Thursday, 13 November 2025

तोच ( ग्राहक ) च नसेल, तर मी कुठून असणार !

​नेटवर्किंग मध्ये काम करत असताना कसे कसे अनुभव येत राहतात, जे शिक्षण म्हणून नाही घेतले ना, तर नक्की वैफल्य येईल. नुकताच आलेला एक अनुभव असा :

मला प्रवासाला जायचे होते. मी शक्यतो माझी हॉटेल खोली वगैरे माझी मीच पोर्टल वरून बुक करून जात असतो. गेल्या वेळी मला असे वाटले, की एखाद्या प्रवास यात्रेच्या सुविधा देणाऱ्या एखाद्या व्यावसायिक व्यक्तीमार्फत हे काम करावे. उद्देश असा की फक्त कमी पैशात सर्व काही असे न असता जरा ऐसपैस , तिथली रूम सेवा वगैरे बद्दल माहिती असलेल्या व्यक्तीने हे करून द्यावे. थोडे अधिक पैसे द्यायची माझी तयारी आहेच. सेवेला मोल असावेच. शिवाय बिझनेस नेटवर्क मधील मेंबर असल्याने जरा अधिक विश्वसार्हता वगैरे.

मी भरपूर वेळ हातात ठेवून वगैरे संपर्क केला, वेळोवेळी रिमाइंड केले. उत्तर “झालय हो, टेन्शन नका घेवू” हे पालुपद. शेवट अगदी प्रवासाच्या २-३ दिवस आधी १०० टक्के आगावू रक्कम भरून हॉटेल रूम बुक केली. दुर्दैवाने मी आजारी पडल्याने रद् लागणार असे दिसले. सदर व्यक्तीला हे सांगताच ताबडतोब उत्तर “पैसे परत मिळत नाहीत एक दिवस अगोदर रद्द केले तर” ! 

एकतर दोन दिवस होते हातात. किमान प्रयत्न करणे आणि त्याचे आश्वासन देणे तरी निश्चित शक्य होतच. 

फक्त हेच हिने केले नाही पण परस्पर मला न सांगता खात्यात refund जमा झाला. 

परिणाम महत्त्वाचा असला तरीही थोडा संवाद अपेक्षित आहे.

बाकी काही असो, पण मला का कायमच प्रश्न सतावत आलेला आहे … की आपण जे काम करत असतो ना, अगदी कोणतेही, ते कुणा तरी करिता असते नाही का ? 

म्हणजे असं… की तो जो … ज्याच्या करिता हा खटाटोप मांडलेला असतो, त्यालाच खोडून काढल्यासारखे झाले ना हे. तेही सेवा व्यवसाय ! Communication matters 

शिवाय, बिझनेस नेटवर्क, जिथे फक्त एकमेकांच्या ओळखींचा व्यापार असतो, तिथे तर हे फार घातक ठरू शकते, नाही का ?

पूर्वी माझे एक मशीनरी चे पुरवठादार होते. माझा व्यवसाय मार्केटिंग करून मागण्या मिळविणे व जी मंडळी ती मशीन्स तयार करतात त्यांच्याकडून तयार करून घेवून ती पुरवणे ह्या प्रकारचा होता. तर कधी कधी ह्या पुरवठा दारांकडून वेळोवेळी विविध मशिनरीची वेगवेगळ्या ( म्हणजे मशीन तेच असेल, परंतु समोरून त्या मशीनकडून ईप्सित कार्य बदलले की मॉडल मध्ये बारीक बदल होत असे. ) किंमतपत्रकांची गरज भासायची. त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडून ही किंमत पत्रके पुन्हा पुन्हा घेत असू. बरेच लोक द्यायचे सुद्धा. मान्य, की कधी कधी माझ्याकडून सुद्धा पूर्वी मागितलेले किंमतपत्रक पुन्हा मागविले गेले असावे. तरी मलाही भान होतेच की ! पण माझ्या ह्या मित्राने मात्र मला खणखणीत सांगून टाकले “आता ह्यापुढे मी तुम्हाला कोणतेही कोटेशन देणार नाही” 

एक दुसरा पुरवठादार होता, तो म्हणाला : “तुम्ही नुसतीच कोटेशन्स घेत राहता. ऑर्डर तर कधीच देत नाही !” 

ह्या दोघांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल मला नक्कीच आदर वाटतो. पण आपला धर्म , उदरनिर्वाह हा वेळ विकून होत नाही ( आपण नोकरदार नाही ). ह्या अर्थी आपण सांगत आहोत की “अमुक आमच्याकडे आहे , तर ते तुम्ही घ्या”. मग समोरून विचारणा होणार. तर ह्याच मूलभूत संकल्पनेला छेद दिल्यासारखं झालं ना हे. ह्या उलट एक व्यक्ती म्हणाली तीन वेळा नाही तीनशे वेळा विचारा सर. मी देतच राहीन. ह्या व्यक्तीशी पुढे घनिष्ठ मैत्री झाली. गुज्जू भाई. त्याचं म्हणणं : सुरुवातीला तुझ्याकडून जास्त प्रश्न येतील. हळूहळू कमी होतील.पण तू ट्रेन झालास की मला तुझ्याचकडून भरपूर धंदा येईल ना बाबा ! 


उगाच नाही लोक गुजराथी मंडळींकडून धंदा शिकत !