Thursday, 28 January 2021

'रीवोल्युशन' चे प्रिंटींगवाले - प्रसाद कात्रे

 मुलाखतीची ठळक वैशिष्ट्ये : -

वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील चढ उतारांना सामोरं जातांना त्यांनी दाखवलेला धीर आणि संयम शब्दांत बांधणं कठीण 🙆🏼‍♂️ माझ्या परीने प्रयत्न करतोय तरीही सगळ्यांना हीच विनंती करेन की प्रत्यक्ष मुलाखत ऐकाच 🙏

1.जन्मताच कलेची आवड असणारे कात्रे सरांचं बालपण 'भोर' ह्या निसर्गरम्य ठिकाणी गेलं.आजोबा शाडू मातीचे गणपती बनवायचे आणि सुदैवाने आजी-आजोबा 'हे करू नको, ते करू नको' असला सल्ला देणारे नसल्यामुळे कात्रे सरांचं मातीशी आणि पर्यायाने कलेशी नातं घट्ट होत गेलं.आईकडून गर्भातच शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रकला इत्यादींच देणं लाभल्याचं ते सांगतात.पुढे हि चित्रकलाच त्यांच्या आयुष्याची श्रेयस आणि प्रेयस झाली

2. एका शब्दात सांगायचं तर छपाई किंवा प्रिंटिंग हा कात्रे सरांचा व्यवसाय, पण त्याआधी आणि नंतरच्याही बऱ्याच प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग असतो आणि म्हणूनच सौमित्र सर त्यांना ' प्रिंटिंगवाले ' कात्रे सर असं संबोधतात

3.कुठल्याही व्यावसायिकाला विझिटिंग कार्ड, चलन किंवा जाहीरात पत्रक असं काहीतरी छापायला प्रिंटर ची गरज लागतेच.
प्रिंटिंगच्याही आधी डिझाइन करतांना ग्राहकाचं उत्पादन काय, कुठल्या भागात व्यवसाय करतात, वापरणारा ग्राहक वर्ग कोण इत्यादी गोष्टींचा विचार करून त्याअनुरूप आवश्यक त्या गोष्टी सुचवण्यापासून ते डिलिव्हरी देण्यापर्यंत ग्राहकाला जास्तीत जास्त मूल्याधारीत परतावा मिळवून देणे हा कात्रे सरांचा व्यवसाय मंत्र.

4.वडील हे एकटेच कमावणारे आणि कात्रे सर इयत्ता चौथीत असतांना वडिलांना मुतखड्याचा आजार झाला असतांना आपल्यालाही घर चालवण्यासाठी हातभार लावावा लागेल असं कात्रे सरांच्या मनाने घेतलं.संगीत आणि चित्रकला ह्या आपल्या आवडत्या छंदांपैकी संगीत क्षेत्रात काही एक मजल गाठून उत्पन्न मिळवण्याप्रत यायला वेळ लागेल हा विचार त्यावेळी कात्रे सरांनी केला आणि चित्रकलेत ते अधिक रस घेऊ लागले.अगदी तहानभूक हरपून दिवसच्या दिवस त्यांचा चित्र काढण्यात जात असे.

5.गुळवणी महाराजांचे अनुयायी आणि कात्रे कुटुंबाला वंदनीय असे श्री मामा देशपांडे यांनी दहावी नंतर कात्रे सर चित्रकलेत करिअर करणार असे वडिलांनी सांगताच थोडे नाराज झाले पण 2 - 3 दिवसातच कात्रे सरांची घालमेल पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना आपला हा छंद जोपासण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला मात्र त्याच्या बऱ्यावाईट परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागेल असेही बजावले.

6.अभिनव कॉलेजात कलेशी संबंधित शिक्षण घेत असतांना 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' पुणे ह्या संस्थेने कॅलिग्राफी (तेव्हाचं लेटरिंग आणि टायपोग्राफी) संदर्भातील कामासाठी कात्रे सरांची निवड केली.
मुंबई दूरदर्शनच्या एका कार्यक्रमाची श्रेयनामावली बनवून देण्याचं काम होतं आणि ते कात्रे सरांच्या अगदी हातचा मळ.
तिथे कात्रे सरांना छपाईतील पुनरुत्पादनाच्या (मूळ प्रतिसारख्याच अधिक प्रति तयार करण्याच्या) तंत्रज्ञानाची ओळख झाली.माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टींचं भांडारच उघडल्यासारखं झालं आणि त्याच्या कुतूहलापोटी कात्रे सर अधिक माहिती मिळवत गेले आणि नकळतपणे चित्रकलेची आवड असणाऱ्या कात्रे सरांचा 'प्रिंटिंग' च्या दुनियेत प्रवेश झाला.अभिनव मध्ये फोटोग्राफी शिकल्याचाही खूप उपयोग झाला हे ते इथे आवर्जून नमूद करतात.
पहिलंच काम 'लगान' चित्रपटातील अभिनेत्री 'सुहासिनि मुळ्ये' ह्यांच्यासाठी काही एक शक्कल लढवून काचेवर 'छपाई' केल्याचं ते सांगतात

7.त्याकाळी सरासरी 120 ते 150 रुपये पगार असताना व कॉलेजमध्ये शिकत असतानाच कात्रे सरांना मासिक 630 रुपये पगारावर FTII मध्ये काम करण्याची संधी मिळाली.त्यात कॉलेजमधून सकाळी 10 वाजताच निघून जाण्याची सवलतही होती. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत काम आणि 5 नंतर अगदी रात्री 1 वाजेपर्यंत कात्रे सर अनिमेशन शिकण्यात वेळ घालवू लागले. दोनेक वर्षांनी कात्रे सर तेथील जॉब सोडून एका 'ऍड एजन्सीत' रुजू झाले. एकच व्यक्ती ती एजन्सी चालवत होता त्यामुळे तिथे कात्रे सरांना भरपूर 'क्रिएटिव्ह स्पेस' मिळाला, निर्णयक्षमता वाढली आणि कामाचं समाधान ही मिळालं.
पण काही वर्षांनी कमअस्सल दर्जाच्या लोकांनी काम मिळवण्यासाठी अवाजवी सवलत देणे, त्याच काळात इंदिरा गांधींची हत्या आणि एकंदरच कामाच्या ठिकाणी अविश्वास अशा कारणांनी कात्रे सरांनी तेथील नोकरीचा राजीनामा दिला. स्वतःचा व्यवसाय सुरू करतांना कामाच्या दर्ज्याबाबत कसलीच तडजोड करायची नाही व आपले सहकारी हे आपल्यासाठी नव्हे तर आपल्याबरोबर काम करतायत अशी समान वागणूक त्यांना द्यायची असा त्यांचा पहिल्या दिवसापासूनचा नियम ठरला.

8.छापील कागदाचा अपव्यय कात्रे सरांना मान्य नाही त्यात कुठलही काम व्यवस्थित पूर्ण करतांना थोडे अधिकचे कागद लागतातच.
एकदा काम हातात घेतल्यावर आज मशीन बिघडलंय किंवा मशीन ऑपरेटर आला नाही वगैरे कारणं ग्राहकांना सांगणं कात्रे सरांना अजिबात मान्य नाही त्यामूळे कुणावरही अवलंबित्व नसणारं, कागद वाया न जाता कुठल्याही आकाराच्या आणि कितीही प्रति काढता येतील असं एखादं तंत्रज्ञान नक्कीच अस्तित्वात असणार आणि म्हणून मित्रांच्या मदतीने इंटरनेटवर त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली आणि त्यांना उत्तर सापडलं. मूळ प्रतिसारख्याच अनेक प्रति काढणं अर्थात ज्याला आपण (फोटो कॉपी म्हणतो) आणि ते देऊ करणारी कंपनी म्हणजे 'झेरॉक्स' ह्याची कात्रे सरांना माहिती झाली आणि त्यांच्या छपाई क्षेत्रातील 'डिजिटल' प्रवासाला सुरुवात झाली.

9.2006 - 07 साली 34 लाख रुपये किंमतीच 'झेरॉक्स' कंपनीचं मशीन अमेरिकेतुन पुण्यात मागवायचं असं कात्रे सरांनी ठरवलं. तशी ही त्याकाळी गरुड झेपच पण कात्रे सर त्या तंत्रज्ञानाने पूर्ण झपाटलेले त्यामुळे बँकेकडून कर्ज घेऊन मशीन मागवायचं ठरलं. बँकेनेही सुरुवातीला कर्ज  देऊ असं मान्य करून ऐन वेळेला नाही म्हटलं आणि 34 लाख रुपये जमा करतांना कात्रे सरांची फार त्रेधातिरपीट उडाली पण तो ही अडथळा त्यांनी पार केला आणि मशीन पुण्यात आलं. झेरॉक्स कंपनी चं भारतातलं हे बहुधा पहिलं मशीन.

10.मशीनच्या वापराची माहिती घेतांना कुठल्या गोष्टी नाही करायच्या ह्याची अचूक नोंद कात्रे सरांनी करून ठेवली

12.सुझलॉन कंपनीचं एक काम आपल्या कुवतीच्या बाहेरचं आहे हे जाणवल्यामुळे त्यांच्या मित्राने कात्रे सरांना ह्या कामाबद्दल माहिती दिली.
खिशात दमडीही नसतांना कामावरील विश्वास व प्रामाणिकपणा कात्रे सरांच्या बोलण्यातून जाणवल्यामूळे, सुझलॉन कंपनी ते काम कात्रे सरांच्या अटी शर्ती वर त्यांना देऊ केलं.

13.प्रिंटिंग क्षेत्रात 'ऑस्कर' शी तुल्यबळ ठरेल अशा 'PIXI' ह्या पुरस्काराने कात्रे सरांना गौरवण्यात आले आहे. दुदैवाने पासपोर्ट वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित ह्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही पण झेरॉक्स कंपनीनं इथे पुण्यात एक छोटेखानी समारंभ आयोजित करून कात्रे सरांचा यथोचित गौरव केला

14.तशाच अजून एका कार्यक्रमात स्वतःकडच्या मशीनवर छापलेलं पुस्तक त्यांनी 'झेरॉक्स' कंपनीच्या मार्केटिंग मॅनेजरला दाखवलं आणि तो हबकलाच.हे काम आपल्याच कंपनीच्या मशीनवर केलंय ह्यावर त्याचा विश्वासच बसेना.त्याने लागलीच 'इंडियन प्रिंटर्स अँड पब्लिशर्स' ह्या मासिकाचा संपादक त्या कार्यक्रमात हजर होता त्याला बोलावून ताबडतोब कात्रे सरांची मुलाखत घ्यायला लावली.

15. वैयक्तिक आयुष्यात बरीच वादळं कात्रे सरांनी झेलली.
वडिलांना विस्मृतीचा आजार आणि त्यातच त्यांचं 2014 साली निधन, पुढे कात्रे सरांची आई कर्करोगाने गेली.आईच्या निधनानंतर चार महिन्याच्या कालावधीत धाकटा मुलगा रोशनला रक्ताचा कर्करोग असल्याचं निष्पन्न आणि अजूनही रोशनवर उपचार सुरू आहेत पण कात्रे सर डगमगलेले नाहीत आणि म्हणून त्यांना भेटलं की माझ्यातील सकारात्मकता दुप्पट होते असं सौमित्र सर म्हणतात.

16.त्यांना इथेच थांबायचं नाही.
स्वतः सारखं दर्जेदार आणि प्रामाणिक काम करणारी, पर्यावरणाची काळजी करणारी, ग्राहकांना त्यांनी दिलेल्या कामाचं समाधान आणि मोल मिळवून देणारी, अशी माणसं त्यांना तयार करायची आहेत.
इथे ते त्यांची सहकारी राजश्री जी अतिशय समर्पित होऊन काम करते तिचा जरूर उल्लेख करतात.

17.पुणे विदयार्थी गृहाच्या एका पुस्तकाच्या उदघाटनाप्रसंगी त्यांनी कात्रे सरांनाच वक्ता म्हणून पहिल्यांदा बोलायला सांगितलं,
तसेच सॅटर्डे क्लबच्या 'उद्योग दिंडी' ह्या समारंभात पडदयावर आधी भारताचा तिरंगा झळकला आणि त्यावर नंतर अशोक चक्र, पुढे अशोक चक्र हळूहळू धूसर होत जाऊन कात्रे सरांनी 'उद्योग दिंडी' चा केलेला लोगो झळकला.
वरील दोन प्रसंग आपल्याला मानाचे आणि कायम स्मरणात राहणारे असल्याचे ते सांगतात.

आपल्या वागण्या बोलण्यातून, कामातून, ओघवत्या वाणीतून व्यावसायिकतेचा आणि सकारात्मक विचारसारणीचा वस्तुपाठच घालून देणाऱ्या प्रसाद कात्रेंना 'निवडक उद्यमी' तर्फे मानाचा मुजरा 🙏🏾आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

शलाका टोळ्ये - 'IP Adventure LLP' ची पार्टनर - ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि पेटंट एजंट

 मुलाखतीची ठळक वैशिष्ट्ये :-

1. सौ शलाका टोळ्ये हिचा जन्म मुंबईतील उपनगर - डोंबिवलीचा, तिथेच बालपण, महाविद्यालयीन शिक्षण, रसायनशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम तिने पूर्ण केला

2. यु.एस.व्हिटामिन ह्या कंपनीच्या 'संशोधन व विकास' ह्या विभागात अधिकारी पदावर 7 वर्षे कार्यरत

3.त्याकाळात प्रयोगशाळेत काम करताना वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियांचे निरीक्षण, नमूने तयार करणे, त्याच्या नोंदी, कच्चा माल मागविण्यापासून ते प्रत्यक्ष जागेवर जाऊन चाचणी करणे इत्यादी कामाचा अनुभव

4.दरम्यानच्या काळात लग्न व मुलगी झाल्यानंतर तिच्या संगोपनासाठी शलाकाने तात्पुरत्या काळासाठी व्यावसायिक कामातून रजा घेतली

5.पुढे पती श्री राजीव टोळ्ये ह्यांची नोकरीनिमित्त पुण्यातील कोथरूड भागात बदली झाल्यामुळे जून 2008 साली शलाका पुण्यात आली

6.चार ते पाच महिने मैत्रिणीच्या केकशॉप मध्ये सुपरवायझर म्हणून काम केल्यावर एस.एन.डी.टी. महाविद्यालयात रसायनशास्त्राची व्याख्याता म्हणून ती रुजू झाली

7.जवळच्या पाळणाघरात मुलीला ठेवून महाविद्यालयात शिकवणे अशी कसरत जवळपास वर्षभर शलाकाने केली

8.पुढे 2010 साली पुण्यातील हडपसर भागात रहायला गेल्यामुळे शलाकाला अध्यापन अर्धवट सोडून द्यावे लागले

9.पुढील 5 ते 6 वर्षे आठवी ते दहावीच्या विदयार्थ्यांना विज्ञान व गणित विषयाची शलाका शिकवणी देत असे

10.दरम्यानच्या काळात कौटुंबिक जबाबदारीमूळे नोकरी किंवा व्यवसायात खंड पडलेल्या पदवीधर, इंजिनियर किंवा अगदी पीएचडी मिळवलेल्यांना सुद्धा व्यावसायिकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या भारत सरकारच्या 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' विभागाच्या 'महिला वैज्ञानिक उपक्रमाची'(Woman Scientist Scheme) माहिती एका मैत्रीणीने शलाका दिली

11.ह्या उपक्रमाअंतर्गत शलाका ने 'बौद्धिक मालमत्ता अधिकार' ह्या विषयावरील 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, तसेच त्याच्या अभिमुखतेसाठी महिनाभर दिल्लीला देखील वास्तव्य करावं लागलं

12.त्यानंतर वर्षभर एका कायदेविषयक कंपनीत ट्रेडमार्क व पेटंट संदर्भातील खटले दाखल करणे, पेटंटचा मसुदा तयार करणे इत्यादी कामात प्राविण्य मिळवतानाच, अभ्यास करून  'पेटंट एजंट' ची परीक्षा उत्तीर्ण होऊन शलाका 'नोंदणीकृत भारतीय पेटंट एजंट' झाली

13.संभाव्य संशोधक आपल्या संशोधनाबद्दल भावुक असतात आणि आपल्या संशोधनाला कुठल्याही परिस्थितीत मान्यता मिळावी अशीच त्यांची इच्छा असते परंतु त्यांच्यासारखे संशोधन जगात पूर्वी कुठे झालेले आहे का हे पाहणे पेटंट एजंटचे मुख्य काम. ह्या वर्षभरात संभाव्य संशोधकांशी बोलताना ह्या विषयावर जनजागृती करण्याची गरज शलाकाच्या लक्षात आली होती व त्याबद्दल तिने ब्लॉग लिहायचा प्रयत्न देखील केला होता

14.बौद्धिक मालमत्ता अधिकार संदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण करतांना भेटलेल्या मैत्रिणीबरोबर (सौ पल्लवी कदम) सतत ह्या जनजागृती व्यवसायाबद्दल चर्चा होत असे आणि म्हणून त्यादोघींनी 13 सप्टेंबर 2019 रोजी IP Adventure Llp ही  कंपनी सुरू केली

15.कंपनी सुरू झाल्यापासून 'बौद्धिक मालमत्ता अधिकार' ह्या विषयावर,
-10 ते 12 जनजागृती व्याख्याने,
-15 पेटंट
- 8 ते 10 ट्रेडमार्क त्यांच्यातर्फे नोंद झाली आहेत.

-हार्ट ऍग्रो इन्स्टिट्यूटचे  प्रोसिक्युशन पेटंट वर्षभरातच मान्यता मिळण्याच्या वाटेवर आहे

-इंडस्ट्रीयल डिझाइन संदर्भातील पेटंटवर देखील काम सुरू आहे

शलाका आणि पल्लवी ' भारतीय युवा शक्ती ट्रस्ट च्या मेंटर्स आहेत.

16.ताणतणाव दूर करण्यासाठी वाचन आणि व्यायामाला शलाका महत्व देते पण तिचं कामं च तिची आवड असल्यामुळे दमत जरी असली तरी फारसा तणाव येत नाही असं ती सांगते

17. परदेशी मुलांना अगदी तपशिलात नसली तरी 'बौद्धिक संपदे' बद्दल किमान माहिती असते, त्यामुळे आपल्याकडच्या मुलांना विद्यार्थीदशेतच ह्या क्षेत्राची माहिती व्हावी आणि त्याचे महत्व पटल्यामुळे त्यांच्याकडून नवनिर्मिती व्हावी, निरनिराळे शोध लागले जावे ह्या दृष्टीने प्रयन्त करण्याचे आणि खऱ्या अर्थांने आपली कंपनी वैश्विक करण्याचे शलाका आणि पल्लवीचे उद्दिष्ट आहे.

त्यांच्या ह्या उपक्रमाला 'निवडक उद्यमी' तर्फे शुभेच्छा 💐

 अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या

www.ipadventure.in

गायत्री अकोलकर - "विद्युत विकास" ह्याकंपनीची तिसऱ्या पिढीची महिला उद्योजिका

 मुलाखतीची जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये :

1.आजोबांपासूनचा व्यवसाय आणि घरात सतत त्यासंबंधीचे शब्द जरी कानी पडत असले तरी त्याच क्षेत्रात अभियांत्रिकीची पदवी आपण घ्यायची असं ठरविणे आणि जिद्दीने ती मिळवणे ह्याबद्दल गायत्रीचे अभिनंदन

2.सर्वसाधारणपणे पुरुषांचाच वावर असणाऱ्या ह्या व्यवसायात येताना स्त्रीत्वाचा कसलाही न्यूनगंड न बाळगणे व वडीलांनीही काही पायघड्या घातल्या नाहीत आणि त्यामुळे तो प्रवास रंजक किंवा छान झाला ह्या गायत्रीच्या विचारसरणीचे देखील कौतुक

3.सासऱ्यांच्या व्यवसायात येण्याचा गायत्रीचे पती श्री कुणाल जोशी यांचा निर्णय तसा बऱ्याच अर्थानी धाडसी म्हणावा असा 🙂

4.ग्राहकांच्या प्रतिक्रियेकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांचे विजेचे बिल कमी करण्यासाठी काय करता येईल ह्या विचाराने गायत्रीने पुढे एनर्जी मॅनेजमेंट ह्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे

5.कमिन्स इंडिया ह्या कंपनीत काम करतांना 'एनर्जी सेविंगचे प्रारूप' तयार करून दिल्यामुळे कंपनीचे दरवर्षाला 67 लाख रुपये वाचतायत हे गायत्री कंपनीतुन निघाल्यानंतरही तिच्या परदेशी वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतःहून तिच्या 'लिंकड इन' प्रोफाइल वर आवर्जून सांगणे

6.ऑफिस मध्ये बसूनच काम करण्याचा रटाळपणा न मानवल्यामुळे 'विद्युत विकास' साठी पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय

7.'विद्युत विकास' ह्या घरच्याच कंपनीत 'एनर्जी ऑडिट' हा पूरक असा अजून एक महसूल स्रोत सुरू करणे

8.'एनर्जी ऑडिट' ह्या क्षेत्रात शैक्षणिक संस्था व बँका ह्या दोन उद्योगक्षेत्रात वेगवेगळे ग्राहक कायमस्वरूपी जोडून घेणे

9.पती श्री कुणाल जोशींनी कॉर्पोरेट क्षेत्रातील ग्राहक जोडणे

10.उद्यम रजिस्ट्रेशन असल्यामुळे सरकारी टेंडर भरताना EMD (Earnest Money Deposit) बात करून घेता येतो ही महत्वपूर्ण माहिती देणे

11.घरावर सोलर पॅनल बसवून तयार होणारी वीज वापरून एम एस इ बी च्या वीज वापरात वजावट करून देणे अशा प्रकारचे  प्रकल्प सध्या गायत्री राबवतेय.

तिच्या व्यवसायतील पुढील वाटचालीस 'निवडक उद्यमी' तर्फे
शुभेच्छा 💐

अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या

www.vidyutvikas.com


Monday, 25 January 2021

मित्रांनो, नमस्कार !

निवडक उद्यमी वर हि अगदी पहिलीच पोस्ट !

अगदी sample म्हणून समजा हि पोस्ट. काही नियम स्वत:हूनच पाळूयात :-

व्यावसायिक , स्वत: चे प्रभुत्त्व सिद्ध करणाऱ्या पोस्ट्स असूद्यात 

केस स्टडीज, काही विशेष बाबतीतले यश , मान सन्मान अगदी विस्ताराने लिहून सांगण्यासाठी ह्या space चा छान वापर करा !

labels ह्या पर्यायाचा वापर करा पोस्ट च्या विषयासाठी !

बाकी करता करता शिकूच !