Wednesday, 30 July 2025

अनुत्पादक वार्षिक सोहळे

काल २९ जुलै. टाटा ह्यांचा जन्मदिवस साधून काही संस्थांनी समारंभ ठेवले होते, ज्यात सर्वोत्कृष्ट उद्योजक नामक पुरस्कार, आणि जोडून एखाद्या प्रथितयश व्यक्तीचे भाषण असे साधारण स्वरूप होते.

आता पुन्हा मी अशा कार्यक्रमांना न जायचे ठरवले आहे. कारण त्यात येणारा विदारक अनुभव. 

दोन्ही कार्यक्रमांत, ज्यांचा सत्कार केला गेला, त्या त्या उद्योजकांना ना बोलू दिले, ना त्यांच्या उद्योग प्रवासा बद्दल काही माहिती. उद्योजक सुद्धा अशा उथळ पुरस्कारांना पूर्ण भुललेले असतात असेच दिसत आहे. त्यामुळे ज्या करिता गेलो होतो ते एक कारण तर संपले.

दुसरे म्हणजे प्रमुख वक्ते जे काही सांगतील ते. दुर्दैवाने एकात एक मंत्री होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तिमित करणाऱ्या शैलीने तसेच अत्यंत प्रभावी अशा नम्रपणे वारंवार आयोजकांना खुष करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.

दुसऱ्या कार्यक्रमात एक प्रथितयश उद्योगपती होते, ज्यांनी स्वतः चा PR अत्यंत कसब दाखवून करून घेतला, जोडीने खुपशी आश्वासने दिली. अशी मंडळी नंतर अजिबात भेटत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे ही देखील एक अत्यंत अंधुक अपेक्षा. 

दोघांच्याही कडून तसे काहीच विशेष विचारधन नाही मिळू शकले. भोजने वगैरे होतीच. अर्थात मी त्याकरता जात नाहीच. राहिला भाग नेटवर्किंग चा. त्याबद्दल देखील माझे आता वेगळेच मत तयार झालेले आहे. ते पुन्हा कधी.

तात्पर्य असे, की जे ऐकायला गेलो होतो, ते सोडून दोन्ही संस्थांनी मला पहा आणि फुले वाहा असाच सर्व प्रकार केला. त्यामुळे असल्या कार्यक्रमांना आता फुली.

Monday, 28 July 2025

माझे वेळापत्रक नव्हे.. "ऊर्जा पत्रक"


सोबतचे छायाचित्र आहे २७ जुलै च्या  सकाळ सत्परंग मधील. पान २ वरचे. वीणा वर्ल्ड च्या  वीणा पाटील ह्यांच्या "किचन आणि टॉयलेट" ह्या लेखातील. 

ह्या लेखात अजूनही छान संदर्भ सापडतील, तरीही आपल्या विषयाला धरून हे समर्पक वाटलं.

वीणा ह्यांनी सकाळची वेळ ही सूचित केली आहे, ज्यात त्यांना नवीन उपक्रमासाठी आवश्यक अविचलित एकाग्रता सापडलेली आहे. ह्यावेळी त्यांची ऊर्जा देखील सर्वोत्तम असते.

मी माझ्या वेळापत्रकाला आता ऊर्जापत्रक असे संबोधायला सुरुवात केली आहे. आणि "वेळेचं व्यवस्थापन" ह्या कालबाह्य संकल्पनेतून खरेच बाहेर पडण्याची गरज आहे आता. 

एक गोष्टीची कबुली : की शेवटी आपण वेळच तर manage करतो ना;  मग कशाला ही नवीन फंडूगिरी ?

META ची संकल्पना 

हे डिजीटल विश्वातील meta नाही. तर मी माझ्यासाठी केलेले एक सूत्र. कोणताही वेगळा विचार अंमलात आणताना काही गोष्टी द्याव्याच लागतात. त्या म्हणजे META.

M = Money
E  = Energy 
T  = Time 
A  = Attention 

ह्यातील Money, Time ह्या गोष्टी आवर्जून द्याव्या लागतात. पण Energy म्हणजे ऊर्जा मात्र खर्ची पडते. आवर्जून न देताही. ही स्वतः ची कल्पक ऊर्जा म्हणतो आहे मी. ही माझीच असते. ही सर्व ऊर्जा म्हणजे सर्जनशील, धैर्यशील, तुलनात्मक वगैरे मूल्यमापन करणारी मेंदूची शक्ती. आत्मशक्ती. 

माझाच नवीन प्रकल्प असल्याने ही ऊर्जा माझीच जात असते, आणि मलाच लावावी लागेल,लागते. ह्यात काहीच करता येत नाही. ही पुन्हा भरूनच काढावी लागते. आपण बऱ्याचदा म्हणतो की .... फुकट वेळ गेला यार! 

हे दुःख वेळ गेल्याचं कमी, आणि आता पुन्हा सगळं नव्याने करावं लागणार ह्याचं अधिक असतं. त्यामुळे अशी वेळ कमीतकमी यावी ह्याकरता आधी आपलं Attention म्हणजेच व्यवधान कुठे ठेवायचं हे ठरल्यास बहुमोल फायदा होतो. 

म्हणून ऊर्जापत्रक.

ऊर्जापत्रक म्हणजे :- 

# कमी गोष्टींचा संकल्प करणे 
# कोरडी शिस्त टाळून आनंदावर भर देणे
# ऊर्जा खाणाऱ्या गोष्टी हळूहळू नामशेष करणे
# आणि ह्यानुसार क्रमवारी करत वेळेची आखणी करणे.

रोजचे नियोजन नव्हे 

आपल्याला कॅलेंडर शी खेळायला जाम आवडतं. आणि मज्जा येते. करुयात. पण रोज प्रत्येक दिवशी हे व्हायलाच हवं असं नाही. उदा: एखादा लेख किंवा blog किंवा व्हिडीओ करायचा ठरवला, तर नेम नका लावू सुरुवातीला. किंवा चालायला जायचं ठरवलं, तर रोजच चालायला हवं असं काही नाही. कोरडी शिस्त जर तुम्हाला प्रेरित करत असेल तर त्यात पुन्हा मानसिक शक्ती म्हणजे ऊर्जा खर्च. 

जेव्हा वाटेल, तेव्हा विचार करून पहा.. "आत्ता लिहून पाहावं का ? व्हिडिओ ला  मस्त मूड आहे, करू का ?" आतून "हो" आलं, की झालं. करायला सुरू करा, जमेल तितकेच करा. अट्टाहास नको. 

स्वतः चाच ट्रेंड पहा ...

अशा पद्धतीने करा. फक्त व्यवधान राहू दे. आपलं ध्यान इकडे तिकडे भटकू द्यायचं नसेल तर व्यवधान म्हणजे Attention कुठे ठेवायचं हे आठवा. ते तुम्हाला दर्शक ठरेल. काही काळ स्वतः ला द्या. निष्कारण मोजमाप नको. आपला आपल्याला अंदाज येतो, आणि तो दाखवतो की अमुक गोष्ट मला अमुक कालावधीत किती वेळा जमते.साधारण ठरवा. की आठवड्यातून, पंधरवड्यातून मी दोन लेख लिहू शकते, किंवा आठवड्यात साधारण दोन दिवस मी संध्याकाळी ३० मिनिटे चालायला जाऊ शकतो किंवा आठवड्यातून एक व्हिडिओ मला तयार करता येईल वगैरे.

अतिरिक्त, जास्तीचे ध्येय नको 

सगळ्या जगाचाच हा रेटा असतो, की पहिल्या ३ महिन्यांत घेतलेल्या ध्येयापेक्षा आता जास्त वगैरे. हे पूर्ण टाळा. आपले उद्दिष्ट हे आहे, की जास्त काळ आनंदाचे काम आनंदाने करत वेळ जायला हवा आहे. त्यामुळे काहीच काळ एखादे काम करण्यापेक्षा एक आनंदाचा शाश्वत मार्ग शोधणे. त्यामुळे 

मोजके करू, 
जे आपोआप कायम, सहज, 
आत्मशक्ती न लावता होत राहील.

कंटाळा आला तर चक्क थांबा.

लिहिता लिहिता खूपच कंटाळा आला तर थांबा. ब्रेक घ्या. मध्येच WhatsApp तपासा. पण त्यात गढून जावू नका. घरातले एखादे काम करा. उदा. पत्नीला, स्वतः ला चहा करणे, वगैरे. परत बसा. तरीही नाही वाटले, तर सोडून द्या. फिर कभी.

प्रेरक वाटला विचार तर करून पहा, तुमचा काही वेगळा विचार असेल तर कमेंट मध्ये जरुर कळवा.

Saturday, 26 July 2025

मी माझ्या व्यवसायात नक्की कुठे आहे ?

काल परवाच एका व्यावसायिक मित्राची भेट झाली. छान आहे म्हणाला व्यवसाय. पण खूप धावपळ आहे, असणारच, असेही म्हणाला.

ठीकच..माझे मोघम उत्तर.

"मला काहीच दिवसांपूर्वी चेहऱ्यावर पक्षाघाताचा झटका येऊन गेला" असे नंतर म्हणाला. 

आता मात्र माझे विचारचक्र सुरू झाले. काही होणे हे तसे फारसे आपल्या हातात नाही. तरी त्यानंतर आपण त्यातून शिकून आपले काय चालले होते, आणि आहे हे त्याप्रमाणे बदलू शकतो नक्की. 

सदर व्यावसायिकाचे आर्थिक गणित तसे ठीकठाक आहे. कधी कधी नाही हो तितकं असं आपल्याला वाटू शकतं. पण ते नक्की ठीक असतं. "सुखी माणसाचा सदरा" हे करुणा गोखले अनुवादित पुस्तक वाचा. उलगडा होईल. 

चर्चा पुस्तकाची नाहीये, तर आपल्या व्यवसायाचा आणि जोडून असलेल्या आपल्या आयुष्याचा आपण लेखाजोखा अवश्य घेतला पाहिजे, असे कळकळीने वाटते.

तर वरील व्यावसायिकाच्या बाबतीत, त्याने प्रचंड धावपळ करणे हे तरी निश्चित कमी करता येईल. थोडा धंदा कमी झाला तरी चालतंय. आणि हा कमी झालेला धंदा जास्त प्रमाणात वेळ उपलब्ध करून देईल, जो स्वतः वर अवलंबून नसलेल्या वाटा सुचवेल, शिवाय शारीरिक तंदुरुस्ती कडे काम करण्यास प्रवृत्त करेल. अशा वेळी तर निश्चितच आपला व्यवसाय आपल्याला आवश्यक बाबी सोडून किती काम करायला लावतो हे नक्की पाहायला हवं. शिवाय आपला कृतिशील व्यवसाय म्हणजे आपण फक्त एकच व्यवसायात सगळी गुंतवणूक करत आहोत.

पुन्हा सांगतो :- शारीरिक तंदुरुस्ती अधिक आयुष्य लाभण्याकरिता नाही. तर प्रत्यक्ष त्यातून खूप छान वाटते, आणि "सतत आपण काहीतरी करायला पाहिजे" ह्या सापळ्यातून  आपण मुक्त होऊ शकतो. ही खरी सुरुवात आहे. वेगळी वाट चोखाळायची.

तर कधीही विचार केला नसेल तरी काही आर्थिक विवरण करणाऱ्या गोष्टीचा अभ्यास स्वतः च करा. गेले २ ते ३ वर्षे मी हे करत आहे आणि त्यातून मला समांतर मार्ग मिळाला आहे असे मी म्हणेन, जो मला शांत करतो, शारीरिक तंदुरुस्ती कडे प्रवृत्त करतो, आणि एक समांतर अर्थ व्यवस्था उभी करून देत आहे.

सोबत अगदी मूलभूत अशा ताळेबंदाचे चित्र जोडले आहे, जे आपल्याला जे जे सांगू शकते ते ते उद्धृत केले आहे. त्यातले owners/shareholders हे अगदी समजण्यासारखे आहे. कारण ते आपण स्वतः च आहोत.

Friday, 25 July 2025

सातत्यपूर्ण सेवा

" भाजी कोणती देवू आज ? " 






गेली पंचवीस वर्षे ही हाक मी दरवाज्यात ऐकली नाही असे कधीच झाले नाही. ह्याचे कारण श्री व सौ ढेकणे हे स्वत: प्रत्येक घराच्या दाराशी येवून, बेल वाजवून विचारतात, समोर भाजीची टोकरी असते. भाज्या उत्तम, रास्त दरात वगैरे असतातच. तो प्रश्न नाही. 

पण हल्ली whatsapp च्या जमान्यात हे , इतक्या कमालीच्या सातत्याने किती मंडळी करतात ? जरी लिफ्ट असली, तरीही उतरताना हे उपलब्ध साधन नाहीये. 

महत्त्वाचे असे, कि कोणत्याही मार्केटिंग शाखेचे कोणतेही खास प्रशिक्षण न घेताही त्यांनी ही गरज बरोब्बर हेरली आहे. हाच त्यांचा USP.

तुमच्या सातत्याला सलाम !

Thursday, 24 July 2025

स्पष्ट नकार म्हणजे शिष्टपणा नाही

आजचीच ताजी ताजी घटना....

एका व्यक्तीने काल मला ते काय करतात ते (कळत नव्हतं नीट) एक व्हॉट्सॲप संदेशमार्फत पाठवलं. पाठोपाठ घडून आलेल्या छोटेखानी संदेश आदान प्रदानातून आम्ही कोणत्या ग्रुप मार्फत एकमेकांना ओळखतो ह्याची खात्री पटली.

दरम्यान आज सदर व्यक्तीचा दुसरा संदेश. त्यात affiliate marketing बद्द्ल लिहिले होते, ज्याचा त्यांनी सांगितलेल्या बिझनेस शी तसा भासमान संबंध नाही आढळला. मी त्यांना स्पष्ट फिरून विचारलं की "आपण नक्की काय करता ?"

( प्रत्येकाकडे स्वतः विषयी नेमकं सांगायचं कौशल्य नसू शकतं.किंवा सुरुवात करताना नव व्यावसायिक अनेक वाटा हाताळून पाहत असतो, तेव्हा देखील असे होत असते.)

सदर व्यक्तीने जे सांगितलं, त्यात एक विशिष्ट उल्लेख केला, जे मला वाटलं की माझ्या कामाचे असेल. म्हणजे त्याची सेवा मी त्या विशिष्ट उपयोगासाठी जसेच्या तसे सुचवू शकेन. परंतु त्यांची सेवा ERP ही ज्या विशेष वापरासाठी आहे त्यात माझ्या मनातला वापर नव्हता. तरी हे संभाषण सुरु असतानाच त्यांनी " सर फोन करतो, बोलू सविस्तर " असे उत्तर पाठवले.

ही धोक्याची घंटा 

ह्यात खूप वेळ जातो, त्यामुळे मी त्याला स्पष्ट, परंतु नीट कळवून टाकले की बाबा, माझ्याकडे सरळ सरळ अशी requirement नाही त्यामुळे फोन करू नकोस. ह्यात खूप वेळ जाऊ शकतो. अर्थात हे सापेक्ष आहे म्हणा. तरीही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर अनेक ठिकाणी आपला जाणारा वेळ, आणि पाठोपाठ जाणारी ऊर्जा, पैसे ह्याचा विचार करणे नक्कीच उपयुक्त !

हा शिष्टपणा नाही 

उगाचच आढ्यताखोर आविर्भाव ह्यात नाही. तर पुढे जावू शकणारा दोघांचा वेळ वाचविणे हा उद्देश आहे. तरीही मी त्याला फोन करू नको , पण चहा करिता कधीही भेट ठरवू शकतो असे निश्चित सांगितले आहे.

पाहुयात आता 



Sunday, 20 July 2025

Indiamart हे लौकिक अर्थाने सर्च इंजिन नव्हे !

सर्च इंजिन म्हणजे काय ? तर लोकांच्या मनात असलेल्या शोध मोहिमेत त्यांना मदत करणारे. वरकरणी दिसताना असंच भासतं कि हे एक उत्तम सर्च इंजिन आहे. निदान ज्या प्रकारे त्यावर माहिती टाकलेली दिसते, त्यावरून तरी. पण प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केलीत, की अत्यंत चीड येवू लागते.

तुम्हाला हवं ते निवांत पाहण्याची, त्यातून शिस्तीत, आरामात काहीच निवडण्याची सोय नाही. सारखे सारखे pop ups टाकून हैराण मात्र करत असतात. 

थोड्या फार फरकाने just dial ह्याची सुद्धा वेगळी कथा नाही. 

कसे असायला हवे ?


आपण गुगल वर एखादा व्यवसाय शोधात असतो, त्यात त्या त्या व्यवसायानुरूप साधारणपणे सर्व मानक दिलेले असतात. त्यावरून आपल्याला सहजपणे निवडता येतं. 

👉हे ह्या websites वर नाही. हे सोपे का होऊ नये ? 

ग्राहकाला चटकन काही सप्लायर बाजूला वेगळे काढून ठेवता यायला हवे, त्यांना संपर्क साधणे सहज हवे. हे काहीही नाही. तर India Mart त्यांच्या लिस्टिंग करणाऱ्यांत चढा ओढ लावते , आणि लाभार्थींचा व्यवसाय वर ढकलते. 

⛔हे नसायला हवे. तुमचा मूळ उद्देश ( स्व धर्म ) हा लोकांना लोकांचे शोध पटकन मिळवून देणे हा असायला हवा आणि पर्यायाने तो platform देखील ✔

स्वधर्म म्हणजे व्यावहारिक नाही असे अजिबात नाही 


जेव्हा BNI सारखी एखादी संस्था Selling, किंवा lead generation wing स्थापन करण्यासाठी नाही म्हणते, तेव्हा स्वधर्म च पाळत असते. टेल्को म्हणजे आताची टाटा मोटर्स इंडिका V2 चे दोषकारक बम्पर स्वखर्चाने बदलून देते, ती स्वधर्म च पाळत असते

ह्या रूपकाने एखाद्या माशिनेरी शोधणाऱ्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या मापदंडा अनुसार मशिनरी चे जास्तीत जास्त पुरवठादार कमीत कमी वेळात समोर आणून देणे हा indiamart सारख्या website चा स्वधर्म का असू शकत नाही ?

Wednesday, 16 July 2025

तक्रार :- प्रगतीची उत्तम संधी

आपापल्या व्यवसायात तर असतेच, आणि शिवाय विविध ग्रुप्स ना देखील सभासदांच्या तक्रारी ही एक मोठी संधी असते, आपली वाटचाल तपासून पाहण्याची.

ग्रुप ची " मालकी " नाही.

नेतृत्वाने हे "ही काय कटकट" असे न पाहणे ही पहिली आवश्यकता असते. मुळात ग्रुप म्हणजेच लोकांचा समूह. अगदी मी स्वतः सुरू केलेला असला तरीही मी त्या ग्रुप चा "मालक" किंवा स्वामी नाही. कारण मुळात जे त्यात सामील झाले, त्यांच्याही मनात त्याच भावना होत्या, त्या फक्त मी छेडल्या असतील. एखाद्या संस्थेचा देखील हा एक ग्रुप असेल,त्याचे तात्पुरते नेतृत्व तुमच्याकडे आलेले असेल. तरीही तुम्ही त्याचे सर्वे सर्वा नाही. हे लक्षात ठेवायला हवे. स्मरण हवे. 

सदस्य मंडळी जे काही व्यक्त करतील ते कदाचित आपण ठरवलेल्या मार्गात अडचणीचे असू शकेल. पण त्याचा कटकट असा विचार करता कामा नये. तर मेंबर काहीतरी वेगळे म्हणत असू शकेल हा आस्था दायक विचार आधी हवा.

कदाचित व्यक्तिगत जरी बोलले गेले तरी ते आपल्या पदाच्या दिशेने असेल, त्याच्या अधिकार क्षमतेच्या क्षेत्रात बसणारे. तुम्हाला उद्देशून नाही. असा विचार लाभदायक ठरेल.

एकदा का हा वैचारिक पाया पक्का झाला, की मग चक्क एक विशेष बैठक ह्याच कारणास्तव घ्यावी. आरोप प्रत्यारोप असे स्वरूप न येऊ देण्याकरिता प्रत्येकाच्या मताचा यथोचित मान ठेवून कोणतेही मत प्रदर्शित करावे, करायला संबोधन करावे.

प्रत्येक गोष्टीतून शिकताच येते

नुकतंच एका वेब सिरीज मध्ये एक काल्पनिक प्रसंगात आई आणि मुलगी एकच चित्रपटात सोबत काम करायला तयार नसतात. तर त्यांचे वाद प्रतिवाद घडायला लागतात. लेखक दिग्दर्शक एकच असते : फरहा खान. ती त्यांना चित्रपटात घेत नाही, परंतु त्यांच्या वाद प्रतिवादातून तिला तिच्या पुढच्या कथेची थीम मिळते.

असाच थोडासा दृष्टिकोन नेत्याला ठेवायला लागतो. प्रत्येक इशू काहीतरी शिकवत असतो.

Tuesday, 15 July 2025

उद्दिष्टाचे स्मरण : प्रगल्भतेचे मानक

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात काल भारताची हार. बरंच शिकण्यासारखं. दोन्ही संघांकडून.

मला वाटलं, मी धुतलं 
यशस्वी जयस्वाल, हॅरी ब्रूक, ऋषभ पंत ह्यांनी संघाचा काहीही विचार न करता मनाला येईल तसा फटका मारला आणि आऊट झाले. ते ते चेंडू सर्वोत्कृष्ट नव्हते. काहीच नाही. आली सनक, हाणा.... मागचा पुढचा विचार शून्य. 

बाचाबाची अर्थात स्लेजिंग 
इंग्लंड सारखे संघ अगदी आधीपासून हे करतातच. मला आठवतं एकदा गावस्कर आणि एकदा अरविंद डिसिल्वा ह्याबद्दल बोलले होते, की ह्याकडे दुर्लक्ष करणे हे किती महत्त्वाचे आहे. कशासाठी ? स्वतः ची एकाग्रता ढळू न देण्यासाठी. पर्यायाने संघासाठीच. ह्याउलट शुभमन गिल ह्याने स्वतः भांडभांड केली. इथेच त्याची स्वतः ची एकाग्रता ढळली. 

फक्त उभं राहायचं होतं 

रेड्डी, बुमरा,सिराज, राहुल आणि दस्तुरखुद्द जाडेजा ह्यांना जे जमलं ते बाकीच्यांनी का बरं करू शकू नये ? जेफ्री बॉयकॉट च्या म्हणण्यानुसार "तासनतास उभे राहून अजिबात फटका मारण्याचं टाळणे" हे एक अत्यंत प्रभावी अस्त्र आहे ( क्रिकेट मध्ये ) आणि कौशल्य आहे ( व्यवसायात ).

तिकडे विंडीज आऊट झाले फक्त २७ धावांत ! कारणे : हीच, अशीच. अजून काय !

अंतिम उद्दिष्ट काय ?

ह्याचे थोडे जरी स्मरण असते, तरी अशा चुका घडल्या नसत्या. संयम का ? तर अंतिम उद्दिष्टकरिता. सामन्यात विजय. मनात आलेले फटके मारण्यासाठी अख्खा दिवस होता ना पडलेला.

अशाच चुका आपल्या व्यवसायात होत असतात. अशा वेळी अपेक्षित संधीचे नीट मूल्यमापन करून मगच त्यात शिरावे. कधी कधी "नाही" म्हणायला देखील हरकत नसते.

Thursday, 10 July 2025

व्यावसायिक हा प्रथम एक गुंतवणूकदार असतो

ज्याप्रमाणे शेअर बाजारातील कंपन्या फार विश्वासार्ह नाहीत , असं आपण म्हणत असतो, आता हाच नियम आपल्या सरकार बाबत सुद्धा लागू होऊ शकतो. 

अगदी ताजं उदाहरण म्हणजे सौर ऊर्जा. 
अनेक वर्षे याचा सगळीकडून प्रचार केला जातो आहे. सोबत अनेक कंपन्या तसेच उद्योजक यांना देखील हे क्षेत्र खुणावत आहे. अनेक लघु आणि अति लघु उद्योजक मंडळी याच्यावर शंभर टक्के अवलंबून आहेत. ही तुमच्या माझ्यासारखी मंडळी याचा प्रसार करून स्वतःचं अर्थार्जन स्वतःच करू पाहणारे खरे मुळातले उद्योजक. ही मंडळी विविध ठिकाणहून सौरऊर्जेचा प्रचार करत असतात आणि यात प्रमुख मुद्दा असतो तो म्हणजे वीज बचतीचा. याला नक्कीच मोठं मार्केट आहे. आणि त्यामुळेच तितकीच स्पर्धा सुद्धा आहे. 

बाजाराच्या नियमाप्रमाणे स्पर्धा वाढली की नफा आकसतो. तरीही उद्योजक मंडळी मावळ्यांप्रमाणे खिंड लढवत असतात. सतत आशेवर आणि दुर्दम्य इच्छाशक्ती वर ही मंडळी लढत असतात. 

पण मध्येच एखादा मोठा घाव येतो आणि भविष्य धूसर होऊन जातं. अशावेळी अनेक मंडळी मानसिक रित्या ढासळतात. आणि स्वाभाविक देखील आहे. अगदी पहेलगाम सारखी अनपेक्षित घटना घडली तर तसं काही फार करता येत नाही, सरकारवरचा विश्वास देखील उडत नाही. परंतु नुकतीच महाराष्ट्र वीज मंडळाने जाहीर केलेला सौर ऊर्जेबाबतचा नियम म्हणजे अजबच म्हणायला हवा. थोडक्यात सांगायचं तर ज्या उद्देशाने मोठे उद्योजक किंवा लहान सहान कारखानदार बऱ्यापैकी गुंतवणूक करून ज्या आशेवर तो परतावा मिळण्याची अपेक्षा करत असतात त्यावरच घाला घातला गेलेला आहे. 

एकच दणका 

म्हणे, आता 24 तास सौरऊर्जेचा मोबदला म्हणून वीज मंडळाची वीज मिळणार नाही. याचा अर्थ असा की फक्त आठच तास त्या बदल्यात असलेली वीज मिळणार. उरलेले सोळा तास वीज मंडळाच्या राक्षसी दराने वीज खरेदी करावी लागणार. शिवाय जेव्हा कारखाना बंद असेल तेव्हा जी काही युनिट्स गोळा होत होती, त्याचा परतावा देखील मिळणे थोडे मुश्किल होऊन बसले आहे. एखादा सौरऊर्जा तज्ञ याबद्दल त्यांचे मत देईलच. परंतु या निमित्ताने सरकार हे देखील अत्यंत बे भरवशाचे आहे हे सिद्ध होऊ लागले आहे. 

खाजगीत तर असे वरचेवर होत असते 

मला आणि इतर अनेक लहान उद्योजकांना हा वारंवार अनुभव येत असतोच की काम संपलं की ज्या संस्थेंसोबत आपण काम सुरू केलं आहे किंवा होतं त्या आपल्याला वाऱ्यावर सोडतात. यात फार तपशीलात जाण्यात अर्थ नाही. 

आज गुरुपौर्णिमा आणि त्या निमित्ताने अनुभव हा आपला कायमस्वरूपी गुरू तो आपल्याला काय शिकवतो हे अधिक महत्त्वाचं. 

यातून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे की कुणीच विश्वासार्ह नाही ही वस्तुस्थिती स्वीकारणे. आणि उद्योजक हा प्रथम गुंतवणूकदार आहे ही अधिक व्यापक दृष्टी विकसित करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

आपल्या व्यवसायाचा सुद्धा आपण अनेक व्यवसायांपैकी एक व्यवसाय असाच विचार करायला हवा. आपण एकच व्यवसाय घेऊन बसतो आणि त्यात वर खाली झाले की दुःख करत बसतो. असे न करता आपण अनेक ठिकाणी आपली गुंतवणूक विखुरणे गरजेचे आहे. शेअर बाजार आपल्याला ही संधी देतोच. स्वतः अभ्यास करून हे करता येईलच, परंतु ह्या विचाराला केंद्रस्थानी धरून बाकीचे विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. 

म्हणजे करायचे काय ?

गुंतवणूक हा आपला स्थायीभाव ठेवला तर परतावा हा त्यातला परिणाम. कोणत्याही गोष्टींनी उमटणारे पडसाद हे काहींसाठी योग्य असतात तर काहींसाठी अयोग्य. शेअर बाजार आपल्याला अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये अगदी कमीत कमी गुंतवणूक करून आपली गुंतवणूक समतोल करण्याची बहुमूल्य संधी देतो. अनेक लोक हे एसआयपी किंवा थेट रोख्यांमध्ये गुंतवणे ह्या मार्गाने हे करतच असतात. गरज आहे ती या मार्गाकडे प्रमुख मार्ग म्हणून पाहण्याची. 

जब जाग आए वही सवेरा 

"माझं वय फार झालंय", किंवा 
"मी अगदीच तरुण आहे", 
"आत्ता कुठे करिअरला सुरुवात केली आहे",
तत्सम कारणे मनाला देत बसू नका. ज्या क्षणी हे उमगलय त्या क्षणी कामाला सुरुवात करा. 

एखाद दोन पुस्तके वाचा, काही कोर्सेस वगैरे अटेंड करा. खूप पैसे भसकन गुंतवू नका. त्याऐवजी अशा कोर्सेस किंवा शिकण्यामध्ये थोडे जास्त पैसे गेले तरी चालेल. काही ठिकाणी खूप चांगले काही मिळेल, काही ठिकाणी तितकेसे मिळाले नाही असे देखील वाटेल. परंतु एकदम अंधविश्वासाने किंवा कमी ज्ञानाने हे सुरू करू नका. 

यालाच आजपासून सुरुवात करूया.

Monday, 7 July 2025

Operations चे असाधारण महत्त्व ....

माझा मित्र निशांत ह्याने नुकताच राजीव तलरेजा ह्यांच्या मुलाखतीची एक लिंक मला पाठविली होती. त्यात मला आवडलेले आणि खूप भावलेले एक वाक्य म्हणजे :-

सध्याच्या युगात आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल, तर आपली Operational Efficiency वाढवूनच हे शक्य होईल. उत्पादने, सेवा वगैरे तर प्रत्येक संस्था उत्तमोत्तम देण्यात कुठे कुचराई नाही करत.

✔ पटण्यासारखे आहे. माझ्या कडे सध्या काही अशी उदाहरणे (लहान व्यवसायांची) आहेत की त्यांना वाटत राहते कि फक्त विक्री हेच सर्वस्व. 

मला एका संस्थेने त्यांच्याकडील निवडक अशा १२ उद्योजकांबद्दल टिप्पणी द्यायला सांगितले, आणि सोबत एक एक्सेल sheet दिला ज्यात बरेच मुद्दे होते मूल्यांकना करिता. एक होता : Net Profit अर्थात निव्वळ नफा. त्यात १२ पैकी फक्त एकाचाच निव्वळ नफा ८% पेक्षा जास्त होता. बहुतेकांचे १- ३ टक्के. मी विनंती करून त्यांच्या "कार्यचालन म्हणजेच Operating Profit" चे आकडे मागवून घेतले. मग सर्व जरा बरे झाले. बऱ्याचदा नफा कमी दाखवून कर कमी भरण्याच्या प्रवृत्तीने असे होत असावे. तरीही, मी माझा निष्कर्ष पाठवून दिला :- ज्या उद्योजकांचा कार्य चालन नफा हा १५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, त्यांचाच विचार व्हावा. कारण निकष अगदी काहीही जरी असला, तरीही आपल्या स्वत: च्या मूळ कामातून जे उद्योजक कमीत कमी १५ टक्के नफा मिळवू शकत नसतील, तर बाकी सर्व गौण. खालील एका कंपनीच्या उदाहरणातून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय.

आजच्याच सकाळ मध्ये योगा योगाने डॉ अनिल लांबा ह्यांचे एक विधान आले आहे जे Cash Flow किती महत्त्वाचा आहे ह्याबद्दल आहे 👇


✵पाठोपाठ श्री भूषण ओक ह्यांचे एका कंपनीचे (Dynacons) आर्थिक विश्लेषण आलेले आहे. त्यातील बाकी सर्व भाग सोडा परंतु, खालील दोन्ही वक्तव्ये पहा :-



दोन्हींमध्ये " Cash In" जरा चिंताजनक बाब आहे असे म्हटलेले आहे. म्हणजे येणी आहेत, परंतु वसुली मात्र ३५ टक्केच आहे. आता आणखी खोलात गेल्यावर समजून आले, की , कदाचित कंपनीच्या प्रत्यक्ष धंद्यातून असलेल्या येण्याचे प्रमाण इतके कमी नसेल, परंतु कंपनीने सोबत इतर गुंतवणुकी केल्यात ज्यात कदाचित घाटा झाला असावा.कुठेतरी कंपनी व्यवस्थापनात गडबड असू शकते. तर ही इतर गुंतवणूक कार्य चालन नफ्यातून केली जाते ना ! म्हणूनच एखाद्या कंपनीची कामगिरी पाहताना ताळेबंद, नफा तोटा पत्रक व सोबत कॅश फ्लो देखील पाहतात. हे कॅश फ्लो सुद्धा ३ भागांत असतात : त्यातील Operations Cash Flow नीट बघितला कि कंपनीचे कामकाज समजून येते.

मी काही यातला कसलेला खेळाडू नाही, फक्त सोबत स्वत: चा व्यवसाय व इतर व्यावसायिकांशी सल्ला मसलत करत असताना, त्यांच्या समस्या अधिक खोलात जाणून घ्यायला, त्या नीट अधोरेखित करायला ह्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा प्रयत्न करीत आहे.

इथे आपण कंपनीचे शेअर घ्यावे कि नाही ही चर्चा नाही करत आहोत, परंतु ह्या अनुषंगे आपल्याला निश्चित समजून येतं की Operational Profit किती महत्त्वाचा आहे. हाच तो EBITDA. ह्यावर आपला एक विशेष podcast देखील आहे. 

✔ नुसता कागदावर नफा दिसून नाही भागायचे तर तो रोखीत , वेळेत रुपांतरीत व्हायला हवा. नाहीतर गणित पालटायला वेळ लागणार नाही. ह्याकरिता वेळेवर वसुली होणे, प्रत्येक ठिकाणच्या नोंदी अचूक तसेच वेळेवर चोख व्यायला हव्यात. नसल्यास कर्मचारी वर्गास समजूत द्यायला हवी. कंपनीत कार्यचालन नफ्याची संस्कृती रुजवायला हवी. कर्मचारी वर्गाला ह्यात प्रशिक्षित करायला हवे.