माझ्याकडे सध्या एक जरा चांगली संधी निर्माण झाली आहे... म्हणजे त्यातून काहीतरी चांगले, व्यवसायात जरा घवघवीत परिणाम मिळवून देणारी अशी एक घटना घडत आहे. पुन्हा ह्यात हो/नाही आहेच.
"तू जरा जास्तच न होत असलेली किंवा साशंक बाजू बघत आहेस " असा विचार एका जवळच्या व्यक्तीने मांडला.
हा एक लोकप्रिय गैरसमज आहे. माझ्या बाबत नव्हे, तर एकंदरीतच.
अनुभवाधारित, सारासार विचार करणे; हे योग्यच आहे नाही का ? पूर्वी मला अशा संधींच्या बाबत अनुभव असेल, तो गाठीला धरून निर्णय घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत अयोग्य अशा काहीही Commitments न देणे ह्याला जर महत्त्व देवून विचार केला तर तो योग्यच आहे; निदान माझ्या पुरता तरी.
माझे व्यावसायिक आणि पर्यायाने सारासार आयुष्य कमीतकमी गुंतागुंतीचे रहावे व मला माझ्या हातातल्या प्रत्यक्ष कामावर अधिकाधिक लक्ष देवून ते ग्राहकासाठी जास्त सुयोग्य कसे राहील, इथे माझा प्रमुख विचार असायला हवा.
तर वरील घटनेच्या संदर्भात होत असं होतं, की मी त्याला अवास्तव (हो, अवास्तवच !) महत्त्व देत होतो, त्यामुळे त्यातील प्रत्यक्ष कामाचा वेळ वगळून उरलेल्या वेळातही स्वप्न रंजन किंवा इतर समांतर विचार वगैरे करत बसलो होतो. नशीब वेळीच डोके ठिकाणावर आले. तेही एक वेगळीच घटना आठवल्याने ....
परचुरे शास्त्री नामक व्यक्तीस समाजाने फक्त त्याला महारोग झाला म्हणून वाळीत टाकले होते. परिणामी त्यांच्या जखमा, त्याची मलमपट्टी हा विषय तर बादच. महात्मा गांधी ह्यांनी त्यांना सेवाग्राम येथे आणले व स्वत: त्यांची रुग्णसेवा केली. हा विचार आजच्या "आनंदवन" च्या मुळाशी आहे. ज्यामुळे बाबा आमटे प्रेरित झाले.
हे सुरु असतानाच देशाच्या भविष्याला कलाटणी देणारा १९४२ चा चले-जाव संग्राम, त्याची रणनीती वगैरे खलबते, तसेच योजना प्रत्यक्ष सेवा ग्रामात सुरूच होत्या. नेहरू वगैरे सर्व मोठे नेते तेथे तळ ठोकून होते. किती खलबते सुरु असतील, कल्पना केलेलीच बरी.
अशाही परिस्थितीत गांधीजी मध्येच उठून जात. अगदी High Voltage मीटिंग असेल तरीही.... "मला शास्त्रींच्या जखमा धुवायची वेळ चुकवायची नाही" असा विचार ठेवून.
हातातले प्रत्येक काम तितकेच महत्त्वाचे आणि एक "सध्या बाजूला ठेवू" हा विचार माझ्या मनातून कायमचा खोडला गेला ह्या प्रसंगामुळे.
आणि परिणाम म्हणाल ? तर चलेजाव सुद्धा लक्ष्यभेदी ठरले तसेच रुग्णसेवा देखील. कारण बाबांनी हि कुटी पाहूनच तर प्रेरणा घेतली !