कालच एका संस्थेत "समन्वयक" अर्थात Co-Ordinator म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीशी संवाद सुरु होता. ती तिथल्या कर्मचारी वर्गाच्या विचित्र वागण्याबाबत खेद कम आश्चर्य व्यक्त करीत होती. कारण देखील तसेच होते.
सदर संस्था ही एक सामाजिक संस्था आहे, ५० वर्षे जुनी , उदात्त विचारांनी निर्मित झालेली आहे. मूल्ये स्पष्ट आहेत, अधोरेखित देखील असावीत. आणि वर्षानुवर्षे अनेक अनुभवी व्यक्तींच्या चाळणीतून चाळून झालेली असणार.
तर त्यांचे एक व्यावसायिक मूल्य असे कि इथे येणाऱ्या कर्मचारी मंडळींना "लेटमार्क" केला जात नाही. कारण असे, कि ही काम करणारी मंडळी देखील तशी संघर्षमय परिस्थितीतूनच आलेली असतात. तर त्यांना मानवता वादी दृष्टीकोनातून इतकी सवलत देणे हे देखील एक प्रकारचे सामाजिक भान व काम आहे. अशी सवलत देवू करणारी मी तरी पहिलीच संस्था पाहिली. आणि हेच दुखणे आमच्या समन्वयक व्यक्तीचे होते.
की असे असून देखील, इथे काम करणारे कर्मचारी संस्थेचा खूप ( उगाचच ) दुस्वास करतात. नावे ठेवतात, वगैरे. संस्थेच्याही काही डाव्या बाजू असणारच रे अशी माझी खास खोचक शंका देखील काढून झाली. पण एकंदरीत संस्थेकडून फार अन्यायकारक काही घडत नाहीये हे लक्षात आले. मग असे का बरे होत असावे ?
सामाजिक संस्थेबाबत अशी स्थिती असेल, तर खाजगी नफा उद्दिष्टीत संस्थांबद्दल काय बोलावे ?
पण अगदी हे काळे , हे पांढरे असे नको करायला, कारण अशाही अनेक संस्था ( खाजगी ) , ज्यांना "उद्योग" म्हणता येईल, पाहण्यात आहेत, ज्यांच्या बद्दल कर्मचाऱ्यांना नितांत आदर आहेच, शिवाय ते स्वत: आनंदी देखील आहेत.
मला भासलेल्या काही गोष्टी :-
१. खाजगी संस्थांबाबत बोलायचं झाल्यास, नुसता "नफा" ह्यापलीकडे काय विशेष आपण करतोय, कोणत्या प्रकारे लोकांच्या आयुष्यात ( म्हणजे ग्राहक वर्गाच्या ) क्रांतिकारक बदल घडवून आणीत आहोत, हे शोधणे, तपासणे, आणि ते व्यवस्थित लिहून काढणे.
२. ह्या मूल्याकरिता स्वत: प्रवर्तक, किंवा मालक मंडळी किती कटिबद्ध आहेत ह्याचं स्वत: वस्तू निरपेक्ष मूल्यमापन करणे.
३. ह्या नंतर आपल्या विविध संबंधित व्यक्तींमार्फत ही अंतर्गत मूल्ये कशी पोहोचतील, ह्याचा कृती कार्यक्रम तयार करणे.
प्रत्येक संबंधित व्यक्ती करिता ह्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नवीन रुजू होणारे, बढती प्राप्त होणारे, पदभार बदललेले, वगैरे वगैरे.
हे फक्त मोठ्या नव्हे, तर अगदी एक - दोन व्यक्ती असणाऱ्या संस्थांकरिता देखील आवश्यक आहे. आपण ज्या संस्थेकरिता काम करत आहोत, ती संस्था काय आहे, तिची मूल्ये काय आहेत हे समजल्यास कर्मचारी वर्ग टिकवून ठेवण्यास त्याचा निश्चितपणे उपयोग होईल.
बऱ्याच आस्थापनात मुळात कामगार न मिळणे ही समस्या दिसते.. पण खोलात पाहिल्यास मालक किंवा आस्थापनेस हव्या त्या पगारात कामगार मिळणे ही खरी समस्या आहॆ. कामगारां सोबत empathy walk केल्यास त्यांच्या घरगुती, आर्थिक, सामाजिक अडचणी समजून येतात, कधी कधी त्याचे पूर्ण समाधान करता येणे अशक्य असते.. पण किमान विचारपूस झाल्यास कामगार चांगले काम करतात.. सोडून जाण्याचा रेशो कमी करता येईल.
ReplyDelete