Monday, 26 May 2025

ही निष्ठुरता नव्हे, तर "विवेक" आहे

अनेक वर्षे मी स्वत: Pocket नामक एक सुंदर, अत्यंत उपयुक्त असे संकेतस्थळ तसेच App वापरत आहे. 

👉मला वाटणारे, आवडणारे, उपयुक्त लेखांक ह्यावर नुसते लिंक ह्या स्वरुपात सेव्ह करून ठेवायचे. ते मी नंतर वाचतो, ते सुद्धा जाहिराती बाजूला करून, शिवाय हव्या त्या अक्षराच्या मापात ( मोठ्या - छोट्या ). अजून म्हणजे दोन्हीकडे : मोबाईल व web वर, लिखित मजकूर "श्राव्य" करून ऐकण्याची सोय वगैरे अत्यंत उपयुक्त. त्यात पुन्हा अधोरेखित करून ठेवायची सोय, वगैरे. 

😢 दुर्दैवाने ही website बंद होत आहे. वाईट वाटले. 

☝ ही झाली "वापरकर्ता" ह्या नात्याने एक बाजू. पण काय कारण असेल ? हे जरा खणले असता एक साधारण कारण जाणवले ते असे : की ... Firefox ( संकेतस्थळाचे प्रवर्तक ) ह्यांना त्यावर उर्जा आणि वेळ देणे परवडत नाहीये

बास. इतकेच पुरेसे आहे, असते. 

"तुमचा तो Zero Budget Digital Marketing Course किती भारी होता हो, का घेत नाही तुम्ही ?" अशी मला अनेक ट्रेनिंग कोर्सेस बाबत कायम विचारणा होतंच असते. पण दिलेली उर्जा आणि मिळणारा परतावा हा माझ्या आयुष्याला संलग्न नसेल तर मी त्या गोष्टी चक्क थांबवतो. 

माझा मशिनरी उद्योग किंवा ट्रेनिंग ह्या गोष्टी मी अशाच बंद केलेल्या आहेत. दुसऱ्याने करावे का ह्याबद्दलचे हे अनुमान नव्हे. पण "करता येतं" किंवा असं करणारे काही असतात असं पाहिल्यावर हुशः वाटतं.

हेच तर कारण आहे, आपण आपले अर्थपत्रक प्रत्येक तिमाही ( आणि मासिक-साप्ताहिक सुद्धा 👌 ) पाहून आपल्या कृतींत यथोचित बदल करण्याला. काही निर्णय परखडपणे घेता येतात. फायदा ? उर्जा वाचते.

हा "विवेक" च आहे. 

Saturday, 24 May 2025

परखड परीक्षणाची फलश्रुती

नुकतेच आम्ही एक Podcast केले ज्यात आधारभूत विषय घेतला होता तो हा की ...
  1. छापून येणाऱ्या बातम्यांतील आणि प्रत्यक्ष असणाऱ्या आर्थिक आकड्यातील तफावत 
  2. शेवटच्या तिमाहीत कंपन्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी करत असलेली धावाधाव. 
पब्लिक लिमिटेड कंपन्यांना हे अहवाल प्रत्येक तिमाहीला सादर करावे लागतातच. त्याबद्दल फार नको बोलायला, परंतु ह्या निमित्ताने आपण लघु, तसेच अति लघु किंवा वैयक्तिक व्यावसायिक मंडळी आपल्या व्यवसायाचे परखड परीक्षण करतो का , आणि ते केल्यास काय फायदे होतात ह्याचे एक उदाहरण :-

मी स्वत: भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ह्या संस्थेसोबत एक Mentor ह्या नात्याने अनेक वर्षे कार्यरत आहे. काम हेच : नवीन उद्योजक मंडळींना, ज्याना कर्ज वितरीत झाले आहे त्यांना साधारण दोन वर्षे मदत करत राहणे. त्यांचा व्यवसाय सुस्थितीत आणणे, अडचणी असल्यास मदत करणे. 

एका वस्त्र उद्योजकाची कहाणी :-


ह्याचे एक दुकान आहे ते सिंहगड कॉलेज च्या परिसरात. सुरुवातीला जम बसेस्तोवर काही अडचणी होत्या, ज्या वाहत्या गल्ल्यामुळे तसेच दिलेल्या गेलेल्या रोकड कर्जामुळे ( CC ). त्यात त्याने सतत विचारणा होत असल्याने पादत्राणे तसेच चष्मा goggles ह्याचेही एक छोटे दालन बाजूला सुरु केले.

नियमित, परखड परीक्षणाचा फायदा 


सुरुवातीस दर महिन्यातून एकदा , व नंतर दर तीन महिन्यांतून एकदा आम्ही नफा-तोटा पत्रक तसेच ताळेबंद पाहत राहिलो. तो सुरवातीला तयार नव्हता तरीही आकड्यांच्या संकेतानुसार त्याने त्याच्या आवडीचा परंतु व्यवसाय संमती देत नसलेला निर्णय घेतला, आणखीही सोबत काही निर्णय घेतले ते असे :-
  1. पादत्राणे दालन बंद केले 
  2. "प्रत्येक मागणी आपल्याला पुरवता यायलाच हवी" हा दुराग्रह काढून टाकला. ह्या मुळे XXL प्रकारचे फक्त २०-२५ शर्टस विकले जात, परंतु साठा मात्र त्याच्या १० पट करावा लागे. हा पडून राहणारा Asset ताळेबंदात सतत दिसायचा, त्यामुळे मालमत्ता कमी होत होती. 
  3. हाच अर्थ प्रवाह मागणी सतत असणाऱ्या वस्त्रांकडे वळवला. 
  4. आणि हीच कृती पुढे दोन तिमाही कायम ठेवली.

परिणाम स्वरूप :-

  1. नफ्यात भरभक्कम वाढ, कर्मचाऱ्यांना वेतनवाढ तसेच बोनस देता आला.
  2. वेळ बराच शिक्कल राहिला, ह्यातून नवीन अजून एक दुकान काढले, असेच, पण वेगळ्या भागात ( ह्याबद्दल आम्ही पूर्वी चर्चा केलेली होती ).
  3. नवीन सामान विक्रीस नाही ठेवलेले, आहे त्यातील उप प्रवर्गातील वस्त्रे ठेवली, गरजेप्रमाणे साठा कमी जास्त केला.
  4. मुद्दा १ आणि २ मुळे आधीचाच एक कर्मचारी आता मूळ दुकान पूर्णपणे चालवितो, तर हा स्वत: आता नव्या दुकानी बसतो, ते चालवितो. ( नया धंदा , पुराना आदमी  ) 
  5. हेही दुकान आता जेमतेम ६ महिन्यांतच Cash Flow + ve झालेले आहे.
ह्यामुळेच निवडक उद्यमी च्या त्रैमासिक बैठकींत आम्ही आता एकमेकांच्या उद्योगाचे परखड परीक्षण करत असतो.


Sunday, 11 May 2025

कंपनीबद्दल बोला .....

काल एक सत्र घेत असताना लक्षात आलं की खास करून लहान उद्योजक, अगदी घरून व्यवसाय सुरू करणारे देखील ज्यात येऊ शकतात, अशा व्यावसायिक मंडळींना कमी वेळात ( जास्तीत जास्त १० मिनिटे ) त्यांच्या व्यवसायाची माहिती द्यायला सांगितली तर सर्वात जास्त ते त्यांच्या उत्पादने अथवा पैलू, त्यातील विविध वैशिष्ट्ये इत्यादींबद्दल भरभरून बोलतात. वेड, passion वगैरे वगैरे...

पण ही मंडळी *भरभरून बोलतच सुटतात*. इतकी, की कदाचित पलीकडील टेबलवरून घंटानाद ऐकू येऊ शकतो. आणि अगदी वेळेचं बंधन नसेल तरी ऐकणारा तुम्हाला मनातून बंद पाडू शकतोच की !

जैसा देस वैसा भेस

ज्याप्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन आहे त्याप्रमाणे हे असायला हवे. अनेक, विविध परंतु अनोळखी व्यक्ती समुदायासमोर आपले सादरीकरण असेल,तेव्हा आपल्या संस्थेबाबत अधिक बोलायला हवे. तिची महती.

कारण मुळात आपण देत असलेली सेवा तसेच उत्पादन अनेकांपैकी एक असेल, तर मग ह्या अनेकांतून एक म्हणून मला,आम्हाला का निवडा  हे संभाव्य ग्राहकाच्या मनापर्यंत पोचायला हवे ना !



Friday, 9 May 2025

खरे उपयुक्त संपर्क मिळविण्याची एक क्लुप्ती

सर्व प्रकारच्या व्यावसायिक मंडळींना मी "leads" तसेच नेट्वर्किंग मध्ये "Referrals" करता काम करताना पाहत असतो. जणू काही एखादा बिझनेस आणि त्याची परिणामकारकता म्हणजे सतत नवीन, आणखी नवीन स्त्रोतांकडून सतत अविरत leads येत राहणे. हे जरी महत्त्वाचे असले, तरी इतर बाबीही तितक्याच किंबहुना अधिक महत्त्वाच्या ठरतात. उदा :-

  • नवनव्या तंत्रांचा मागोवा घेत राहणे 
  • आपल्या व्यवसायात ती अंमलात आणणे 
  • अधिक प्रभावी व्यक्तींना भेटणे ( फक्त "विक्री" वाढवणे ह्यासाठी नव्हे )
हे करताना काही नवनवे कोर्सेस करीत रहाणे, विविध कार्यशाळा अटेंड करणे तसेच अनेक प्रदर्शने व त्या अनुषंगे घडणारे परिसंवाद तसेच नेट्वर्किंग च्या संधी आवर्जून घ्यायला हव्यात. बऱ्याच वेळा ही सत्रे विनामुल्य असतात. काही ठिकाणी सशुल्क देखील असतात. 

माझ्या मते आपल्या थेट क्षेत्रातील निदान एक - दोन तरी अशी प्रदर्शने आपण वार्षिक पातळीवर अटेंड करावीतच !


ह्यात सर्व काही घडू शकते, आणि आपण पूर्वी कधीही न विचार केलेल्या संधी देखील आपले दार ठोठावू शकतात. 


ह्या करता आपल्या मनात येणाऱ्या , मागे खेचणाऱ्या विचारांचे संपूर्णपणे निर्दालन करून रस्ता करावा लागतो. अनेक वेळा माझे असेही झालेले आहे, कि ३- ४ दिवस राखीव ठेवले आणि तितके काहीच हाताला नाही लागले, वगैरे. होते असे कधी. पण म्हणून हा संपूर्ण विचार चुकीचा ठरवणे हे मात्र चूक ठरेल


तर आपल्या पुढच्या "प्रदर्शन" किंवा "परिषद" कार्यक्रमास शुभेच्छा !


Tuesday, 6 May 2025

संस्था अंतर्गत प्रशिक्षणाचे महत्त्व

कालच एका संस्थेत "समन्वयक" अर्थात Co-Ordinator म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीशी संवाद सुरु होता. ती तिथल्या कर्मचारी वर्गाच्या विचित्र वागण्याबाबत खेद कम आश्चर्य व्यक्त करीत होती. कारण देखील तसेच होते. 

सदर संस्था ही एक सामाजिक संस्था आहे, ५० वर्षे जुनी , उदात्त विचारांनी निर्मित झालेली आहे. मूल्ये स्पष्ट आहेत, अधोरेखित देखील असावीत. आणि वर्षानुवर्षे अनेक अनुभवी व्यक्तींच्या चाळणीतून चाळून झालेली असणार. 

तर त्यांचे एक व्यावसायिक मूल्य असे कि इथे येणाऱ्या कर्मचारी मंडळींना "लेटमार्क" केला जात नाही. कारण असे, कि ही काम करणारी मंडळी देखील तशी संघर्षमय परिस्थितीतूनच आलेली असतात. तर त्यांना मानवता वादी दृष्टीकोनातून इतकी सवलत देणे हे देखील एक प्रकारचे सामाजिक भान व काम आहे. अशी सवलत देवू करणारी मी तरी पहिलीच संस्था पाहिली. आणि हेच दुखणे आमच्या समन्वयक व्यक्तीचे होते. 

की असे असून देखील, इथे काम करणारे कर्मचारी संस्थेचा खूप ( उगाचच ) दुस्वास करतात. नावे ठेवतात, वगैरे. संस्थेच्याही  काही  डाव्या  बाजू  असणारच  रे  अशी माझी खास खोचक शंका देखील काढून झाली. पण एकंदरीत संस्थेकडून फार अन्यायकारक काही घडत नाहीये हे लक्षात आले. मग असे का बरे होत असावे ?

सामाजिक संस्थेबाबत अशी स्थिती असेल, तर खाजगी नफा उद्दिष्टीत संस्थांबद्दल काय बोलावे ? 

पण अगदी हे काळे , हे पांढरे असे नको करायला, कारण अशाही अनेक संस्था ( खाजगी ) , ज्यांना "उद्योग" म्हणता येईल, पाहण्यात आहेत, ज्यांच्या बद्दल कर्मचाऱ्यांना नितांत आदर आहेच, शिवाय ते स्वत: आनंदी देखील आहेत.

मला भासलेल्या काही गोष्टी :-

१. खाजगी संस्थांबाबत बोलायचं झाल्यास, नुसता "नफा" ह्यापलीकडे काय विशेष आपण करतोय, कोणत्या प्रकारे लोकांच्या आयुष्यात ( म्हणजे ग्राहक वर्गाच्या ) क्रांतिकारक बदल घडवून आणीत आहोत, हे शोधणे, तपासणे, आणि ते व्यवस्थित लिहून काढणे

२. ह्या मूल्याकरिता स्वत: प्रवर्तक, किंवा मालक मंडळी किती कटिबद्ध आहेत ह्याचं स्वत: वस्तू निरपेक्ष मूल्यमापन करणे. 

३. ह्या नंतर आपल्या विविध संबंधित व्यक्तींमार्फत ही अंतर्गत मूल्ये कशी पोहोचतील, ह्याचा कृती कार्यक्रम तयार करणे.

प्रत्येक संबंधित व्यक्ती करिता ह्यासाठी शिस्तबद्ध प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नवीन रुजू होणारे, बढती प्राप्त होणारे, पदभार बदललेले, वगैरे वगैरे.

हे फक्त मोठ्या नव्हे, तर अगदी एक - दोन व्यक्ती असणाऱ्या संस्थांकरिता देखील आवश्यक आहे. आपण ज्या संस्थेकरिता काम करत आहोत, ती संस्था काय आहे, तिची मूल्ये काय आहेत हे समजल्यास कर्मचारी वर्ग टिकवून ठेवण्यास त्याचा निश्चितपणे उपयोग होईल.