6 ऑक्टोबर 2023 रोजी 'निवडक उद्यमी' च्या साप्ताहिक मीटिंग मध्ये 'थकलेले पैसे वसूल करण्याची प्रक्रिया' ह्या विषयावर सौ.छाया गोलटगावकरांची मुलाखत झाली.
'ह्युमन रिसोर्स ऑफिसर', डॉक्टर, वकील यांसारख्या व्यक्ती ह्या मुळातच सहानुभूतीपूर्वक असाव्यात असा ह्या पेशांचा घटनादत्त अपेक्षित स्थायीभाव पण जमिनीवरील परिस्थिती नेमकी कशी उलटच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. छायाताई मात्र ह्याला सन्माननीय अपवाद ठरल्या.
दैनंदिन जीवनात रेंगाळलेली कामं, त्यात झालेली आर्थिक आणि भावनिक गुंतवणूक, वेळेचा अपव्यय आणि त्यामुळे येणारं नैराश्य ह्या सगळ्यामुळे आपल्याकडे येणारा व्यक्ती कावलेला असतो ह्याचं भान त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. मुलाखतीच्या सुरुवातीलाच वकिली हा एक उदात्त व्यवसाय आहे आणि आपण त्याच्या प्रतिनिधी आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं.
पैसे थकवणं, किंवा सामाजिक स्तरात आपल्यापेक्षा वरचंढ असलेल्यांकडून होणारी दंडेली आणि मानहानीकारक वागणूकी विरुद्ध उभं राहणं हे सामान्यांचं कर्तव्यच आहे हेही त्यांनी बजावून सांगितलं.
स्वतःच्या ओळखीबद्दल लिहिलेल्या माहिती आणि प्रस्तावनेत त्यांनी सुचवलेले बदल त्यांच्या दक्षतेची आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीची साक्ष देतात.
मुलाखतीच्या विषयावरील त्यांचं प्रभुत्व, तांत्रिक माहिती, काही क्लुप्त्या आणि एकंदरच संयतपणे विषय मांडण्याची पद्धत वादातीत होती (त्याबद्दल अधिक लिहीत नाही - प्रत्यक्ष मुलाखतच लोकांनी ऐकावी हि अपेक्षा).
लिंक :- https://youtu.be/A0Q6U_MM_io?si=yC8Y5omrr-GWDCiW
एक कबुली मात्र जरूर देऊ इच्छितो -
मुलाखत कश्या पद्धतीने उलगडावी ह्याबद्दल झालेल्या चर्चेचे मुद्दे आणि प्रश्न लिखित स्वरूपात देण्यास माझ्याकडुन झालेल्या दिरंगाईबद्दल छायाताईंनी रास्त पण सौम्य आक्षेप माझ्याकडे नोंदवला आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढला.
त्याबद्दल क्षमस्व.
प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाला कमी अधिक प्रमाणात भेडसावणाऱ्या एका ज्वलंत विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलंत आणि वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात त्याबद्दल 'निवडक उद्यमी' तर्फे आभार आणि तुमच्या कारकिर्दीस अनंत शुभेच्छा.
------------
निशांत आवळे