नुकतेच आमच्या नेटवर्किंग ग्रुप वर सभासदांच्या अनुपस्थिती बाबत जोरदार चर्चा घडत आहे. अनेक कारणं असू शकतात त्याला, परंतु एक वस्तुस्थिती :- की बऱ्यापैकी पैसे भरून देखील अनेक सदस्य पुन्हा पुन्हा Meetings ना अनुपस्थित राहतात.
ह्यातून काय दिसतं ? की ह्या मीटिंग ना न येण्याने आपण काहीही महत्त्वाचं मिस करतोय असं अनुपस्थितांना वाटत नाहीये. उलटपक्षी न जावून बराच वेळ वाया तरी जाणार नाही असं मात्र नक्की वाटतं आहे. कारण Meetings ना यायचं तर ३-४ तास, शिवाय जायचं यायचं ट्रॅफिक, त्यामुळे होणारी मचमच आणि लागणारे इंधन किंवा प्रवासभाडे. इतकं करून काहीतरी अतिशय बिघडत आहे असं त्यांना वाटत नाहीये. हे सत्य आहे, कारण ते घडत आहे, समोर.
ही परिस्थिती कोरड्या शिस्तीने किंवा नियमांनी नाही बदलायची
अमुक मीटिंग नंतर सदस्यत्व रद्द किंवा तुमच्याच सारखा व्यवसाय करणारा दुसरा व्यावसायिक घेऊ वगैरे शिस्त लावली तरीही फक्त हेच करून चालायचं नाही. उलट, मनाने ती अनुपस्थित व्यक्ती अजून दूर जाऊन प्रत्यक्ष ग्रुप मधून देखील बाहेर जाऊ शकेल. किंबहुना ही उत्तम संधी समजून त्यांच्याशी त्यांना काय मिळत नाहीय हे जर नीट, आस्थापूर्वक ऐकून व समजून घेतलं तर बदलाची शक्यता तरी आहे. ती व्यक्ती जरी नाही राहिली, तरीही भविष्यात सदस्यत्व घेणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत तरी ही दक्षता घेता येईल.
मग करायला काय हवं नक्की ?
एक तर स्वीकारायला हवं की प्रत्येकाला आपण समाधानी ठेवू शकणार नाही. त्यामुळे काही अनुपस्थिती दर ( २० टक्के पासून सुरुवात करू शकतो ) हा कायम राहणार.
दुसरं असं करायला हवं की प्रत्येक मेंबर शी कायम स्वरुपी संवाद रुपी सातत्यपूर्वक संपर्कात राहणाऱ्या दोन ते तीन व्यक्ती तैनात ठेवायला हव्या. ह्यांच्या मार्फत त्या त्या सदस्यांशी संवाद साधायचा. ह्या व्यक्ती "कुणीतरी" नसून नीट पाहून घ्याव्या. आपल्या फायद्याच्या, मर्जीतल्या नको. तर जुन्या, जाणत्या असाव्यात.
आपल्याला ग्रुप फायदेशीर ठरतोय की नाही ह्याचे एक सोपे मानक म्हणजे आपला प्रत्यक्ष व्यवसाय वाढणे. आणि तो माझ्या ग्रुप मुळे वाढण्याची शक्यता आहे, मी शिस्तबद्ध प्रयत्न केल्यावर असे वाटणे आणि ते प्रत्येक मीटिंग गणिक वाढत जाणे. ग्रुप नेतृत्वाला हे उद्दिष्ट प्राप्त करणे तितकेसे अवघड नाही. कारण समजदार उद्योजक ठराविक कालावधीने एकत्र भेटतात, त्यामुळे त्यांची तशी समजूत चांगली आहे.
हवा तो फक्त एक कटिबद्ध, लांब पल्ल्याचा कार्यक्रम, त्यात फक्त visitor Day म्हणजे ग्रुप चे सदस्य वाढविण्याची मोहीम किंवा सोशल ( एकत्र casual जमून वेळ घालवणे ) हे हवेच, शिवाय संपूर्ण नेटवर्क चे कार्यक्रम, इतर ठिकाणी भेटीगाठी, प्रशिक्षणे इत्यादींचा देखील अंतर्भाव असावा. ह्याचे वेळापत्रक असावे, बजेट हवे आणि अत्यंत गांभीर्याने अंमलबजावणी हवी. प्रत्येक मीटिंग मध्ये असे काही हवे ज्यातून अगदी अपूर्व नाही, तरी असे काही सत्र हवे, ज्यात काहीतरी अत्यंत नवीन अपडेट मिळतोय. संधी प्राप्त होतीय, जी न गेल्याने मी मिस करेन.
ह्यासाठी
"अजून काय करायचं आता ?"
ऐवजी
"अजून काय करता येईल ?"
असा दृष्टीकोन हवा.