Saturday, 28 June 2025

सेवा - बीवा

काही प्रसिद्ध online व्यवसायांच्या "ग्राहक - सेवा" 

नुकतंच अमेझॉन वरून एक पार्सल ऑर्डर केलं. TDS मीटर+ PH Meter असे होते. अमेझॉन प्राईम असल्याने २ दिवसांत मिळणार होते. ज्या दिवशी यायचे त्याच दिवशी संध्याकाळी संदेश : आज नाही, दोन दिवस लागतील. दोन दिवस वाट पाहिली. पुन्हा सायंकाळी संदेश : आम्हीं म्हणे तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला, तुमच्या पर्यंत पोचता नाही आले, त्यामुळे दोन दिवस अजून लागणार.

ह्यांच्याकडे chat पटकन उपलब्ध नाही, फोन विषयच नाही. महत्प्रयासाने chat सापडले माणूस एकदम प्रॉम्प्ट पण प्रचंड मठ्ठ आणि अत्यंत फालतू स्मार्ट. त्याने अजिबात किती वाजता पार्सल मिळेल हे सांगितले नाही. आजही ( ८ पर्यंत देणार होता ) आलेले नाहीच. मी ऑर्डर रद्द केली. पुन्हा ह्या लोकांचा अभिप्रायाचा ठराविक स्क्रीन. माझ्या गरजेचं काय ? तपासच नाही.

असाच अनुभव axis च्या  क्रेडिट कार्ड कडून. काही केल्या ही मठ्ठ मंडळी स्टेटमेंट इमेल ने पाठवायला तयारच नाहीत. हद्द झाली यार.

ह्यांना तुमची काहीच पडलेली नाही.

इंडिया मार्ट :- इथे तर साधा सर्च करायची प्रचंड भीती वाटते. भयानक फॉलो अप सुरू होतो. आणि फीडबॅक वर फीडबॅक. साधं संभाषण कसं झालं ह्याचा सुद्धा प्रचंड फीडबॅक फॉलोअप. मूर्खपणाचा कळस.

सर्वात विनोद म्हणजे अमेझॉन च्या फीडबॅक फॉर्म वरचा empathy नामक एक पर्याय. 

काय बोलायचं आता ?

पूर्वी मशिनरी चे काम करताना ACC ह्या tata समूहातील बलाढ्य कंपनीने माझ्यासारख्या अती लघु उद्योगाला काम दिले होते. जैन नामक व्यक्तीने हे काम मोठ्या कंपनीला डावलून मला दिले ह्याबद्दल आश्चर्य वाटून मी त्यांना विचारले होते, तेव्हा त्याचं उत्तर ऐकण्याजोगे होते :-

" बडे कंपनी के सपोर्ट को पकड़ना मुश्किल होता है , छोटा पकड़ में आ जाता हैं "

Friday, 27 June 2025

आत्मसन्मान हीच खरी ऊर्जा

उद्योग व्यवसायात आपले उत्पादन, सेवा ह्या सुचणे, त्यांना एक व्यावसायिक विक्रीयोग्य रुप देणे, पाठोपाठ त्यांविषयी सतत सांगत राहणे हेही काम असते. म्हणजे काय तर त्यांचे कायमस्वरूपी दालन प्रत्यक्ष दुकान किंवा आंतरजालावर प्रस्थापित संकेतस्थळ तयार करणे ( किंबहुना दोन्हीही ). 

आणि नंतर ते अनेक ठिकाणी : अशी ठिकाणे, जी गप्पा मारण्यासाठी तयार करण्यात आलेली असतात जसे की इंस्टाग्राम वगैरे; किंवा अशी ठिकाणे की जिथून प्रत्यक्ष खरेदी करण्याच्या उद्देशाने व्यक्ती येतात, म्हणजेच बाजार  (जसे की अमेझॉन, जस्ट डायल, इंडिया मार्ट इत्यादी ); तर काही अशीही ठिकाणे की जिथे व्यक्ती त्यांच्या संगणक अथवा भ्रमण ध्वनी मार्फत शोध करतात ( जसे की गुगल ) अशा ठिकाणी पोस्ट करणे.

अजूनही इतर मार्ग आहेतच. इथे विषय भटकायला नको म्हणून थांबवतो,कारण चर्चा ह्या मार्गांची नाही, तर एक उद्यमी ला कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल बोलायचं आहे. 

उद्यमी:- मग ती व्यक्ती स्वतः चे काहीतरी असे करू पाहतेय की ज्याद्वारे तिचे अर्थार्जन त्याद्वारे होईल, दुसऱ्या कुणाची चाकरी न करता.
हा प्रवास सुरू असताना काही व्यक्ती, संस्थांच्या संपर्कात येतात, तिथे काही "महत्त्वाच्या" वगैरे व्यक्ती असतात, म्हणजे काय तर व्यवस्थेने त्यांना दिलेले पद. तर त्यांच्यापर्यंत पोचण्याचा उद्यमी सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी मनाविरुद्ध जाणे, विनंत्या करत राहणे हा प्रवास बऱ्याच ना इलाजस्ताव ती व्यक्ती करत असते, राहते. कृत्रिमरीत्या आवडून घेऊन करत राहते. काही व्यक्ती ह्या कृत्रिमरीत्या मुरवून घेतलेल्या कौशल्याला सरावतात. काहींमध्ये अजिबात हे शिरत नाही. काही लोक कधी कधी हे जमवून घेतात, तर कधी कधी अजिबात झेपत नाही त्यांना.

हीच शिदोरी पुढे कामी येणार 

कधी कधी मला स्वतः ला देखील स्वतः बाबत हा अनुभव येतो,येत असतो. 

"तुझं हेच चुकतं"
"थोडी आणखी कळ काढली असतीस तर.."

असे आप्तस्वकीय मंडळींचे ताशेरे, किंवा 

"त्याने बघ कसं पुढे - पुढे करून बरोब्बर पदरात दान पाडून घेतलं"
"आपलं प्रोफाईल नाय ना यार तसं

ह्या स्वरूपाची किंचित असूया, खेद मिश्रित वल्गना ( स्वतः ची )

अशा अनेक मनो प्रवासातून मी गेलोय,जात असतो. मला खरं तर ह्यातून मुक्त व्हायचं असतं ( हेही आत्ता आत्ता म्हणजे साठी ला  आल्यावर उमगलेले नव सत्य ). तर मला ह्यातून एक गोष्ट सुचली ती म्हणजे :- 

एका प्रमाणाबाहेर आपण हे नाही सहन करू शकत. आणि नाही करायचं. कधी कधी ते so called पदस्थ आपल्याला बऱ्यापैकी दुर्लक्षित करतात अशी जाणीव झाली आणि माझी अशी काही कृती झाली की त्यातून प्राप्त होऊ शकणाऱ्या संभाव्य लाभाला घातक होती ( हे नंतरच जाणवतं) , तर सर्वप्रथम स्वतः बद्दल योग्य वाटून घ्यायचं, अजिबात खंत किंवा अपराधी वगैरे वाटून घ्यायचे नाही , कारण आपण आपल्या आत्मसन्मानाची कदर केली, त्याकडे आलो की विश्रामाची भावना जागृत होते.

हीच शिदोरी पुढे कामी येणार !



Thursday, 19 June 2025

खरंच मराठी उद्योजक घडवायचे आहेत?

मी काही नेटवर्क चा सदस्य आहे अनेक वर्षे. इथे व्यावसायिक मंडळी कोट घालून भेटतात. ह्या गोष्टीला अनेक जण नाके मुरडतात.

असेच मग सर्व साधारणपणे मराठी भाषा वापरताना , खास करून सरकार दरबारी , अत्यंत जड शब्द वापरले जातात. शब्दाला शब्द असा अतिरेकी आग्रह सोडल्यास नक्कीच बरं होईल, शिवाय प्रत्येक ठिकाणी मूळ इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द असायलाच हवा असं नाही ना ! 

तरीही प्रत्येक ठिकाणी, अगदी साधे साधे लिहायचे, बोलायचे झाले तरी इंग्रजी चा वापर का बरं ?

अजून एक म्हणजे :- हे कोणी सांगितले की मुलाना इंग्रजी शाळेतच घाला ? इथे मराठीचा दुस्वास करायचा, तिला निष्कारण कमी लेखायचं आणि मराठी उद्योजक घडवायचे !

आशेचा किरण 

नवीन शैक्षणिक धोरण मात्र आशादायक आहे. 
प्राथमिक वर्षांत तरी सरकारने मातृभाषा प्रमाण ठेवली आहे ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन

Monday, 9 June 2025

कर्मचाऱ्यांत खरी passion निर्माण करणारा उद्योजक

उद्योग जगतातील अवलिया हे लिहिणारे रिकार्डो सेमलर ही तसे पाहता जन्मजात धनवान व्यक्ती, ज्यांच्या वडिलांनी मशिनरी उद्योग निर्माण करून मोठा केला. रिकार्डो नी अगदीच लहान वयात ही जबाबदारी पुढे पेलली.

विशेष हे , की त्यांनी सर्व ढाचा, ज्या पारंपरिक पद्धतीने कंपन्या चालवल्या जातात, त्या त्रिशंकू व्यवस्थापनाला तोडून मोडून, कंपनी ही "मनुष्य" केंद्री केली. आणि प्रचंड यशस्वी करून दाखविली. 

भारताप्रमाणे ब्राझील मध्येही ट्रॅफिक, गर्दी इत्यादी समस्या आहेतच. त्यात लवचिक वेळा, स्वतः च स्वतः चे उत्पन्न ठरवणे, आपले ऑडिट आपल्या कनिष्ठ मंडळींकडून  करून घेणे, कर्मचारी मंडळीना नफ्यात भागीदार करून घेणे, ह्यामुळे त्यांना अपेक्षित तो परिणाम त्यांना लाभला :- सकाळी अत्यंत प्रेरित होऊन कामाला आतुर असलेला कर्मचारी वर्ग.

तरीही सर्व काही लोकशाही पद्धतीने व्हायलाच हवे असा त्यांचा दुराग्रह नाही. काही युनिट्स अगदी लष्करी खाक्याने देखील चालत आहेत त्यांची. कारण मुळात "माणूस" समजून घेतलेला आहे.

निरुपयोगी मेट्रिक्स काढून टाकणं, मशीन असेम्ब्ली करिता पट्टे नसणे, अनावश्यक कागदपत्रे टाळून एक पानी टाचणे, तसेच कर्मचाऱ्यांची ठोकळबाज उतरंड काढून टाकून नवी लहानशी कंट्रोल युनिट्स तसेच मला सर्वात भारी वाटलेली म्हणजे अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना त्यांनी राबविलेली उपग्रह उद्योग उपक्रम व्यवस्था. अर्थात कर्मचाऱ्यांना कंपनीचे भाग सप्लाय करण्याकरिता मदत, शिक्षण , तसेच संपूर्ण सहकार्य. अचंबित करणारे आहे सर्व.

काही वाक्यं मला खूप वेगळी वाटली ती खाली देत आहे :-
  • मिनिटा मिनिटाचा हिशोब ठेवणाऱ्या ला जीवनाची संकीर्णता समजूच शकणार नाही 
  • जेव्हा मी काहीच करत नसतो तेव्हा मी अतिशय कार्यकुशल असतो
  • जे निर्णयाचे परिणाम भोगणार आहेत त्यांच्यावर निर्णय सोडणे
  • तपशिलाचा चिखल
  • माहिती गोळा करायचा हव्यास
  • जेव्हा मी अर्धा दिवस, घरून काम करायचं ठरवलं तेव्हा सर्वांना वाटलं की मालकाचा मुलगा, आराम मिळावा म्हणून बहाणा करत असेल. त्यांची ही शंका दूर करण्याचे जाणीव पूर्वक प्रयत्न मी केले नाहीत.
  • माझी गरज आहे अशी परिस्थिती निर्माण होणं ही लाज आणणारी गोष्ट आहे
आणि अशी अनंत वाक्ये.

केळकरांनी देखील अगदी छान मराठीत वाक्ये वापरून अनुवाद करण्याचा यत्न केलाय. 

इतर अनेक अनेक अनुवादित साहित्या प्रमाणे ह्यातही मूळ इंग्रजी आहे ते प्रसंगी फोड करून, विलग करून आणि सोपे करून न सांगितल्याने अर्थ समजायला खूप अवघड जातं.

पण ते अगदीच माफ. कारण असे पुस्तक मराठीत आणणे ही कल्पना सुचणे, ते प्रत्यक्षात करणे ह्या सर्वकारिता केळकर : आपले आभार.