या वगैरे जातील. 

आपण एकदम तडजोड करणेही शक्य नाही. भारताने इतर राष्ट्रांशी बोलणी सुरु केली आहेत, परंतु इकडे आड आणि तिकडे विहीर अशी गोची मात्र झालेली आहे आपली. 

मुळात निकृष्ट दर्जा म्हणून हिणवल्या गेलेल्या चीन वरच आता अमेरिका अवलंबून आहे इतका कायापालट चीन ने साधला. आपल्याला नुसता अभिमान बाळगून नाही चालणार, तर कंबर कसून आपल्या शक्ती स्थळांवर नीती केंद्रित करावी लागेल.

सर्व ठिकाणी काळजी स्वरूप स्थिती असली, तरी भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात जलद आहे सध्याला. निर्बंध २७ तारखेपासून अंमलात आले, की ही इतकी उत्तम ह्यापुढ राहिलच असे नाही. 

अशा वेळी, एक व्यक्ती समूह म्हणून भारतीय उपखंड जो एक मनुष्य ह्या नात्याने ह्या सर्व पश्चिमी देशांपेक्षाही प्रगल्भ आहे ( हा दुराभिमान नाही ). खूप पूर्वापार आपल्याकडे संस्कृती नांदत आहेत. जो काही आततायीपणा केलाय, तो परकीय राजांनी. तर आपण आपला Stock घ्यायची गरज आहे. इतरांकडे न पाहता. दुर्लक्ष नाही म्हणणार मी, पण स्वयं विश्वास वाढवून. 

भारतीयांकडे व्यापारी वृत्ती उत्तम आहेच. सोबतीला इतका प्राचीन वारसा, ज्याचा आधार आपण ह्यापुढे पथदर्शक म्हणून ठेवावा, आणि इतके स्वत:च बलवान व्हायचा संकल्प सोडवा, कि तैवान किंवा कोरिया प्रमाणे जगच आपल्या कडे धावत येईल.

Thursday, 14 August 2025

घर बसल्या पुस्तके खरेदी करताना...

ऑनलाइन पुस्तके मिळत असतील, आणि ती सुद्धा वाट्टेल त्या विषयावर, बाजार न फिरता, अमेझॉन सारख्या वेबसाईट वरून, आणि अनंत ! तर का जावं प्रत्यक्ष दुकानात तरी ? शिवाय हल्ली त्या दुकान वाल्यांनी सुद्धा स्वीकारला आहे हा ट्रेंड आणि बऱ्याच मंडळींनी स्वतः च्या वेबसाइट्स केल्या आहेत आता.

वेळ घालवायचा असेल, छान बीन वाटत असेल, गवाक्ष खरेदी ( window shopping ) करायचे असेल, किंवा चक्क एसी ची हवा खायची असेल तर जावे खुशाल पण उगीच जुने विश्वास कवटाळून मी तरी नाही बसत.

ऐवजी, हल्ली नीट पुस्तके निवडून घ्यायला शिकलोय. सोबत ती वाचताना, अभ्यासपूर्ण असतील, तर काही विशेष गोष्टी सुद्धा अंगीकारल्या आहेत आता. तर पहिलं:- पुस्तके निवडताना :-

त्याच्या reviews वर जाणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण आधी पहा की किती reviews आहेत. निदान ( विषयानुसार ) १०० किंवा २०० तरी हवेत. जसे पुस्तक जास्त खपू लागते, तसे reviews वाढू लागतात. चांगल्या सोबत वाईट सुद्धा. 

तर दुसरे म्हणजे अमेझॉन बऱ्याच वेळा आधी वाईट अभिप्राय दर्शवते. आपण लेटेस्ट प्रमाणे क्रमवारी लावून पाहू शकतो. तर वाईट कशाला म्हटले आहे, ते बऱ्याच वेळा पुस्तकाच्या वापराशी संबंधित नसूही शकेल. उदा मी काही पुस्तके वाचत असतो खास करून finance ह्या क्षेत्रात. मी त्या मानाने नवखा आहे,त्यामुळे जी पुस्तके मी खूप भारी म्हणालो आहे ती एखाद्या पारंगत व्यक्तीला खूप बेसिक वाटू शकतात. हे नीट पाहा.बऱ्याचदा कमी पाने आहेत, वगैरे लिहिलेले असते. ह्यालाही विशेष अर्थ नाही. मुळात अगदी ४.० च्या खाली स्कोअर असलेली पुस्तके आधी नकाच निवडू.

पुस्तक वाचताना, मी स्वतः सोबत जेमिनी चा खूप आधार घेतो. अगदी शाळकरी मुलाप्रमाणे परत परत उत्तर नीट मिळेपर्यंत विचारणा करत राहतो. हे अत्यंत उपयुक्त ठरते.सोबत स्टुडिओ वर असेन तर चक्क प्रिंट्स काढतो, file करून ठेवतो.

एक नव्हे तर असंख्य बुकमार्क वापरतो. पुस्तक वाचताना उपयोगी पडतात. काही विशेष पानांवर असलेला संदर्भ फक्त त्याच्या index वरून समजत नाही. तर तो माझ्या अभ्यास वहीत चक्क त्याचा पान क्रमांक टाकून मला त्यातून कोणता प्रश्न उत्तरीत झाला किंवा नवीन काय समजलं  हे माझ्या भाषेत, बऱ्याच दा मराठीत ( पुस्तक इंग्रजी असेल तरीही ) लिहितो. हे कुठेही पोस्ट करण्यासाठी नाही तर मलाच कुठे चटकन संदर्भ लागला तर खूप उपयुक्त पडते.


Sunday, 10 August 2025

जागतिक अर्थकारण आणि माझा व्यवसाय : बरेच शिकण्यासारखे

सध्या जगाच्या आर्थिक पटलावर जरा जास्तच हलचल दिसतीये. त्यानिमित्ताने एक व्यावसायिक ( खरे तर एक गुंतवणुकदार ) ह्या नात्याने जाणवणाऱ्या काही गोष्टी :-

गुंतवणुकदार ह्या नात्याने संधी !

कदाचित रोखे बाजार बरेच खाली जातील. प्रत्येक खाली जाणाऱ्या पायरीवर काही शेअर्स थोड्या ( अगदी अत्यल्प ) प्रमाणात घेत राहण्याची संधी. ही गुंतवणूक हमखास वाढते, १५ -२० वर्षांत अनेक पट वाढू शकते. शेअर बाजार कायम वर जाण्यासाठीच जन्माला आलेला आहे. आणि आपण जरी नाही राहिलो, तरी पुढच्या पिढी करिता उत्तम गुंतवणूक आहे ही. नुसतं "मी उद्योजक" बिरूद मिरविण्यात काहीच मतलब नाही. 

बातम्यांना बळी पडायचे नाही 

अमेरिकन लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या शेकडो वस्तूंच्या किमती त्यांच्या आयात शुल्क धोरणामुळे वाढून बसतील. चैन सोडा हे म्हणणे जितके सोपे तितकेच अंमलात आणणे मुश्कील. त्यामुळे हे बाजार अमेरिका भीतीग्रस्त होतील, शेअर खरेदीची पुन्हा संधी देतील, आणि २०२६ च्या आसपास पुन्हा ठिकाणावर येतील. त्यामुळे कोणत्याही भीतींना बळी नाही पडायचे. 

ग्राहक , ग्राहकवर्ग विखुरायचे 

भारताने चांगलाच धडा घेतला असणार : एकूण पैकी फक्त अमेरिकेला होणारी निर्यात ६२ % टक्के आहे. ही विखुरायला हवी. हेच धोरण आपण आपल्या Segments अर्थात ग्राहक वर्गांबद्दल लागू करायला हवे. एकाच ग्राहकावर अवलंबून आपले उत्पन्न नको, एकाच Segment ग्राहक वर्गावर वर सुद्धा नको. 

मैत्री फक्त फायद्याशी !

विचित्र वाटेल ऐकायला, पण निष्कारण भावुकता उपयोगी नाही. वागण्याची रीत भात म्हणून ठीक आहे, पण एखाद्या व्यावसायिक संबंधांतून पुरेसा नफा निर्मित होत नसेल, तर त्यातून बाहेर पडणे केव्हाही चांगले. लवकरात लवकर. दिखाऊ मैत्रीला न जगलेले अमेरिकन अध्यक्ष ते पचवू शकतात, आपण नाही हे पंतप्रधानांनी जसे ध्यानात घेतले आहे, तसे आपणही अनेक व्यावसायिक संबंधांत समजून घेवून वेळप्रसंगी माघार घ्यायला हवी, आणि धूर्तपणे नावे भागीदार निवडायला हवेत. म्हणूनच आपले पंतप्रधान चीन, ब्राझील, रशिया ह्या देशांशी नव्याने जवळीक साधत आहेत. 

मुत्सद्देगिरी : एक आवश्यक कौशल्य  

प्रक्रिया लांबलचक वाटल्या, तरीही वाटाघाटी करण्याची तयारी आपण दाखवून द्यायला हवीच. ह्यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात. 


Saturday, 9 August 2025

आर्थिक वाटचाल Track करतोय का आपण ?

माझे एक मित्र श्री तेजस पाध्ये ह्यांच्या सोबत एक संवाद कायम रंगत असे : MSME वि Corporate. ह्यात तेजस छान छान मुद्दे मांडत असत. मोठ्या कंपन्यांच्या संपर्काच्या पद्धती आणि लहान लहान उद्योजकांच्या. किंवा फक्त उलाढाल मोठी झाली तरी दृष्टीकोन न बदलणे वगैरे .....

मी हल्ली हल्लीच खूपशा शेअर मार्केट वर नोंदीत ( म्हणजेच ज्यांनी भाग भांडवल हे तुमच्या आमच्या कडून उभारलेले आहे अशा ) कंपन्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. आणि समांतरपणे लहान लहान उद्योजक ह्यांच्यासोबत तर पूर्वापार मी काम करतच आलेलो आहे. मला जाणवते कि, नोंदणीकृत कंपन्या दर तीन महिन्यांना आपले निकाल जाहीर करीत असतात : नव्हे - त्यांना ते कायद्याने बांधील आहे. ह्या जाहीर करण्यात येत असलेल्या निर्णयांचा आकृतिबंध पाहिल्यास लक्षात येतं कि प्रत्येक महिन्यास काही अति महत्त्वाचेच निर्देशांक त्या प्रदर्शित करत असतात. 

हे निर्देशांक आहेत हे विसरायला नको. म्हणजे ह्याच्या अंतरंगात खूप प्रकारचे संदर्भ, त्यांची त्या त्या वेळेची चोख नोंद वगैरे खूप काही अस्तित्त्वात असायलाच लागते. म्हणजे इतक्या प्रकारे एखाद्या कंपनीची विचारणा होऊ शकते आणि त्यांना त्या त्या वेळी त्या त्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देणे भाग असते, तरच त्यांची प्रतिपादने, विधाने, निकाल, परिणाम इत्यादी सिद्ध होऊ शकतात. प्रत्येक भागधारक हा त्या कंपनीचा "मालक" असतो, आणि तो प्रश्न करायला अधिकृत असतो.

तर काही आकडे उदा निव्वळ नफा एखाद्या वर्षी कमी दिसला आणि ताळेबंदा तून असे दिसून आले, कि कंपनीने इतर काही उद्योगांत गुंतवणूक केलेली आहे, तर आधी तर अंतर्गत व नंतर बाह्य auditor ला उत्तर द्यावे लागते कि ह्या मागे काय लांब किंवा नजीकच्या पल्ल्याची भूमिका आहे ते. आणि ह्यानंतही भाग धारकांना उत्तर द्यावे लागू शकते.

थोडक्यात काय, तर मनाला येईल तसे निर्णय ( कृतींचे ) ह्या कंपन्यांना बदलता येत नाहीत. 

इथे लहान उद्योजक संपूर्णपणे विरुद्ध वागतात. सारखे निर्णय बदलत असतात. Tracking करत नाहीत. त्यामुळे परिणाम हे अशाश्वत मिळतात. संपत्ती वाढत नाही. 

निऊ ने उचललेले एक प्रमुख पाउल 


ही प्रमुख बाब लक्षात घेवून निवडक उद्यमी चे सदस्य सध्या दर तीन महिन्यांनी भेटतात, त्यांच्या वाटचालीचा छोटेखानी अहवाल एकमेकांसमोर ठेवतात, पुढील कृतीबद्दल चर्चा करतात, मागील कृतींच्या परिणामांची सखोल चर्चा करतात, एकमेकांना एक संचालक मंडळाप्रमाणे बदल वगैरे सुचवतात. 

उद्योग साम्राज्ये अशीच उभी नाही राहत, त्यांच्या मागे ही मानसिकता विकसत करावी लागेल !


Thursday, 7 August 2025

उद्योग = अनिश्चितता

अनिश्चित असतो तोच तर उद्योग. आता नुकत्याच घडलेल्या काही घटना पाहिल्या तर हे लगेच लक्षात येईल.

१. सरकारने अचानक बदललेले सौर ऊर्जा धोरण. ह्याबद्दल ऑलरेडी दोन लेख झालेत

२. अमेरिकेने अचानक लादलेले अतिरिक्त आयात शुल्क.

ह्या घटना बघितल्या तर त्या त्या उद्योगांवर होणारे निकटचे तसेच दूरगामी परिणाम लक्षात येतील. अनेक उद्योग कदाचित बंद देखील पडू शकतील.

करार मदार : सावधपणे घेऊयात !


"डोळस" पणे हा शब्द अधिक संयुक्तिक आहे. ट्रम्प महाराज तिकडे आयात शुल्क वाढवत असतानाच ब्रिटन व भारत करार झालाय. आपल्या देशाच्या नेतृत्वाला भारतीयांना नव्या संधी उपलब्ध करून देणे भागच आहे. त्यामुळे अमेरिकेची बाजारपेठ जर का लांब पल्ल्यासाठी अशीच अनिश्चित राहिली तर निदान इतर देश तरी बांधून ठेवायलाच हवेत. ब्रिटन ने देखील ही अगतिकता ओळखून आपल्या scotch बाटल्यांवरील भारतातील आयात शुल्क ५० टक्क्यांनी कमी करून घेतले आहे. ब्रिटन च्या scotch निर्यातीपैकी ९० टक्के निर्यात भारताला होते. त्यामुळे त्यांना ह्या कराराचा जास्त फायदा होणार आहे.

तरीही समांतर पणे विचार करता अनेक वस्तू जसे की चामडी वस्तू, रसायने, पादत्राणे, रत्ने , दागिने, कापड आणि कोळंबी तसेच सेवा ह्यांवर ब्रिटन शून्य टक्के आयात कर लावेल. ही सुद्धा एक उत्तम संधी आहे. कारण नेमक्या ह्याच वस्तूंना अमेरिकेच्या धोरणाने फटका बसला आहे.

ह्यामुळेच डोळस हा शब्द वापरला. असो. तरीही, लवकरात लवकर आवश्यकता आहे, ती एक "गुंतवणूकदार" होण्याची.  

म्हणजे करायचं इतकंच, की स्वत:च्या व्यवसायासोबत  थोडी थोडी गुंतवणूक इतर व्यवसायातही करायची, जे कदाचित भरभराटीला येतील.एक पूर्वीचा लेखांक पहा 

कारण स्वतःचा उद्योग अनिश्चित असला तरीही स्वतःचे आर्थिक स्रोत तर शाबूत ठेवावेच लागतील !

Wednesday, 6 August 2025

ह्या अचानकतेला तयार रहायलाच हवे !

जुगाड हे पुस्तक सध्या वाचनात आहे. त्यात विकसनशील देशातल्या ( प्रामुख्याने भारत ) उद्योजकांच्या संशोधना बद्दल भरपूर लिहिले आहे, ज्याचा प्रमुख सूर असा आहे, की विपुलते ऐवजी कमतरतेतून  हे संशोधन घडत असते. ह्यात "अचानक बदलणारी शासकीय धोरणे " हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे उद्योजक अशा बदलत्या परिस्थितीसाठी अत्यंत सरावलेले असायलाच हवेत. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपल्याकडे तुलनेने किंचित कमी अनिश्चितता आहे, किंवा लोकप्रतिनिधी आणि पर्यायाने सरकार तितके बेदरकार नाहीये.

वरकरणी मनमानी वाटत असली तरी सरकारी अथवा निमसरकारी संस्था तितक्या मनमानी किंवा जुलूम करीत नसतात. हे म्हणायला कारण घडलं ते म्हणजे वीज मंडळाच्या सौर ऊर्जेची सवलत मर्यादित करण्याचा निर्णय. ह्याबद्दल एक लेख पुर्वी लिहिला आहे,तो जमल्यास जरूर पहा

थोडक्यात ताज्या अधिनियमानुसार, ज्या कारखान्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केल्याचा १०० टक्के परतावा मिळत होता, तो आता फक्त सकाळी नऊ ते पाच ह्या वेळेतच मिळेल. 

हा नियम थोडा जाचक वाटतो,त्याबद्दल थोडे स्पष्टीकरण :- 

१. निर्माण झालेली वीज साठवण्याची क्षमता ( बॅटरी ) मंडळाकडे पुरेशी नाही.सुरुवातीला सौर द्वारे निर्मिती कमी व्हायची ती आता खूप वाढली आहे. 

२. पुर्वी सौर ऊर्जा निर्मात्यांकडून रु १५ ह्या दराने खरेदी केली जाणारी वीज आता रु ३ ह्या दराने घेतली जाते कारण प्रगत झालेली उपकरणे. निर्मात्यांना अत्यंत कमी दराने हे निर्माण आता शक्य आहे. तरी मंडळाच्या म्हणण्यानुसार ९ ते ५ मध्येच हा दर मिळतो, इतर वेळी १० ते १२ रुपये दराने वीज "बाजारातून" विकत घ्यावी लागते म्हणे. ( हा "बाजार" नक्की कुठला, कुठे भरतो तो ?  पुन्हा रु ३ ने खरेदी आणि रु ७ - ८ ने विक्री, उद्योगांना १५- १६ ने हे गणित फायद्यात न उतरायला मंडळाचा आदर्श कारभार हा देखील एक मुद्दा आहेच. ह्याला आव्हान नाही.कारण मुरलेली नोकरशाही.)

३. असे जरी असले, तरीही १० MW खालील म्हणजे शक्यतो घरगुती ग्राहकांना मात्र सवलत पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहे. ह्या आर्थिक ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे, ह्यावर नेहमीचा सरकारी भीमटोला. धरा उद्योगांना वेठीला. 

४. इतर राज्ये असेच करतात, मग आम्ही का नको ? ह्या न्यायाने पंजाब,राजस्थान गुजरात पाठोपाठ महाराष्ट्र देखील री ओढत आहे.

सदर लेख सकाळ मध्ये ६ ऑगस्ट च्या मुख्य आवृत्तीत सापडेल. मी आमचे स्नेही श्री शशिकांत वाकडे जे सोलर उद्योगात अनेक वर्षे आहेत त्यांचेही मत ह्याबद्दल जाणून घेतले, त्यानंतर ही पोस्ट लिहिली आहे.

लेखक देखील माझ्या तात्पर्याशी सहमत असावेत. 

ह्यातून बॅटरी निर्माण व तत्सम उद्योग उभा करण्यासाठी भविष्यात चांगली संधी आहे हे दिसत आहे. परंतु पुन्हा तेच :- 

की ह्यातही आव्हाने येऊ लागल्यास सरकार स्वतः ची अंतर्गत कार्यक्षमता वाढवणे हे कधीही करणार नाही हे उद्योजकाने गृहीत धरून चालावे. तोच खरा गुंतवणूकदार - उद्योजक.



Sunday, 3 August 2025

तुम्हाला हे चालेल का ?

आजच मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या ठिकाणी "पंचम पुरीवाला" येथे जावून आलो. आज चा अनुभव तितकासा बरा नव्हता, किंवा अनुभवाने माझे भिंग जरा अधिक तीव्र होत चालले असावे. 

पहिलं म्हणजे इथे queue होता.नेहमी सुद्धा इथे गर्दी असतेच, पण पोटभऱ्या मंडळींची. आजची गर्दी कुतूहल असणाऱ्यांची, एकदा जावून बघू म्हणणाऱ्यांची आणि फूडी मंडळींची देखील. हे reels वगैरे ने वाढणारे ट्रॅफिक. VT म्हणजे आताचे CSMT किंवा CST च्या  GPO बाजुला उतरलो, की समोर पेरीन नरिमन अर्थात बाझार गेट स्ट्रीट च्या अगदी तोंडाशी हा पंचम आहे.

अनेक वर्षे आहे. पुरी आणि सोबत अनेक प्रकारच्या भाज्या आणि अत्यंत रास्त दरात, हे वर्षानुवर्षे मिळत आहे इथे. चव सुद्धा व्यवस्थित. व्यवस्थित इतकंच म्हणतोय, कारण इथे येणारा काही foodie अपेक्षित नाही. स्वस्तात चांगले जेवण हाच ह्यांचा व्यवसाय आत्मा. 

ते अजूनही मिळत आहेच. सोबत काही अनिष्ट गोष्टी पहिल्यांदाच आढळल्या. उदा :- स्टील च्या वाट्या न देता, कागदी. तसेच लाकडी चमचे ज्यातून पातळ भाजी खाताच येत नाही. किंवा स्वच्छतेच्या नावाने संपूर्ण बोऱ्या वाजलेला आहे. साफ सफाई करणारे कर्मचारी तर टेबलावरील खरकटे सरळ खाली ढकलून देत होते. त्यामुळे खूप घाण, अस्वच्छ, असुरक्षित देखील वाटले.

स्वस्त देणे म्हणजे असे करावे असे काही नाही

नुकताच कोइंबतूर येथे गीता हॉटेल नामक अत्यंत स्वस्त, तरीही कमालीच्या स्वच्छ व संपूर्ण प्लास्टिक विरहित उपहारगृहात जायचा योग आला. पुण्याचे बादशाही देखील ह्या प्रकारात मोडते.

धंदा वाढतोय,तो कराच.परंतु काउंटर सोडून मालक मंडळी कधी प्रत्यक्ष जिथे धंदा चालतो तिथे जाऊन पाहतील आणि स्वतः लाच प्रश्न विचारतील, की मला हे चालेल का ? तरच बदल घडेल. नाहीतर लोकप्रियता रसातळाला लागण्यात कितीसा वेळ लागेल ?

कॅफे गुडलक चे आपण नुकतेच काय झालं आहे हे पाहिलेच ! मला वाटतं की सुरुवातीला गरज म्हणून निवडलेला व्यवसाय एकदा स्थैर्य देवू लागला, की जोर पकडतो,वाढतो, आणि खूप पैसेही मिळू लागतात. अशा वेळी लागेल ते भान. सुरुवातीला नाही जाणवले तरी एखादा फटका, झटका बसल्यावर तरी किंवा स्वतः ला जाणवले तरीही हा बदल घडून येऊ शकतो, आणि संभाव्य हानी टळू शकेल.

Friday, 1 August 2025

लोहमार्ग : मुंबई चा खरा प्राणवायू

( मी स्वतः जन्माने मुंबईकर असल्याने मला मुंबई लोकल्स प्रकाराची व्यवस्थित माहिती आहे, ही आधीच कबूली देतो )

तर सांगायचं असं, की आता एक अ मुंबैकर म्हणून ( गेले २७ वर्षे मी मुंबईकर नाही ) मुंबईत येतोय, अगदी तसाच मी प्रमुख मेट्रो शहरांत म्हणजे कलकत्ता, दिल्ली, चेन्नई मध्ये तर अर्ध मेट्रो शहरांत उदा बंगळूर, हैदराबाद आणि ह्याच्या किंचित खाली म्हणजे पुणे, अहमदाबाद, सुरत, नागपूर इत्यादी शहरांमध्येही फिरत असतो. अर्थात कामाच्याच निमित्ताने.

मुंबईत तर परिचयाचे असल्याने, आणि आता दिल्ली, चेन्नई आणि कलकत्त्यात देखील मी लोकल किंवा मेट्रो ह्या मार्गेच फिरून कामे करतो. अतिशय चोख असा हा साथीदार आहे. गर्दी फिर्दी जरा धरून चालायचे. तर ह्यासारखा वेळेत आपल्या गंतव्य ( हा शब्द सुद्धा रेल्वे नेच शिकवला  ) स्थानी पोचविणारा दुसरा साथीदार नाही. अगदी आधीपासूनच पुणे मुंबई प्रवास सुद्धा माझा मार्ग म्हणजे लोहमार्ग. शक्य नसेल तरच रस्त्याने.

हल्ली पुण्यात मेट्रो झालिये पण पुणेकर आणि चटकन कामे मार्गाला लावण्याची नॅक असलेला मुंबईकर ह्यांच्या वर्तणुकीत असलेला प्राथमिक फरक हा देखील रेल्वे मुळेच आहे. त्यामुळे अगदी मुंबईत येऊन राहिला नाहीत, तरी लोकल वापरायचे कुतूहल जागृत करा. शिवाय चालणे आपोआप होतेच. १० हजार पावले ही मुंबईकर व्यक्ती करिता अत्यंत किरकोळ बाब आहे.