Monday, 15 April 2024

जो गरजते हैं वह बरसते नहीं

आपल्याला प्रतिक्रियांवरून त्वरित अनुमान लावायची एक विचित्र सवय जडली आहे. ही तशी जुनाट कोड असली तरीही सोशल मीडिया च्या वापरापासून या सवयीला जरा अधिकच उचल मिळाली आहे हे मात्र खरे.

झालं असं की आमच्या एका फोरमवर एक सदस्य अतिशय उत्कृष्ट असा त्यांचा कंटेंट शेअर करत असतात. हा त्यांचा कंटेंट ते त्यांच्या व्हाट्सअप पोस्ट द्वारे शेअर करतात. या पोस्ट या थेट व्हाट्सअप वर लिहिलेल्या पोस्ट असत. 

मध्ये नुकतंच त्यांनी वर्ड फाईल तयार करून त्याची इमेज स्वरूपात पोस्ट त्या ग्रुप वर शेअर केली. वर्ड मध्ये फॉरमॅटिंग केलं असल्यामुळे ही पोस्ट आकर्षक व सुबक स्वच्छ दिसू लागली. साहजिकच अनेक मंडळींनी आता "अशाच प्रकारे पोस्ट करत राहा" असा त्यांना सल्ला दिला. 

सदर व्यक्तीने हा सल्ला ताबडतोब मानला आणि त्या पुढील पोस्ट ते या स्वरूपात करत आहेत. 

आता आपण हे चटकन अनुमान काढू शकतो की हाच योग्य मार्ग आहे. तरीही हे पूर्णतः सत्य असेलच असं नाही कारण मी स्वतः या प्रकारच्या पोस्ट वाचत नाही. त्याचं कारण म्हणजे त्यातला आशय हे नसून ती पोस्ट कशा स्वरूपात माझ्याकडे पोहोचते हे आहे. 

म्हणजे असं की ही वर्डची इमेज स्वरूपात केलेली पोस्ट आधी आपल्याला डाऊनलोड करून घ्यावी लागते. त्यानंतर ती स्वच्छ दिसण्याकरता त्याला इनलार्ज करावी लागते. या प्रक्रियेमध्ये ही पोस्ट आपल्या मोबाईल च्या मार्जिनच्या बाहेर जाते. म्हणजेच मोबाईलवर वाचण्यायोग्य सुलभ राहत नाही. आणि याच कारणाने मला ते नकोस वाटतं. तरीही ही नकोशी वाटणारी गोष्ट मी सदर व्यक्तीच्या एकदा सौम्य स्वरूपात निदर्शनास आणून दिली. मी कदाचित एकटाच असल्यामुळे त्याला तितकसं महत्त्व दिलं गेलं नसावे. त्यामुळे त्यांच्या चांगल्या असणाऱ्या पोस्टचा झरा अविरतपणे तशाच प्रकारे सुरू आहे. आणि मला फक्त त्या पद्धतीमुळे ते वाचायला त्रास होतो. त्यामुळे ते वाचले जात नाही. 

मी ते काही करून व्यवस्थित वाचणे योग्य करून वगैरे पुढे वाचेनच. पण प्रश्न तो नाही. 

आपल्याला आपला आशय किंवा आपण जे म्हणतो ते लोकांपर्यंत पोहोचविण्याची जर इच्छा असेल तर आपण तो आशय ज्या पद्धतीने वापरला जातो याचा किमान अभ्यास करून त्या प्रकारे तो आशय निर्माण करायला हवा. 

अगदी इतकं जमलं नाही तरीही निदान ज्या प्लॅटफॉर्मवर तो पोस्ट करत आहेत त्यावर तो मुळात कशाप्रकारे सहज सुलभ घेतला जाऊ शकेल याचा किमान विचार करणे आवश्यक आहे. व्हाट्सअप वर जर सहज टाकलेले टेक्स्ट मेसेज काहीही न करता पटकन वाचता येत असतील तर ते त्याच पद्धतीने करायला हवेत. 

आणि मूळ म्हणजे फक्त प्रतिक्रिया देणारे आपले प्रेक्षक वर्ग किंवा ग्राहक असा समज करून घेऊ नये. माझा तर असा अनुभव आहे की जे लोक फार प्रतिक्रिया देत नाहीत किंवा गप्प राहणे पसंत करतात हेच लोक माझे अनेक वर्ष ग्राहक राहिलेले आहेत. तेव्हा यातून योग्य तो धडा घेऊ आणि कामाला लागू.