Wednesday, 28 June 2023

माझ्यासाठी जे Right; तेच राईट !

३-४ महिन्यांपूर्वी मला एका हितचिंतक मित्रा कडून सरकारी कामाची एक संधी आली. संधी मला Next-Level घेवून जावू शकेल अशी. दिवसभर बसून मी सर्व कागदपत्रे तयार करून दिली. शेवटी त्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी मला जराशा विचित्र अटी फेकल्या , त्या खालील प्रमाणे :-

  • तुमचा कोर्स केल्याने उद्योजक पुढच्या महिन्यापासून अर्थार्जन करायला लागलाच पाहिजे.
  • त्यातून निदान ८० टक्के लोक अर्थार्जन करायला लागलेच हवेत.
  • डिजिटल कोर्स अगदी स्वस्तात व्हायला हवा.
  • अधिकाऱ्यांनी "ओके" म्हटले, कि तुमचे पैसे फटक्यात रिलीज.
जे अधिकारी हे सर्व बोलले त्यांनी मला खात्री दिली कि हे काम तुमचेच आहे. पैसे बिसे सुद्धा कुणालाच द्यायचे नाहीत वगैरे. 

तर नुकतेच त्या प्रोजेक्ट चे पैसे Sanction होवून आले, आणि मी त्यांना धडधडीत "नाही" म्हटले आहे. हो, ही मोठी संधी ( कदाचित ) नाकारून. 

तत्त्वाचा प्रश्न केलेला नाहीये, पण नुकत्याच अशाच एका सिमिलर घटनेत आमच्या एका मित्राला बसलेला फटका डोळ्यासमोर आहे. त्याचा analysis केला तर खालील गोष्टी माझ्या लक्षात आल्या :-
  1. आपण सगळ्यात "बाप" असू, पण सरकारी खात्यात आपल्या हातात काहीच नाही.
  2. अगदी क्लीन अधिकारी वर्ग असला, तरीही तर प्यादे कुठे अडले कि सगळे नामानिराळे होतात. मरतो, तो उद्योजक. 
  3. अशा केसेस मध्ये आर्थिक तर होतंच, शिवाय मानसिक नुकसान देखील प्रचंड होऊ शकतं, वेळ खूप जातो हे अतिरिक्त.
  4. अगदी Defined प्रकारचा Product किंवा सेवा असेल, उदा. Dunlop चे tyre supply, तर ठीक आहे. पण असे कोणते उत्पादन किंवा सेवा असेल, ज्यात नवीन पणा आहे, आणि ज्यात काही मान्यता देणारे अधिकारी आहेत, अशात सरकारी खात्यात हात न घालणे हे योग्य.
( Disclaimer : हे "माझे" विचार आहेत फक्त. चर्चेला, मताला जरूर वाव आहे )

Thursday, 1 June 2023

कस्टमर बदलतोय....

छोट्या ( तुलनेने ) शहरांत आता खरे मार्केट आहे असे वारंवार म्हटले जाते. असेलही. पण सर्वच क्षेत्रात आहे असे नाही. बहुतेक ठिकाणे चाणाक्ष उद्योजकांच्या नजरेतून कधीच हेरली गेलेली आहेत. Time to upgrade ! असे आता प्रत्येक ग्रामीण नागरिकाला वाटू लागले आहे आणि त्यांची राहणी आता स्मार्ट होवू लागली आहे.

तालुका प्लेसेस किंवा अजून काही मोक्याची ठिकाणं इथे तर खूप वाव दिसतो. एक ताजं उदाहरण म्हणजे .... मी परवा पुण्याहून बारामती ला गेलो होतो,तिथून काम संपायला उशीर झाला. साताऱ्याला जायचं होतं, विचार केला ... निरेला थांबू. मला काय तसं बेसिक लॉज सुद्धा चालतं.पण निरा जे एक well connected ठिकाण आहे, तिथे बरे हॉटेल नाही थांबायला.

पुणे,बारामती,सातारा,मुंबई laa ला ट्रेन,फलटण जवळ, शिवाय अनेक मार्गांवर नीरा हे स्पेशल लोकेशन आहेच आहे. तरी इथे असे हॉटेल नसावे.

इथे इतका scope नाय सायेब असे तो लॉज मालक म्हणाला. कदाचित त्याला ठाऊक नसावे की हल्ली ऑनलाइन सर्च तर असतोच, शिवाय पर्यटन सुद्धा बदलले आहे.

काय जाणो एखादे छानसे हॉटेल एव्हाना setup झालेही असेल पुन्हा जाईस्तो.

Sunday, 21 May 2023

इथे Steve Jobbs चं काय काम ?

IIT , IIM , MIT किंवा London School of Economics वगैरे मध्ये जावून शिक्षण घेणे किंवा इथे शिकून आलेले, फंडे करणारे लोक्स हा एक नवा वर्ग निर्माण झालेला आहे. 

ह्याच्या सोबत, सतत कायम बाहेरच्या लोकांचीच ( नेट वरील ) उदाहरणे घेवून आणि देत राहणे हा देखील एक वर्ग आहे.

शिवाय, इथल्या देखील प्रथितयश लेखकांची अभिवचने share करणे, संस्कृतातील सुभाषितांचे दाखले देणे ही देखील एक पद्धत रुजू असते. 

हे सगळं फोल नाही 


हे करावं ना, पण जग वाचणे... ह्याचं काय ? आजूबाजूला ... अगदी जवळच घडत असलेलं काही .. ते पहावं. अनुभवावं. रीचवावे. बुद्धीचा फिल्टर घट्ट  काम करत असतोच की : काय घ्यावं/ काय नाही. हे अधिक सजग.

कालच एका ठिकाणी जाण्याचा प्रसंग आला. एका अगदी छोट्याशा प्रश्नाचं उत्तर शोधताना एका " Start Up " ( ही एक अतिरिक्त जातकुळी ) ने थेट Steve Jobbs चं ( अर्थात ऐकीव किंवा कथित ) उदाहरण दिलं. 

ह्यांना आपल्या कोपऱ्या वरचा बाळू वडेवाला का दिसत नाही ... जो वड्यांचा हिशोब ठेवायला नको, म्हणून सरळ १३ ( एका वडा पाव चा दर ) गुणिले १,२,....१०,२०.... असे दुकानात कोष्टकच लावून ठेवतो. 

किंवा आपल्या गल्ली बोळाच्या तोंडावरचे केरळी आण्णा का दिसत नाहीत, जे tyre चे दुकान दिसायला चक्क रस्त्यावर एकावर एक असे Tyres रचून ठेवतात. 

अशी असंख्य उदाहरणे आजूबाजूला असताना.... मी पाहू कशाला नभाकडे ?

Saturday, 13 May 2023

Video का तयार करावेत ?

एका नेट्वर्किंग मीटिंग मध्ये Video Creator चे प्रेझेन्टेशन सुरु होते. त्या व्यक्तीने खालील प्रश्न विचारले :-

"किती जणांनी 5 Point Someone हे पुस्तक वाचले आहे " .... ( फक्त ३ हात वर आले )

" किती जणांनी 3 Idiots बघितला आहे " ..... ( साधारण २५ लोकांचे हात वर आले )

Video कसा जास्त लोकप्रिय आहे, आणि तो जास्त लोक पाहतात म्हणून तुम्ही Video करा असा सूर होता आणि समजही तसाच झाला. ती व्यक्ती तिच्या सेवा विकत होती त्यामुळे ठीक असाही भाव उमटू शकतो, ह्या निमित्ताने थोडे चर्वित चर्वण ....

मुळात फक्त "जास्त लोक पाहतात" हा निकष Video बनविण्यामागे असला की घोळ होऊ शकतो. ह्या ऐवजी Video केल्याने माझे उत्पादन, प्रक्रिया, सेवा ही अधिक उत्तम प्रकारे उलगडून दाखविला येईल किंवा माझा विचार, त्याचे पैलू माझ्या हाव भावांसकट अधिक दृक श्राव्य, जिवंत करता येईल असा जर दृष्टीकोन ठेवला, तर जास्त उत्तम असा अनुभव तयार होईल. मुळात Video म्हणजेच एक न अनुभवलेला अनुभव आहे. कल्पिलेला अनुभव. तो अधिक उत्तम करावा ह्याकडे फोकस ठेवला तरच तो बोलका होईल.

दुसरा भाग असा कि एखाद्या व्यावसायिकाने असा विचार केला तर ? की असा Video वगैरे बनवत बसण्या ऐवजी का नाही एखादे पुस्तकच लिहावे ? किंवा ब्लॉग्स लिहावेत ? कारण वाचणे हे जे जास्त कठीण काम ... ते जे लोक करतील ... कदाचित ते मोजकेच आपल्या साठी महत्त्वाचे संपर्क असू शकतात, नाही का !

Videos हे जास्त पाहिले जातातच, वादच नाही. पण हे search कसे होतात हे पाहायला हवे. अब्जावधी videos नेटवर जाणे, ते Index होणे, त्यावर Google चा Crawler येणे, हे बऱ्या पैकी आव्हानात्मक आहे. परत त्या त्या विचारणे ( Query ) ला तो तो Video जोडून देणे हे खूप जास्त आव्हानात्मक आहे. पुन्हा कितीही सुंदर आपण लिहिलेले असले, किंवा Video केलेला असला तरीही तुमचाच का दाखवू ? असा गुगल ला प्रश्न पडणारच. कारण आपण तर चकट फू काम करतो, आणि शाहरुख खान पण नाही .... मग काय विशेष त्यात ?

त्यामुळे सुरुवात उत्तम explainer Videos ने करावी. Tags, Description छान टाकावे. Browse करणाऱ्या व्यक्तीला अगदी सहज आणि उत्तम रीतीने सर्व पैलू समजतील अशा प्रकारे Navigation असावे. Thumbnail सुद्धा थोडा चांगला करावा. जमले, तर Videos च्या Description मध्ये Chapters हा Youtube चा पर्याय वापरायला हरकत नाही. 


Sunday, 7 May 2023

नेटवर्किंग आणि धंदा

नुकतंच मला एका परिचित व्यक्तीने एक Requirement share केली. मी संपर्क केला, तर त्यांनी सगळं पुन्हा share करायला सांगितलं, प्रोफाईल मागविल वगैरे. ह्याचा अर्थ असा, कि ज्यांनी रेफर केलं त्यांचं तिकडे तितकेसे वजन नाहीये. किंवा त्यांनी माझ्या बद्दल बोलायला काहीच कष्ट घेतलेले नाहीयेत. 

अशा प्रकारे काम करायचे नाही असं मी ठरवलं आहे. कारण मी अशा प्रकारे अजिबात कनेक्ट करून देत नाही.

जी लोकप्रिय नेटवर्क आहेत म्हणजे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यामध्ये रेफरल देणे आणि त्या मार्फत प्रत्यक्ष व्यवसायात ते रेफरल रूपांतरित होणे याला खूप महत्त्व दिलं जातं.

एका प्रकारे खरंही आहे ते कारण मुळात नेटवर्किंग चा कन्सेप्टच हा आहे की काही ठराविक व्यावसायिक लोकांसोबत काम करून व्यवसाय वृद्धी व्हावी

हे रेफरल विविध प्रकारे दिले जातात. कधी कुणी पटकन संपर्क तिथल्या तिथे शेअर करतो, किंवा कधी कुणी अगदी तपशीलवार व्यवसाय समजून घेऊन नंतर शेअर करतो.

खरं म्हणजे व्हायला हवं असं की आपल्या मेंबर चा व्यवसाय नीट समजून घेऊन, त्या व्यवसायाला अनुरूप असा एखादा संपर्क पाहून त्याच्याशी परस्पर बोलून आणि एक पार्श्वभूमी तयार करूनच आपल्या मेंबरला त्यांच्याशी जोडून देणे.

या पद्धतीने काम केलं तर आपल्या मेंबरचे काम कमी होत जाईल आणि त्याला सेल्स किंवा मार्केटिंग याच्यावर फार लक्ष न देता प्रत्यक्ष काम (कर्म) याच्यावर जास्त एकाग्रतेने काम करता येईल.

सध्या नेटवर्कमध्ये खूप उथळ पद्धतीने काम होताना दिसत. रेफरल ची खिरापत वाटणे हा एक लोकप्रियतेचा मार्ग होऊन बसलाय. त्यात मिळणाऱ्या टाळ्या, मिळणारी उथळ प्रसिद्धी, हा एक अधिकाधिक मेंबर्स मिळवणे याचा मार्ग होऊन बसलाय. यात पुन्हा जेव्हा हे मेंबर्स अधिक मिळवणे याच्या मोहिमा उघडल्या जातात तेव्हा तेव्हा हे दाखवलं जातं की मेंबर्स वाढले की आपोआप व्यावसायिक संधी अधिकाधिक निर्माण होत आहेत

वरकरणी यात जरी तथ्य वाटलं, तरी यात वाहवून जाण्याची शक्यता अधिक आहे. मेंबर्स चं लक्ष एकमेकां सोबत अधिक दृढ नातेसंबंध निर्माण करणे यापासून विचलित होऊन ते विखुरलं जातं. 

त्यामुळे कमी आणि मोजक्या लोकांसोबत अधिक खोलवर काम करणे या प्रकाराला तिलांजली मिळते.

Sunday, 23 April 2023

श्रेय बीय इत्यादी......


एखाद्या विचाराची आपण रुजवात केली आणि तो दुसऱ्या कोणी अमलात आणला आणि नंतर आपलं नाव त्याने घेतलं नाही तर मनाला नक्कीच त्रास होतो. निदान मला तरी एक दोन वेळा असं झालेलंच आहे असं कबूल करावं लागेल.

नुकतंच एका सॉफ्टवेअर बद्दल त्याच्या निर्मात्याने काही बोलले असता त्या सॉफ्टवेअरची प्रत्यक्ष कल्पना ज्याची होती त्या व्यक्तीने असं सांगितलं की "ही कल्पना माझी बरका ".... आणि माझ्या मनात या विचाराची शृंखला सुरू झाली.

खरं म्हणजे ज्याचा विचार, त्याला हे इतकं वाईट वाटण्याची आवश्यकता नाही. तांत्रिकदृष्ट्या. म्हणजे असं पहा की जो विचार आहे तो अमलात येणे येणे महत्त्वाचे नाही का.....

मग तो कुणाच्याही मार्फत येईना का !

अहंकार दुखावतो हे जरी आपण सत्य मानलं तरीही "प्रगल्भ होणे" म्हणजे हा अहंकार बाजूला ठेवून जे प्रत्यक्ष अमलात आणायचे होते ते कुणी तरी अंमलात आणले याबद्दल समाधान मानणे अधिक श्रेयस्कर नव्हे का ?

How to win friends and influence people या जगप्रसिद्ध पुस्तकात अमेरिकेच्या अध्यक्षा बद्दल एक उल्लेख केला गेलेला आहे त्यात असं म्हटलं आहे की एक अशी कल्पना की ज्याने हे अध्यक्ष "अध्यक्ष" झाले.

ही कल्पना मुळात त्या पक्षाच्या एका दुसऱ्या सहकाऱ्याची होती. हे ज्या व्यक्तीला ठाऊक होते त्या व्यक्तीने सदर सहकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी जे उत्तर दिले ते अगदी मार्मिक आणि ऐकण्याजोगे आहे.

"ही कल्पना जरी माझी असली तरी ती मूर्त स्वरूपात आणणे याकरता माझ्यापेक्षाही सक्षम व्यक्ती ही जे अध्यक्ष झाले ती आहे त्यामुळे ती योग्य हातात पडली".

मला वाटतं श्रेय बिय हे विचार करताना यापेक्षा मोठं उदाहरण नसावं....

तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे प्रतिक्रिया स्वरूपात ऐकायला जरूर आवडेल.....

Thursday, 13 April 2023

शब्द स्वामित्त्व : सर्वात प्रभावी कौशल्य !

An Image can tell what 100 words can say 

Video is the most popular media toay 

Podcast is getting more & more popular 

अशी वाक्य सतत कानावर पडत असतात. शिवाय तो Mehrabian आहेच साथीला, जो म्हणतो की शब्द हे फक्त ७ % उपयोगी ठरतात समोरच्यावर प्रभाव पाडायला. 

ह्या सर्वाने काय व्हायला लागत... कि आपण शब्द संपत्ती ला दुय्यम समजायला लागतो. शब्द आणि तेही मायबोलीतील, हे अधिक भिडतात ही गोष्ट वादातीत आहे. जर आपण आपला स्वत:चा असा विचार सर्वात आधी ग्राह्य धरला तर. 

नुकतेच एका सरकारी कार्यालयात भेट द्यायचा प्रसंग उद्भवला. एका टेंडर संदर्भात त्यांना काही माहिती द्यायची होती. माझे सर्व म्हणजे बऱ्या पैकी काम मायबोलीत चालतं. (हा मी एखाद्याला कनेक्ट व्हायचा सर्वात जवळचा सेतू )

तर तिथले कर्मचारी व उपस्थित व्यक्ती अगदी अभिमानाने " हे इंग्रजीतले शब्द मराठीत आणणे हा कसा मूर्खपणा सुरु आहे " ह्या आविर्भावाने काम करीत होते. एक व्यक्ती- जी प्रत्यक्ष संगणकात मजकूर टाकत होती - त्यांना अनेक मराठी प्रतिशब्द अगदी छान अवगत असलेले दिसत होते, त्यांनी Minutes of Meeting साठी एक सोप्पा, सुरेख, तत्काळ समजून येणारा मराठी शब्द सुचविला : "इतिवृत्त". Minutes of Meeting ह्या शब्दावरून माझ्या मनात अगदी पहिल्यापासून गोंधळच जास्त व्हायचे. कार्यालयांमध्ये रुजलेला हा बोअर शब्द. इतिवृत्त ला काय Problem आहे यार ! कमालीचा त्रास आणि अनादर दिसत होता मंडळींच्या चेहऱ्यांवर. असो.

मुद्दा असा ...की कितीही उदो उदो केला Videos, Images, Audios चा; तरी शोधायला Filters लावले जातात ते शब्दांचेच. त्यानेच आपला शोध सोप्पा, नेमका होतो. 

माझं तर म्हणणं असं .. कि कमीत कमी शब्दांत मला सांगता यायला हव काय म्हणायचं ते ... म्हणजे ते जो शोधात असणाऱ्याच्या हातात चटदिशी पडेल. व्यवसायाचा देखील उद्देश तर हाच असतो ना ? 

अगदी Chat GPT ने तुम्हाला तुमच्यासाठी हा आशय स्वरूपातील मजकूर झटक्यात दिला, तरी त्याला काय द्यायला सांगायचं हे नेमक्या शब्दांतच सांगावं लागतं ना ! कसं वाढवायचं हे कौशल्य ? तर ऐकून, वाचून. स्वत: स्वत:चं विकायची घाई न करता. तसेच वेळोवेळी कागदांवर टिपून, टिपत राहून, पुन्हा संदर्भ वापरत राहून. 

हे कागदांवर किंवा डायरीवर घेवू शकलात तर खूपच छान. अगदी नाईलाज झाला तरच mobile. टिपून घेणे हे कागदावरच सोपं पडतं. परवा डिजिटल चं कौतुक करताना एक व्यक्ती ने मला त्यांचे असेच कार्ड पाठवले. मी मात्र माझे physical कार्ड चटदिशी त्यांच्या हातात थमविले. त्यांनी ते पाहिले शिवाय काहीतरी नोट सुद्धा केले. हे कुठे करणार डिजिटल कार्डवर ? तर मिळालेल्या, गोळा केलेल्या माहितीवर काम करायला सुद्धा पुन्हा शब्द सामग्रीच लागते. त्यामुळे हे स्वामित्त्व लवकर प्राप्त करणे श्रेयस्कर !