Friday, 14 October 2022

जागतिक मानसिक आरोग्य दिन - वृंदा आंबेकर



आरोग्य, स्वास्थ्य म्हटलं कि आपल्या मनात आहार, व्यायाम याबद्दल विचार येतात. आता मी जर 'मानसिक आरोग्य किंवा स्वास्थ्य' असं म्हटलं तर अनेकांच्या भुवया उंचावतील. हे आपल्यासाठी नाही असेही वाटेल. पण जर मी हे  सांगितलं कि आज दहा  माणसातील किमान एक माणूस मानसिक समस्येने त्रस्त आहे तर? 

मी मानसिक समस्या म्हणत आहे; आजार नव्हे. stress, anxiety  किंवा depression याच्या कोणत्यातरी पातळीवर दहातील एक माणूस आहे. त्यात आपला नंबर नाही ना? हा विचार येणारच आणि आला नाही तर  तो करायला हवा. 

आज १० ऑक्टोबर- जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी ही गरज WHO ला वाटावी यावरून त्याचे महत्व कळते. आपल्या शारीरिक आजारांपैकी साधारण ७०% आजारांचे मूळ मानसिकतेत आहे हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे याकडे सजगपणे पाहणे, त्याबद्दल जाणून घेणे निकडीचे आहे.
माणूस सुख, आनंद यासाठी सतत प्रयत्नशील असतो. काळाबरोबर त्यांच्या व्याख्या बदलल्या. ते मिळवण्याच्या  प्रवासात मानसिक पातळीवर काय काय घडते याबद्दल तो अनभिज्ञ असतो किंवा त्याकडे लक्ष देणे जरुरी वाटत नाही. सुखाच्या वस्तू पायाशी लोळण घेत असल्या तरी मानसिक स्वास्थ्य नसेल तर उपभोगातला आनंद कसा मिळणार?
 
बाहेरून माणूस कितीही शांत दिसत असला तरी आत काय चालले आहे हे कोणाला कळत नाही, कदाचित त्याला स्वतःलाही. मनावर असणारा सततचा ताण, चिडचिड, उत्साह न वाटणे हि मानसिक अस्वास्थ्याची प्राथमिक लक्षणे असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा स्वीकार करून काय काम करता येईल याचा योग्य वेळेत विचार केल्यास  पुढील पातळीवरील डिप्रेशन, anxiety किंवा व्यसन यापासून दूर राहणे शक्य आहे.  

यासाठी आपल्या भावनांशी मैत्री करायला शिकले पाहिजे. भावनांकडे लक्ष देणे, त्यांना अचूक नाव देणे आणि त्यांचा चांगला- वाईट असे लेबल न लावता स्वीकार करणे हे शिकले पाहिजे. सगळ्याच भावना गरजेच्या असतात. त्या व्यक्त कशा प्रकारे केल्या जातात हा भाग वेगळा. त्या दाबून टाकणे किंवा overreact होणे हे दोन्ही धोकादायकच. इतरांपेक्षा आपल्यासाठीच. सततची overreactive प्रवृत्ती आपली physiology काही अंशी बदलू शकते आणि दाबलेली भावना वाफेसारखी कधी कुठे बाहेर पडेल याचा नेम नाही. कधी कधी अगदी लहानपणी कळत नकळत दबल्या गेलेल्या अशा भावना तारुण्यात किंवा वृद्धापकाळातही डोके वर काढू शकतात - मानसिक किंवा शारीरिक आजाराच्या रूपात. 

आजूबाजूला काय घडते याचा तपशील आपण ठेवत असतो पण मनाच्या सागरात काय चालले आहे याचा पत्ताही नसतो. हिमनगाच्या पाण्याच्या खालच्या भागाची कल्पना आली नाही तर काय होते याचे 'Titanic' हे बोलके उदाहरण आहे.  

NOAM SHPANCER च्या मते मानसिक स्वास्थ्य हे अंतिम साध्य नाही तर ती एक प्रक्रिया आहे. तुम्ही कुठे चालला आहेत यापेक्षा कसे चालला आहात हे महत्वाचे आहे.

मग आजच्या दिवसाचे औचित्य साधून भावनांशी मैत्रीचा संकल्प  करू या, त्यांच्याविषयी सजगता बाळगू या  आणि एका मानसिक स्वस्थ जीवन प्रवासाची वाटचाल सुरु करू या.

वृंदा आंबेकर
Emotioal Intelligence Trainer
Mindfulness Therapist
Parenting Coach
emozance@gmail.com

No comments:

Post a Comment

निवडक उद्यमी हा संवाद साधणारा platform आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा. खूप प्रक्षोभक वगैरे अपेक्षित नाही. सकारात्मक टीकेला मात्र जरूर वाव आहे.