Tuesday, 30 July 2024

"चालायचंच" कधीपर्यंत .....?

काल एका संस्थेच्या कार्यक्रमाला जायचा योग आला. खरं तर कंटाळा आलेला, हल्ली जिकडे तिकडे कार्यक्रम. तरी माझे मित्र बीमन गांधी ह्यांनी येण्यात रस दाखवला आणि गेलो.

कार्यक्रम तसा वेळेत सुरु झाला, पण नेहमीप्रमाणेच त्या त्या संस्थांच्या नवीन अध्यक्ष मंडळींचे हस्तांतरण, सत्कार इत्यादी कार्यक्रम तुफ्फान लांबविले. ( हेच कदाचित दाखवायचं असतं ह्या मंडळीना ) ज्यातून प्रत्यक्ष वक्ते मंडळींना बोलायला खूप उशीर झाला.

त्यापूर्वी ह्या सत्कारांमध्ये काही उद्योजक मंडळींचा सत्कार केला गेला. त्यावेळी त्यांची दृकश्राव्य फीत चालविली गेली. 

ह्यावेळी आवाजच आला नाही ! तांत्रिक दोष म्हणे !

त्यामुळे नुसत्याच पडद्यावर मूक आकृत्या आणि मग काय ... प्रेक्षक आणि प्रत्यक्ष वक्ते सुद्धा गप्पांत मग्न झाले.

सगळाच poor show ! एवढा मोठा hall घेतलेला, नंतर जेवण-फीवण होतं, आणि हे सर्व विनामुल्य होतं. म्हणजेच प्रत्यक्ष संस्थेचा किंवा प्रायोजक मंडळींचा होता ना हा पैसा. 

कुणी म्हणेल .... "चालायचंच" .....

हेच म्हणतो : कधीपर्यंत ? 

काही इतर गोष्टीही आक्षेपार्ह जाणवल्या :-

वक्त्यांची ओळख नीट करून दिली जात नव्हती 

ते बोलणारे लोक व्यवस्थित निवडलेले नव्हते 

ह्यातही एक दृकश्राव्य फीत प्ले झाली शेवटी, ज्यात एका मराठी व्यावसायिक मंडळींसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचा उल्लेख होता. त्यात दृक फीत फारच दर्जाहीन होती. त्यातील मराठी ऐकून घेरी यायची पाळी आली.

इतकही कसं पाहत नाहीत ? वर्षात जेमतेम एकदा मिळणारी संधी, कशी काय हलक्यात घेतात ?

Friday, 26 July 2024

Value Proposition आणि Title Songs ....

पूर्वी "अवंतिका" नामक एक मराठी मालिका गाजली होती. त्यातील मध्यवर्ती भूमिका मृणाल कुलकर्णी ह्यांनी साकारली होती. चौकटीत असूनही वेगळे निर्णय घेऊन आयुष्य जगणारी एक सक्षम आणि कर्तव्यदक्ष अशा गृहिणीचा रोल ( बऱ्याच स्त्रिया करतच असतात हे ) त्यांनी खुपच सुरेख वठवला होता.

अवंतिका

सुख आणिक दु:ख यांना सांधते आहे

जीवनाशी ती कधीची भांडते आहे

दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती 

वेगळे काहीतरी बघ सांगते आहे 

जीवनाचे एक गाणे गात जाताना 

वेगळीशी चाल त्याची बांधते आहे 

जीवनासाठी जणू ही अकस्मिता 

सुख आणिक दु:खवेडी, अवंतिका !

ह्या प्रतिमेचे संपूर्ण प्रतिबिंब ह्या मालिकेच्या Title Song मध्ये उमटते. ह्या गाण्याचे बोल आणि संगीत अतिशय समर्पक आहेच, शिवाय गायन सुद्धा अगदी संयत आहे. कुठेही शब्दांना सूर, गायन वरचढ करीत नाहीत. अगदी वाद्ये सुद्धा !

शेवटी, Title Song म्हणजे त्या संपूर्ण मालिकेचा एक Catalogue च की.

अनेक मालिका त्यांच्या Title Songs मुळे चालतात. ती ती गाणी त्या त्या मालिका पाहून दर्शकांना काय मिळेल ह्याची खूपच कमी वेळात चुणूक देतात, ही त्यांची खासियत. 

हेच Value Proposition. 

Wednesday, 24 July 2024

उत्तरदायित्व वगैरे ......

बिझनेस मॉडेल कॅनव्हास हे एक सुरेख तंत्र आहे, ज्याद्वारे आपण आपल्या प्रस्तावित व्यवसायाचा किंवा योजलेल्या नवकल्पनेचा धांडोळा एका पानावर झटक्यात जेमतेम ९ रकान्यात घेवू शकतो.

ह्यात सर्वात प्रमुख असलेला रकाना आहे तो म्हणजे "Value Proposition". असं काय तुमची कल्पना त्याच्या लाभार्थी ला देईल, ज्याकरता त्याने तुम्हाला त्याचे उचित मूल्य द्यावे. हे मूल्य स्वीकारताना, ते देवू करण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे येतेच.

गीतेत ह्यालाच स्वधर्म असे संबोधले आहे. 

विषय खरे तर वेगळाच आहे, तरीही जरा निगडित आहे म्हणून लिहीतोय. नुकताच केंद्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला, त्यात पायाभूत सुविधा म्हणजेच ज्यात दळण वळण, लोहमार्ग, मेट्रो इत्यादी येतं. ह्या वर भरभक्कम रक्कम योजली आहे. सोबत कौशल्य विकास ह्यावर देखील तरतूद केलेली आहे.

ह्या दोन गोष्टींना धरून पुणे लोणावळा रेल्वे मार्ग वाढविणे ह्या एका प्रकल्पावर अशक्य दुर्लक्ष झालेले आढळते. नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार हा प्रकल्प पुणे, PCMC सोबत रेल्वे करणार होती. ज्यात कंटाळून शेवट रेल्वे स्वबळावर करणार आहे म्हणे. हा प्रकल्प allready ५ वर्षे रखडला आहे, आणि ह्यापुढे ( इतर अडचणी न आल्यास ) अजून ४ वर्षे चालेल म्हणे. म्हणजे एक मूलभूत जनोपयोगी निर्णय, ज्याला दुप्पट वेळ ( आणि खर्च सुद्धा ) लागावा ह्या सारखा मूर्खपणा दुसरा दिसत नाही.

दुसरीकडे मेट्रो, मुंबई पुणे अतिरिक्त महामार्ग इत्यादी आकर्षक प्रकल्प ह्यावर भर दिला जातो. पुणे लोणावळा लोकल मात्र सहज रद्द केल्या जातात. लोकं सुद्धा मुकाट सहन करतात.

ते तर ठीकच आहे, पण मुळात ज्यांना हे कौशल्य द्यायचं ते कनिष्ठ उत्पन्न गटातील प्रत्यक्ष काम करणारे लोक असतात. चाकरमाने. तर त्यांचे दळण वळण हे सुकर झाले तर आपला स्वधर्म निभावेल इतका व्यवहार तरी उमजणे नक्कीच अपेक्षित आहे !

यानिमित्ताने मी माझ्या व्यवसायाबाबत विचार करताना त्यातील मूल्य माझ्या ग्राहकांना पोचवायचा सतत विचार करायलाच हवा आहे ह्याची पुन्हा जाणीव झाली. त्यात जे resources मी अमलात आणतो, वापरतो खासकरून मनुष्यबळ त्यांना काही अडचणी येत आहेत का, हा विचार केंद्रस्थानी असायला हवा,हे ठळकपणे जाणवले.

Monday, 22 July 2024

निवडक उद्यमी Whatsapp ग्रुप : शिकण्याची अमुल्य संधी !

२०१९ साली तयार झालेला निवडक उद्यमी whatsapp ग्रुप आत्ता आहे तसा नव्हता; म्हणजे काय, तर तमाम जनांना जे हवं ते सर्व होतं त्यात .... उदा : भरपूर मेम्बर, त्यांच्या भरपूर पोष्टी, उलट सुलट ( उगाचच ) चर्चा; मग त्यात आपसूक येणारे Forwards, त्यांना Monitor करत राहणे, मास्तर गिरी इत्यादी. कलकलाट नुसता. 

आम्हाला हे नको होतं, म्हणजे निष्कारण मास्तर पणा नको होता, आणि एकमेकांच्या अनुभवांतून निखळ शिकणे हे अपेक्षित होतं. त्यामुळे पुढे आम्ही फक्त मोजक्या मंडळींना ठेवलं म्हणजे तेवढेच राहिले, आणि कमी कमी होत गेले.

नंतर नंतर तर साप्ताहिक झूम मिटींग्स सुद्धा गरजे नाशा झाल्या , आणि आम्ही फक्त Podcasts सुरु केली. ही म्हणजे काही मंडळी आपण जे एकमेकांशी गप्पा स्वरूपात बोलतो, तेच झूम वर बोलायचं आणि रेकॉर्ड करून youtube वर पोस्ट करायचं इतका माफक उद्देश. टिपिकल podcast setup नाही.

शिवाय समोर येणारे आणि अनुभवाला येणारे प्रश्न आम्ही घेवून बोलतो. हे सर्व youtube वर आहे. 

ह्या खेरीज निवडक चा एक फेसबुक ग्रुप सुद्धा आहेच. त्यावर बरीच मंडळी प्रोमो पोस्ट्स वगैरे टाकत असतात.

पण निवडक ची खरी ताकद म्हणजे whatsapp ग्रुप. ज्यावर अजिबात भारंभार पोस्टिंग नाही, कि वायफळ चर्चा नाहीत, जोक्स नाहीत, शोकसभा नाहीत किंवा मेम्बर ची भलावण करणाऱ्या अंगठेबहाद्दर पोस्ट्स नाहीत. 

आहे तो एक निव्वळ संवाद : एखाद्या छानशा प्रश्नाला धरून केलेला !

एक प्रकारे अजिबात disturbance नसलेली एक शाळाच म्हणा ना ! बिन शिक्षकाची ....

टीप : हा ग्रुप मात्र Paid आहे. माफक आहे फी , परंतु paid आहे. 

 

Saturday, 20 July 2024

Wiring बदलण्याचा राजमार्ग !



शिव राज्याभिषेकाच्या तस्वीरीत काही गुजराथी व्यापारी दिसतात. गुजरातेतल्या लोकांशी अगदी युरोपातील अनेक व्यापाऱ्यांशी कित्येक वर्षे व्यापारी संबंध होते. सुरत हे अत्यंत मोठी व्यापारी पेठ होती-आहे. 

हे आवर्जून सांगायचं कारण म्हणजे भिडे सर , म्हणजे Saturday Club चे संस्थापक, ह्यांनी हे वेळीच ओळखलं आणि गुजराथी मंडळींची ही व्यावसायिक वृत्ती मराठी माणसांत उतरवायची असा चंग बांधला, आणि ही वृत्ती निर्माण होण्यासाठी मराठी माणसाचं "वायरिंग" बदलायचा एक Crash उपक्रम तयार केला, तो म्हणजे Saturday Club !

वर्षानुवर्षे नोकरी पेशात मुरलेल्या मराठी माणसांत हा व्यवसाय हळूहळू परंतु निश्चित स्वरुपात भिनायला लागतो तो काही विशेष गोष्टी त्याच्या नकळत त्याच्या सुप्त मनात कोरल्या गेल्याने !

हा बदल ( किंवा कोणताही ) घडायला प्रमुख लागतो, तो "विश्वास" आणि शिवाय अजून दोन गोष्टी : त्या म्हणजे तंत्र-कौशल्य आणि सराव. Saturday Club च्या सतत एका ठराविक दिनक्रमाने होत राहणाऱ्या व्यावसायिक मिटींग्स मुळे ; तसेच त्यात share केल्या जाणाऱ्या सभासदांच्या यशोगाथांमुळे हे साध्य होते, होत राहते.

हळू हळू हे वायरिंग बदलत जाते आणि घडतो एक पक्का व्यावसायिक !

आज Saturday Club हा एक समाज आहे , ज्यातून अनेक चळवळी निर्माण होत आहेत, एक "श्रीमंत" मराठी माणूस निर्माण करण्याकरिता. 

एकदा वायरिंग बदललं कि नवीन पिढी देखील व्यवासायाकडेच आकृष्ट होते आणि एक नवा समाज घडू लागतो !

अशा एका द्रष्ट्या युगपुरुषाला आज गुरुपौर्णिमेच्या खास वंदन !

Tuesday, 2 July 2024

किंमत upfront टाकावी की नाही ?

आपण जे काही विकत असतो , त्याच्या किंमती बद्दल विचारणा होते ( साहजिकच ). कुणीही किंमत विचारताच ( किंवा पगार सुद्धा ) तिथल्या तिथे न सांगण्याचा एक प्रघात आहे. मला वाटतं कि आपला अपेक्षित ग्राहक Filter Out करण्याची मौल्यवान संधी आपण घालवून बसतो. 

माझ्या बाबतीत म्हणाल, तर मी फक्त किंमतच नव्हे, तर इतर अनेक गोष्टी ज्या माझ्या Offering सोबत कराव्या लागतात, त्या देखील बऱ्या पैकी स्पष्टतेने सांगतो. जगाचं ठावूक नाही, पण माझ्यासाठी गोष्टी थोड्या सोप्प्या होतात हे मात्र निश्चित. पूर्वी ( २००९-१० मध्ये ) जेफ मिल्स नावाच्या एका ट्रेनर कडून एक छान विचार मी ऐकला, पटला देखील :-

माझ्या उर्वरित आयुष्याचं ध्येय काय ? तर ते कमीत कमी गुंतागुंतीचे व्हावे ! केवढी स्पष्टता !

त्यानंतरच मी माझ्या मिनरल water website वर किंमत, जागा, वगैरे गोष्टी खणखणीत पोस्ट केल्या. अजूनही ट्रेनिंग मध्ये ह्या सांगतो. आपल्या गतायुष्यातील अनुभवांतून मी शिकतो, आणि पुढे तरी ( निदान ) असं होऊ न देणे ह्याकरिता अवश्यक ते बदल मी घडवतो.

तर मी काय काय सांगतो ? उदा : मिनरल water ट्रेनिंग :-

किंमत ( अर्थात ) 

वेळ किती द्यावा लागेल 

पैसे आगाऊ द्यायला लागतील

discount नाही कारण सेवा सुद्धा मर्यादित नाही 

काय मिळणार नाही : उदा सप्लायर्स चे पत्ते, परवाने मिळविण्याच्या प्रोसिजर, यंत्रे वापरण्याचे तांत्रिक ज्ञान इत्यादी 

त्या आधी बरेच विनामुल्य असे थेट साहित्य मी देवू केलेले असतेच. ही काही रणनीती नव्हे. तर "आस्था" आहे. ज्याला व्यवसाय सुरु करायचा आहे, त्याला उपयुक्त ज्ञान देणे. मग माझं चरितार्थ ? माझे mentoring ( त्यांना वाटले तर ते येतीलच कि ), आणि येतात. फक्त माझ्यातल्या त्या x factor करताच !

बऱ्याच वेळा लोक डिजिटल साठी येतात ... त्यांना मी स्पष्ट कल्पना देतो, बजेट सांगतो, आणि तरीही तुम्ही स्वत: काही केलं नाही तर अपेक्षित परिणाम येणार नाहीत हे-सुद्धा आवर्जून सांगतो.

परिणाम : माझं उर्वारेत आयुष्य कमीत कमी गुंता गुंतीचे व्हावे !

हे तेव्हाच होईल, जेव्हा माझं जे offering आहे, किंवा जे काही मी देवू पाहतोय, trade करू पाहतोय ते त्या घेणाऱ्याच्या खरेच उपयोगी पडेल. ह्याची कसोटी सुद्धा सोप्पी आहे :- माझे mentoring चे प्लान्स आहेत, साधारण व्यावसायिक ३-४ वर्षे ह्यात जोडला जावा ह्याची अपेक्षा असते. तो आधीच गळाला तर समजायचे कि त्याला अपेक्षित जे, ते द्यायला मी कमी पडतोय. इथेच माझ्या Filteration ची पातळी अजून विस्तारते. असो.

तर माझे मत किंमत upfront "टाकावी" असे आहे .

तुमचं काय, आणि त्यामागची विचारधारा काय हे सुद्धा सांगा !